Wednesday, 19 May 2021

 

           रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क  इंधन पुरवठा

        वर्धा दि, 19 :- रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचे जिल्ह्यातील पुलगाव आणि हिंगणघाट या दोन पेट्रोल पंप धारकांनी जिल्ह्यात कोविड 19 रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने या वाहनांकरिता निःशुल्क इंधन देण्याचा उपक्रम सुरू करून केला आहे अशी माहिती आदित्य पाटणी आणि किशोर नायडू यांनी दिली.

रुग्णवाहिका आणि मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी सदर वाहन त्या सेवेसाठी वापरले जाते याचे प्रमाणपत्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग किंवा पोलीस विभागाकडून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनाना पुलगाव येथील पाटणी पेट्रोलियम, वर्धा रोड आणि हिंगणघाट येथील रिलायन्स बी पी मोबिलिटी लिमिटेड, एन एच 7 हैद्राबाद - नागपूर हायवे हिंगणघाट या दोन पेट्रोल पंपवर निःशुल्क पेट्रोल- डिझेल उपलब्ध करून देण्यात येईल असे श्री पाटणी आणि श्री नायडू यांनी सांगितले.

                                                            000

 

 

शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण

आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा 

                 -जिल्हाधिकारी

Ø कोविड अनुकूल वर्तणूक स्विकारणे आवश्यक

Ø शेतकऱयांनी पीक पद्धतीत बदल करावा

Ø 100 मी मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये



Ø बी जी 3 सारखे अप्रमाणित बियाणे विकत घेऊ नये

Ø सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे महत्वाचे

Ø कृषी केंद्राने खताचा जुना साठा नवीन दराने विक्री करू नये

          वर्धा दि 19(जिमाका):-  शेतीचा खरीप हंगाम सुरू होत  असल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे आणि खत बंधावरच पोहचविण्याचा निर्णय घेतला असून हा शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवणारा आहे. शेतकऱ्यांना खत व बियाणे मिळण्यास काही अडचण असल्यास त्यांनी गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्राधान्य देईल, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. 

         कोविड 19 आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दूरदृश्य माध्यमाद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ विद्या मानकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे जिल्हाधिकारी  कार्यालयातून उपस्थित होत्या, तर पत्रकार ऑनलाईन जुळले होते. 

      कोविड परिस्थितीमुळे आपल्याला यापुढे कोविड योग्य वर्तणूक स्विकारावी लागेल. गर्दी टाळणे हा आपला मुख्य उद्देश आहे. गर्दीमुळे कोविडचे संक्रमण  होते, त्यामुळे आपल्याला काही बंधने घालावी लागतात. पण आपण वारंवार अशी बंधने लावू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला अनेक सेवा घरपोच देणे आणि घरपोच  सेवा स्वीकारणे याची सवय करून घ्यावी लागेल. पुढील काळात हेच आपल्या जिल्ह्यातील कोरोना संक्रमण कमी करण्याचा मार्ग राहील,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

     शेतकऱ्यांसाठी काही बाबी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची अडवणूक किंवा त्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. खतांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे कृषी केंद्राने त्यांच्याकडील जुना साठा शेतक-यांना नवीन दराने विकू नये. असे करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषी केंद्राकडील साठयाची माहिती कृषी विभागाला देणे बंधनकारक केले असून  साठा तपासणीसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

       जम्बो हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, मात्र शासनाने आता बदललेल्या धोरणानुसार त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. त्या करून त्यासाठी 50 टक्के निधीची तरतूद करून सदर प्रस्ताव पुन्हा शासनाकडे तातडीने सादर करण्यात येईल. तसेच ऑक्सिजन स्वयंपूर्णतेसाठी 11 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाला आपण उभारत आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. 

       शेतकऱयांनी मागील वर्षीची सोयाबीनची परिस्थिती बघता यावर्षी पीक पद्धतीत बदल करावा, तूर - सोयाबीन, तूर - मूग असे आंतरपीक घ्यावे. तसेच सोयाबीनची उगवण शक्ती तपासल्यानंतरच त्या बियाण्यांची पेरणी करावी. यामुळे निकृष्ट बियाणे पेरणीपूर्वीच ओळखता येईल आणि शेतकऱयांचे नुकसान टळेल. तसेच वर्धेत धूळ पेरणी करण्याची पद्धत आहे. मात्र लवकर पेरणी केल्यामुळे कापूस पिकावर गुलाबी बोन्ड अळी आणि बोन्डसड  रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेत -शिवारात 100 मिली मीटर  पाऊस झाल्याशिवाय कोणतीही पेरणी करू नये, यामुळे दुबार पेरणीचे आणि किडीचे संकट शेतकऱयांना टाळता येईल, असे विद्या मानकर यांनी सांगितले.

