Saturday, 2 October 2021

 

               गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती व  अहिंसेचे प्रेरक

                                           -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Ø  सेवाग्राम आश्रमात बापूना केले अभिवादन

वर्धा, दि 2 ऑक्टो (जिमाका) :-  महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. सेवाग्राम आश्रम हे प्रेरणास्थान आहे. आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे असे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देत  बापुकुटीत प्रार्थना करून गांधीजींना अभिवादन केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी आदर्श आणि त्यागमय जीवन जगुन जगातील हजारो लोकांना प्रेरित केले. शिवाय आजही गांधींचे विचार जगाला प्रेरित करत आहे. आज महात्मा गांधींची जयंतीदिनी सेवाग्राम इथे येऊन मी स्वतःला धन्य मानत असल्याचे सांगितले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गांधी आश्रमात आगमन होताच खासदार रामदास तडस यांनी त्यांचे स्वागत केले. तर आश्रमप्रतिष्ठानच्या वतीने आश्रमप्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी स्वागत केले.यावेळी  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशासनाचे वतीने राज्यपालांचे स्वागत केले. आ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा,उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोडपे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, मिलिंद भेंडे, अविनाश देव आदींची उपस्थिती होती.

                                                                  0000













 

प्र.प.क्र -686                                                                              दि. 2.10.2021

                        भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मुल्यांचा

                        महात्मा गांधी यांच्या विचारात सारांश

                                                -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

Ø  वर्धेतील राष्ट्रीय परिसंवादात वैश्विक सांप्रदायिकतेवर विचारमंथन

Ø  दीपोत्सव उपक्रमाच्या माध्यमातून नव्या जाणिवांचा जागर

Ø  राज्यपालांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांना भावपूर्ण अभिवादन

वर्धा, दि २ (जिमाका) :- भारतीय समाजात प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या विविधांगी चिंतनाचा तसेच अनेक महान प्रेषितांनी मांडलेल्या तत्वज्ञानाचा संपूर्ण सारांश महात्मा गांधी यांच्या शिकवणीत आहे. त्यामुळे आज जगात विघटनकारी शक्ती सक्रिय झाल्या असतांना गांधी विचारच सा-या जगाला दिशादर्शक ठरु शकतो. असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज येथे केले. 

            राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयंतीनिमित्ताने आज येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे ‘गांधी का दर्शन  : वैश्विक सांप्रदायिकता का समाधान  विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे तसेच दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  विद्यापीठाच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह प्रसिध्द अभिनेते नितीश भारद्वाज आणि कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु रजनीशकुमार शुक्ल होते.

            महात्मा गांधी यांच्या विचाराचे औचित्य जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले, गांधी विचारांचा जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभाव आहे. कारण इथल्या संस्कृतीतील श्रेष्ठ विचारांचे गांधीजी हे समग्र रुप आहे. त्यामुळे गांधी समजून घेणे आज अतिशय महत्वाचे आहे. सत्य आणि अहिंसा ही दोन्ही मुल्ये परस्परपुरक आहेत. याच सत्यावर आधारलेला सत्याग्रह  बापुजींनी सुरु केला. या लढयात अहिंसा हे त्यांचे महत्वाचे शस्त्र होते. त्या माध्यमातून मोठया शक्तीशी त्यांनी संघर्ष केला. स्वत:च्या वैयक्तिक जीवनात त्यांनी या मुल्यांचे निष्ठेने आचरण केले. त्यामुळे त्यांच्या विचारांना कृतीशीलतेचे मोठे अधिष्ठान लाभले आहे.

