Saturday, 2 October 2021

 





                       गांधीजींनी रुजवलेला करुणेचा झरा करुणाश्रमच्या रुपात जिवंत

                                                                 -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

वर्धा, दि 2 ऑक्टोबर (जिमाका) महात्मा गांधींनी देशवासीयांमध्ये प्राण्यांप्रती करुणेचा भाव निर्माण केला. याच करुणेचा जिवंत झरा आज वर्धेत करुणाश्रमाच्या रूपाने पहायला  मिळत आहे. हीच बापुना खरी श्रद्धांजली असलयाचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. 

आज राज्यपाल वर्धेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वन्यजीवांची शुश्रूषा करणाऱ्या करुणाश्रम आश्रमाला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आश्रमात प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेवकांचा सत्कार केला तसेच संस्थेला 10 लाखाची मदतही जाहीर केली.

        देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच गांधीजींच्या स्वतंत्रता आंदोलनाचा एकमेव उद्देश नव्हता, असे सांगून ते म्हणाले, देशाचे नागरिक आत्मनिर्भर  व्हावेत यासाठी सुद्धा त्यांनी संस्थांची निर्मिती करून विचारांची पायाभरणी केली. देशाचा विकास होण्यासाठी  देशात शांतीपूर्ण वातावरण असायला पाहिजे या हेतूने महात्मा गांधींनी सर्व आंदोलने अहिंसात्मक पद्धतीने केलीत असेही श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.

आश्रमाचे संचालक आशिष गोस्वामी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  उपवन संरक्षक राकेश सेपट उपस्थित होते.

Wednesday, 8 September 2021

 




.प्र..क्र- 643                                                                                                                              दि.8.9.202

                  पीक कर्ज वितरण, शेतकरी आत्महत्या व इतर योजनांचा अध्यक्षांकडून आढावा

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत

                                                       - किशोर तिवारी

Ø  आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा

वर्धा, दि. 8 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांना शेत मालाचा योग्य हमीभाव व बँकांनी पीक कर्जासाठी आगाऊ कागदपत्रे न मागता सुलभतेने पीक कर्जाचे वितरण होणे आवश्यक आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यावर अनेक संकटांचे आभाळ कोसळले असते. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना दिलासा द्यावा. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अन्न सुरक्षा योजना, सुलभरित्या पीक कर्ज अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज येथे सांगितले.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्री. तिवारी यांनी शेतकरी आत्महत्या, पीक कर्जाचे वितरण, कोरोना आजार व इतर बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महीरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, लीड बँकेचे मॅनेजर वैभव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. तिवारी म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभरित्या पीक कर्जाचे वाटप, आरोग्य सुविधेंचा लाभ, बी बियाण्यांची उपलब्धता, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, अत्योंदय योजनेचा लाभ, विविध शासकीय योजनांचा लाभातून उत्पादन वाढीस मदत, कृषी तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन, शेत मालाला हमीभाव, कृषी विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी बाबींचा लाभ शेतकऱ्यांना सुलभरित्या होणे गरजेचे आहे. या गोष्टी त्यांना नियमितपणे सुरळीतरित्या मिळाल्या तर आत्महत्या सारख्या घटना घडणारच नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी शेत मालाला योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. पीक कर्ज, कर्जाचे पुर्नगठन बँकानी आगाऊ कागदपत्रांची मागणी न करता सुलभरित्या उपलब्ध करुन द्यावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱी कुटुबांना संजय गांधी निराधार योजना, अत्योंदय योजना यासारख्या अन्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पीक कर्जाच्या अनुषंगाने श्री. तिवारी यांनी पीक कर्ज वितरणाचे लक्षांक पूर्ण करण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना ज्यादा कागदपत्रांचा तगादा न लावता सुलभरित्या कर्ज वितरीत करावे. मुद्रा योजने अंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणांना मान्यता द्यावी. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी मदत होते. आदिवासी बांधवांची उपासमार न होता त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यासाठी खावटी कर्जाचे लक्षांक पूर्ण करावे. प्रलंबित प्रकरणांचाही येत्या पंधरा दिवसात निपटारा करुन संबंधितांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. जिल्ह्यास आवश्यकता असणाऱ्या वस्तू भारत सरकारच्या जेम पोर्टलवरुन खरेदी कराव्यात. कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्यांना आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा योजनेचा लाभ द्यावा, विमा कंपनींचे अंकेशन करुन ज्यादा पैसे उकळणाऱ्यांकडून वसूली करण्यात यावी. संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी बैठकीत पीककर्ज वाटप, शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजना व आदिवासींना अंत्योदय योजनेचा लाभ, अवैध गौण खनिज माफियांची यादी व त्यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई, शासकीय ठेकेदारांना धमक्या व कामांत अडथळे आणणाऱ्या समाजसेवका विरुध्द प्रशासनाकडून कारवाई, भारत सरकारच्या जेम ई पोर्टलवरुन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तू खरेदी न करता खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या वस्तू, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भेटी, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी भारतीय घटनेच्या कलम 19 व 21 मधील तरतुदीनुसार नागरिकांचे अधिकारी गोठविल्याच्या तक्रारींची समिक्षा व त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात झालेला फायदा, शासनाने कोविड महामारीच्या काळात लावलेले कडक निर्बंध व सलवती, आरोग्य सुविधांचा अभाव, सहकारी मजूर संस्थांचे लेखापरीक्षण, मजूरांची नामावली व त्यांनी केलेल्या कामांचा तपशील आदी संदर्भात श्री. तिवारी यांनी सविस्तर आढावा घेतला.

