Saturday, 5 January 2019




देश निर्मितीत बांधकाम कामगाराचा वाटा मोठा
                                             सुधीर मुनगंटीवार
Ø बांधकाम कामगार नोंदणी मेळावा
वर्धा , दि. 05 : देश निर्मितीत बांधकाम कामगाराचा वाटा मोठा आहे. यासाठी देशाच्या निर्माणासाठी घाम गाळणा-या कामगारासाठी शासन विविध योजना राबवित आहे. गेल्या चार वर्षात शासनाने या येाजनेत दुप्पट वाढ केलेली असून यामुळे कामगार मंडळाकडे कामगारांच्या नोंदणीत सहापट वाढ झालेली आहे.  या नोंदणीधारक कामगारांना  विविध योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे  वित्त, नियोजन व वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज बांधकाम कामगाराच्या मेळाव्यात केले.
आज सार्वजनिक ग्रंथालयाच्या  सभागृहात आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी बांधकाम कामगारा संघटनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगार मेळाव्याला  इमारत व बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, खासदार रामदास तडस,  जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार, डॉ. पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, आमदार रामदास आबंटकर,  माजी खासदार दत्ता मेघे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप ठाकूर यांची उपस्थिती होती.
 
शासनाने सत्तेत आल्यावर प्रथम मंत्र्याच्या वाहनावरील लाल दिवे हटवले. लाल दिव्यावर प्रेम करण्यापेक्षा   लाल रक्ताच्या माणसाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणणे  हे उद्दिष्ट ठेवले. यासाठी शासन दिनदुबळे, कष्ठकरी, सामान्य माणूस हा केंद्र बिंदू  समजून  राज्य शासन योजना  राबवित आहे. बांधकाम कामागारांनी महामंडळाकडून ‍मिळालेल्या पैशाचा सदुपयोग केला पाहिजे. कारण हा  पैसा मेहनतीचा आणि कष्टाचा आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले, बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत  निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले. 
यावेळी मंत्रीमहोदयांना जिल्हयातील कामगार संघटनानी  जिल्हयात कामगार भवन उभारण्यात यावे तसेच कामगारांना पेंशन लागु करावी अशी मागणी केली असता श्री. मुनगंटीवार यांनी कामगार भवनाची मागणी पूर्ण करुन  कामगार भवनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या कामगार भवनामध्ये  कामगाराच्या मुलांना  शिक्षण, संगणक, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात येईल अशी  ग्वाही  यावेळी दिली. तसेच पेंशन बाबत  केंद्र पेंशन कायदयानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात पुर्वी 2 लाख बांधकाम कामगाराची नोंदणी होती. गेल्या चार वर्षात आता 13 लाख नोंदणी झालेली असून या नोंदणी करण्यात आलेल्या सर्व बांधकाम कामगार व त्याच्या पाल्यांना महामंडळाकडून विविध योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे श्री यादव म्हणाले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते 500 बांधकाम कामगारांना निधीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
                             00000