गांधीजींनी ज्या मुल्यांचा पुरस्कार केला ती त्रिकालाबाधित श्रेष्ठ आहेत, असे सांगतांना राज्यपाल म्हणाले आज विविध समस्यांनी त्रस्त झालेले जग भारताकडे मोठया आशेने पाहत आहे. अशा जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती गांधीजींच्या विचारात आहे. प्रत्येकाला रोजगार देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा आग्रह हा त्यांच्या  नई तालीम या संकल्पनेचे आधुनिक रुप आहे. विविध मुल्यांचा अंगीकार करणारा भारताचा नागरिक जगासाठी मार्गदर्शक व्हावा हे स्वप्न त्यांनी पाहिले.  या शिकवणीची मुळे ही त्यांच्या संस्कारात आढळतात त्यामुळे पूजा आणि  चर्चा यापलीकडे गांधी विचारांचे जीवनात प्रत्यक्ष आचरण करणे गरजेचे आहे तरच सांप्रदायिकता समाप्त होऊ शकेल. हिंदीच्या प्रचारप्रसारासाठी गांधीजींनी दिलेल्या योगदानाचा यावेळी त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

 

आत्मविश्वासपूर्ण शिक्षण देण्याऐवजी रोजगाराभिमुख शिक्षण दिल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून श्री नितीश भारव्दाज म्हणाले, भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा लक्षात घेऊन त्याबाबत व्यापक विचारमंथन व्हावे. देशातील विद्यापीठानी याबाबत सकारात्मक प्रयत्न करुन संपूर्ण व्यवस्थेला  विश्वास दयावा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात याबाबत काही कृतीशीलता दर्शविल्यास पुढील 25 वर्षात निश्चितच चित्र बदलेल त्यासाठी अनुकुल अशा जाणिवांचे दीप इथल्या हृदयात प्रज्वलित करावेत. आज आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरु आहेत.

असत्याकडून सत्याकडे होणारा जाणिवांचा प्रवास अधिक व्यापक करण्यासाठी गांधीविचार महत्वाचा असल्याचे सांगतांना कुलगुरु वरखेडी म्हणाले, गांधीजी हे पूर्णत: एक नव्या वर्गाचे प्रतिनिधी होते. महर्षी, देवर्षी आणि राजर्षी या व्यक्तीमहानतेच्या संकल्पनाच्या पारंपारिक चौकटीपलीकडे जाऊन त्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. ते या दृष्टीने महात्मा होते. सांप्रदायिकता ही मानवतेला दानवतेकडे नेते. सत्यांचा एकच एक चेहरा असू शकत  नाही. अनेक चेहरे असू शकतात. असे मानणारे महात्मा गांधी सत्योपासक होते. त्यांच्या नई तालीम मधील विचारांचा नव्या शैक्षणिक धोरणात अंगीकार करण्यात आला आहे.

 विद्यापीठाचा दीपोत्सवाचा उपक्रम हा अग्नीमधील शक्तीला  दीपकाचे विधायक रुप देणारा असून ज्यायोगे इथल्या  अंतरगातील अंधार दूर होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

            विद्यापीठाकडून आयोजित होत असलेल्या दीपोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलगुरु  रजनीशकुमार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. गेल्या वर्षभरात यानिमित्ताने आयोजित परिसंवादाचा असलेल्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत उपाध्याय यांनी केले. तर कुलसचिव कादर नवाज खान यांनी आभार मानले. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. 

                                                          000

 





                       गांधीजींनी रुजवलेला करुणेचा झरा करुणाश्रमच्या रुपात जिवंत

                                                                 -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

वर्धा, दि 2 ऑक्टोबर (जिमाका) महात्मा गांधींनी देशवासीयांमध्ये प्राण्यांप्रती करुणेचा भाव निर्माण केला. याच करुणेचा जिवंत झरा आज वर्धेत करुणाश्रमाच्या रूपाने पहायला  मिळत आहे. हीच बापुना खरी श्रद्धांजली असलयाचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. 

आज राज्यपाल वर्धेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वन्यजीवांची शुश्रूषा करणाऱ्या करुणाश्रम आश्रमाला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आश्रमात प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेवकांचा सत्कार केला तसेच संस्थेला 10 लाखाची मदतही जाहीर केली.

        देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच गांधीजींच्या स्वतंत्रता आंदोलनाचा एकमेव उद्देश नव्हता, असे सांगून ते म्हणाले, देशाचे नागरिक आत्मनिर्भर  व्हावेत यासाठी सुद्धा त्यांनी संस्थांची निर्मिती करून विचारांची पायाभरणी केली. देशाचा विकास होण्यासाठी  देशात शांतीपूर्ण वातावरण असायला पाहिजे या हेतूने महात्मा गांधींनी सर्व आंदोलने अहिंसात्मक पद्धतीने केलीत असेही श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.

आश्रमाचे संचालक आशिष गोस्वामी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  उपवन संरक्षक राकेश सेपट उपस्थित होते.

Wednesday, 8 September 2021

 




.प्र..क्र- 643                                                                                                                              दि.8.9.202

                  पीक कर्ज वितरण, शेतकरी आत्महत्या व इतर योजनांचा अध्यक्षांकडून आढावा

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत

                                                       - किशोर तिवारी

Ø  आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा

वर्धा, दि. 8 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांना शेत मालाचा योग्य हमीभाव व बँकांनी पीक कर्जासाठी आगाऊ कागदपत्रे न मागता सुलभतेने पीक कर्जाचे वितरण होणे आवश्यक आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यावर अनेक संकटांचे आभाळ कोसळले असते. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना दिलासा द्यावा. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अन्न सुरक्षा योजना, सुलभरित्या पीक कर्ज अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज येथे सांगितले.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्री. तिवारी यांनी शेतकरी आत्महत्या, पीक कर्जाचे वितरण, कोरोना आजार व इतर बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महीरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, लीड बँकेचे मॅनेजर वैभव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. तिवारी म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभरित्या पीक कर्जाचे वाटप, आरोग्य सुविधेंचा लाभ, बी बियाण्यांची उपलब्धता, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, अत्योंदय योजनेचा लाभ, विविध शासकीय योजनांचा लाभातून उत्पादन वाढीस मदत, कृषी तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन, शेत मालाला हमीभाव, कृषी विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी बाबींचा लाभ शेतकऱ्यांना सुलभरित्या होणे गरजेचे आहे. या गोष्टी त्यांना नियमितपणे सुरळीतरित्या मिळाल्या तर आत्महत्या सारख्या घटना घडणारच नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी शेत मालाला योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. पीक कर्ज, कर्जाचे पुर्नगठन बँकानी आगाऊ कागदपत्रांची मागणी न करता सुलभरित्या उपलब्ध करुन द्यावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱी कुटुबांना संजय गांधी निराधार योजना, अत्योंदय योजना यासारख्या अन्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पीक कर्जाच्या अनुषंगाने श्री. तिवारी यांनी पीक कर्ज वितरणाचे लक्षांक पूर्ण करण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना ज्यादा कागदपत्रांचा तगादा न लावता सुलभरित्या कर्ज वितरीत करावे. मुद्रा योजने अंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणांना मान्यता द्यावी. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी मदत होते. आदिवासी बांधवांची उपासमार न होता त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यासाठी खावटी कर्जाचे लक्षांक पूर्ण करावे. प्रलंबित प्रकरणांचाही येत्या पंधरा दिवसात निपटारा करुन संबंधितांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. जिल्ह्यास आवश्यकता असणाऱ्या वस्तू भारत सरकारच्या जेम पोर्टलवरुन खरेदी कराव्यात. कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्यांना आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा योजनेचा लाभ द्यावा, विमा कंपनींचे अंकेशन करुन ज्यादा पैसे उकळणाऱ्यांकडून वसूली करण्यात यावी. संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी बैठकीत पीककर्ज वाटप, शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजना व आदिवासींना अंत्योदय योजनेचा लाभ, अवैध गौण खनिज माफियांची यादी व त्यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई, शासकीय ठेकेदारांना धमक्या व कामांत अडथळे आणणाऱ्या समाजसेवका विरुध्द प्रशासनाकडून कारवाई, भारत सरकारच्या जेम ई पोर्टलवरुन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तू खरेदी न करता खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या वस्तू, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भेटी, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी भारतीय घटनेच्या कलम 19 व 21 मधील तरतुदीनुसार नागरिकांचे अधिकारी गोठविल्याच्या तक्रारींची समिक्षा व त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात झालेला फायदा, शासनाने कोविड महामारीच्या काळात लावलेले कडक निर्बंध व सलवती, आरोग्य सुविधांचा अभाव, सहकारी मजूर संस्थांचे लेखापरीक्षण, मजूरांची नामावली व त्यांनी केलेल्या कामांचा तपशील आदी संदर्भात श्री. तिवारी यांनी सविस्तर आढावा घेतला.