0000

 

 

 

Tuesday, 7 September 2021

 

                                जिल्ह्यात समूह उद्योग स्थापन करण्यास प्राधान्य द्यावे

                                                                        -जिल्हाधिकारी

       वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका):- जिल्ह्यात विविध क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्हा उद्योग केंद्र, आरसेटी, उमेद अभियान, खादी व ग्रामोद्योग महामंडळ, नाबार्ड आणि एम गिरी यांनी प्रशिक्षणा सोबतच समूह उद्योग स्थापन करण्यासाठी काम करावे.जिल्ह्यात निर्माण होऊ शकणाऱ्या आणि मागणी असणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

       जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समूह उद्योग विकास बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री मुद्देमवार, लीड बँक व्यवस्थापक वैभव लहाने, एमगिरीचे व्यंकट राव,  नाबार्डचे व्यवस्थापक, मविमच्या जिल्हा समन्वयक  अस्मिता भोंगाडे, तसेच उमेदच्या स्वाती वानखेडे उपस्थित होत्या.

       बैठकीत उद्योगासाठी लागणारी विविध कौशल्ये आणि वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षकांची चमू तयार करायची आहे. यासाठी एम गिरी, आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र या संस्था प्रशिक्षण आयोजित करेल. एमगिरीने राज्य किंवा केंद्र कौशल्य विकास प्राधिकरणासोबत करार करून घ्यावा. तसेच प्रशिक्षणासाठी डायटचे इमारत वापरावी. यासोबतच खादी ग्रामोद्योग महामंडळाने शेतकऱ्यांना मध संकलनासाठी सुद्धा प्रशिक्षण द्यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

        उमेदच्या महिलांचे  चार समूह प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्यात आले. यात सेलूमध्ये -डेअरी क्लस्टर, सिंधी मेघे येथे  बॅग आणि टेराकोटा ज्वेलरी क्लस्टर, नाचनगाव येथे गारमेंट स्टिचिंग क्लस्टर विकसित केले जाईल. यासाठी खादी व ग्रामोद्योग महामंडळाकडे असलेल्या स्फूर्ती योजनेमध्ये  या प्रकल्पाना अनुदान मिळण्यासाठी अहवाल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

                                                                        0000

 

                  डेंग्यु रुग्णाचे प्रमाण जास्त असलेल्या परिसरात अधिका-यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्या

