Friday, 27 August 2021

 

महाआवास अभियानांतर्गत विभागीय पुरस्काराचे सोमवारी वितरण

राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम

* केंद्र पुरस्कृत आवास योजनेत गोंदिया प्रथम*

* उत्कृष्ट तालुके व ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार*

     वर्धा , दि. 27 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणारा महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा गौरव समारंभ सोमवार,30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. द्वितीय क्रमांक भंडारा जिल्ह्याला तर तृतीय क्रमांक चंद्रपूर जिल्याल्ला प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम सडक अर्जुनी (गोंदिया), द्वितीय लाखांदूर, तृतीय पवनी पंचायत समिती, जिल्हा भंडारा यांची निवड झाली आहे.

उत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत बोरगाव(चंद्रपूर), द्वितीय दिघोरी (भंडारा) तर तृतीय सानगांव(साकोली) व ग्रामपंचायत चिचूर(कुही) नागपूर जिल्ह्याची निवड झाली आहे. बांधकामासाठी कर्ज  देणारी उत्कृष्ट वित्तीय संस्था म्हणून प्रथम वर्धा जिल्ह्यातील समानता प्रभाग संघ, समुद्रपूर, द्वितीय परिवर्तन प्रभाग संघ सेलू तर तृतीय  सार्थक प्रभाग संघ वायफळ या वर्धा जिल्ह्यातील तीनही संस्थांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे.

महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल ‍जिल्हे, तालुके तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

महाआवास  अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. तसेच द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्हा तर तृतीय पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय तालुका म्हणून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया व  तिरोडा पंचायत समितीला अनुक्रमे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासोबतच  उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तळेगाव, द्वितीय कोरंबी तसेच केसोरी या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांची निवड झाली आहे. तृतीय पुरस्कार वर्धा ‍जिल्ह्यातील झंझाडा ग्रामप्रचायतीची निवड झाली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी कर्ज देणारी वित्तीय संस्था म्हणून वर्धा  जिल्ह्याची नारी शक्ती प्रभात संघ सिंधीविहिरी(कारंजा), द्वितीय भंडारा जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, आंधळगाव तर तृतीय वर्धा जिल्ह्यातील हिरकणी प्रभाग संघ, अंदोरी(देवळी) तसेच जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी प्रथम वरोरा तालुका, द्वितीय कामठी तालुका तर तृतीय भद्रावती तालुक्याचा समावेश आहे.

0000

 

.प्र..क्र- 617                                                                               दि.27.8.2021

4 महिन्यात दोन लक्ष सव्वीस  हजार सहाशे गरिबांना मिळाला निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार

17 केंद्रावरून मिळतो लाभ

      वर्धा दि. 27 (जिमाका) : कोरोना काळात सर्वत्र लॉक डाऊन असताना कुणीही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने 15 एप्रिल,2021 पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली. तसेच जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा इष्टांक दीड पट वाढवून तो 2100 पर्यंत दिला. एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यात 2 लक्ष 26  हजार 600 गरिबांना निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार मिळाला आहे.

शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात दिनांक 26 जानेवारी 2020 पासून सुरु झाला. गरीब व गरजु लोकांना स्वस्तात शिवभोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता  23 ऑगष्ट 2021 पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्याअंतर्गत सर्व तालुके मिळुन 17 केंद्रे सुरु करण्यात आली या सर्व केंद्राला शासनाने प्रतिदिन 1600 थाळ्यांचा इंष्टांग मंजुर केला होता. पण कोरोना काळात कुणीही गरीब व गरजु व्यक्ती उपाशी राहु नये, म्हणुन शासनाने  15 एप्रिल,2021 पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली.  तसेच प्रतिदिन थाळीच्या इंष्टांकात  दीड पट वाढ केली.  वर्धा जिल्ह्यात सरासरी 1800 ते 2100 थाळ्यांचा लाभ गरीब,गरजु व अनाथ लोक दररोज या सर्व केंद्रावरुन घेत आहे.

या योनजेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात एकुण 17 केंद्रावर ह्या थाळीचा लाभ गरीब व गरजु लोक घेत आहे.  15 एप्रिल ते 23 ऑगष्ट 2021 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 2,43,00,230 (दोन कोटी त्रेचाळीस लाख) लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील 17 केंद्रावरुन 2 लक्ष 26 हजार 613 एवढ्या गरीब व गरजु लोकांनी या थाळीचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे  17 शिवभोजन केंद्राला शासनाच्या नियमाप्रमाणे  14 ऑगष्ट 2021 पर्यतचे संपूर्ण अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

 

 

000000

 

.प्र.प.क्र- 618                                                                  दि.27.8.2021

 

महिला व मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण व साहित्यासाठी 90 टक्के अनुदान

इच्छुक लाभार्थ्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावा

     वर्धा दि. 27 (जिमाका):-  महिला व बाल कल्याण समितीकरीता सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे प्राप्त निधीनुसार  ग्रामीण भागातील मुलींना 90 टक्के अनुदानावर व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण तसेच महिलांना व्यवसायासाठी 90 टक्के अनुदानावर साहित्य पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. यासाठी  सर्वसाधारण, अनुसूचित जाती- जमाती  प्रवर्गातील  लाभार्थ्यांकडून 15 ऑक्टोबर,2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांना 90 % अनुदानावर साहित्य पुरविणे (शिलाई मशिन) तसेच ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना 90 %  अनुदानावर व्यावसायिक व तांत्रीक प्रशिक्षण (शिवणकाम व फॅशन डिझाईनिंग प्रशिक्षण)

देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यात ग्रामपंचायतीने सदर लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेमध्ये करून ती माहिती पंचायत समितीला पाठवावी. यासाठी अर्जदारांनी ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा.

अर्जदाराचे बी.पी.एल.चे प्रमाणपत्र तसेच तलाठी/तहसिलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे. सन 2020-2021 चे वार्षीक उत्पन्न् रु. 1,20,000/- (अक्षरी एक लक्ष वीस हजार फक्त) पेक्षा जास्त नसावे. अर्जदार ही वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी. (सरपंच/सचिवाचे प्रमाणपत्र जोडावे.) जातीचे प्रमाणपत्र तहसिलदार किवा उपविभागीय अधिका-यांचे प्रमाणपत्र जोडावे. सदर योजनेचा लाभ, लाभार्थ्यांनी अन्य कोणत्याही विभागाकडुन/योजनेतुन घेतलेला नसावा. लाभार्थीना साहित्य शुल्काच्या 90 % रक्कम अदा करणेत येईल. किंवा या कार्यालयाकडुन दर निश्चितीच्या 90 % रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येईल.

शिवणकलेचे मान्यता प्रापत संस्थेचे प्रमाणपत्र जोडावे.

लाभार्थ्यांचे आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॅाक्स प्रत व बँकेची सिडीग स्लीप अर्जासोबत जोडावी. लाभार्थ्यांना वस्तू व  प्रशिक्षण शुल्काच्या 10% रक्कम स्वतः भरावी लागेल. 

 

00000

Thursday, 26 August 2021

 

वर्धा विधानसभा मतदार संघातील प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर मतदारांनी हरकती नोंदवाव्यात.                                                                                                                                         

                                                                                           -सुरेश बगळे

      वर्धा दि. 26 (जिमाका) वर्धा विधानसभा मतदार संघातील  17 जानेवारी ते  23 जुलै 2021 या कालावधीची मतदारांची सुधारित नमुना 10 यादी नगर परिषद वर्धा, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायत च्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ज्या मतदाराचा त्यांच्या यादी भागात सर्वसाधारण रहिवास आहे, परंतु त्यांचे नाव कमी झालेले आढळल्यास त्यांनी तात्काळ तहसील कार्यालय वर्धा येथे नमुना 6 भरुन ,रंगीत फोटोसह, जन्म तारिख व रहिवासी पुराव्यासह सादर करावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