0000

 

 

 

Tuesday, 7 September 2021

 

                                जिल्ह्यात समूह उद्योग स्थापन करण्यास प्राधान्य द्यावे

                                                                        -जिल्हाधिकारी

       वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका):- जिल्ह्यात विविध क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्हा उद्योग केंद्र, आरसेटी, उमेद अभियान, खादी व ग्रामोद्योग महामंडळ, नाबार्ड आणि एम गिरी यांनी प्रशिक्षणा सोबतच समूह उद्योग स्थापन करण्यासाठी काम करावे.जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आणि मागणी असणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

       जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समूह उद्योग विकास बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री मुद्देमवार, लीड बँक व्यवस्थापक वैभव लहाने, एमगिरीचे व्यंकट राव,  नाबार्डचे व्यवस्थापक, मविमच्या जिल्हा समन्वयक  अस्मिता भोंगाडे, तसेच उमेदच्या स्वाती वानखेडे उपस्थित होत्या.

       बैठकीत उद्योगासाठी लागणारी विविध कौशल्ये आणि वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षकांची चमू तयार करायची आहे. यासाठी एम गिरी, आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र या संस्था प्रशिक्षण आयोजित करेल. एमगिरीने राज्य किंवा केंद्र कौशल्य विकास प्राधिकरणासोबत करार करून घ्यावा. तसेच प्रशिक्षणासाठी डायटचे इमारत वापरावी. यासोबतच खादी ग्रामोद्योग महामंडळाने शेतकऱ्यांना मध संकलनासाठी सुद्धा प्रशिक्षण द्यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

        उमेदच्या महिलांचे  चार समूह प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यात आले. यात सेलूमध्ये -डेअरी क्लस्टर, सिंधी मेघे येथे  बॅग आणि टेराकोटा ज्वेलरी क्लस्टर, नाचनगाव येथे गारमेंट स्टिचिंग क्लस्टर विकसित केले जाईल. यासाठी खादी व ग्रामोद्योग महामंडळाकडे असलेल्या स्फूर्ती योजनेमध्ये  या प्रकल्पाना अनुदान मिळण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

                                                                        0000

 

                  डेंग्यु रुग्णाचे प्रमाण जास्त असलेल्या परिसरात अधिका-यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्या

                                                                   -जिल्हाधिकारी

Ø  महिन्यातील प्रत्येक शनिवार कोरडा दिवस पाळावा

Ø  डेंग्युच्या रुग्णांना ज्योतीबा फुले आरोग्य योजनेचा लाभ दयावा

वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका) जिल्हयात डेग्युच्या आजाराच्या रुग्णात मोठी वाढ होत असून सावंगी मेघे व सेवाग्राम येथे 300 डेंग्यु आजाराचे रुग्ण दाखल असून इतर खाजगी रुग्णालयात सुध्दा मोठया प्रमाणात रुग्ण दाखल होतांना दिसत आहे. सामान्य रुग्णालया दाखल होणा-या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरोसिस मशीन खरेदी करावी. ज्यामुळे  रुग्णांना प्लेटलेट देण्याची सुविधा उपलब्ध होऊन  रुग्णांना चांगले उपचार देता येईल त्याच बरोबर खाजगीरित्या प्लेटलेट खरेदी करण्याची आवश्यक भासल्यास  खरेदी करुन   सदर महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत   रुग्णांवर  उपचार करावा  अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी  डेंग्यू आजार आढावा बैठकित दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी वेदप्रकाश पाठक,सेवाग्राम वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. देवळीकर, आर्वी , हिंगणघाट, सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

