Wednesday, 5 October 2011

तात्काळ मनीऑर्डर सेवा उपलब्ध


प्रसिध्दी पत्रक                     दि.5 ऑक्टोंबर 2011
      
     वर्धा, दि.5-अधीक्षक डाकघर, वर्धा विभाग, वर्धा यांचेकडून वर्धा विभागातील वर्धा, हिंगनघाट, आर्वी,देवळी, सेवाग्राम व पुलगांव येथील पोस्ट ऑफीसमध्ये तत्काल मनीऑर्डर सेवा उपलब्ध आहे. तरी सर्व जनतेनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे अधिक्षक डाकघर, वर्धा कळवितात.
                        000000

शेतक-यांच्या अडीअडचणीसाठी मोफत दूरध्वनी टोल फ्री सेवा


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 5 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.5- जिल्ह्याच्या ठिकाणी शेतक-यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरीता व त्यावर उपाययोजना करण्याकरीता शासनाने किसान टोल फ्री सेवा दुरध्वनीवर शेतकरी बांधवांना निर्माण झालेल्या पिकासंबधी तसेच खतासंबधी अडीअडचणी, किडीचा प्रार्दुभावाबाबत माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी किसान टोल फ्री सेवा दुरध्वनी क्रमांक 07152-250099 असा असून या क्रमांकावर तक्रार दिल्यास त्यावर शेतकरी बांधवाना ताबडतोब आपल्या शंका, अडीअडचणीबाबत मोफत सल्ला तंत्र सल्लागारा मार्फत देण्यात येईल.
      जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, किसान टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 07152-250099 या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा़, असे  जिल्हा कृषी अधिक्षक,कृषी अधिकारी, वर्धा कळवितात.
                        00000

माजी सैनिकांना उद्योग स्थापण्यासाठी 10 ऑक्टोंबर पर्यंत प्रस्ताव आमंत्रित


प्रसिध्दी पत्रक                                 दि.5 ऑक्टोंबर 2011
        
     वर्धा, दि.5- महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे (मेस्को) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पिंपरी चिंचवड येथे 2.5 एकर जागेत औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येत आहे. या व्यावसायिक उपक्रमात इंजिनिअरिंग व ऑटोमोबाईल क्षेत्रातील संबंधीत सुटे भाग तयार करण्याचे प्रस्थापित आहे.
जे माजी सैनिक व इतर नागरीक, उद्योजक वरील उपक्रमात भाग घेण्यास इच्छुक आहेत अशा व्यक्तींनी व्यावसायिक प्रस्ताव   10 ऑक्टोंबर 2011 पूर्वी मेस्कोच्या पुढील पत्यावर पाठवावा. या उपक्रमात माजी सैनिक व अवलंबितांना प्राधान्य देण्यात येईल. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या.(मेस्को), रायगड, राष्ट्रीय युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे-411001 असा आहे.
                          000000

    महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.5ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
           जिल्हास्तरीय महिला गटासाठी क्रिडा स्पर्धा
  आता 7 ऑक्टोंबर रोजी
     वर्धा,दि.5-जिल्हास्तरीय महिला गट क्र.4 व्हॉलीबॉल, कबड्डी,खो-खो या क्रिडा स्पर्धाचे आयोजन दि. 5 ऑक्टोंबर 2011 ला करण्यात येणार होते. परंतू पटसंख्या पडताळणी मोहीमेमुळे सदर स्पर्धेचे आयोजन दि. 7 ऑक्टोंबर रोजी जिल्हा क्रिडा संकुल वर्धा येथे करण्यात येत आहे.
     जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था व क्रिडा मंडळे व खेळाडूंनी नोंद घ्यावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये यांनी कळविले आहे.
                              0000

आत्मा योजने अंतर्गत झंडू फुलाची विक्री


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.5ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
          