 1 जानेवारी,2021 या आर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित झाला आहे. त्याअनुषंगाने 047 वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या भागामधील फोटो नसलेले मतदारांचे फोटो गोळा केलेत व जे मतदार मय्यत/दुबार आहेत व जे मतदार आढळुन येत नाही तसेच जे मतदार स्थालांतरील झाले आहेत अशा मतदाराचे नमुना 7 भरुन दिले आहेत.  प्राप्त नमुना 7 च्या आर्जाची 17 जानेवारी  ते 23 जुलै 2021 पर्यन्त  डाटा एन्ट्री करण्यात आली आहे. त्या डाटा एन्ट्री केलेले नमुना 7 च्या अर्जाची नमुना 10 यादी भाग क्रमांक नुसार तयार करुन राष्ट्रीय व राज्य स्तरीय पक्षांना प्रसिध्दीसाठी पाठविण्यात आली आहे. शहरी यादी भागाचे नमुना 10 नोटीस नगर परिषद,वर्धा येथे प्रसिध्दी करण्यासाठी मुख्याधिकारी,नगर परिषद,वर्धा यांना पाठविण्यात आली व ग्रामीण यादी भागाचे नमुना 10 नोटीस ग्रामपंचायत मध्ये प्रसिध्दी करण्यासाठी गट विकास अधिकारी,पंचायत समिती,वर्धा यांना पाठविण्यात आले आहे. तसेच त्याची एक प्रत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार,वर्धा यांच्या नोटीस बोर्ड वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मतदारांनी  आपल्या भागातील मतदार यादी पाहून नाव कमी झाल्याचे आढळल्यास तात्काळ तहसील कार्यालयात कळवावे.

 

00000

 


 

जल जीवन मिशनमधून प्रस्तावित पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचे नियोजन करावे

                                                                                     -जिल्हाधिकारी

      वर्धा, दि 26 ऑगस्ट (जिमाका):-  अनेकदा ग्रामीण पुरवठा योजनांचे वीज देयक न भरल्यामुळे त्या गावांचा  पाणी पुरवठा बंद होतो. त्यामुळे यापुढे किमान वीज बील भरण्याच्या त्रासातून ग्रामपंचायतची सुटका होऊन गावातील लोकांना नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी

नवीन पाणी पुरवठा योजना किंवा जुन्या पाणी पुरवठा योजना बळकट करताना त्या सौर ऊर्जेवर चालतील असेच नियोजन करण्याचा सूचना जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.

जल जीवन मिशन कार्यक्रमाबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी त्यांनी सदर सूचना केल्यात. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग डी एस वाघ, मजीप्रा कार्यकारी अभियंता श्री चंद्रिकापुरे, वर्धा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सुनील रहाणे, शिक्षणाधिकारी संजय मेहेर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे आदी अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांवर पूर्वी कोणत्या योजनेतून, कोणकोणत्या बाबीवर खर्च झालेला आहे याची माहिती देण्यात यावी. तसेच 2036 मधील लोकसंख्या गृहीत धरून प्रति माणसी 55 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत, त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

ग्रामपंचायती सोबतच अंगणवाड्या, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी 100 टक्के नळ जोडणी देण्याचे नियोजन करावे.

यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत समुद्रपूर मधील कांढळी, आरंभा, फुकटा, बांबरडा, तसेच वर्धा येथील मोर्चापुर, बोथली, आमगाव जंगली या 7 गावांचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी त्यामध्ये सुधारणा सुचवून तो  पुढील आठवड्यात सादर करण्याच्या सूचना दिल्यात. 

तसेच मजीप्राच्या सेवाग्राम व 5 गावे आणि पिपरी मेघे आणि 13 गावांच्या पाणी पुरवठा योजनेवर चर्चा करण्यात आली. मोठ्या योजनेसाठी निधी लवकर मिळणे आणि काम वेळेत पूर्ण करणे याबाबीसाठी खूप वेळ जातो. त्यामुळे यापुढे शक्यतो मोठ्या योजना घेण्यापेक्षा  प्रत्येक ग्रामपंचायत निहायच योजना प्रस्तावित करण्यात यावी. जेणेकरून  योजना लवकर पूर्ण होऊन गावांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.

0000

Friday, 13 August 2021

 

आता  शेतक-यांना स्वतःच घेता येणार आपल्या पिकाची नोंद

 

ई -पीक पाहणी अँप लॉन्च

 

     वर्धा, दि 13 (जिमाका):- येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे "ई-पीक पाहणी" प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. शेतकऱ्यांना आता स्वतःच मोबाईल अँपच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद सातबारा मध्ये घेता येणार असून यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचण्यासोबतच चुकीच्या नोंदीमुळे होणारे नुकसान टळणार आहे.

टाटा ट्रस्ट मार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता.  मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग प्रयत्न करीत आहे. 

 आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऑनलाईन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता 8 अ सुध्दा ऑनलाईन करण्यात आला आहे.

 माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा" असे या प्रकल्पाचे बोधवाक्य आहे.

शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणारआहे.