नगर पालिका व ग्रामपंचायत  क्षेत्रातील ज्या परिसरात डेंग्यु आजाराचे रुग्णाचे प्रमाण जास्त आढळून  येत आहे. अशा परिसराला  नगर पालिका अधिकारी व नगर सेवकांनी स्वत: प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेबाबत पाहणी करुन लोंकामध्ये स्वच्छतेबाबत जागृती करावी.  यासाठी सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयाकडून डेंग्यु आजाराच्या रुग्णाची पत्त्यासह यादी मागवून घ्यावी. सर्व नगर पालिका ग्रामपंचायत क्षेत्रात कोरडा दिवस पाळावा. त्याचबरोबर  साचलेले गटार, नाल्या व घरामध्ये फवारणी करावी अशा, सूचना श्रीमती देशभ्रतार यांनी दिल्यात.

नागपूर, गडचिरोली, गोदिंया व भंडारा जिल्हयात डेल्टाचे रुग्ण आढळले असून  कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही त्यामुळे   नगर पालिकांनी कोविडची चाचणी वाढवावी त्याचबरोबर नगर पालिकाच्या शाळा  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर व गृहविलगीकरण कक्ष तयार करुन ठेवावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ऑक्सीजन पुरवठा , पर्याप्त प्रमाणात बेड उपलब्ध करुन ठेवावे. ऑक्सजीजन व व्हेंटीलेटरसहित बाल कोविड कक्ष तयार करुन ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

00000

Friday, 3 September 2021

 



जल जीवन मिशन अंतर्गत 442 योजनांची

कामांची निविदा प्रक्रिया  सप्टेंबर अखेरीस पूर्ण करा

                                 -जिल्हाधिकारी

वर्धा, दि 3 सप्टेंबर,(जिमाका):- जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी व नविन पाणी पुरवठा अशा ४४२ योजनांची अंदाजपत्रके तयार करावयाची असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंदाजपत्रके तयार करण्याच्या कामाची गती वाढवावी. सप्टेंबर अखेर योजनांची अंदाजपत्रके प्रशासकिय मान्यतेस्तव सादर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिलेत.

         जल जीवन मिशन अंतर्गत "जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन बाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी

          डॉ. सचिन ओम्बासे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्री. मदनकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील रहाने, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे श्री. कुळकणी, वरीष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे, विद्युत वितरण कंपनीचे श्री. पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

        जिल्ह्यात प्रती माणसी प्रती दिवस 55 लिटर पाणी देण्यासाठी  425 गावांमध्ये असलेल्या जुन्या योजनांची क्षमता वृद्धी करण्यासाठी 393 योजनांची कामे करायची आहेत. तसेच 68 गावांमध्ये 49 नवीन योजनांची कामे सुरू करण्यासाठी या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामास गती देण्यास जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्व अंदाजपत्रके एक आठवड्यात तयार करून त्याला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

पाणी पुरवठा योजनांकरिता सौर ऊर्जेवर आधारितनेट मिटरिंगचा अवलंब करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून  मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश दिलेत.

         तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित नविन पाणी पुरवठा योजनेचे कामांकरिता कुशल व अनुभवी कंत्राटदारांकडून सदर काम करून घेण्यासोबतच  केलेल्या  कामाची गुणवत्ता तपासून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी  काम पूर्णत्वाचा अहवाल द्यावा अशी सूचना ग्रामीण पाणी पुरवठा

कार्यकारी अभियंता यांनी केली. यासाठी  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांचेकडे सदर कामाचे पर्यवेक्षण शुल्काचा भरणा केल्यास महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणकडून सदर कामावर पर्यवेक्षण करण्यात येईल व काम पूर्णत्वाचा अहवाल सादर करता येईल असे सांगितले. 

                                                   000000