Saturday, 11 November 2017



समृध्द महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार शिवाय पर्यांय नाही
                                 प्रा. राम शिंदे
पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
वर्धा, दि 9 (जिमाका)  समृध्द महाराष्ट्र उभा करायचा असेल तर जलयुक्त शिवार या महत्वकांक्षी कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज केले.
वर्धा येथील विकास भवन येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त  शिवार  कार्यक्रमात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व ग्रामपंचायतींना बक्षिस वितरण सोहळयात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,  आमदार समिर कुणावार, आमदार आशिष देशमुख, जलसंधारण सचिव  एकनाथ डवले, विभागीय आयुक्त अनूपकुमार, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
राम शिंदे पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार हा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य टंचाई मुक्त करण्याचा प्रयत्न  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर विभागात यावर्षी 70 टक्के पर्जन्यमान झाले असून विभागात निश्चितच टंचाईची परिस्थिती  निर्माण होऊ शकते. यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही. यासाठी जलयुक्त शिवाराचे महत्व सर्वांना पटवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवारमध्ये  झालेल्या कामाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत  पोहोचविण्यासाठी  संबंधित यंत्रणांनी यशोगाथा, माहितीपट तयार करुन त्यांची प्रचार व प्रसिध्दी करावी अशा सुचनाही त्यांनी दिल्यात.
यावेळी जलयुक्त शिवार  अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी, पत्रकार गांवाना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यात पुरस्कारांमध्ये विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र प्रथम पुरस्कार महाराष्ट्र टाईम्सचे प्रवीण लोणकर यांना रुपये 30 हजार व स्मृती चिन्ह , व्दितीय  दैनिक पूण्यनगरी चंदपूरचे प्रशांत देवतळे  रुपये 20 हजार व स्मृती चिन्ह, तृतीय दैनिक लोकमत गोंदियाचे नरेश रहिले यांना रुपये 15 हजार व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
          जिल्हास्तरावर पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नागपूर येथील दैनिक हितवादचे कार्तिक लोंखंडे यांना रुपये 12 हजार स्मृतीचिन्ह, लोकशाही वार्ता नागपूरचे अनिल इंगळे यांना रुपये 10 हजार स्मृतीचिन्ह, वर्धा येथील    दैनिक तरुण भारतचे प्रफुल व्यास यांना प्रथम रुपये 15 हजार व स्मृतीचिन्ह, भंडारा येथील दैनिक सकाळचे श्रीकांत पनकंटीवार यांना प्रथम रुपये 15 हजार व स्मृतीचिनह, गोंदिया येथील दैनिक लोकमत समाचारचे व्दितीय  मुकेश शर्मा यांना  रुपये 12 हजार व स्मृतीचिन्ह , चंद्रपूर येथील दैनिक सकाळचे ‍व्दितीय संदिप रायपुरे यांना रुपये 12 हजार व स्मृतीचिनह  देऊन गौरविण्यात आले.
        राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रथम गावस्तरीय गडचिरोली जिल्हयातील अहेरी तालुक्यातील मुत्तापूर गावाला रुपये 7 लाख 50 हजार व स्मृतीचिन्ह,  व्दितीय गोंदिया जिल्हयातील गंगाझरी गावाला रुपये 5 लाख व स्मृतीचिन्ह, तालुकास्तरीय प्रथम नागपूर जिल्हयातील काटोल तालुका रुपये 10 लाख व स्मृतीचिन्ह, व्दितीय चंद्रपूर जिल्हयातील चिमूर रुपये 7 लाख 50 हजार स्मृतीचिन्ह व जिल्हास्तरीय प्रथम नागपूर 15 लाख रुपये व स्मृतीचिन्ह ,   व्दितीय गोंदिया  जिल्हा रुपये 10 लाख व स्मृतीचिन्ह  देऊन गौरविण्यात आले.
          तसेच तालुका स्तरावर प्रथम 5 लाख  रुपये व व्दितीय 3 लाख रुपयाचे पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस , आमदार आशिष देशमूख , आमदार समिर कुणावार यांची समायोचित भाषणे झाली.
