Tuesday, 31 October 2017



न्यास नोंदणी बाबत 30 दिवसाचे आत हरकती सादर करावे
वर्धा, दि 31 (जिमाका)   सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या अनेक  निष्क्रीय संस्थाची नोंदणी रद्द करणेसाठी सहायक धर्मादाय आयुक्त यांनी चौकशी सुरु केली आहे.  न्यासांनी नोंदणी झाल्यापासुन पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपासुन न्यासांची हिशोबपत्रके दाखल केली नाहीत.  होणारे बदल अर्ज सादर केलेले नाहीत, तसेच आजपर्यंत काही न्यासांनी मुळ नोंदणी प्रमाणपत्र सादर केले नाही.  अशा संस्थांनी    न्यास नोंदणी बाबत काही हरकती घ्यावयाची असल्यास किंवा पुरावा दयायचा असल्यास लेखी स्वरुपात 30 दिवसाचे आत सादर करावे, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.
मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत हरकती न आल्यास संबंधित न्यासाचे काही म्हणने नाही  असे समजुन चौकशी पुर्ण करुन  योग्य ते आदेश पारित केल्या जाईल. तसेच सदर प्रकरणात पुढील कोणतीही तारीख दिली जाणार नाही. ज्या न्यासांची नोंदणी रद्द करण्यात येईल त्यांची यादी कार्यालयाचे सुचना फलकावर व धर्मादाय संघटनेच्या charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. असे सहायक आयुक्त धर्मादाय आयुक्त यांनी कळविले आहे.

Friday, 6 October 2017

खादीच्या उत्पादन व विक्रीला  प्रोत्साहन देणार
-देवेंद्र फडणवीस
·         सेवाग्राम आश्रमातील सामुदायीक प्राथनेत सहभाग
·         सुत कताई करून महात्मा गांधीना विनम्र अभिवादन
·         गांधी फॉर टुमारो प्रकल्पाअंतर्गंत सेवाग्राम आश्रमाचा विकास
वर्धा,दि.2 (जिमाका) खादीच्या  उत्पादनाला मोठया प्रमाणात मागणी आहे. खादीच्या  निर्मित्तीत मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी  राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी  बोर्डाच्या माध्यमातून राबविण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सेवाग्राम आश्रम परिसरात  दिली.
मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज गांधी जंयती दिनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल  बापू कुटी येथे सामुदायिक प्राथनेत सहभागी झाले तसेच चरख्यावर सुत कातून गांधीजीना विनम्र अभिवादन केले.
यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक तसेच जल स्त्रोत व नदी विकास मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ,उर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार,  खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयत मटकर, सचिव डॉ.श्रीराम जाधव, ज्येष्ठ गांधीवादी मा.म.गडकरी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते.

खादीची मागणी वाढत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्हयामध्ये खादी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची विनंती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्र्यांना यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खादी उत्पादनाच्या माध्यमातून युवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो रोजगारासाठी खादीचे सुलभ तंत्रज्ञान  तसेच खादी पर्यावरण पुरक असल्यामुळे  राज्य खादी  ग्राम उद्योग तसेच राज्यातील खादी ग्रामोद्योग  संस्थांची बैठक घेण्यात येईल त्यानंतर उत्पादनाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.