वर्धा,दि.5-जिल्ह्यातील स्थानिक कृषि गरजा आधारीत कार्यक्रम राबविण्यासाठी आत्मा ही संस्था जिल्हाधिकारी जयश्री भोज यांचे अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या योजनेतून फुलांची लागवड करुन सर्व सामान्य ग्राहकांना जास्त मागणीचे कालावधीत झेंडूची फुले उपलब्ध करुन देणे या हेतून तालुका फळरोपवाटीका,ता.बि.गु.केंद्र, तळेगाव, विरुळ, लाडणापूर या ठिकाणी आत्मा अंतर्गत झेंडू या फुलाची लागवड करण्यात आलेली असून उत्पादीत झेंडू फुलांची विक्री सध्यासुरु आहे.  
       जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा कार्यालय यांच्या परीसरात दसरा व दिवाळी या कालावधीत फिरता स्टॉल राहणार आहे.
     सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचा-यांनी सदर उपक्रमात सहभाग नोंदवावा. बाजारातील घाऊक व किरकोळ दरांचे सरासरीने विक्रीदर ठेवण्यात आले आहे. साधारणत: ग्राहकांना स्थानिक बाजार भावापेक्षा 10 रु. किलो फायदा राहिल. तरी आत्मा योजने अंतर्गत फूले उत्पादन व विक्री या नाविन्यपूर्ण उपक्रमास हातभार लावावा. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.
                              00000


पटपडताळणीचे साध्य !


विशेष लेख                   जिल्हा माहिती कार्यालय      
   वर्धा, दि.5/10/2011

       राज्यात 3 त 5 ऑक्टोंबर दरम्यान शालेय पटपडताळणी एकाच वेळी करण्यात आली. यात कागदावरच शिक्षण संस्था चालविण्यापासून पटसंख्या वाढवून शासकीय अनुदान लुटणा-या संस्था आणि संस्थाचालकांचे पितळ उघडे पडले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक अशा या पटपडताळणीत काय साध्य झाले याबाबत केलेला हा उहापोह.                          - प्रशांत दैठणकर
      शासन ही प्रभावी यंत्रणा आहे आणि मोठमोठी किचकट वाटणारी कामे देखील ही यंत्रणा सहजरित्या पार पाडू शकते हेच शालेय पटपडताळणीच्या रुपाने आढळून आलय. शिक्षणाची दुकानदारी करुन त्यात शिक्षणाचा मुळ हेतू बाजूला ठेवून केवळ कमाईसाठी शिक्षण संस्था काढणा-यांना या पडताळणीमुळे चांगलाच चाप बसणार हे स्पष्ट आहे.
     शिक्षण हा जीवनाचा मुलाधार आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण किमान प्राथमिक शिक्षण मिळालेच पाहिजे असा कायदा शासनाने केला आहे. शासन स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शाळा चालवून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नाही म्हणून खाजगी संस्थांना शाळा काढण्याची व अनुदान देण्याची भूमिका शासनाने घेतली मात्र कालांतराने यात अनुदान लाटण्याची शर्यतच लागली.
बदलत्या काळात मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढत आहे त्यामुळे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले. त्याप्रमाणात शिक्षकांच्या  जागा अतिरिक्त ठरायला हव्या होत्या मात्र शाळेतील पटसंख्येच्या आधारे शिक्षक नियुक्त करणे थांबलेले नाही.
      अनुदानीत संस्थांमध्ये आरंभी मानधन तत्वावर नेमणूक द्यायची आणि प्रत्यक्षात शासनाकडे मात्र नियमित नेमणूक दाखवायची या दोन वेतनातील फरक संस्था चालक घेतात असे प्रकार अनेक शाळांमधून दिसून येतात. पटसंख्येच्या आधारे नात्यातील व्यक्तींच्या नेमणूका करण्यापासून पुढे संपूर्ण शाळाच कागदावर उभी करुन चालवणारेही यातून समोर येत आहेत.
      शासनाने विद्यार्थ्यांना शाळेतच एकवेळ सकस आहार मिळावा तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढावे याकरिता माध्यान्ह आहार योजनेत शिधा द्यायला सुरुवात केली. यात धान्य मिळते सोबतच प्रति विद्यार्थी शिजविण्यासाठी पैसे देखील मिळतात. असे मिळणारे दुहेरी लाभ बनावट हजेरीपटाने वाढवता येतात तसेच पैसे घ्यायचे आणि मिळणारे धान्य बाजारात विकायचे असा प्रकार करणा-या संस्था आहेत.
शहरांमधील कित्येक नामांकित संस्था या प्रकारे शासनाची फसवणूक करतात हे स्पष्ट होत आहे. असे धान्य विकणा-यांवर आणि खरेदी करणा-यावरही कारवाई होण्याची गरज आहे.
     शाळेत इतरही अनेक सुविधांसाठी शासन विविध माध्यमातून पैसा पूरवित आहे. दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग होणे व मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा मुलांचा हक्क आहे.
     या शालेय संस्थांना शालेय अनुदान ज्यात वेतन व       भत्‍त्यांवर सर्वाधिक रक्कम खर्च होत असते. सोबतच शालेय पूरक अनुदान त्याचप्रमाणे क्रीडा अनुदान अशा विविध प्रकारचे अनुदान दिले जात असते. ते योग्यरित्या खर्च न होणे ही गंभीर बाब आहे परंतु काही संस्था हा प्रकार सर्रास करतात हे देखील पटपडताळणीत समोर आलेले आहे.
नेमणूक करण्यात आलेले शिक्षक पात्रता प्राप्त असले तरी त्यांना शिकवता येत नाही असाही प्रकार काही शाळांमधून समोर आलेला आहे. ज्या मुलांना आपण देशाचं भविष्य म्हणून बघतो त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले तरच पुढे संधी मिळणार आहे. उगाच शिकलो आहे म्हणण्यासाठी शिक्षण होत असेल तर त्याचा उपयोग काहीच नाही हे आपण मान्य केले पाहिजे.
     शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणा-या  सुविधा महत्वाच्या असतात. अनेक शाळांमधून मुलांना साधे स्वच्छ पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी खेळायला पटांगणच नाही अशी परिस्थिती आहे अशा स्थितीत मुलांचा सर्वांगिण विकास कसा होणार असा सवाल पडतो.
     या सर्व बाबींमुळे शालेय पटपडताळणीचा हा राज्यव्यापी उपक्रम आवश्यकच होता हे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण राज्याची संकलीत आकडेवारी समोर आल्यावर हे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
                        000000      