Thursday, 3 January 2019








चार वर्षांत राज्य शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर
  शिक्षणमंत्री विनोद तावडे
Ø शिक्षणाची वारीचे थाटात उदघाटन
Ø  100 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार
Ø  गोंदिया हा शाळाबाह्य विद्यार्थी जिल्हा घोषित
Ø  राज्य शासन ओपन बोर्ड सुरू करणार
           वर्धा, दि 3 जिमाका :-  कोणतंही मुलं नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्याच्या कपाळावर नापास चा शिक्का मारतो.  विद्यार्थ्याना  कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करण म्हणजे शिक्षण अस मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा परिणाम म्हणजे 4 वर्षात  राज्य शिक्षणाच्या बाबतीत देशात 16 व्या क्रमांकावरून 3  क्रमांकावर आले आहे आणि यावर्षी ते प्रथम क्रमांकावर राहील.विद्यार्थी घडविणे हा मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
      आज वर्धा येथिल  चरखा घर येथे आयोजित  'शिक्षणाची वारी'  या उपक्रमाचे  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, विभागीय आयुक्त संजीव कुमार , शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती  जयश्री गफाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे शिक्षण विभागाचे संचालक सुनील मगर उपस्थित होते.
      राज्यात शिक्षण क्षेत्रात विविध गुणात्मक बदल केल्यामुळे अनेक शिक्षकांनी त्याचे  स्वागत करून ते राबविल्यामुळे आज शिक्षणात गुणात्मक बदल दिसतोय. वर्धेत 1 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषद शाळेत आणण्याचा काम जिल्हा परिषद शिक्षकांनी केले आहे. हा त्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे याचा परिणाम असून यावर श्रेय शिक्षकांना जातेयं असे श्री तावडे यावेळी म्हणाले. इंगजीतून शिक्षणाला विरोध नाही हे स्पष्ट करताना ते म्हणाले की मराठी भाषा  ही डोळे असून इंग्रजी भाषा  ही चष्मा आहे. त्यामुळे दृष्टी असल्याशिवाय  दूरदृष्टी येणार नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षणाला त्यांचा नेहमीच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
          जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची शोक्षणातील प्रगती वाढावी म्हणून स्वखर्चाने विविध उपक्रम राबविले.त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि त्यांचे प्रयोग राज्यभर पोहचून इतर शाळांनी तसेच उपक्रम राबवून राज्याला शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करावे, यासाठी शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात 64 हजार शाळा शिक्षक आणि लोकप्रतिनिधिंच्या च्या लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत. आता केंद्र शासन देशातील 15 लाख शाळांमध्ये डिजिटल बोर्ड हा उपक्रम सुरु करणार आहे. राज्य शासन नापास विद्यार्थ्यांसाठी वन टू वन करिअर समुपदेशन करून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देत आहे. घोकंपट्टी परीक्षा पद्धतीमुळे महाराष्ट्र संशोधक तयार करण्यात कमी पडले आहे. त्यामुळे मागील 4 वर्षांपासून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम बदलला आहे. तसेच यापुढे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षकाची उपलब्धता होणार असल्यामुळे शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी वेळ मिळेल असेही त्यांनी सांगितले.
 
     यावेळी विनोंद तावडे यांनी शिक्षक , विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शिक्षण विषयक प्रश्नांना उत्तरे दिलीत. यावेळी श्री विद्यामंदिर येथील विद्यार्थिनीने दफ्तराच्या ओझ्याचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा श्री तावडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाना यावर नियमांची अंमलबजावणी करण्यास  सांगितले.
100 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार
       महाराष्ट आंतराष्ट्रीय शैक्षणिक बोर्डाची स्थापना करून राज्य शासनाने यावर्षी 13 शाळा सुरू केल्यात. पुढील वर्षात 100 शाळा सुरू करणार असल्याचे श्री तावडे यांनी सांगितले. याचा अभ्यासक्रम डॉ. रघुनाथ  माशेलकर,  डॉ काकोडकर, विजय भटकर, सोनम वांगचोक सारख्या शास्त्रज्ञानी तयार केला आहे असेही त्यानी यावेळी सांगितले.
ओपन बोर्डची स्थापना करणार
     काहीं विद्यार्थी संगीत, अभिनय, गायन ,खेळ यामध्ये रस असतो. पण शाळेमुळे त्यांना त्यांच्या या सुप्त गुणांवर लक्ष देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे त्या- त्या क्षेत्रात उत्तम  करियर घडविण्यासाठी आणि शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी असे ओपन बोर्ड त्याला मदत करेल.
बालरक्षक चळवळ
      राज्यात बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून कोणतेही मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी काम करीत आहे. या माध्यमातून गोंदिया जिल्हा हा शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त जिल्हा झाला आहे असे श्री तावडे यांनी सांगितले.



         यावेळी आमदार पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावर यांनीही वारीसाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी अनटोल्ड स्टोरी या दिव्यांगाणी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या यशोगाथेच पुस्तक प्रकाशन करण्यात आले. दीप्ती बेले या कान्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा दिपकाव्य कविता संग्रह, शुभांगी वासनिक यांच्या रत्नाची खाण आणि सार्थक जीवनासाठी संस्कार पार्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

      शिक्षणाची वारी मध्ये विविध शाळांचे 55 स्टॉल लावण्यात आले आहेत . 10 जिल्हे या वारीला जोडले असून 6 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या वारीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सुनील मगर यांनी प्रस्ताविकातून केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी तर आभार  शिक्षण उपसंचालक सतिश मेंढे यांनी  मानले.
                                                                        0000