Monday, 2 October 2017

इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या निर्मितीतून स्थानिक युवकांना रोजगार
- देवेंद्र फडणवीस
* हेरिटेज टुरिझममुळे सेवाग्राम जागतिक नकाशावर
* सिंदी (रेल्वे) ड्रायपोर्टमुळे आयात-निर्यातीला संधी
वर्धा, दि. २ : जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एकाच दिवशी 5 हजार कोटींच्या कामांना सुरूवात होत आहे. चौपदरी रस्ते, ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील उद्योगांना चालना मिळणार असून या विकासाला पुरक म्हणून सेवाग्राम विकासाचा 266 कोटींचा आराखडा हाती घेण्यात आला आहे. या सर्व प्रयत्नांमधून इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या निर्मितीमधून स्थानिक युवकांना रोजगार हे एकमेव ध्येय समोर ठेवण्यात आले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
            या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री तथा वित्त, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, सर्वश्री आमदार समिर कुणावार, डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष  नितीन मडावी, माजी खासदार दत्ता मेघे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सेवाग्रामच्या सरपंच श्रीमती रोशना जामलेकर, पवनारचे सरपंच राजेश्वर गांडोळे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते. 
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ड्रायपोर्टची निर्मिती हे या परिसराला मिळालेले मोठे वरदान ठरणार आहे. या पोर्टच्या माध्यमातून प्रत्यक्ष पोर्टमध्ये मिळणाऱ्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आणि उद्योजक आपला माल थेट विदेशात पाठवू शकतील. यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळेल. तसेच यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पांत स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी ‘सिंबॉयसीस’च्या माध्यमातून कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात स्थानिक युवकांनाच प्रशिक्षित करून पोर्टमध्ये काम देण्यात येईल.
‘पोर्टलेट’चा विकास हा देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतो. वर्धा आणि जालना येथील ड्रायपोर्ट हे राज्यातील मागास भागाला विकसीत करणारे प्रकल्प आहेत. रस्ते हे आर्थिक सुबत्तता आणतात. त्यामुळे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम विदर्भात होते आहे. कार्गो हब, बुटीबोरी ते वर्धा आणि वर्धा ते यवतमाळ या चारपदरी रस्त्यामुळे या भागातील शेतमाल आणि औद्योगिक उत्पादने या ड्रायपोर्टपर्यंत सहज आणि जलदरित्या पोहोचतील. देशातील एककर प्रणालीमुळे मालवाहतूक क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येत्या काळात नागपूर हे मालवाहतुकीचे केंद्र होणार आहे.
महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून सेवाग्राम आज जागतिक नकाशावर सर्वांना परिचित आहे. जगातील नामवंत या ठिकाणी येऊन संशोधन करण्यास इच्छुक आहेत. याठिकाणी पर्यटक येऊन गांधीजींच्या विचारापासून प्रेरणा घेतील. गांधीजींची ग्रामविकासाची संकल्पना आजही मार्गदर्शक आहे. याच संकल्पनेतून उभा राहिलेला द रूरल मॉल महिला आणि शेतकरी बचतगटांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. गांधीजींनी या जिल्ह्याला दिलेला वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला असून यातूनही रोजगाराच्या संधी निर्माण होतील.  
जलसंधारणाच्या सर्वात जास्त योजना वर्धा जिल्ह्यात सुरू झाल्या आहे. सिंचनाच्या निर्मितीमुळे जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. सिंचनाच्या माध्यमातून परिवर्तनाची नांदी शेती आणि उद्योगात येणार आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून त्याला स्वातंत्र्याची अनुभूती मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे सिंचन क्षेत्र 40 टक्क्यांवर नेणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सिंचन महत्त्वाचे आहे. राज्याचे 18 टक्के असणारे सिंचन क्षेत्र 40 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
महात्मा गांधींच्या जयंतीदिनी भविष्यातील नवीन भारत निर्माणाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. खादी ग्रामोद्योग ही गांधीजींनी दिलेली देणगी आहे. त्यामुळे येत्या काळात खादीच्या उत्पादनाला व्यावसायिक जोड देण्याची आवश्यकता आहे. जगाच्या पाठीवर आज ज्युट, रेशीम, कापूस, बांबू आणि लिनेन या पाच कच्च्या मालापासून सूत आणि कापड तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे. या पाचही धाग्यांचा उपयोग करून वस्त्रनिर्मतिीचा प्रयोग झाल्यास या क्षेत्रातील निर्यातदार होण्याची संधी आपल्याला आहे. रस्ते जोडणी आणि ड्रायपोर्टमुळे शेतमालासह इतरही उत्पादन विदेशात पाठविण्याची संधी निर्माण झाली आहे. याचा या परिसरातील नागरीकांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्याला रोजगारयुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्याला पर्यावरणयुक्त, आरोग्ययुक्त, जलयुक्त आणि व्यसनमुक्तीसोबतच रोजगारयुक्त करण्याचा संकल्प केला आहे. महात्मा गांधी यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पुर्तता आज होत आहे. सेवाग्रामच्या 266 कोटी रूपयांच्या विकास आराखड्यातील कामांमधून सेवाग्राम ही जागतिक प्रेरणाभूमी बनेल. तसेच देशाला आणि जगाला दिशादर्शक भूमी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विकासाचे जाळे तयार करणार – राज्यमंत्री मदन येरावार
महात्मा गांधी यांच्या ग्रामविकासाच्या संकल्पनेतून विदर्भ विकासाचा पाया रचला गेला आहे. विदर्भाच्या बहुस्पर्शी विकासातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. या नवीन आयामातून विकासाचे जाळे निर्माण होत मिळत असल्याचे प्रतिपादन श्री. येरावार यांनी केले.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी मनोगत व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी प्रास्ताविकातून ड्रायपोर्टबाबत माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य डी. ओ. तावडे यानी रस्ते प्रकल्प, तर विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी सेवाग्राम विकास आराखडाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या आपल्या योजना पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राजेश बकाने यांनी मान्यवरांचा नागरी सत्कार केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या चित्रफितीही यावेळी दाखविण्यात आल्या.