        बी जी - 3 हे अप्रमाणित बियाणे आहे, हे बियाणे उगवत नाही. त्यामुळे शेतकऱयांनी हे बियाणे घेऊ नये. शेतकऱयांनी परवानाधारक कृषी केंद्रकडून  बियाणे खरेदी करावे, आणि बियाणे खरेदीची पावती आणि त्याचा पिशवी जपून ठेवावी. असे अप्रमाणित बियाणे आढळल्यास 07152- 250091 या क्रमांकावर तक्रार करावी असेही श्रीमती मानकर म्हणाल्या.

                                              00000000000

 

जिल्ह्यात घरपोच भाजी विक्रीला उत्तम प्रतिसाद

जिल्ह्यातील शेतकऱयांची सुमारे 16 लक्ष  रुपयांची उलाढाल

37 हजार 840 कुटुंबाला घरपोच भाजी

     वर्धा, दि 19:- (जिमाका) घरपोच भाजी विक्रीला शेतकरी आणि ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 37 हजार 840 कुटुंबांपर्यंत घरपोच भाजी पोहचवली असून यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा चांगला नफा झाला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱयांची जवळपास 16 लक्ष रुपयांची उलाढाल झाली आहे.

कडक संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना भाजीपाला, फळे आणि किराणा घरपोच पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासन, सर्व मुख्याधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ यांना निर्देश दिलेत. त्यानुसार कृषी विभागाने गुगल फॉर्मच्या माध्यमातून ग्राहक आणि शेतकरी यांना नोंदणी करण्यास सांगितले. याला शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.  जिल्ह्यात 953 ग्राहकांनी ऑनलाईन मागणी नोंदवली तर 232 शेतकऱयांनी कृषी विभागाकडे नोंदणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत 1682 क्विंटल भाजीपाला विक्री झाली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून तालुकानिहाय शेतकऱ्यांना मिळालेले उत्पन्न असे आहे.

एकूण विक्री  मिळकत -

वर्धा -  रुपये 3, 40,990/-

समुद्रपूर - रुपये 1,28,320/-

आष्टी - रुपये 2,44,180/-

कारंजा घा - 61, 430/-

आर्वी   - 3, 32,965/-

सेलू - 1,35, 490/-

देवळी -  1,23,760/-

हिंगणघाट - 2,13,570/-

एकूण उलाढाल - 15 लक्ष 80 हजार 705 रुपये झाली आहे.

चौकट

एखाद्या भागातील ग्राहकाने भाजीची मागणो नोंदवली असेल आणि शेतकरी त्या ग्राहकाकडे भाजी घेऊन गेल्यावर त्या भागातील नोंदणी न केलेल्या नागरिकांनाही त्याने घरपोच भाजी दिलेली आहे. त्यामुळेच ऑनलाईन नोंदणी कमी दिसत असली तरी जिल्ह्यातील सुमारे 37 हजार 840 कुटुंबापर्यंत शेतकऱ्यांनी भाजी विक्री केली आहे. आता ग्राहकांनीही भाजी उत्पादक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक स्वतःकडे घेतल्यामुळे ग्राहक मोबाईलद्वारे थेट शेतकऱ्याकडे भाजीची मागणी नोंदवत आहे.

डॉ विद्या मानकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

चौकट

आम्ही 4 मित्रांनी  मागच्या लॉकडाऊन पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. सेंद्रिय भाजीपाल्यासाठी आम्हाला विशिष्ट मार्केट नव्हते. मार्च महिन्यात टोमॅटोचे बाजारात भाव पडल्यामुळे ते 1 रू किलो ने विकावे लागले होते. मात्र घरपोच भाजीपाला विक्री सुरू झाल्यामुळे 5 दिवसात 25 हजार रूपयांची विक्री झाली आहे. हे असेच सुरू राहिले तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल.आमच्यासारख्या नवीन प्रयोग करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहील.

