Friday, 24 November 2017



         15 हजार 556 कर्क रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा दिलासा 
  एकूण 26 हजार रुग्णांवर उपचार
  2896 हृदय रुग्णांवर शस्त्रक्रिया
         वर्धा, दि 23-जिमाका :-  कर्करोगाचे नाव जरी उच्चारले तरी हृदयात धडकी भरते.कारण या आजारावर अजूनही रामबाण उपाय सापडलेला नाही. हा  आजार होण्याची  अनिश्चितता आणि झालेला आजार बरा होण्यासाठी करावी लागणारे त्रासदायक   उपचार यामुळे या आजाराविषयी एक भीतीदायक वातावरण समाजात आहे. या आजारावर होणारा खर्च  लक्षात घेऊनच गरिबांना यासाठी योग्य उपचार मिळावेत म्हणून शासनाने  कर्करोगाला  महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट  केले. याचा लाभ  वर्धा जिल्ह्यातील  15 हजार 556  कर्क रुग्णांना झाला असून यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार माफक दरात मिळवून देण्यासाठी शासन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबवित  आहे. पूर्वी ही योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने राबविण्यात येत होती.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी  1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले, केशरी शिधापत्रिका धारक  कुटुंब आणि आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंब पात्र आहेत. योजनेत पात्र कुटुंबाना 971 आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया  तसेच 121 पाठपुरावा सेवा मोफत दिल्या जातात. एका कुटुंबाला एक वर्षात दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार या योजनेतून मोफत मिळतात. याचा लाभ अनेक रुग्णांना होत असून यामुळे  दुर्मिळ आणि मोठ्या  आजारांवर गरिबांना उपचार करून घेणे शक्य झाले आहे.
यासाठी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, आणि आर्वी येथील डॉ राणे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अंगीकृत केली आहेत. वर्धा जिल्ह्यात अंगीकृत रुग्णालयात आतापर्यंत 26 हजार रुग्णांनी  या योजनेचा लाभ घेतला आहे.  यामध्ये 2 हजार 896 हृदय रुग्णांवर शस्त्रक्रिया, 15 हजार 526 कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार,  14 रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण  तसेच इतर आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे.यासाठी शासनाने 96 कोटी 33 लक्ष 46 हजार 773 रुपये उपचारासाठी रुग्णालयाना  दिले आहेत.  यामुळे सामान्य गरीब माणसाला मोफत व चांगले उपचार मिळत आहे.

Wednesday, 22 November 2017



शेतकऱ्यांनी पिकावरील किडीवर वेळीच उपाययोजना करावी

वर्धा ,दि.22 (जिमाका) :-सध्यास्थितीत तुर पिक जोमदार असुन कळी, फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. परंतु सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता  असल्याने शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना कराव्यात  जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल,असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कापसे यांनी केले आहे. वर्धा उपविभागात राबविण्यात येणाऱ्या क्रॉपसॅप प्रकल्पातर्गंत तुर व हरभरा पिकावरील किड व रोग सर्वेक्षण करून त्या आधारावर शेतकरी बांधवाना पीक संरक्षण सल्ला देण्यात येतो.तुरीवर येणाऱ्या विविध किडीपैकी शेंगा पोखरणारी अळी ही मुख्य किड आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवानी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास (10 ते 20 अळ्या प्रति 10 झाडे ) इमोमेक्टिन बेंझोएट 5 एस.जी. 3 ग्रॅम किंवा क्लोरँनर्ट्रनिलिप्रोल 18.5 एस.बी.2.5मि.ली.प्रति 10 लि.पाण्यात मिसळून फवारणी करावी. यासोबतच कापुस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 8 मि.ली.किंवा थिऑडीकार्ब 75 डब्ल्यु पी.20 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लि.पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी शिफारस डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी केली आहे. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपासीवर जास्त प्रमाणात होत असल्याकारणाने उत्पादनात होणाऱ्या घटीसोबतच हाच प्रादुर्भाव पुढील वर्षी परावर्तित होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवानी उशिरापर्यंत फरदड घेण्याचे टाळावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कापसे यांनी केले आहे.