                                    00000

प्र.प.654                                                              दि.9 नोव्हेंबर 2017
  कामे करण्यास विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार
                                                          - प्रा राम शिंदे

Ø पत्रकार परिषद संपन्न
वर्धा दि 9 (जिमाका)  :-जलयुक्त शिवार अभियानात वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे,  त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकार नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे  यापुढे  जास्त कामे  घेऊन जाणीवपूर्वक काम करण्यास विलंब करणाऱ्या आणि पावसाळ्यापूर्वी कार्यादेश दिला असतानाही काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे पाणीसाठा न होण्यास कारणीभूत असलेल्या कंत्राटदारांवर  कारवाई  करण्यात येईल,  अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
आज जलयुक्त शिवार बाबत नागपूर विभातील जिल्ह्यांची आढावा बैठक वर्धा येथे प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील  सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना  ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, आमदार आशिष देशमुख, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्या.
प्रा. शिंदे यावेळी म्हणाले की, नागपूर विभागात समाधानकारक कामे झाली आहेत. त्यामुळे दोन वर्षात 1789 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत हे या योजनेचे यश आहे. . ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी जिल्ह्यांनी कामे केलीत.चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे नैसर्गिक आपत्तीमुळे थोडे माघारले असले तरी ते सुद्धा 31 मार्च पर्यंत सर्व कामे पूर्ण करतील. असेही ते यावेळी म्हणाले.  यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबवताना गाव हा घटक होता . पण यावर्षी 2017- 18 मध्ये  पाणलोट क्षेत्र  हा घटक ठरवून  माथा ते पायथा काम करण्यात येणार आहे. यामध्ये 70 टक्के कामे ही माथ्यावर क्षेत्र उपचाराची असून 30 टक्के काम ही गावात होतील. यावर्षी 757 गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये  21120 कामे प्रस्तावित केली आहेत. यासाठी 146 कोटी 65 लक्ष रुपये निधी नागपूर विभागाला वर्ग करण्यात आला आहे.
नागपूर विभागात 2015 -16
  मध्ये 1077 गावांमध्ये जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या कामांमुळे 1 लक्ष 89 हजार 859 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्णण झाला असून त्यातून 1 लक्ष 9 हजार 108 हेक्टर क्षेत्राला दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी 494 कोटी 82 लक्ष रुपये खर्च झाला असून सर्व 1077 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत.
तसेच सन 2016-17 मध्ये एकूण 915 गावांपैकी 712 गावांमध्ये 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.  यामुळे  60 हजार 185 सहस्त्र घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून यातून 43 हजार 713 हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. यासाठी 334 कोटी 96 लक्ष खर्च करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
                                     



Thursday, 9 November 2017



जलयुक्त शिवारची कामे जुन पर्यंत पूर्ण करा
                                          प्रा. राम शिंदे
Ø जलयुक्त शिवार विभागीय आढावा बैठक संपन्न
Ø यशोगाथाचे संकलन करुन ठेवावे
Ø टंचाईग्रस्त गावांचा प्राधान्याने समावेश करा
वर्धा, दि 9 (जिमाका)  जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नागपूर विभागात चांगली कामे झाली असून त्याचा फायदा शेतकरी व लोकांना  होतो आहे,  ही समाधानाची बाब आहे. 2016-17 मधील कामे 31 मार्च पर्यंत तसेच सन 2017-18 मधून प्रस्तावित आराखडयातील कामे जुन 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
आज विकास भवन येथे नागपूर विभागातील सहा जिल्हयांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या तीन वर्षातील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार समिर कुणावार, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त अनुपकुमार, रोहयो उपायुक्त पराग सोमन, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नागपूर चे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, भंडाराचे सुहास दिवसे , गोंदियाचे अभिमन्यू काळे,  गडचिरोलीचे एस.आर.नायक, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्री उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले कि, जलयुक्त  शिवार ही लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे यावर्षी कमी पाऊस असतांनाही त्याची झळ फारशी बसलेली नाही. अभियानाचे हे तिसरे वर्ष असून या योजनेविषयी लोकांचे अभिप्राय घेऊन त्यानुसार योजनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे. सन 2015-16 आणि 2016-17 मध्ये झालेल्या कामांमुळे अनेक यशोगाथा तयार झाल्या आहे. गोंदिया जिल्हयात जलयुक्त शिवारमुळे जसे धानाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढले तसेच इतर जिल्हयातही अशाच प्रकारचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या सर्व यशोगाथा प्रत्येक जिल्हयांने माहितीपट, छायाचित्र पुस्तिका, यशकथा पुस्तिका स्वरुपात तयार करुन त्या प्रसारमाध्यमातून व चित्ररथाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. यामुळे निराशावादी लोकांनाही यातून प्रेरणा मिळून चांगले काम होत राहील.