वैभव लोखंडे

तरुण भाजीपाला उत्पादक शेतकरी,

सेलू घोराड

00000

Monday, 17 May 2021

 

वर्धा नगर परिषदतर्फे घरपोच सेवेसाठी  MY WARDHA अँप सुरू

वर्धा दि, 17 (जिमाका):-  वर्धा जिल्हामध्ये सुरू असलेल्या कडक संचारबंदी काळात बाजारात व दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये व नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा मिळाव्या याकरिता वर्धा नगर परिषदेने माय वर्धा मोबाईल अँप कार्यान्वित केले आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठादार यांचे

संपर्क व पुरवित असलेल्या सेवा याची माहिती या अँप मध्ये आहे. पहिल्याच दिवशी शहरातील 180 पूर्वठादारांनी  या अँप मध्ये नोंदणी केली आहे. याचे लोकार्पण आज नगराध्यक्ष अतुल तराळे व नगर परिषद मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी  यांचे संकल्पनेनुसार  नगरपरिषदने माय वर्धा (MY WARDHA) हे अँप विकसित केले आहे. सदर अँप वर्धा शहरातील नागरिकांकरिता आज दि. 17 मे रोजी नगरपरिषद येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सभागृह येथून लोकार्पण (Launching) लोकार्पण करण्यात आले. 

सदर APP च्या माध्यमातून व्यापारी , अत्यावश्यक सेवा पुरवठा करणारे व नागरिक यांचे करिता सुविधा झाली आहे. तसेच या APP च्या माध्यमातून पूरवठा करणारे दुकानदार , कामगार, डिलिव्हरी बॉय यांचे ओळखपत्र उपलब्ध होतील जेणेकरून शासनाच्या पथकांनी तपासणी केल्यास सेवा देण्यास अडचण

जाणार नाही.सदरचे ॲप हे नागरिकांना

परिषद वर्धाचे संकेतस्थळ

http//wardhamahaulb.maharashtra.gov.in / येथून डाऊनलोड करता येईल तसेच लवकरच गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. याबाबत काही अडचण असल्यास 8530006063 या व्हाट्स अँप क्रमांकावर संदेश पाठवावा.

नगराध्यक्ष  अतुल तराळे यांनी कोरोनाच्या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी व

नागरिकांनी घराबाहेर न पडता अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी हे अँप उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, गटनेता  निलेश खोंड, गटनेता प्रदीपभाऊ ठाकरे ,  आशिष वैद्य शिक्षण सभापती , नगरसेवक कैलास राखडे,

सचिन पारधे, गोपी त्रिवेदी  यांच्या ऑनलाईन उपस्थितीत करण्यात आला.

00000

 

जिल्हयात  लॉकडाऊनला पुन्हा मुदत वाढ

1 जून पर्यंत निर्बंध लागू

अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना शहरी भागात केवळ घरपोच सुविधेची परवाणगी

ग्रामीण भागात शिथिलता

     वर्धा, दि.17 (जिमाका):  जिल्ह्या प्रशासनाने कोविड रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात लावलेले कडक निर्बंध 18 मे पासून ग्रामीण भागात थोडे शिथिल करत शहरी भागात पूर्वीप्रमाणेच 1 जून सकाळी 7 वाजता पर्यंत वाढवले आहेत. शहरी भाग आणि शहराला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती यांच्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने घरपोच सेवा पुरविण्यासाठी सकाळी 7 ते 1 या कालावधीत चालू ठेवता येणार आहे. तसेच  कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक  वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

1 शहरी भाग

वर्धा नगर पालिका व लगतच्या मोठ्या 11 ग्रामपंचायती पुलगाव व लगतच्या 2 ग्रामपंचायती, सिंदी रेल्वे ,हिंगणघाट नगर परिषद व लगतच्या 4 ग्रामपंचायती आर्वी, देवळी सेलू, नगरपालिका व समुद्रपूर कारंजा आष्टी या नगरपंचायत क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने ठरलेल्या दिवशी सकाळी 7 ते 1 पर्यंत घरपोच सेवेसाठी सुरु राहतील

सोमवार- बुधवार -शुक्रवार

1 सर्व किराणा माल, डेअरी,बेकरी, मिठाई अंडे, मटन, पोल्ट्री, कोंबडी, मासे, पिठाची गिरणी तसेच खाद्य पदार्थाची सर्व दुकाने

 मंगळवार,गुरूवार व शनिवार

 या दिवशी  सर्व भाजीपाला व फळ विक्रेते यांची दुकाने घरपोच सेवा पुरविण्यासाठी सकाळ 7 ते दुपारी 1 वाजपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील.