Thursday, 14 September 2017



            महाराष्‍ट्र वार्षिकी  व महामानव पुस्‍तक विक्रीस उपलब्‍ध
Ø माहिती व जनसंपर्क महासंचालनयाव्‍दारे प्रकाशित
Ø सर्व बुक स्‍टॉल व जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्‍ध

वर्धा , दि 13(जिमाका)माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाव्‍दारे महाराष्‍ट्र वार्षिकी 2017 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जीवनाच्‍या विविध पैलूवर प्रकाश टाकणारे महामानव हे पुस्‍तक प्रकाशित करण्‍यात आले आहे. सदर दोन्‍ही पुस्‍तके  जिल्‍हयातील सर्व बुक स्‍टॉल, स्‍पर्धा परिक्षा केंद्र व जिल्‍हा माहिती कार्यालय येथे विक्रीस उपलब्‍ध आहे. वाचक व स्‍पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांसाठी पुस्‍तकात अतिशय उपयुक्‍त माहिती दिली आहे. वाचक विद्यार्थ्‍यांना  पुस्‍तक खरेदी करावयाचे असल्‍यास जिल्‍हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी केले आहे.
            महाराष्‍ट्र वार्षिकी 2017 या पुस्‍तकात महाराष्‍ट्राची अधिकृत, वस्‍तुनिष्‍ठ माहिती, महाराष्‍ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्‍ट्राची परंपरा, महाराष्‍ट्रातील जिल्‍हे, शासनाचे विभाग, गत वर्षातील राज्‍य शासनाने घेतलेले महत्‍वाचे निर्णय, योजना,  घडामोडी तसेच  भारताचे राष्‍ट्रपती, उपराष्‍ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्‍ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्‍ट्र विधिमंडळ सदस्‍य, संसद सदस्‍य आदींची माहितीचा समाविष्‍ट आहे.
            महामानव पुस्‍तकात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विविधांगी पैलूवर आधारित अभ्‍यासपूर्ण लेख, राज्‍यातील मान्‍यवर लेखक, संशोधक, प्राध्‍यापक, संपादक, लेखक यांनी लिहिले आहे. यातून बाबासाहेबांच्‍या चतुरस्‍त्र प्रतिमेची नेमकी व प्रभावीरित्‍या ओळख होते. हे पुस्‍तक अभ्‍यासक, संशोधक आणि सामानय वाचक या सर्वासाठी अतिशयक उपयुक्‍त अशी आहे. बाबासाहेबाचे श्रेष्‍टत्‍व आणि त्‍यांचे चौफेर व्‍यक्‍तीमत्‍व जाणून घेण्‍यासाठी सदर पुस्‍तक सहाय्यभूत ठरेल. 
                                                0000

.प्र.प.538                                                                दि.13 सप्‍टेंबर  2017                              18 गावांचा होणार डिजीटल विकास
Ø ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत इंटरनेट जोडणी
वर्धा , दि 13(जिमाका) शासन आणि खाजगी कंपन्‍यांच्‍या मदतीने राज्‍यातील ग्रामीण भागात भागात परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्‍या संकल्‍पनेतून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्‍यात येत आहे. यामध्‍ये  पहिल्‍या टप्‍यात राज्‍यातील 350 गावांपैकी वर्धा जिल्‍हयातील 18 गावांचा समावेश आहे. या अठराही गावामध्‍ये या अभियानाच्‍या माध्‍यमातून इंटरनेट जोडणी देऊन गावे डिजिटल करण्‍यात येणार आहे.
            दर्जेदार शिक्षण, आरोग्‍य, स्‍वच्‍छता, कृषि उत्‍पादनात वाढ करणे, गावात इंटरनेट जोडणी, गावातील सर्वासाठी पक्‍की घरे , पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, गावातील तरुणांना कौशल्‍यपूर्ण्‍ बनवून रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देणे, या लक्षांकावर काम करण्‍यात येत आहे. यासाठी जिल्‍हयातील 18 गावांमध्‍ये मुख्‍यमंत्री ग्रामविकास सहकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. या ग्राम सहका-यांच्‍या माध्‍यमातून शास्‍त्रोक्‍त पध्‍दतीने माहिती गोळा करुन ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि गावक-यांच्‍या सहकार्यांने गाव विकास आराखडा तयार करण्‍यात आला आहे.
            देवळी तालुक्‍यातील 12 गावे आणि आर्वी तालुक्यातील 6 गावांचा या अभियानात समावेश असून या गावांना डिजिटल करण्‍याच्‍या दृष्‍टीने रिलायन्‍स जिओ कंपनी मार्फत इंटरनेट जोडणी देण्‍यात येणार आहे. यामुळे गावातील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र डिजिटल होणार आहे. तसेच  आरोग्‍य सेवा, कृषि विषयक माहिती, कृषि मालाचे बाजारभाव, शासनाच्‍या विविध योजनांची माहिती गावक-यांना गावातच उपलब्‍ध होऊन विकासाच्‍या प्रक्रीयेत थेट सहभागी होण्‍याची संधी मिळणार आहे.
          ग्रामप्रर्वतकांडून तयार करण्‍यात आलेल्‍या ग्रामविकास आराखडयास व गावाच्‍या विकासासाठी गावक-यांनी सहकार्य करुन ग्राम प्रर्वतकांना मदत करावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.