                                                                   -जिल्हाधिकारी

Ø  महिन्यातील प्रत्येक शनिवार कोरडा दिवस पाळावा

Ø  डेंग्युच्या रुग्णांना ज्योतीबा फुले आरोग्य योजनेचा लाभ दयावा

वर्धा, दि 7 सप्टेंबर (जिमाका) जिल्हयात डेग्युच्या आजाराच्या रुग्णात मोठी वाढ होत असून सावंगी मेघे व सेवाग्राम येथे 300 डेंग्यु आजाराचे रुग्ण दाखल असून इतर खाजगी रुग्णालयात सुध्दा मोठया प्रमाणात रुग्ण दाखल होतांना दिसत आहे. सामान्य रुग्णालया दाखल होणा-या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरोसिस मशीन खरेदी करावी. ज्यामुळे  रुग्णांना प्लेटलेट देण्याची सुविधा उपलब्ध होऊन  रुग्णांना चांगले उपचार देता येईल त्याच बरोबर खाजगीरित्या प्लेटलेट खरेदी करण्याची आवश्यक भासल्यास  खरेदी करुन   सदर महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत   रुग्णांवर  उपचार करावा  अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी  डेंग्यू आजार आढावा बैठकित दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी वेदप्रकाश पाठक,सेवाग्राम वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. देवळीकर, आर्वी , हिंगणघाट, सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

नगर पालिका व ग्रामपंचायत  क्षेत्रातील ज्या परिसरात डेंग्यु आजाराचे रुग्णाचे प्रमाण जास्त आढळून  येत आहे. अशा परिसराला  नगर पालिका अधिकारी व नगर सेवकांनी स्वत: प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेबाबत पाहणी करुन लोंकामध्ये स्वच्छतेबाबत जागृती करावी.  यासाठी सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयाकडून डेंग्यु आजाराच्या रुग्णाची पत्त्यासह यादी मागवून घ्यावी. सर्व नगर पालिका ग्रामपंचायत क्षेत्रात कोरडा दिवस पाळावा. त्याचबरोबर  साचलेले गटार, नाल्या व घरामध्ये फवारणी करावी अशा, सूचना श्रीमती देशभ्रतार यांनी दिल्यात.

नागपूर, गडचिरोली, गोदिंया व भंडारा जिल्हयात डेल्टाचे रुग्ण आढळले असून  कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही त्यामुळे   नगर पालिकांनी कोविडची चाचणी वाढवावी त्याचबरोबर नगर पालिकाच्या शाळा  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर व गृहविलगीकरण कक्ष तयार करुन ठेवावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ऑक्सीजन पुरवठा , पर्याप्त प्रमाणात बेड उपलब्ध करुन ठेवावे. ऑक्सजीजन व व्हेंटीलेटरसहित बाल कोविड कक्ष तयार करुन ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

00000

Friday, 3 September 2021

 



जल जीवन मिशन अंतर्गत 442 योजनांची

कामांची निविदा प्रक्रिया  सप्टेंबर अखेरीस पूर्ण करा

                                 -जिल्हाधिकारी

वर्धा, दि 3 सप्टेंबर,(जिमाका):- जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी व नविन पाणी पुरवठा अशा ४४२ योजनांची अंदाजपत्रके तयार करावयाची असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंदाजपत्रके तयार करण्याच्या कामाची गती वाढवावी. सप्टेंबर अखेर योजनांची अंदाजपत्रके प्रशासकिय मान्यतेस्तव सादर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिलेत.

         जल जीवन मिशन अंतर्गत "जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन बाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी

          डॉ. सचिन ओम्बासे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्री. मदनकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील रहाने, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे श्री. कुळकणी, वरीष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे, विद्युत वितरण कंपनीचे श्री. पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

        जिल्ह्यात प्रती माणसी प्रती दिवस 55 लिटर पाणी देण्यासाठी  425 गावांमध्ये असलेल्या जुन्या योजनांची क्षमता वृद्धी करण्यासाठी 393 योजनांची कामे करायची आहेत. तसेच 68 गावांमध्ये 49 नवीन योजनांची कामे सुरू करण्यासाठी या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामास गती देण्यास जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्व अंदाजपत्रके एक आठवड्यात तयार करून त्याला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

पाणी पुरवठा योजनांकरिता सौर ऊर्जेवर आधारितनेट मिटरिंगचा अवलंब करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून  मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश दिलेत.

         तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित नविन पाणी पुरवठा योजनेचे कामांकरिता कुशल व अनुभवी कंत्राटदारांकडून सदर काम करून घेण्यासोबतच  केलेल्या  कामाची गुणवत्ता तपासून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी  काम पूर्णत्वाचा अहवाल द्यावा अशी सूचना ग्रामीण पाणी पुरवठा

कार्यकारी अभियंता यांनी केली. यासाठी  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांचेकडे सदर कामाचे पर्यवेक्षण शुल्काचा भरणा केल्यास महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणकडून सदर कामावर पर्यवेक्षण करण्यात येईल व काम पूर्णत्वाचा अहवाल सादर करता येईल असे सांगितले. 

                                                   000000

 




‘उमेद’ अभियानातून मिळाला 214 महिलांना रोजगार

अडीच कोटीचा साकारला सोलर प्रकल्प

कवठा झोपडी गावाची यशोगाथा

देवळी, कारंजा व आष्टी तालुक्यातील

सात गावांत स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास सुरुवात      

वर्धा दि.3 (जिमाका) : वर्धा जिल्हा बऱ्याचश्या ऐतिहासिक चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे.  बचतगटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यातही जिल्ह्याने नावलौकिक मिळवलेले आहे. याचा प्रत्यय येतो तो कवठा झोपडी या गावच्या तेजस्वी सोलर एनर्जी महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या सोलर  स्ट्रीट लाईट निर्मितीच्या प्रकल्पाच्या यशातून. या महिला बचतगटाने सुमारे अडीच कोटीचे स्ट्रीट लाईट निर्मितीचे ध्येय बाळगून जिल्ह्यातील देवळी, कारंजा व आष्टी तालुक्यातील सात गावांत स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे स्ट्रीट लाईट उपकरण एकत्रित करुन बसविण्याचे संपूर्ण काम महिलांव्दारे केल्या जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून 214 महिलांना रोजगार मिळाला असून महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण समाजाला दिसून आले आहे.  

जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी विशेष प्रयत्न करुन स्ट्रीट लाईटसाइी निधी उपलब्ध करुन दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचीन ओम्बासे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सत्यजीत बडे, अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेंडे यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रकल्पाच्या महिला पदाधिकारी संगीता प्रकाश वानखेडे, अर्चना बलवीर यांच्या नियोजन व परिश्रमातून हा सोलर उत्पादने निर्माण करणारा प्रकल्प आकारास आला.

या प्रकल्पाच्या संस्थेला जिल्हा नियोजन समिती मार्फत 40 लाख स्ट्रीट लाईट पुरवठा करण्याचे मागणी प्राप्त झाली आहे. त्यानुसार 11 लक्ष 70 हजार रुपयाचा निधी संबंधित कंपनीला प्राप्त झाला असून त्यातून 56 सोलर स्ट्रीट लाईट जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील खातखेडा, एकाम्बा, कारंजा तालुक्यातील मेठहिरजी, खैरवाडा तर आष्टी तालुक्यातील ममदापूर, बाम्बडा, बोरखेडी आदी ठिकाणी तेजस्विनी सोलर एनर्जीव्दारे बसविण्यात आले.

कवठा झोपडी या गावी 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून 214 महिलांनी बचत गट स्थापित करुन  तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पाची को-ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत नोंदणी केली. प्रकल्पाच्या माध्यमातून स्ट्रिट लाईट निर्मितीचे काम सुरु झाले. या प्रकल्पात 214 महिला सहभागी झाल्यात. या सोलर प्रकल्पासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने तांत्रिक मार्गदर्शन दिले. यातील 12 महिलांना राजस्थानच्या डुंगरपूर येथील दुर्गा सोलर एनर्जी येथे प्रशिक्षित करण्यात आले. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईव्दारा गावातच संबंधित महिलांना उमेद अभियानच्या माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण दिले.

तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मागदर्शन व प्रयत्नातून समाजकल्याण विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून हा सोलर प्रकल्प उदयास आला. या प्रकल्पाचे 2 कोटी 62 लक्ष रुपये अंदाजपत्रक असून महिलांना प्रशिक्षित करुन सोलर उत्पादने तयार करण्यात येत आहे. प्रकल्पात काम करणाऱ्या महिलांनी एक हजार लॅम्प बनविले असून दोन लाख रुपयाची विक्री झाली आहे. या कामास उमेद अभियानाचे अधिकारी, व आयआयटी मुंबईने सहकार्य केले.

कवठा (झोपडी) या गावात कंपनीच्या इमारतीचे पूर्णपणे बांधकाम झाले असून पॅनल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट व सोलर होम लाईट इत्यादी उत्पादने बनविण्याचे काम सुरु आहे. काही ठिकाणी सदर साहित्याची उभारणी सुद्धा करण्यात आली असून जिल्हा नियोजन समिती मार्फत या कंपनीला 40 लाख स्ट्रीट लाईटचा पुरवठा करण्याचे मागणी आदेश प्राप्त झाले आहे. या सोलर उत्पादनांच्या विक्रीतून सुमारे 11 लाख 70 हजार रुपये बचतगटाला मिळाले असून यामुळे गावातील महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे.

0000

 

 

 

 

 

 

 

Friday, 27 August 2021

 

.प्र..क्र- 618                                                                               दि.27.8.2021

महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनेसाठी शेतकऱ्यांचे अर्ज आमंत्रित

प्रमाणित बियाणे वितरण,पीक,प्रात्याक्षिके,सुधारित कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या घटकासाठी अर्ज करता येणार

      वर्धा दि. 27 (जिमाका):-  सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व गळीत धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण,पीक,प्रात्याक्षिके,सुधारित कृषि औजारे व  सिंचन सुविधा साधने या बाबीसाठी इच्छुक शेतक-यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱयांनी महाडीबीटी पोर्टलवर 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करावी.

पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्याक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करुन 10 हे.क्षेत्र असणा-या गटांनी नोंदणी करावी. शेतक-यांना नोंदणी करण्यासाठी दिनांक 30 ऑगष्ट,20212ते सप्टेंबर,2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणा-या शेतक-यांचाच विचार केला जाईल. याची नोंद घ्यावी.

बियाणे वितरण:-

  हरभरा प्रमाणित बियाणे वितरण 10 वर्षाआतील वाणास रु.25  प्रति किलो,10 वर्षावरील वाणास रु. 12 - प्रति किलो,  रब्बी ज्वारी 10 वर्षाआतील वाणास रु.30 प्रति किलो,10 वर्षावरील वाणास रु.15 प्रति किलो. एकुण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतक-याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येईल.

पीक प्रात्याक्षिके:-

हरभरा,करडई व रब्बी ज्वारी  पीक प्रात्याक्षिकासाठी एका शेतक-याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्ममुलद्रव्ये,भु सुधारके व पीक संरक्षण औषधी या निविष्ठांसाठी शेतक-याला 1 एकरच्या मर्यादेत डीबीटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येणार असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतक-यांची निवड ऑनलाईन लॉटरी पध्दतीने होणार आहे.

000000

.प्र.प.क्र- 619                                                            दि.27.8.2021                                                                  

सोयाबीनवरील मरुका अळीचे व्यवस्थापन.    

     वर्धा दि. 27 (जिमाका):-  सोयाबीन या पिकावर मरुका या किडिचा प्रादुर्भाव बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व शेगाव या दोन तालुक्यामध्ये झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या जिल्ह्यात अद्याप या किडीचा नोंद नाही. मात्र तरीही शेतकऱयांनी जागरूकपणे या अळीवर लक्ष ठेवणे आवश्यक असून अळी दिसून आल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. 

सोयाबीन उत्पादन कमी येण्याच्या विविध कारणंपैकी किडिंचा प्रादुर्भाव हे सर्वात महत्वाचे कारण आहे. सोयाबीन पिक हिरवेगात, मऊ,लुसलुशीत आणि दाट पानांचे असल्यामुळे अनेक किडी या पिकाकडे आकर्षित होतात. त्यात प्रामुख्याने तंबाखुवरील पाने खाणीर अळी (स्पेाडोप्टोरा),उंट अळी व घाटे अळी (हेलिकोव्हर्पा) या किडींचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर नुकसान करतांना आढळुन येतो.

