Tuesday, 9 January 2018



नाबार्डकडून वित्‍तीय आराखडा सादर
वर्धा , दि. 9(जिमाका) नाबार्डचा सन 2018-19 चा पीक कर्ज, कृषी व कृषीत्तर कामासाठी जलस्त्रोतांचा विकास, बागायती, रेशीम, कुक्कुटपालन अशा विविध बाबींसाठी  वित्तीय आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा  जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकित जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर करण्यात आला.
पाण्याचा योग्य वापर  व व्यवस्थापन, लघुसिंचनाच्या उपयोगाकरिता 134 कोटी रुपये, ग्रामीण भागातील बाजारपेठ, गोदाम, व्यापार सुविधेकरिता 97 कोटी रुपये, पशुपालन 101 कोटी रुपये, कृषि यांत्रिकी 25 कोटी रुपये, मत्स्यव्यवसाय 4 कोटी 70 लाख रुपये, वनिकरण आणि पडिक जमिन सुधारणेकरीता 1 कोटी 1 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. तर जैविक विज्ञान, वर्मी कंपोस्ट बिज उत्पादन तंत्रज्ञान, टिश्यू कल्चर ईत्यादी 3 कोटी 80 लाखाचा समावेश करण्यात आला आहे.

बँकांव्दारे प्राधान्य क्षेत्रासाठीची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत नाबार्डच्या जिल्हा व्यवस्थापक स्नेहल बनसोड यांनी प्राधान्य क्षेत्रातील कर्ज विषयक  वित्तीय आराखडा सादर केला. यामध्ये सन 2018-19 वर्षातील  लघु मध्यम उद्योगाकरीता 405 कोटी, महिला स्वयंसहायता समुह, संयुक्त देयता गटाकरीता 316 कोटी रुपयाचे संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे. ॲग्रो प्रोसेसींगसाठी 55 कोटी व शेतक-यांच्या सहकारी संस्था तसेच फेडरेशन यांच्या सुविधेकरीता 4 कोटी 80 लाख रुपयांचा आराखडयात समावेश करण्यात आला. शेतमालाचा निर्यात, ग्रामीण शिक्षण सुविधा, ग्रामीण हाऊसिंग, समाज कल्याणाच्या मुलभुत सुविधा व सोलर, प्राकृतिक उर्जासाठी 727 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.
तसेच यावेळी जिल्हयाच्या वित्तपुरवठा आराखडयाच्या मार्गर्शिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.
            आराखडा सादर करतांना रिझर्व्ह बॅकेंचे श्री. मेंढे, व श्री. सिंग, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वामन कोहाड, जिल्हा उपनिबंधक अजय कडू तसेच बँकाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.


25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन
Ø मतदार दिनानिमित्त सत्कार, मतदार नोंदणी व प्रदर्शनीचे आयोजन
वर्धा, दि. 9  : राज्यात दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस  राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन साजरा करण्यात येते . या दिनाचे औचित्य साधून यावर्षी निवडणूक आयोगाने अपंग मतदारांचा सत्कार Accessible Election  हा विषय घोषित केला आहे. तसेच सहस्त्रक मतदाराचा सत्कार, नविन मतदाराचा सत्कार , छायाचित्र प्रदर्शन, आणि शाळा व महाविद्यालय स्तरावर स्नेहसंमेलन व शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
अपंग घटकांना निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेणे सुलभ व्हावे यासाठी अपंग मतदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी जन्म झालेल्या व विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये नोंद झालेल्या नविन तरुण मतदारांचा सहस्त्रक मतदार म्हणुन सत्कार करण्यात येणार आहे. 15 जानेवारी रोजी साजरा होणा-या सैन्य दिना निमित्ताने सैन्यदलातील मतदारामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार असून त्यांना राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला नागरी संस्था, युवक संस्था, एनसीसी, एनएसएस या संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. 


हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा बनावी
           – राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी
हिंदी विश्वविद्यालयाचा 20  वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
‘हिंदी सेवी सन्मानाने’ देश विदेशातील 8साहित्यिकांचा सन्मान  
वर्धा, दि. 8  : देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे. हिंदी आमची राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा झाली पाहिजे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हिंदी जनमनाची भाषा व्हावी. इतर भारतीय भाषामधील बोली आणि शब्दांचा उपयोग हिंदीत केला तर ही भाषा आणखी समृद्ध होईल, असे विचार पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी व्यक्त केले. ते येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या 20 व्या स्थापना दिवस समारंभात मुख्य अतिथि म्‍हणून बोलत होते.
विश्वविद्यालयचा 20 वा स्थापना दिवस मोठया उत्साह आणि उल्हासात सोमवार, 8 जानेवारी रोजी विश्वविद्यालयाच्या अनुवाद व निर्वचन विद्यापीठ भवनाच्‍या प्रांगणात भारतेंदु सभा मंडपात साजरा करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. गिरीश्‍वर मिश्र होते. यावेळी खासदार रामदास तडस विशिष्ट अतिथी म्‍हणून तर  भारतीय जनसंचार संस्‍था, नवी दिल्लीचे महानिदेशक डॉ. के. जी. सुरेश मुखय वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी विश्वविद्यालयाचे प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा, कुलसचिव कादर नवाज खान, प्रो. मनोज कुमार, प्रो. हनुमान प्रसाद शुक्‍ल, प्रो. देवराज, प्रो. एल. कारूण्यकरा मंचावर उपस्थित होते. यावेळी विश्वविद्यालयाच्या वतीने मालती जोशी, मध्य प्रदेश,  डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र, ओरिसा, तेजेंद्र शर्मा, लंडन, डॉ. रणजीत साहा, दिल्‍ली, डॉ. तात्‍याना ओरांसकाइया, जर्मनी, प्रो. मिलेना ब्राटोइएवा, बल्गारिया, डॉ. पी. के. बालसुब्रमण्यम, तमिळनाडु, सुरेश शर्मा, महाराष्‍ट्र यांना राज्यपालांच्या हस्ते ‘हिंदी सेवी सन्मान’ प्रदान करण्यात आला.

राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी म्हणाले की, विश्वविद्यालयाचा विकास महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमि वर्धा येथे एका दृढ़ निश्चयाने होत आहे. हे विश्वविद्यालय राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख सिद्ध करत आहे.  वर्धेची भूमि स्वातंत्र्य संग्रामाची असून राष्ट्रपिता महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक व हेगडेवार यांच्या महान विचारांचे सिंचन येथे होत आहे.
       भारतीय जनसंचार संस्थान नवी दिल्लीचे महानिदेशक प्रो. के. जी. सुरेश यांनी ‘’शिक्षा का वैश्विक परिदृश्‍य और भारतीय शिक्षा प्रणाली’’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले की, हिंदी चित्रपट देश-विदेशात लोकप्रिय आहे तशी हिंदी भाषा लोकप्रिय झाली पाहिजे. व्यवसाय, व्यापार आणि कार्यालयीन उपयोगात हिंदी आणली तर ती जागतिक स्तरावर पोहचेल. त्यांनी वर्तमान शैक्षणिक धोरण, शिक्षणाचे व्यावसायिकरण, सरकारी प्रयास, पालकांची जबाबदारी, संशोधनाची गुणवत्ता, अल्पसंख्यक संस्थांना कायद्याच्या चौकटी बाहेर ठेवणे,  शिक्षण क्षेत्रात बढतीचे नियम तसेच गुणवत्तेचे आव्हान यावरही आपले मत मांडले. 
खासदार रामदास तडस म्हणाले की, 20 वर्षाआधी विश्वविद्यालयाचा पाया एका छोटयाशा रोपटयाने झाला जो आज 20 वर्षांनी वटवृक्षासमान विस्तारित झाला आहे. विश्वविद्यालयामुळे वर्धेचा गौरव देश-विदेशात वाढत आहे. येथील अभ्यासक्रमात भारतासह देश-विदेशातील विद्यार्थी प्रवेश घेतात. केंद्रीय विद्यालयाच्या रूपाने एक मोठी उपलब्धि विश्वविद्यालयाची म्हणता येईल. केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना वर्धेत साकारत आहे ज्यात विश्वविद्यालयाचा ही महत्वाचा वाटा आहे. नव्या पीढिला शिक्षणाच्या  माध्यमातून दिशा देण्याचे काम हे विश्वविद्यालय करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असेही ते म्हणाले. विश्वविद्यालयाच्या प्रत्येक विकास कामात माझे सहकार्य आहे आणि राहील असे आश्वासन खासदार तडस यांनी यावेळी दिले.
कुलगुरू प्रो. गिरीशवर मिश्र म्हणाले की हिंदीला समृद्ध करण्यासाठी हे विश्वविद्यालय कार्यरत आहे. विश्वविद्यालय दिवसें-दिवस क्षमता वाढवित आहे. येथील विद्यार्थी देश-दुनियेत स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. विश्वविद्यालय निरंतर समाजाशी आपली नाळ घट्ट करत आहे. आतापावेतो 300 हून  अधिक विद्यार्थी अध्ययनासाठी येथे आले असून निरंतर येत आहेत. यावेळी त्‍यांनी विश्वविद्यालयाचे अनेक  कार्यक्रम आणि उपक्रमांचा उल्लेख केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकुलगुरू प्रो. आनंद वर्धन शर्मा यांनी केले.    