सन 2017-18 मध्ये निवडलेल्या गावांचा माथा ते पायथा या परिमानानुसार  आराखडा तयार करुन त्याला विभागीय आयुक्तांकडून तातडिने मान्यता घ्यावी. तसेच ही कामे 15 जुन पर्यंत पूर्ण करण्यासाठी  नियोजन पध्दतीने अंमलबजावणी करावी. अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्यात. नालाखोलीकरण करतांना पाणी वाहून जाणार नाही याची दक्षता घेतांना मध्येमध्ये अडथळे करावे. तसेच नाल्याच्या दोन्ही बाजुला पिचींग करावी. म्हणजे माती पुन्हा नाल्यात वाहून येणार नाही. कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार नोडल अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण न करणा-या कत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी. मागील दोन वर्षात निवडण्यात आलेल्या गावांमध्ये टंचाईग्रस्त  गावे सुटली असल्यास त्यांना प्रथम प्राधान्याने घेण्यात यावे. प्रत्येक गावात काम सुरु करतांनाच कामाचा फलक लावण्यात यावा.
ज्या जिल्हयांमध्ये जलयुक्त  शिवारचे कामासाठी यंत्राची आवश्यकता आहे. तिथे जिल्हा नियोजन आराखडयातून खरेदी करावी. तसेच 15 टक्के निधी  जलयुक्त शिवार कामासाठी राखून ठेवावा,  अशा सुचना सर्व जिल्हाधिका-यांना दिल्या.
प्रास्ताविक करतांना विभागीय आयुक्त यांनी जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत विभागात  झालेल्या कामाबाबत सविस्तर  माहिती दिली. विभागात सन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार अभियानात 1077 गावांमध्ये 23 हजार 379 विविध जलसंधारणाची  कामे पूर्ण झाली असून 156 कामे प्रगतीपथावर आहे. लोकसहभाग व शासकिय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यामधून 75.23 लक्ष घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. या सन 2015-16 मध्ये सर्व गावे जलपरिपूर्ण झालेली असून यातून 1 लाख 9 हजार 108 हेक्टर क्षेत्र सवंरक्षित सिंचनाखाली आले आहे.
सन 2016-17 मध्ये 915 गावांमध्ये 22 हजार 95 विविध जलसंधाराणाच्या कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आज अखेंर 19 हजार 732 कामे पूर्ण झाले असून 843 कामे प्रगतीपथावर आहे. 915 पैकी 712 गावे जलपरिपूर्ण झाली असून यामुळे 43 हजार 713 हेक्टर संरक्षित सिंचनाखाली आले आहे. सन 2017-18 मध्ये 757 गावाची निवड करण्यात आली असुन यामध्ये 21 हजार 120 काम प्रस्तावित केली आहे. यापैकी 955 कामे सुरु झाली असून शासनाकडून 146 कोटी 65 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नागपूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी कांदबरी भगत ,चंद्रपूरचे  जितेंद्र पापळकर, भंडाराचे मनोजकुमार सुर्यंवंशी, गडचिरोलीचे शंतुन गोयल, गोंदियाचे आर.एच.ठाकरे, वर्धेच्या नयना गुंडे तसेच जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करणा-या यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल  राजपायले  यांनी केले.