Monday, 3 October 2011

शालेय पटपडताळणी 2011


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.3 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------



              शालेय पटपडताळणीचे काम
             जिल्ह्यात एकाच दिवसात पूर्ण
वर्धा,दि.3-शाळा शाळांमधून प्रत्यक्ष  भेट देऊन शाळांकडून प्राप्त हजेरीपटांच्या पडताळणीचे काम वर्धा जिल्हयात आज पार पडले. जिल्हा प्रशासनाने मोठया प्रमाणावर यावर जोर दिला होता. स्वत: जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी काही शाळांना भेटी देऊन पडताळणीची पहाणी केली.
शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग वगळून इतर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही पडताळणी केली. राज्यात एकाचवेळी 3 ते ऑक्टोंबर या कालावधीत पडताळणी करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवसात तपासणी पूर्ण करण्याचानिर्णय जिल्हाधिकारी भोज यांनी घेतला व त्यानुसार हे काम झाले.
प्रशिक्षणाच्या दुस-या टप्प्यानंतर कालच सर्व पथकांना साहित्य वाटप करण्यात आले होते. या कामी 392 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. याकामी 150 वाहनांचे अधिग्रहण करण्यात आले होते. उपविभाग स्तरावर नियंत्रण ठेवण्यात आले. तर या तपासणीसाठी 13 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.    2 लाख 44 हजार 47  विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीच्या या कामात 2000 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग होता.या सर्व व्यवस्थेमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी समन्वय राखला.                                                         1451 शाळांमधील या तपासणीसाठी 15 पोलिस पथके निर्माण करण्यात आली होती. पडताळणीचे चित्रिकरण करण्यासाठी 373 कॅमेरे लावण्यात आले.              
जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी काही शाळांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच सुविधांबाबत पहाणी केली. लोकनायक विद्यालय हिंदनगर येथे पत्र्याच्या शेड मध्ये वर्ग भरता व लगतच उघडी विहीर आहे असे आढळून आले. ही विहीर झाकण्याची सूचना जिल्हाधिकारी भोज यांनी केली.
     यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी धार्मिक, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, तहसीलदार सुशांत बनसोड आदींनीही पहाणीत सहभाग घेतला.
     या शालेय पटपडताळणीत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नाव लिहिता न येणे तसेच जूलै व ऑगस्टच्या विद्यार्थी संख्येत तफावत काही ठिकाणी निदर्शनास आली.
     शासनाने नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर अशी पटपडताळणी केली त्यावेळी 20 टक्के विद्यार्थी बोगस आढळले होते. शासनस्तरावर याचा अहवाल प्राप्त झाल्यावर संपूर्ण राज्यात अशी संख्या सापडली तर शासनाचे 5000 कोटी रुपये वाचतील यासाठी हा राज्यभर पटपडताळणीचा निर्णय शासनाने घेतला आहे.