ग्रामीण भाग

नगरपरिषदेला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती वगळता जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

ग्रामीण भागातील आधार केंद्र शेतकऱ्यांकरिता सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहतील.

2 पाळीव  प्राण्याच्या खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामात व्यक्तीसाठी  तसेच संस्थासाठी  सबंधीत  असणा-या साहित्याच्या  निगडीत  दुकाने सोमवार ते शनिवार फक्त घरपोच सेवा सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत राहील.

3.गॅस एजन्सी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत राहील.

4.हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन  थाळी सकाळी 11 ते रात्री 8

5.दुध संकलन केंद्रे व घरपोच  दुध वितरण  व्यवस्था सकाळी 7 ते 1 1 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहिल

6. कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषी अवजारे  व शेतातील  उत्पादनाशी सबंधीत  दुकाने.सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याकरीता सुरू राहील.  मात्र शेतक-यांना  आवश्यक  त्या वस्तुचा पुरवठा  घरापर्यंत  तसेच बांधापर्यंत  करण्याची जबाबदारी  ग्रामपंचायत स्तरावर  संबधीत  कृषी सेवक,  तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांची राहील

7.सार्वजनिक , खाजगी क्रिंडागणे, मोकळया जागा, उद्याने, बगिचे पुर्णता बंद राहील.

8.केशकर्तनालय, सलुन,  स्पा, ब्युटीपार्लर , शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद. तथापी ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.

9.लग्न समारंभ , स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल, चित्रपट गृहे, व्यायामशाळा, , जलतरण तलाव, करमणुक  व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृह, सभागृह बंद राहील. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी राहील.

5. चष्म्याची दुकाने  बंद राहिल, मात्र आपातकालीन  परिस्थितीत रुग्णांस  डोळयांच्या डॉक्टरांनी  त्यांच्या दवाखान्याला  जोडण्यात आलेल्या चष्मा दुकानातुन चष्मा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राहील.

6.नागरी भागातील  पेट्रोलपंप सकाळ 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील.  परंतु  रुग्णवाहिका, शासकिय वाहने,  अत्यावश्यक सेवेतील  कर्मचारी यांचे वाहनाकरीता  पेट्रोल डिझेल  उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी  कंपनीचे अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिका-यांची राहिल.

7.सर्व शासकिय , निमशासकिय, खाजगी  कार्यालये व आस्थापना, वित्त व्यवसायाशी निगडीत  सर्व कार्यालयीन वेळेनूसार 15 टक्के क्षमतेने सुरू राहील.

8. सर्व बँका, पतसंस्था, पोष्ट  ऑफिस ही कार्यालये नेहमी प्रमाणे सुरू राहतील. बँकांच्या शाखामध्ये गर्दी टाळण्याकरीता योग्य ते नियोजन करण्यात यावे.

9. सार्वजनिक तसेच खाजगी  बस वाहतुक , रिक्षा, चारचाकी, व दुचाकी वाहन यांची वाहतुक  पुर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना  ओळखपत्र  सोबत बाळगणे  बंधनकारक राहील.

सुरु राहणारे व्यवसाय व संस्था

10.खाजगी व सार्वजनिक  वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा

11.मेडीकल स्टोअर्स व दवाखाने  तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहील.

12.अत्यावश्यक  सेवा व कोरोना  प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबधित शासकिय, निमशाकिय कार्यालये 

12. एमआयडीसी,  उद्योग, कारखाने, सतुगिरणी  सुरू ठेवण्यासाठी  केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांनाच परवानगी राहील.

13.शासकिय यंत्रणा मार्फत  मान्सुपुर्व  विकासकामे  आवश्यक पाणीपुरवठा  व टंचाई विषयक  कामे चालु राहिल. यंत्रणांना वेगळया परवाणगीची आवश्यकता राहणार नाही. घरपोच सेवा पुरविणाऱ्यांना आर. टी. पी. सी. आर. आवश्यक तसेच संबंधित दुकानाचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई करण्यात येईल.