 

0000

 

 











ब्रेक दि चेन अंतर्गत नवीन आदेश लागू

 

वर्धा, दि 13 (जिमाका):-  ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यात जवळपास सर्व दुकाने आस्थापना सर्व दिवस रात्री 10  वाजे पर्यंत सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नवीन आदेश जारी केले आहेत.

उपहारगृहे-

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास  मुभा देण्यात येत आहे.उपहारगृहामध्ये प्रवेश करताना , प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापरअनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल.

ब) उपहारगृहामध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचेकोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्राआणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृहामध्येकाम करु शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.

क) वातानुकूलित उपहारगृह असल्यास , वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.

ड) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल.

इ) उपहारगृहामध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी

फ) उपहारगृहामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल. उपरोक्तनुसारउपहारगृहे सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृहामधील भोजनासाठीग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 9.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरुठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .

 दुकाने

वर्धा जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10 वाजता पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण दोन मात्रा पूर्ण  झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

 शॉपिंग मॉल्स

वर्धा जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस

रात्री 10 .वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुरारी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

 

* जिम्नॅशिअम ,योगसेंटर, सलून - स्पा :*

अ) वातानुकूलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलन - स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस

रात्री 10 वाजता पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास

वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील .

 

* इनडोअर स्पोर्टस् :*

इनडोअर स्पोर्टस् असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक

लसीकरणाच्या दोन मात्रा वि दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच , या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील.या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वेश, पैरलल बार ,मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

 

कार्यालय | औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना :

 

अ) सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बैंक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व

व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे.

ब) खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेल्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .

क) सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचान्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन

करावे.

 

ड) तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

मैदान, उद्यान

            स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

विवाह सोहळे

अ) खुल्या प्रांगणातील /लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण/लॉन/ मंगलकार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपुर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

ब) खुल्या प्रांगण /लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळयास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्तीच्या मर्यादित असेल.

क) बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत असेल.

ड) मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निबंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

इ) तसेच मंगल कार्यालय/हॉटेल/लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बँडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह संस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र

सोबत असणे आवश्यक राहील.

 सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स

सिनेमागृह / नाटयगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

धार्मिक स्थळे

वर्धा जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.

आंतरराज्य प्रवास

ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना , बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.

सांस्कृतिक कार्यक्रम

            कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा .

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा , रॅली . मोर्चे , इ. वरील निर्बंध कायम राहतील.

वर्धा जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुकण्यास प्रतिबंध , इ. सर्व निबंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल.

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे ,मॉल मालक / व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी ( लसीकरण माहिती / प्रमाणपत्रासह ) तयार ठेवावी व सक्षमप्राधिकाऱ्यांनी तपासणी साठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी.

 दुकाने / उपहारगृहे | मॉल्स / कार्यालये | औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची वं व्यवस्थापनाची असेल . तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी.

डिस्पेसर व बायोमेडीकल वेस्ट ( वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट ) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल .

 

उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

0000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प.क्र. 600

आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत फ्र‍िडम रन संपन्न्

 

वर्धा,जिमाका 13:-  आझादी का अमृत महोत्सव-India@75 च्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व  क्रीडा मंत्रालय च्या वतीने देशभरात फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजन करण्यात आले होते. प्रथम चरण मध्ये महाराष्ट्रातील 09 जिल्हयात फ्र‍िडम रन‍ चे आयोजनात वर्धा जिल्हयातील बापु कुटी सेवाग्राम आश्रमची निवड करण्यात आली त्यानुषांगाने नेहरू युवा केद्र वर्धा द्वारा हुतात्मा स्मारक चरखा गृह सेवाग्राम ते बापु कुटी सेवाग्राम आश्रम वर्धा येथे जिल्हाप्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी हयांच्या सहकार्याने दिंनाक 13 ऑगस्ट 2021 रोजी फ्र‍िडम रनचे आयोजन  स्पोर्ट अशोसिएशन व युवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते हया कार्यक्रमाचे उदघाटन  मा.रामदासजी तडस हयांनी  हिरवी झेंडी दाखवून केले. 