Tuesday, 22 August 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
27 हजार शेतकऱयांचे ऑनलाईन अर्ज दाखल
*48 हजार 382 ऑफलाईन अर्ज
• 190 केंद्रावर सुविधा
वर्धा दि, 22 (जिमाका) दुष्काळ, नापिकी, आणि शेतमालाचे पडलेले भाव याने अडचणीत सापडलेल्या आणि बँकांचे थकीत कर्ज असलेल्याशेतक-यांना शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली . या योजनेचा लाभ घेण्यासाठी आज पर्यंत 27 हजार 86 शेतक-यांनी ऑनलाईन तर 48 हजार 382 शेतकऱयांनी ऑफलाईन अर्ज सादर केले आहेत.
या योजनेसाठी शेतक-यांना ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती ऑनलाईन जमा होत असून योजनेत पारदर्शकता येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून 1 ते 14 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या पीक कर्ज मेळावा दरम्यान 48 हजार 382 शेतक-याचे अर्ज ऑफलाईन भरून घेण्यात आले होते. त्या सर्व शेतक-यांना संपर्क करून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. तसेच आतापार्यंत 32 हजार 384 शेतकरी कुटुंबाची ऑनलाईन नोंदणी झाली असून त्यापैकी 27 हजार 86 शेतक-यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत . थकीत कर्ज असलेले जिल्ह्यात 74 हजार 909 शेतकरी आहेत. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 20हजार 909 शेतकरी थकबाकीदार आहेत. तसेच ज्या शेतक-यांनी कर्जाची नियमित परतफेड केली अशा शेतकऱ्यानाही बोनस स्वरूपात या योजनेचा लाभ मिळणार आहे.
190 केंद्रांवर अर्ज भरण्याची सुविधा
ऑन लाईन अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात 3 एजन्सी काम करीत आहेत. महाऑनलाईन केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र ग्रामीण व नागरी आपले सरकार सेवा केंद्र. ऑनलाईन अर्जासाठी शासनाकडून 159 बायोमेट्रिक मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून केंद्र चालकांकडे असलेल्या मशीनही वापरण्यात येत आहेत. जिल्ह्यात बायोमेट्रिक मशीन महाऑनलाईन 80 केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र ग्रामीण 20 आणि शहरी 90, अशा एकूण 190 केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी मशीन उपलब्ध आहेत. या सर्व केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गती यावी म्हणून प्रशासनाकडून आणखी 200 बायोमेट्रिक मशीनची मागणी करण्यात आली आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱयांनी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी जेणेकरून यासाठी शेतकऱयांना पुन्हा फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. यामध्ये शेतकरी पती पत्नी यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड असल्यास पॅन कार्ड, कर्जदाराचे बँक पासबुक- बचत व कर्ज खाते दोन्ही आवश्यक आहेत