प्रारंभी जलयुक्त शिवार अभियान 2017-18 मधील गावामध्ये जनजागृती करणा-या चित्ररथाचा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी फीत कापून शुभारंभ  केला. दरम्यान सकाळी पुलगाव येथील दारुगोळा भांडार यांच्या अखत्यारित असलेल्या नाचनगाव येथील दर्गा टेकडीवरील जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिथे वृक्षरोपन करुन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी सहकार्य करणारे दारुगोळा भंडारचे सर्व प्रशासकिय अधिकां-याचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच  कवठा रेल्वे येथील जलयुक्त शिवार अभियान कामाचीही पाहणी केली.   
                                      0000







जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे आज वर्धा  दौऱ्यावर
     * जलयुक्त शिवार योजनेबाबत नागपूर  विभागीय आढावा बैठक
* जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध पुरस्कार
  वितरण सोहळा
     वर्धा दि. 8 :---  राज्याचे  जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे  हे गुरूवार, दि. 9 नोव्हेंबर 2017 रोजी वर्धा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते  जलयुक्त शिवार योजने अंतर्गत  2015 16, 2016-17 मध्ये झालेल्या कामाची पाहणी करून  विकास भवन येथे नागपूर  विभागातील 6 जिल्ह्यांचा  आढावा घेतील. 
    या बैठकीला 6  जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार,  जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.
*जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा*
          राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पुरस्कारप्राप्त गावे, तालुके, पत्रकार यांना 9 नोव्हेंबर 2017 रोजी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील विकास भवन
  सभागृहात दुपारी 4  वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सर्व पुरस्कार्थीना  पुरस्कार वितरण होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या पुरस्कारांची माहिती अशी आहे.      
राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रथम गावस्तरीय गडचिरोली जिल्हयातील अहेरी तालुक्यातील मुत्तापूर, व्दितीय गोंदिया जिल्हयातील गंगाझरी, तालुकास्तरीय प्रथम नागपूर जिल्हयातील काटोल तालुका, व्दितीय चंद्रपूर जिल्हयातील चिमूर व जिल्हास्तरीय प्रथम नागपूर व व्दितीय गोंदिया  जिल्हयांना देण्यात येणार आहे.
   
पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रथम प्रवीण लोणकर नागपूर, द्वितीय प्रशांत देवतळे चंद्रपूर, तृतीय नरेश रहिले
  गोंदिया यांना देण्यात येणार आहे.
अहिल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार  तालुकास्तरीय वर्धा जिल्हयातील प्रथम सेलू, व्दितीय , हिंगणघाट , नागपूर जिल्हयातील प्रथम काटोल, व्दितीय नरखेड, भंडारा जिल्हयातील प्रथम मोहाडी, व्दितीय तूमसर, गोदिंया जिल्हयातील प्रथम गोरेगाव व व्दितीय सालेकसा, चंद्रपूर जिल्हयातील प्रथम चिमुर व व्दितीय गोंडपिपरी, गडचिरेाली जिल्हयातील प्रथम ऐटापल्ली व व्दितीय अहेरी  यांना तर गाव स्तरीय वर्धा जिल्हयातील देवळी तालुक्यातील प्रथम मलकापूर, व्दितीय सेलू तालुक्यातील मदनी, तृतीय कारंजा तालुक्यातील मरकसूर, चतुर्थ हिंगणघाट तालुक्यातील उमरी येंडे तर पाचवा वर्धा तालुक्यातील तळेगाव ,  नागपूर जिल्हयातील प्रथम  काटोल तालुक्यातील सोनखांब , व्दितीय नरखेड तालुक्यातील आंबांडा , तृतीय काटोल तालुक्यातील डोंगरगाव , चौथा सावनेर तालुक्यातील