या प्रंसगी हुतात्मा स्मारक सेवाग्राम  येथे मा. रामदासजी तडस हयांच्या हस्ते निसर्ग सेवा समितीच्या सहकार्याने वृ्‌क्ष लावण्यात आले. तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे श्री हांडे हयांनी सामुहिक प्रेरणा गीत व वंदना घेतली.   प्रथम राष्ट्रगीत घेवून दौडला सुरुवात करण्यात आली.  हयावेळी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, लतिका लेकुरवाळे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधरजी बेलखोडे, से नि जिल्हा युवा अधिकारी संजय माटे, सतिश इंगोले, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे कुस्ती प्रशिक्षक एस बी. बडगिलवार, श्री प्रविण पेटे, क्रीडा प्रशिक्षक श्रीमती भोंगाडे, एक्सेल इंडियाचे प्रितेश रामटेके आदी उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवधन शर्मा जिल्हा युवा अधिकारी हयांनी केले.   समारोप बापु कुटी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान  येथे करण्यात आला येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. टी.आर.एन. प्रभु  हयानी मार्गदर्शन केले.  तर आभार प्रदर्शन श्री अनिल निमगडे हयांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम पर्यवक्षक दयाराम रामटेके,  क्रीडा कार्यालयाचे रवि काकडे , नेहरू युवा केंद्राचे अमोल चावरे,  जयश्री भोयर, दिक्षांत टेंभरे, ऐश्चर्या भोयर व मृणाली बुडे  हयांनी परीश्रम घेतले.  दिनांक 13/08/2021 रोजी  निवडक 75 गांवामध्ये  राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व युवा मंडळाचे माध्यमातून  फिडम रनचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर कार्यक्रम 2 आक्टोबरपर्यंत 744 जिल्हयात होणार आहे अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा हयानी दिली.

 

000000

 

 

 

 

 

Tuesday, 20 July 2021

 

प.क्र. 547                                                                   दिनांक 19 जुलै 2021

पोलिस विभागाच्या नविन वाहनाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण

वर्धा, दि 19जुलै जिमाका:- पोलिस विभागास जिल्हा वार्षिक योजनेच्या  नाविन्यपूर्ण योजनेतून  प्राप्त झालेल्या निधीतुन खरेदी करण्यात आलेल्या 13 नविन चारचाकी वाहनाचे आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण व पोलिस विभागाच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन  करण्यात आले.

 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, सर्वश्री आमदार  अभिजित वंजारी, रणजित कांबळे, दादाराव केचे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर,  अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके,  वाहन शाखाप्रमुख पोलिस निरिक्षक महेश मुंढे, राखीव पोलिस निरिक्षक शालिक उईके व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना 2020- 21 च्या नाविन्यपूर्ण योजनेतुन  प्राप्त झालेल्या निधीतून 13 वाहने खरेदी करण्यात आले आहे.  यापूर्वी 8 वाहने असे एकूण  21 वाहने पोलिस विभागास प्राप्त झाली आहे. सदर वाहने जिल्हयातील 19 पोलिस स्टेशनला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे  पोलिस विभागाचे वाहन शाखा प्रमुख श्री. मुंढे यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांचे हस्ते  पोलिस मुख्यालयातील मैदानावरील जागेवर नव्याने बांधण्यात येणा-या पोलिस विभागाच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

                                                            00000

 







प.क्र. 548                                                                   दिनांक 19 जुलै 2021

         जनसुविधेसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 14 कोटी निधी उपलब्ध

                                              -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Ø  लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार अधिकचा निधी देणार

Ø  जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेसाठी  (सर्वसाधारण) अधिकचा 40   कोटी निधी प्राप्त

वर्धा, दि 19 जुलै (जिमाका):- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजनेमधून यावर्षी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे. लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करीत त्यांनी आणखी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केल्यास यासाठी अधिकचा निधी सुद्धा उपलब्द करून देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा  जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सुनील केदार यांनी केले.

जिल्हा परिषद सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली यावेळी श्री केदार बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, ऍड.अभिजित वंजारी, डॉ. पंकज भोयर, रणजित कांबळे, दादाराव केचे, समीर कुणावर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, वित्त व नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेम्भुरणे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  2021-22 साठी शासनाकडे जिल्ह्याची बाजू मांडून  पालकमंत्री सुनील केदार यांनी अधिकचा 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून आता सदर योजना  160 कोटी रुपयांवरून वाढवून सदर निधी 200 कोटी रुपये  मंजूर झाला आहे अशी माहिती यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांनी समिती सदस्यांना दिली.