Wednesday, 2 January 2019






               सुनंदा चौधरी  यांचा  मुख्यमंत्र्यांशी संवाद
• स्वतःच घर मिळाल्यामुळे आता आईच्या घरी राहावे लागणार नाही
• विविध आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

·        आवास योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार 5 ब्रॉस रेती
           वर्धा दि. 2 (जि.मा.का.):   पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी पन्नास हजार मिळाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले अन स्वच्छता गृहासाठी रोहयोमधून अनुदान मिळाले त्यामुळे आम्हाला आता आईच्या घरी  राहावे लागणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया उमरी मेघे  येथे हक्काचे स्वतःचे पक्के घर मिळालेल्या सुनंदा अनिल चौधरी  यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.

       आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधुन त्यांच्या भावना आणि योजनेतील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्स सभागृहातुन  उमरी मेघे येथील सुनीता अनिल चौधरी,  कविता निरंजन  दखणे, कविता आणि जितेश कोट्टेवार रा. समर्थ वाडी, सविता सुरेशराव गायकवाड  रा वर्धा यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना
(ग्रामीण, शहरी ), रमाई आवास योजनेतील एकूण 19
  लाभार्थी उपस्थित होते.

          सुनीता चौधरी यांचे 2010 मध्ये लग्न झाले असून त्यांच्या यजमानांचे स्वतःचे घर नसल्यामुळे  लग्नानंतर आईच्या घरी एका छोट्याश्या खोलीत त्यांचा संसार सुरू आहे. त्यांचे यजमान गवंडी काम करत असूनही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे स्वत:चे घर बांधू शकत नसल्याचे दुःख होते. घर बांधायला त्यांच्याकडे जागाही नव्हती. पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदी योजनेतून त्यांना घरासाठी 50 हजार रुपयांची जागा उपलब्ध करून दिली. तसेच 2018 मध्ये त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले. सद्यस्थितीत त्यांचे  घर स्लॅब पर्यंत बांधून झाले असून मार्च महिण्यात नवीन घरात गृहप्रवेशाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांनी  मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले. 
 
          कविता निरंजन दखणे  यांनी  आपण पूर्वी  मातीच्या कच्या घरात राहत होतो. 2017 -18 मध्ये  प्रधानमंत्री आवास योजनेमुळे पक्के घर मिळाले. आता मी माझे पती आणि दोन मुल अतिशय आनंदात या घरात राहत असून या घरासाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले.
           आरती जितेश कोट्टेवार म्हणाल्या वर्धेतील गजबजलेल्या राजकला टॉकीजवळ  आजूबाजूला सर्व मोठी घरे असताना केवळ माझेच एक झोपडे होते. त्यांच्या घराकडे बघून माझेही पक्के घर असावे असे वाटत होते. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण  होईल असे ध्यानीमनी नव्हते. पण प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झाले असून घराचे बांधकाम सुरू आहे. दुसरा टप्प्याचा निधी मिळाला नाही असे सांगितले.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्धा जिल्ह्यात रेतीचा प्रश्न आहे का? अशी विचारणा केली. त्यावर कोट्टेवार यांनी रेती उपलब्ध नसल्यामुळे दुप्पट भावाने खरेदी करावी लागत असल्याची वस्तुस्थिती मांडली. यावर घरकुल योजनेतील घरे बांधताना मुख्यतः वाळूची समस्या भेडसावत होती. आता  ५ ब्रास पर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न घेता या योजनेतील लाभार्थ्याना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढील हफ्तेही लवकरच मिळतील अशी ग्वाही दिली.
             धुणीभांडी करणाऱ्या सविता गायकवाड यांनी घरकुल मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गरिबांना स्वत:चे हक्काचे घर देण्यासाठीच ही योजना असल्याचे सांगितले.
  तसेच लाभार्थ्यांचे कुंटूंब, मुलांचे शिक्षण आणि घराच्या बांधकामाविषयी मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली.
          राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२ लाख घरांचे २०१९ च्या अखेर पर्यंत नियोजन असून आता पर्यंत ६ लाख घरे बांधली आहेत. उर्वरित ६ लाख घरे यावर्षात पूर्ण होतील. मातीच्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या, पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जीवन जगणाऱ्या गरिबांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत ही योजना सुरू राहील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी घर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले. मजबूत भारत करण्यासाठी, सर्वाना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी  यावेळी सांगितले..
                                                    0000