ग्रंथोत्सव 24 व 25 ला
·         विविध कार्यक्रमांची मेजवानी
·         वाचकांसाठी पुस्तकाची पर्वणी

वर्धा ,दि.22 (जिमाका) :-उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय,आणि  जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय, वर्धा  येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रंथोत्सवात वाचंकाना पुस्तक खरेदी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा ग्रंथालय कार्यालय ते सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय  पर्यंत ग्रंथदिंडी , सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन  कुलपती, कृष्णा आयुर्विज्ञान विद्यापीठ कराड, डॉ.वेदप्रकाश मिश्रा करणार असुन स्वागताध्यक्ष  म्हणुन प्रदिपकुमार बजाज असणार आहेत.उद्घाटन कार्यक्रमाला   प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, विधान परिषद सदस्य अनिल सोले , विधान परिषद सदस्य मितेश भांगडीया , आमदार अमर काळे, आमदार समीर कुणावार, आमदार डॉ.पंकज भोयर, जि.प.अध्यक्ष्‍ा नितीन मडावी, न.प.अध्यक्ष अतुल तराळे, शिक्षण सभापती जयश्री गफाट, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, आदी मान्यवर उपस्थित राहतील.दुपारी 3 वाजता ‘प्रभावी वाचन माध्यम’ या विषयावर परिसंवाद असुन यामध्ये प्रा.दि.बा.साबळे व प्रा.डॉ.राजकुमार मून , सचिन सावरकर,सुषमा पाखरे, राज कोंडावार इत्यादी वक्ते विचार मांडतील.
25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असुन यामध्ये सुनिता कावळे, रंजना दाते आणि प्रा.मीनल रोहणकर यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 1 वाजता ग्रंथाने काय दिले या विषयावर परिसंवाद आणि दुपारी 3 वाजता काव्य  वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवाचा समारोप सायंकाळी 5 वाजता प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी  जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, प्रकाश कुत्तरमारे, डॉ.यु.पी.नाल्हे उपस्थित राहतील. दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध विषयांवरील पुस्तके रसीकांसाठी उपलब्ध राहणार असुन ग्रंथ प्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. ग्रंथप्रेमीनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा आणि विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथपाल अ.नि.मंडपे यांनी केले आहे.

Tuesday, 14 November 2017



उज्वलाने पळविला 28 हजार 960 कुटूंबातील धूर
वर्धा दि 13 (जिमाका ) चुल पेटविण्यासाठी लाकडे जमा करण्यासाठी वणवण भटकायचे आणि मगच घरचा स्वयंपाक करायचा…. हा नित्यक्रम आजही अनेक ग्रामीण व निमशहरी कुटूंबात सुरु आहे. हे चित्र बदलविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली. कुटूंबातील महिलांचे आरोग्यरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ जिल्हयातील 28 हजार 960 कुटूंबाना झाला असुन उज्वलाने या कुटूंबातील धुर पळविला आहे.
देशातील आजही 10 कोटी कुटूंबाकडे स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर होत नाही. अनेकांच्या घरात मातीच्या चुली आहेत. स्वयंपाकासाठी यामध्ये लाकुड, कोळसा, आणि शेणाच्या गोव-यांचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. चुलीत जळणा-या या अस्वच्छ इंधनातुन निघणा-या धुराचा महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार असा धुर श्वसनाव्दारे शरीरात जाणे म्हणजे एका तासात 400 सिगारेट ओढण्यासारखे आहे. महिला किमान दोन तास सकाळी आणि दोन तास रात्री या धुराच्या सानिध्यात येतात. म्हणजे एका दिवसात 1600 आणि वर्षाला 5 लाख 84 हजार सिगारेट ओढणे होय. परिणामी दमा आणि श्वसनाच्या इतर आजारांना महिला बळी पडतात. महिलांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारा हा स्वयंपाकाचा धूर निर्माणच होऊ नये म्हणुन प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली. याचा शुभारंभ राज्यात 23 डिसेंबर 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क येथे करण्यात आला.
 या येाजनेचा लाभ दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील महिलेच्या नावे देण्यात येतो. यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे महत्व यामुळे अधोरेखित झाले असून तिचा सन्मान वाढला आहे. महिलाच्या जीवनात मुलभूत परिवर्तन आणणा-या या योजनेची अंमलबाजावणी पेट्रोलियम व  नैसर्गिक गॅस मंत्रालय करीत आहे. यासाठी जिल्हयात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन आईल कार्पोरेशन या तीन कंपन्यांच्या माध्यमातून गॅस वितरक वितरण करीत आहेत. यासाठी आतापर्यत 36 हजार 691 अर्ज आले, असुन त्यापैकी 28 हजार 960 कुटूंबांना एल.पी.जी. वाटप करण्यात आले.