जैतापूर, पाचवा उमरेड तालुक्यातील मुरादपुर , भंडारा जिल्हयातील प्रथम मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव, व्दितीय करडी, तृतीय नरसिहटोला, चतुर्थ तुमसर तालुक्यातील पवनारखारी , पाचवा मेहेगाव, गोदिंया जिल्हयातील प्रथम गोंदिया तालुक्यातील गंगाझरी , व्दितीय गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला, तृतीय देवरी तालुक्यातील एडमागोंदी , चौथा सडकअर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी, पाचवा मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोळदे , चंद्रपूर जिल्हयातील प्रथम चिमूर तालुक्यातील इरव्हा, व्दितीय टेकेपार, तृतीय रेंगाबोडी, चर्तुथ भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा, पाचवा चिमुर तालुक्यातील शिवरा , गडचिरोली जिल्हयातील प्रथम अहेरी तालुक्यातील मुत्तापुर, व्दितीय धानोरा तालुक्यातील जप्पी , तृतीय भामरागड तालुक्यातील कोठी, चर्तुथ एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी, पाचवा गुरुपल्ली या गावाला प्रदान करण्यात येणार आहे.
        पत्रकारांना देण्यात येणा-या  पुरस्कारांमध्ये वर्धा जिल्हा - प्रफुल व्यास  (प्रथम), नागपूर जिल्हयातील प्रथम श्रीराम लोणकर, व्दितीय   -कार्तिक लोखंडे,  तृतीय अनिल इंगळे ,भंडारा जिल्हयातील  - प्रथम श्रीकांत पनकंटीवार गोंदिया  जिल्हयातील  -  नरेश राहिले (प्रथम), मुकेश शर्मा  (द्वितीय), चंद्रपूर जिल्हयातील  प्रशांत रामदास देवतळे(प्रथम), संदिप महादेव रायपुरे(व्दितीय)  यांना प्रदान करण्यात येईल.
           अधिकारी कर्मचा-यांमध्ये प्रथम पुरस्कार वर्धा जिल्हयातील रविंद्र तुकाराम तुपकर, नागपूर जिल्हयातील अविनाश कातडे, भंडारा जिल्हयातील किशोर गोंविदराव पात्रिकर, गोंदिया जिल्हयातील नंदकिशोर नयनवाड, चंद्रपूर जिल्हयातील शिवरचरण रजवाडे, व गडचिरोली जिल्हयातील दिलीप आत्माराम राऊत यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे राहील.                                                        0000


Monday, 6 November 2017



        गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची आज जगाला  गरज
                                               - राजकुमार बडोले

5 कोटीच्या पर्यटन विकास कामांचे भूमिपूजन
• सांस्कृतिक ठेवा जपण्याची गरज- मदन येरावार
बोर धरण आणि केळझर येथील विकास कामांचा समावेश
वर्धा दि 5 (जिमाका) गौतम बुद्धांचा धम्म हा महासागरासारखा आहे.यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे. आजच्या जागतिक दहशतवादाच्या, आक्रमकतेच्या, निराशेच्या आणि  अनिशचिततेच्या वातावरणात गौतम बुद्धाच्या  पंचशील विचारांची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
        केळझर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि
  कार्तिक पोर्णिमेनिमित्त आयोजित स्वागत समारोह व  धम्म परिषद कार्यक्रमात ते बोलत होते.
        यावेळी पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती सोनाली कलोडे अशोक कलोडे, सेलू पंचायत समितीच्या सभापती सुनिता खोडे,  भन्ते सदानंद ,सियाराम लोहकरे, सरपंच रेखा लोंढे, उपसरपंच फारुख शेख उपस्थित होते.
बोर धरण येथील बगीचा,
  केळझर येथील गणेश मंदिर परिसराचा विकास , डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा विकास, हजरत पीर बाबा टेकडी परिसर विकास अशा एकूण 5 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार आणि राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.