   मरुका पॉड बोरर,बिन पॉड बोरर,मंग मॉथ किंवा सोयाबीन पॉड बोरर या नावाने ओळखली जाणारी ही किड बहुपक्षी असून प्रामुख्याने तुर पिकास नुकसान करते. त्याच बरेाबर सोयाबीन, चवळी,मुग,उडीद व पावटा या पिंकांवर देखील या किडिचा प्रार्दुभाव आढळुन येतो.

जीवनक्रम:-

   पिक फुलो-यांच्या अवस्थेत असतांना या किडिचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन येते. या किडीचे प्रौढ कीड तपकिरी काळसर रंगाचे असुन मध्यम बांध्याचे असतात. त्यांच्या पंखांवर पांढरे चटटे आढळतात. पतंग रात्रीच्या वेळी कार्यरत असतात. मादी पतंग अंडी शक्यतो झाडाच्या शेंड्यांवर पुंजक्यात घालते. अंड्यांचा रंग हलका पिवळसर असून चार ते पाच दिवसांत अंडी उबतात. सदर किडिची अळी हिरवट पांढ-या रंगाची चमकदार असून तिच्या पाठीवर काळसर ठिपके असतात. त्यामुळे तिला ठिपक्यांची अळी असेही म्हणतात. अळीचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असुन ती अतिशय चपळ असते व हलक्या धक्यानेही लगेचच गुंडाळलेल्या फुले कळयामधुन खाली पडते. अळीच्या पाच अवस्था असुन आठ ते चौदा दिवसात अळी अवस्था पुर्ण होते. कोषावस्था चंदेरी रेशमी जाळयांनी विणलेल्या अवस्थेत फुले, कळ्या किंवा जमिनीत आढळते. या किडीचा जीवनक्रम साधारपणे 18 ते 35 दिवसांत पुर्ण होतो.

नुकसानीचा प्रकार:-

    प्रथम अवस्थेतील अळ्या प्रामुख्याने फुले व फुलकळ्यांवर उपजिवीका करण्यास प्राधान्य देतात. प्रत्येक अळी साधारणत: चार ते सहा फुले प्रादुर्भावीत करते. तिस-या अवस्थेतील अळ्या ह्या शेंगावरती उपजिविका करण्यास सुरुवात करतात व पाचव्या अवस्थेतील अळ्या मोठ्या प्रमाणात शेंगांना प्रार्दुभाव करतात. तसेच अधुन मधुन पाने,शेंगाच्या देठांना व मुख्य खोडाला नुकसान करतात. विशेषत: ऑगष्ट सप्टेबर महिन्यामध्ये म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत  येण्याच्या कालावधीमध्ये वातावरणामध्ये जास्त आर्दता व मध्यम तापमान असते. अशा अनुकुल वातावरणात किडीचे प्रजनन जलद होते. जास्त आर्द्रता असलेल्या भागात ह्या किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन येते. सदर परिस्थितीत सोयाबीनवरील मरुका किडीचे नियंत्रणासाठी केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारा कुठल्याही किटकनाशकाची शिफारस उपलब्ध नाही. परंतु तुरीवरील मरुका किडीचे नियंत्रणासाठी खालील शिफारशीत किटकनाशके उपलब्ध आहेत तरी फवारणी करीता त्यांचा अवलंब करता येईल.

फवारणीसाठी उपलब्ध रासायनिक कीटकनाशके

1)क्लोरॅट्रॅनिलीप्रोल 18.50 एस.सी. किंवा 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

2) इथिऑन 50 ई.सी -    20मिली प्रति 10 लिटर पाण्यात.,

3)फ्लुबेन्डामाईड 20 डब्यु.जी. -   6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात.

4)थायोडिकार्ब 75 डब्ल्यू पी. -   15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात.

5) नोव्हॅल्युरॉन 5.25+ इन्डोक्झाकार्ब 4.50 एस.सी. 17.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

6) इन्डोक्झाकार्ब 15.80 इ.सी.-   6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात.

7) इन्डोक्झाकार्ब 14.50 एस.सी.-           4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. तयार करून फवारणी करावी.

 

00000