योजनेसाठी पात्रता
अर्ज सादर करतांना अर्जदार वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला असावा. यासाठी दारिद्रय रेषेखालील कुटूबातील महिलांनी अर्ज करणे आवश्यक. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना गॅस खरेदी करण्यासाठी 1600 रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते. जवळच्या एल.पी.जी. एजन्सीकडे अर्ज सादर करावा. हा अर्ज निशु:ल्क एल.पी.जी. वितरण केंद्रावर मिळतो. अर्जासोबत आधार कार्ड, जन-धन बँक खात्याचा नंबर, दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र, रेशनकार्ड  आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे आवश्यक आहे.
                                       00000

Saturday, 11 November 2017



माणुसकीच्या जाणिवा जागृत  ठेऊन काम करावे लागते
                                                                -परिवहन मंत्री दिवाकर रावते
·        वर्धा बसस्थानकाचे 7 कोटी 7 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन
·        4 लक्ष 50 हजार रोजगार निर्मिती
·        भरतीमध्ये पारदर्शकता
·        ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार
·        वर्धेतुन तीन शिवशाही बस लवकरच सुरू
वर्धा दि 11 (जिमाका ) एक सामान्य माणूस म्हणून राज्य परिवाहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास केला आहे. त्यामुळे या अनुभवाचा फायदा  बसस्थानक आणि बसच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी होत आहे. पण त्याचबरोबर महामंडळाचे  पुरुष व महिला कर्मचारी, आणि प्रवासी यांच्यासाठी काम करताना माणुसकीच्या जाणिवा जागृत ठेवून काम केले तरच होणारा  बदल महत्वाचा  ठरेल असे प्रतिपादन राज्याचे  परिवहन व खारविकास मंत्री दिवाकर रावते यांनी केले.आज वर्धा बसस्थानकाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
वर्धा बसस्थानक येथे बसस्थानकाचे पुनर्बांधणी ,आधुनिकीकरण आणि नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे हस्ते झाले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार अनिल सोले, आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी उद्योग राज्यमंत्री अशोक शिंदे, नगर परिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख , वर्धा विभाग नियंत्रक राजेश आडोकार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री  रावते म्हणाले, परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. त्यामुळे महिलांना त्यांच्या गावातच नियुक्ती  देण्याची गरज आहे. जेणेकरून  त्यांची ओढाताण कमी होऊन कुटुंबाला वेळ देण्यासोबतच त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतील.  पालकत्वाच्या भूमिकेतून काम करतो असे सांगताना ते म्हणाले महिला कर्मचाऱ्यांच्या  सुरक्षेचाही विचार केला आहे. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. .
राज्यातील बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या पद्धतीने होणारे बस्थानकाचे बांधकाम आता बंद केले आहे. राज्य परिवहन महामंडळच यापुढे सर्व बस स्थानक बांधणार आहे हे सांगताना ते म्हणाले 85 कोटीचे बस स्थानक राज्यात  बांधणार असून त्यामध्ये 48 कोटींची बसस्थानके केवळ विदर्भात निर्माण होत आहेत. हा सर्व खर्च भांडवली खर्चातुन करण्यात येणार आहे.  याशिवाय विदर्भातील सर्व  जुने बसस्थानक रंगरंगोटी करून प्रवाशाना सुखद वाटतील असे  करण्यात येणार असून यासाठी 3 कोटी 15 लक्ष 60 हजार रुपये निधीचे नियोजन केले आहे. याशिवाय 3 हजार प्रवाशी निवारे बांधण्यात येणार आहेत.तसेच सर्व बसस्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी खाजगी संस्थांची नेमणूक केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