 

0000

 

Monday, 27 July 2020


जिल्ह्यात यंदा विक्रमी 32 लाख 10 हजार क्विंटल कापसाची खरेदी
पालकमंत्र्यांच्या सततच्या पाठपुरावयामुळे शेतकऱ्यांना दिलासा
       वर्धा,दि 27 (जिमाका):- मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा प्रश्‍न उभा ठाकला होता. पण नंतरही  शासनाने कापूस खरेदी करण्यास मान्यता देऊनही कधी खरेदी  केंद्राची कमतरता तर कधी मजुरांची वाणवा अशा समस्यांवर मात केली.  पालकमंत्र्यांनी आठवड्यातून दोनदा जिनिंग-प्रेसिंग मालक, सीसीआयचे प्रतिनिधी, कापूस पणन महासंघ, कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे प्रतिनिधी यांच्याशी सातत्याने बैठका घेत, भर उन्हात दौरे करून वर्धा जिल्ह्यातील कापूस खरेदी पूर्णत्वास नेली.  यावर्षी जिल्ह्यात 1 लक्ष 74 हजार 709  शेतकऱ्यांकडून 32 लक्ष 10 हजार 593 क्विंटल कापसाची कापसाची खरेदी झाली आहे.  कोरोना संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा  दिलासा मिळाला आहे.
            जिल्ह्यात 2019-20 मध्ये 2 लक्ष 34 हजार 997 हेक्टर क्षेत्र  कापसाच्या लागवडीखाली होते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन लॉक डाऊनच्या स्थितीपर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 26 हजार 641 शेतकऱ्यांकडील 23 लक्ष 12 हजार 798  क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. मात्र कोविडचे संकट सुरू होताच महाराष्ट्र शासनाला लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये कापूस खरेदीची प्रक्रियाही काही काळ बंद ठेवावी लागली. परंतु शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचा प्रश्न पाहता  राज्य शासनाने दुसऱ्या लॉक डाऊनमध्ये कापूस खरेदीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली .  पण त्यासाठी 50 गाड्यांची मर्यादा ठेवण्यात आली होती. तसेच मोठ्या प्रमाणात परराज्यातील मजूर आपापल्या गावी परत गेल्यामुळे कापूस खरेदीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होत नव्हते. 
        हे प्रश्न समोर येताच पालकमंत्री सुनील केदार यांनी सी सी आय चे  राज्याचे महाप्रबंधक यांच्याशी  फोन वर चर्चा करून त्यांना वर्धा जिल्ह्यातील खरेदी केंद्राची पाहणी करण्यास बोलवले.  स्वतः त्यांच्यासोबत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्ह्याच्या आठही तालुक्यांचा दौरा केला. जिथे -जिथे अडचणी येत होत्या तिथे पालकमंत्री स्वतः जिनिंग-प्रेसिंग मालकांशी, कृषी उत्पन्न बाजार समिती व  पणन महासंघाचे प्रतिनिधी तसेच  जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवत होते. यासाठी 45 डिग्री सेल्सियस तापमानात दौरा असो की रात्री बारा वाजता बैठक असो त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढली.
      अनेक ठिकाणी केवळ 2 खरेदी केंद्र होते तिथे वाढीव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये वर्धा -5 ,हिंगणघाट-  6,   सेलू- 6, समुद्रपूर- 5, देवळी – 6, कारंजा – 3, आर्वी 6,  अशी जिल्ह्यात 37 कापूस खरेदी केंदें सुरू करण्यात आली. केंद्र सुरू झाल्यावरही कापूस गाठी आणि सरकी  ठेवण्यासाठी गोडाऊनच्या उपलब्धतेचा प्रश्न उभा राहिला. यावर एम. आय. डी. सी. मधील खाजगी रिकामे गोडाऊन उपलब्ध करून देण्यात आले. लॉक डाऊनमुळे शेतकऱ्यांच्या घरातच लॉक झालेला कापूस खरेदी केंद्रात पोहचला होता. पालकमंत्र्यानी सतत दोन महिने केलेल्या पाठपुराव्यामुळे जुन महिना अखेर जिल्ह्यात नोंदणी केलेल्या 48 हजार 63 शेतकऱ्यांकडील 8 लक्ष 97 हजार 804 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. कोविड-19 च्या पूर्वीचे आणि कोविड-19च्या  नंतर अशी एकूण 1 लक्ष 74 हजार 709 शेतकऱ्यांकडील 32 लक्ष दहा लाख 593 क्विंटल कापसाची खरेदी जिल्ह्यात पूर्ण झाली आहे.  पेरणीच्या तोंडावर कापूस विक्री होऊन शेतकऱ्यांच्या हातात पेरणी करण्यासाठी दोन पैसे देण्याचे महत्वाचे काम याकाळात झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
        पालकमंत्री सुनील केदार -मुळात वर्धा जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. लॉक डाऊनमुळे शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूस पावसाळा सुरू होण्यापूर्वी विकला जावा यासाठी प्रयत्न केले. कापुस खरेदी जूनच्या अखेरीस संपवणारा वर्धा हा पहिला जिल्हा ठरला. शेतकऱ्यांच्या हातात पेरणीसाठी पैसे मिळाले हे वर्धा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून मिळालेले सर्वात मोठे समाधान आहे.
                                                                        0000