2020- 21 मधील अनुसूचित जाती उपयोजनेतील मृद संधारण या बाबीसाठी 88 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र त्यापैकी 52.69 लक्ष रूपये निधी खर्च झाला, उर्वरित  35 लक्ष रुपयांचा निधी व्यपगत झाल्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिलेत. तसेच पाणलोटचे प्रस्ताव देण्यास दिरंगाई केल्याबाबत  संबंधित अधिकारी यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

धाम धरण सांडवा उंची वाढ

यावेळी धाम धरण सांडव्याची उंची वाढविण्या संदर्भात सभागृहात सादरीकरण करण्यात आले. 1999 पासून सदर प्रस्ताव लघु पाटबंधारे विभागाकडे प्रलंबित होता. पालकमंत्री यांनी यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे 19 फेब्रुवारी 2020 ला यासाठी पर्यावरण मान्यता मिळाली असून 6 जुलै 2020 ला वन विभागाची मान्यता मिळाली आहे. तसेच या प्रस्तावाला  10 मे 2021 रोजी प्रशासकीय मान्यता मिळून निविदा सुद्धा झालेली आहे. या प्रकल्पाच्या सांडव्याची उंची 1.90 मीटरने वाढविण्यात येणार असून यावर 34 स्वयंचलितगेट बसविण्यात येणार आहे. यामुळे 19 .54 दलघमी अतिरिक्त पाणी साठा निर्मिती होणार असून यामुळे वर्धा जिल्ह्यातील वर्धा शहर आणि आजूबाजूच्या 26 गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. सदर काम वर्षभरात पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्यात. 

खरीप पीक कर्ज वाटप

सण 2021- 22 च्या खरीप हंगामासाठी शासनाने 850 कोटींचा लक्ष्यांक दिला होता यामध्ये 300 कोटींची वाढ करण्यात आली असून 1150 कोटी रुपये सध्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 302 कोटी रुपये 26 हजार 36 शेतकऱयांना वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी 35 आहे अशी  माहिती जिल्हा बँक व्यवस्थापक यांनी समितीला दिली. शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून अद्यापही केवळ 35 टक्के कर्ज वाटप झाल्याबाबत पालकमंत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक लावण्यात यावी तसेच जिल्हाधिकारी यांनी पीक कर्ज वाटपाचा नियमित आढावा घ्यावा अशा सूचना श्री केदार यांनी दिल्या.

वर्धा शहर पाणी पुरवठा योजना

वर्धा शहर पाणी पुरवठा योजना अद्यापही पूर्ण झाली नसल्याबाबतही त्यांनी तीव्र आक्षेप घेऊन सदर योजना तात्काळ पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल यासाठी काम करा. तसेच या योजनेच्या दिरंगाई मध्ये ज्यांनी शासनाला फसवलं तसेच चुका केल्या त्यांच्यावर कायदेशीर  कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. शिवाय तत्कालीन पालकमंत्री यांनी योजना विहित कालावधीत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्यापपर्यंत  कोणताही दंड आतापर्यंत वसूल केला नाही याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिलेत.

यावेळी आमदारांनी विविध मागण्या केल्यात. यात आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या नवीन रुग्णवाहिकेच्या इंधन खर्च एन आर एच एम मधून भागविण्यात यावा, मागील वर्षी सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले त्याचे 178 कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत त्याचा प्रस्ताव पाठवावा, पदवीधरांसाठी जिल्ह्यात सर्व सोयी सुविधा असलेले पदवीधर भवन मंजूर करावे, अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील 3 वर्षाचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावे, पालकमंत्री  पांदण रस्ते योजना प्राधान्याने राबवावी, शेतकऱ्यांना खोडकीड संदर्भात मार्गदर्शन करावे, आष्टी शहिद या  क्रांतिकारक स्थळाचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात यावा, इत्यादी मागण्या केल्यात. 

यावेळी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शासकीय अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले. तसेच  कोविड परिस्थितीत काम करत असताना कारंजा तालुक्यातील ठाणेगाव येथील अंगणवाडी सेविका जानकी तुळशीराम भांगे यांचा कोविडने मृत्यू झाल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने 50 लक्ष रुपयांचे अनुदानाचा धनादेश आज पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. शिवाय नाविन्यपूर्ण योजनेत 75 बचत गटाला उद्योगासाठी निधी पालकमंत्री यांचे हस्ते वितरित करण्यात आला.

            या बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.