        यावेळी पुढे बोलताना
  ते म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्यामुळे माणसाला माणसासारखे वागवले जाते.पण त्याहीपेक्षा त्यांनी सामाजिक, आर्थीक, शैक्षणिक, राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धम्माची  ओळख समाजाला करून दिली. शोषित वर्गाचे हित साधल्याशिवाय देशाची उन्नती साधली जाणार नाही . असेही ते यावेळी म्हणाले.
        मदन येरावार:-  आजच्या नाविन पिढीसमोर गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्याची गरज आहे.  केळझरच्या भूमीवरून मागील 40 वर्षांपासून धम्म परिषद आयोजित करून हा संदेश पोहचविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यासाठी आणखी निधी देऊ असे मदन येरावार यावेळी म्हणाले. आज संपूर्ण जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा आपल्याला  शांती चा संदेश देणाऱ्या बुद्धाची आठवण होते.आणि युद्ध नको बुद्ध हवा असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही.
         आपल्या पूर्वजानी संस्कृतीचा ठेवा पुस्तक रुपात जतन केला आहे.त्यामुळे या पुस्तकांसाठी सुसज्ज ग्रंथालय याच कामात
  निर्माण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  तसेच या सर्व विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे आमदार पंकज भोयर यांचे कौतुकही केले.
        70 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानावर संसदेत चर्चा घडवून आणली हे सांगताना खासदार रामदास तडस म्हणाले ,  बाबासाहेबांचा विचार आज घरा-घरापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. पहिल्यांदा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने 5  हजार कोटी रुपयाचे काम  सुरू झाले आहे. त्यात पुन्हा पर्यटन विकास कामांची भर पडली आहे.यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार तडस यांनी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांचे आभार मानले.
       केळझरला तीनही धर्माचे उत्कृष्ट आणि नावाजलेले धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे केलझारला अ वर्ग पर्यटनाचा  दर्जा मिळावा अशी मागणी आमदार पंकज भोयर यांनी प्रसंगी केली. आमदार समीर कुणावर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
                                                            00000
प्र.प.644                                                              दि.5 नोव्हेंबर 2017
           मारुती सुझुकी इंडिया प्रशिक्षणार्थी भरती मेळावा
Ø आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
वर्धा, दि 5 (जिमाका) कौशल्यप्राप्त युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे वतीने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता हिंगणघाट येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सदर मेळावा पार पडणार आहे. यासाठी शासकीय औद्योगिक संस्थेतुन 2016 मध्ये उत्तीर्ण आणि जुलै 2017 मध्ये परीक्षा दिलेले विद्यार्थी पात्र ठरतील.
मारुती सुझुकी इंडीयाच्या गुरगाव, मानेसर, कार प्लॉन्ट, मानेसर पावरटेन प्लांन्ट  करीता सदर भरती मेळावा घेण्यात येत आहे. यामध्ये विद्युत, फीटर, यंत्रकार, यांत्रिकी मोटार वाहने, टुल ॲन्ड डाय मेकर, पेंटर, वेल्डर या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवाराची निवड ही  लेखी व परीक्षा व मुलाखत घेऊन करण्यात येईल. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थ्याना दरमहा विद्यावेतन 9 हजार 238 रुपये आणि हजेरी बोनस  3 हजार 120 रुपये मिळणार आहेत. शिवाय प्रशिक्षणादरम्यान जेवन व युनिफार्म कंपनीमार्फत पुरविण्यात येणार आहे. निवास व प्रवास खर्च स्वत: प्रशिक्षणार्थींना करावा लागेल.
उमेदवारांनी मेळाव्यासाठी येतांना पासपोर्ट आकाराचेही छायाचित्र, ओळखपत्र, आधारकार्ड , मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र दोन प्रतित आणि आय टी आय प्रमाणपत्र दोन प्रतित सोबत ठेवावे. या भरती मेळाव्याचा लाभ आय.टी.आय. उत्तीर्ण बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यु.आर. खारोडे यांनी केले आहे.