Thursday, 4 July 2019




'माझी कन्या भाग्यश्री' चा 482 मुलींना लाभ
1 कोटी 20 लक्ष रुपये मुलींच्या नावे मुदती ठेव
        वर्धा ,दि 4 जुलै (जिमाका ) लिंग निवडीस प्रतिबंध करून  मुलीचा जन्मदर वाढविणे आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री'  ही योजना समाजातील सर्व घटकांसाठी सुरू केली. 1 ऑगस्ट 2017 पासून या योजनेची नव्याने अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात दोन वर्षात 482 मुलींना  योजनेचा लाभ मिळाला आहे.
          राज्यातील सरासरी लिंग गुणोत्तर प्रमाण कमी झाले होते. बीड सारख्या जिल्ह्यात हे प्रमाण 1000 मुलांमागे 850 मुलीं पेक्षा  ही कमी होते.  भविष्यातील ही धोक्याची घंटा बघता राज्यशासनाने मुलींचा जन्मदर वाढावा, स्त्री भ्रूण हत्या थांबाव्यात, मुलीच्या जन्माचा उत्सव व्हावा आणि जन्मलेल्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मुलीच्या पालकांना मदत आणि प्रोत्साहन म्हणून माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली. 2017 पूर्वी ही योजना केवळ दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलींसाठी राबविण्यात येत होती.  मात्र या योजनेची व्याप्ती वाढवून,  यामध्ये बदल करून,  कुटुंबाचे उत्पन्न साडे सात लाख रूपये असणाऱ्या समाजातील सर्व घटकांसाठी योजना लागू करण्यात आली.  . यामध्ये  खासकरुन 1 ऑगस्ट 2017 ला आणि त्यानंतर जन्मलेल्या  एक किंवा दोन मुलीसाठी या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्य या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरते.


         लाभाचे स्वरूप:-  एका मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या  दाम्पत्याच्या मुलीच्या नावे 50 हजार रुपये  बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतात. यामध्ये दर सहा वर्षांनी व्याजाची रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी काढता येते.मुलगी 18 वर्षाची झाल्यावर आणि इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मुलीला मूळ मुद्दल आणि त्यावरील व्याज अशी एकत्रित रक्कम देण्यात येते. यासाठी 18 वर्षापर्यंत मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्यास दोन्ही मुली पात्र ठरतात. 1 ऑगस्ट 2017 नुतर दोन  मुलींना जन्म झाला. असल्यास आणि कुंटूंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास दोन मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये मुदती ठेव योजनेत गुंतविण्यात येतात.  

         सदर योजनेनंतर्गत जिल्ह्यात 482 लाभार्थ्यांना 1 कोटी 20 लक्ष 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.  मुदती ठेव चे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये वर्धा 159, सेलू  55, समुद्रपूर 37, हिंगणघाट 54,  आर्वी 55, देवळी 48, आष्टी 48 आणि कारंजा 26 मुलींच्या नावे या योजनेतून बँकेत मुदती ठेव ठेवण्यात आली आहे. 
           ही योजना 7 लक्ष 50 हजारपर्यंत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या समाजाच्या सर्व घटकातील मुलींसाठी लागू आहे. तसेच बालगृहातील अनाथ मुलींनासुद्धा या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. दत्तक घेणाऱ्या पालकांना योजनेच्या अटी प्रमाणे ही योजना लागू आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या,  केवळ एक किंवा दोन मुली असणाऱ्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
 
 ज्योती कडू

बालविकास प्रकल्प अधिकारी
नागरी प्रकल्प वर्धा