कार्यक्रमाला विविध विद्यापीठांचे संकाय अध्यक्ष, विभागाध्यक्ष, अध्यापक, अधिकारी, कर्मचारी, गणमान्य अतिथी, पत्रकार  तथा विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रो. प्रिती सागर यांनी केले तर आभार कुलसचिव क़ादर नवाज़ ख़ान यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ आणि समारोप बैंडवर राष्ट्रगिताची धून वाजवून करण्यात आला. मुखय कार्यक्रम सुरू होण्याआधी राज्यपाल महोदयांनी गांधी हिल्सवरील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन केले.
                                               



Friday, 15 December 2017



कारागृहे हे शिक्षेचे नव्हे तर सुधार घडविण्याचे केंद्र
                                           - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
v तिमिरातून तेजाकडे सांस्कृतिक कार्यक्रम
v  बंदीजनांनी केली कला-गुणांची उधळण

नागपूर, दि. 15 : जीवनात चूक झाल्यानंतर तीचे परिमार्जन करण्यासाठी शिक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. कारागृह हे कुणाला केवळ शिक्षा देण्यासाठी केलेली व्यवस्था नाही तर ते सुधार घडविण्याचे केंद्र आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            महाराष्ट्र कारागृह विभागाच्यावतीने स्व.वसंतराव देशपांडे सभागृहात दि. 15 डिसेंबर रोजी तिमिरातून तेजाकडे हा बंदिवानांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, अपर पोलिस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने गत तीन वर्षांपासून अतिशय चांगला उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बंदीवानांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आयुष्यात खुप सुंदर गोष्टी आहेत, हे त्यांना समजले पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंदीवानांमधील मानवतेचे गुण व संवेदनशीलता जागृत ठेवण्याचे काम होत आहे.
कारागृहामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, बंदीवानांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी योगासने शिकविण्यात येत आहे. तसेच विविध वस्तु बंदीवानांच्या माध्यमातून बनविण्यात येत असून त्या दर्जेदार आहेत. त्यांना चांगले मार्केटसुध्दा उपलब्ध झाले आहे. त्यातून एक रोजगाराची संधी देखील मिळाली आहे. एखादा व्यक्ती शिक्षा भोगून आल्यानंतर कारागृहात मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्याला स्वावलंबी जीवन जगता येण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून कारागृह संहितेमध्ये (जेल म्यॅनुअल) कुठलीही सुधारणा झाली नव्हती. ब्रिटीशकालीन गोष्टी या कारागृह संहितेमध्ये होत्या. गत दोन-तीन वर्षांत यात बदल करण्यात आला आहे. कारागृहामध्ये चांगली व्यवस्था असली पाहिजे. शिक्षा भोगायला आलेल्या कैद्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. कारागृह प्रशासनाच्या काही अडचणी दूर झाल्या आहेत. कारागृहाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन निश्चित पुढाकार घेईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील विविध कारागृहात असलेल्या बंदीजणांनी गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. नृत्य, पोवाडे, लावणी, एकांकिका, नाटक आदी कला-अविष्कारही बंदीजनांनी सादर केले. तत्पूर्वी कलावंतांच्या वेशभुषा साकारणा-या सुवर्णा मानेकर, नृत्य दिग्दर्शक शंकर घोडेवार, रंगमंच व्यवस्था सांभाळणारे किशोर बत्तासे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलिस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी केले. उपस्थितांचे आभार योगेश देसाई यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरीक, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पोलिस विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
                                                000000