Friday, 14 December 2018



जिल्ह्यात एकही टँकर लागणार नाही असे नियोजन करा
                                                      - चंद्रकांतदादा पाटील
       - दुष्काळ आढावा बैठक

 
वर्धा दि 14 :-
  दुष्काळात अन्नधान्याची कमतरता अन्नधान्य दुसऱ्या राज्यातून किंवा  विदेशातून आयात करून पूर्ण करता येते. चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी चारा छावण्या  सुरू करता येतात. पण पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाणी आयात करू शकत नाही. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांमध्ये एकाही गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा  लागू नये यासाठी  पाण्याचे योग्य नियोजन करावे.किरकोळ  नादुरुस्त असलेल्या पाणी पुरवठा योजना दुरुस्त करून सुरू ठेवाव्यात असे निर्देश महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेत.
        आर्वी येथील नगर परिषद सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थतिचा  आढावा घेतला, यावेळी श्री पाटील बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने उपस्थित होते.

         राज्यात कुठेही पाण्यासाठी टँकर लावावा लागू नये यासाठी नियोजन करीत असल्याचे सांगून त्यांनी टँकर मुळे नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो आणि मिळालेले पाणी लोक शुद्ध करून पित नाहीत. तसेच टँकरमधील भ्रष्टाचार हा सुद्धा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे जिथे पाणी पुरवठा योजना सुरू आहेत तिथे पाण्याचे नियोजन आतापासून करायला पाहिजे. पाऊस उशिरा सुरू झाला तरी पाणी पुरले पाहिजे असे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
          दुष्काळी भागात शेतीची कामे लवकर संपली आहेत. त्यामुळे कामासाठी लोकांचे स्थलांतर होऊ नये यासाठी रोहयोची कामे लवकर सुरू करावीत. यामध्ये फळबागलागवड, विहीर आणि प्राथमिक शाळांचे आवार  भिंतीचे काम घेण्यात यावे. चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी गाळपेर जमिनीवर चारा लागवड करण्यात यावी असेही त्यांनी निर्देश दिलेत.

        शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शेतक-यांना सुखी करण्यासाठी अधिकाऱयांनी शेतकरी हिताच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या पाहिजेत असेही ते यावेळीम्हणाले. यावर्षी कर्जाची गरज होती पण कर्ज मिळाले नाही किंवा मिळू शकले नाही अशा शेतकऱयांनी त्यांची गरज कशी भागवली याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांना सांगितले. यावेळी त्यांनी तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी  गावातील परिस्थितीची माहिती करून घेतली.
        बैठकिच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात आष्टी आणि कारंजा तालुक्यात संपूर्ण मंडळात दुष्काळ आहे तर समुद्रपूर आणि देवळी मधील काही मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यात एकूण 26 मंडळामध्ये दुष्काळ असल्याचे श्री नवाल यांनी सांगितले. पावसाच्या कमतरतेमुळे यावर्षी केवळ 32 हेक्टर मध्ये रब्बीची लागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

          जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई नसून पुढेही चारा टंचाई भासू नये म्हणून 7 लक्ष 62 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. तसेच यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 20 लक्ष रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. सद्य स्थितीत एकाही गावात टँकर नाही. मात्र मार्च महिन्यानंतर मागील वर्षी ज्या 4 गावात टँकर लागला होता त्या गावात टँकर लागू शकतो. पण तो लागू नये यासाठी सुद्धा नियोजन केले आहे. शहरी भागात आतापासून पाणी कपात करण्यात येत असून दोन दिवस आड पाणी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोहयोमधून शेल्फवर कामे तयार आहेत. त्यासाठी 154 कोटीचे नियोजन केल्याचे श्री नवाल यांनी सांगितले
      या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ विद्या मानकर,  जिल्हा परिषद लघुसिंचन कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, इतर विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपास्थित होते.
                                                                        00000