परिवहन महामंडळाची भरती आता पूर्णपणे पारदर्शक झाली आहे. 4 लाख 50 हजार लोकांना रोजगार दिला असून आणखी 16 लाख बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी केवळ लेखी परीक्षा घेऊन लगेच त्यांना निकाल देण्यात येत आहे. अनुकंपा तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या महिलांची  शारीरिक चाचणी न बघता  केवळ त्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
योजना ह्या जनता व कर्मचा-यांच्या हिताच्या असल्या पाहिजेत हे सागतांना ते म्हणाले त्याचा फायदा 50 टक्के या पिढीला  आणि 50 टक्के पुढच्या पिढीला मिळेल असा दुरदृष्टीकोन ठेवून नियोजन करण्यात आले आहे. कर्मच-यांना काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, तेव्हाच तो  चांगल्या मानसिकतेने  काम करेल. म्हणून रात्र पाळीत काम करणाऱ्या चालक व वाहकांसाठी बस स्थानकावर वातानुकूलित निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.
परिवहन महामंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असल्याचे सांगूण ते म्हणाले,त्यामध्ये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल.  तसेच मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा 25 टक्के जागा ठेवणार आहे. कर्मचा-यांचा आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटुंब सुरक्षा योजना सुरू केली आहे. मुंबईतील कर्मच-यांसाठी 1 हजार घरे बांधून देण्याचे काम सुरू असल्याचे श्री रावते यांनी सांगितले.
प्रवाशांचा  लांबचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून काही जिल्ह्यात  शिवशाही ही वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. वर्धेतही लवकरच वर्धा - पुणे, वर्धा- औरंगाबाद, हिंगणघाट- शिर्डी अशा तीन शिवशाही बस लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बसला प्रवाशानी चांगला प्रतिसाद दिल्यास 10 बसेस सुरू करण्यात येतील. वर्धा जिल्ह्यातील  सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करू अशी हमी त्यांनी यावेळी दिली.
खासदार रामदास तडस यावेळी बोलताना म्हणाले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामुळे आज वर्धेत आधुनिक बसस्थानकाचे भूमिपूजन झाले आहे.  पण गावोगावी प्रवाशांसाठी प्रवाशी बस निवारे सुद्धा बांधून देण्यात यावेत अशी मागणी केली. देवळीलाही  नवीन बस स्थानक बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी श्री रावते यांचेप्रति आभार व्यक्त केले.
आमदार पंकज भोयर यांनी नवीन बस स्थानकांमध्ये पूर्वीच्या दुकानदारांना गाळे वाटप करताना प्राधान्य द्यावे.सेलू बस स्थानकाचा विकास आराखड्यास मान्यता द्यावी आणि वर्धेत शिवशाही बस सेवा सुरू करावी अशी मागणी यावेळी केली.  वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे जिल्ह्यात विविध चांगल्या वास्तु बांधण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रकृती अस्वास्थामुळे ते येऊ शकले नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपाचे सुनिल गफाट यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शुभसंदेश यावेळी वाचून दाखवला.
वर्धा विभागाचे विभाग नियंत्रक राजेश आडोकार यांनी प्रास्ताविक केले. श्री बाभरे  यांनी संचालन केले तर आभार वाहतूक अधिकारी श्रीमती सुतोने यांनी मानले.