Friday, 18 August 2017



तीन वर्षात सर्व शेतक-यांचे कृषी पंप सौर उर्जेवर चालविणार
                                                              -चंद्रशेखर बावनकुळे
            वर्धा दि 18 (जिमाका) येत्‍या तीन वर्षात जिल्‍हयातील सर्व शेतक-यांचे कृषिपंप सौर ऊर्जेवर चालविण्‍यात येणार आहे. यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये सौर विज प्रकल्‍प उभारण्‍यात येणार आहे. तसेच दलित वस्‍ती सुधार योजने अंतर्गत प्रत्‍येक गावात सौर पथदिवे, ग्रामपंचायत च्‍या नळ योजना आणि जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळांना सौर विज पुरवठा कार्यान्वित करण्‍यात येणार असल्‍याचे  प्रतिपादन राज्‍याचे ऊर्जा व उत्‍पादन शुल्‍क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आज विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय येथे विविध विद्युत उप केंद्राचे भूमी पूजन, लोकार्पण सोहळा व जनता अदालत  प्रसंगी ते बोलत होते. इंटीग्रेटेड पावर डेवलपमेंट योजने अंतर्गत भारत सरकारच्‍या शहरी विद्युत वितरण प्रणालीच्‍या सशक्‍तीकरणाच्‍या हेतून अल्‍लीपूर, तरोडा, हिंगणघाट, पुलगाव  व कारला चौक वर्धा येथे विद्युत उपकेद्राचे भूमीपूजन व खरांगना, मांडगाव व गिरोली उपकेद्राचे लोकापर्ण सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष नितीन मडावी , नगराध्‍यक्ष अतुल तराळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य पंकज सायंकार, विद्युत विभागाचे विभागीय संचालक श्री.खंडाईत, अधिक्षक अभियंता श्री. देशपांडे उपस्थित होते.
          प्रत्‍येक नागरिकाला घरगुती 24 तास विद्युत पुरवठा देण्‍यात यावा तसेच कृषी पंपासाठीचा 8 तासाचे वर विद्युत पुरवठा खंडीत करु नये, असे निर्देश असतांना काही ग्रामीण भागात 8 तासाचे वर विज पुरवठा ख‍ंडित केल्‍याबाबत यावेळी विद्युत विभागाच्‍या अधिका-याविषयी नाराजी व्‍यक्‍त करुन यापूढे असा प्रकार घडल्‍यास अधिका-यांच्‍या वेतनवाढी थांबविण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी श्री. बावनकुळे म्‍हणाले. जिल्‍हयातील 68 हजार शेतक-यांना सौर विज कृषिपंप देण्‍यात येणार असून यासाठी शेतक-यांनी अर्ज करावे. वर्दळीच्‍या ठिकाणी असलेल्‍या जागेवरील विद्युत खांब, रोहित्र व तारामुळे सामान्‍य नागरिकांना त्रास होऊन अपघात होण्‍याची शक्‍यता असते यासाठी  विद्युत विभागांनी अपघातस्‍थळावरील विद्युत तारा , रेाहीत्र व खांब तात्‍काळ दुसरीकडे स्‍थानांतरीत करावे.
          प्रत्‍येक नागरिकाला केवळ विज जोडणीचे अनामत रककमच घेऊन विज जोडणी दयावी. विद्युत खांब किंवा विद्युत तारा जोडणीची रक्‍कम घेऊ नये अशाही सुचना यावेळी दिल्‍यात. वर्धा जिल्‍हात 2030 पर्यंत विद्युतीकरण  पुर्ण होईल. यासाठी जिल्‍हयाला 200 कोटी रुपये उपलब्‍ध झाले आहे. यामध्‍ये आणखी 250 रुपये  कोटीची आवश्‍यकता असून लवकरच उपलब्‍ध करुण देण्‍यात येणार आहे. ज्‍या शेतक-याला शाश्‍वत विज दिली जाणार नाही त्‍या अधिका-यांवर कठोर कारवाई करण्‍यात येर्इल असा इशारा त्‍यांनी यावेळी दिला.
          जिल्‍हयात 86 कोटी रुपयाचे देयक शेतक-यांकडे थकित असतांनाही  शेतक-यांची विज कापण्‍यात आली नाही.  जिल्‍हयात दोन वर्षात 9 हजार 500 विज कनेक्‍शन देण्‍यात आले असून केवळ 2 हजार 300 कनेक्‍शन बाकी आहे.   यावेळी विद्युत विभागाशी संबधित 270  नागरिकांनी तक्रारी दाखल केल्‍या. सर्वच तक्रारीचे मं‍त्रीमहोदयानी निराकरण केले. यापुढे प्रत्‍येक शाखा अभियंत्‍यांनी  महिन्‍यातून एकदा ग्राहक मेळाव्‍याचे आयोजन करावे. तसेच कार्यकारी अभियत्‍यांनी ग्राहक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहक सेवेचे व्रत जोपासावे, असेही  श्री. बावनकुळे म्‍हणाले.
          कार्यक्रमाला विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी, नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.