Friday, 24 March 2017



समृध्‍दी महामार्गाची पारपडली पर्यावरण  जनसुनावणीत
     वर्धा दि 23- नागपूर-मुंबई समृध्‍दी महामार्ग प्रकल्‍पात बाधित  क्षेत्रातील 56 हजार वृक्ष तोडले जाणार आहे. पर्यावरणाचे हे नुकसान  1 लाख 6 हजार वृक्ष लावगवड करुन भरुन काढले जाईल. यामुळे प्रकल्‍पाचा पर्यावरणावर प्रदुषणाचा परिणाम होणार नसल्‍याचे महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे यांनी पर्यावरण विषयक जनसुनावनीत शेतक-यांना सांगितले.
नागपूर-मुबंई प्रस्‍तावित महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गाच्‍या पॅकेज 1 मधील नागपूर ते पिंपळगाव (वर्धा) दरम्‍यानच्‍या प्रकल्‍पात जाणा-या भूधारकांसाठी   पर्यावरण विषयक जनसुनावणीचे  आज विकास भवन येथे  आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी यांचे अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली. यावेळी महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस व पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे उपस्थित होते.
 यावेळी प्रकल्‍पातील रस्‍त्‍याच्‍या बांधकामात होणारी वृक्षतोड  व पर्यावरण विषयी इतर बाबीची शेतक-यांनी तक्रारी व आक्षेप नोंदविला. याला उत्‍तर देतांना नरेंद्र टोपे म्‍हणाले, प्रकल्‍पात पर्यावरणातील सद्यस्थिती जाणून प्रकल्‍प भागात हवेतील गुणवत्‍ता, ध्‍वनीचे पातळी, पाण्‍याची व मातीची गुणवत्‍ता विचारात घेतली जाणार आहे. प्रकल्‍पामुळे पर्यावरणाचा होणारा दुष्‍परिणाम लक्षात घेऊन महामार्गाची रचना करण्‍यात येणार आहे. तसेच जमिनीची होणारी धूप कमी करण्‍यासाठी उपाययोजना करण्‍यात येणार आहे. प्रकल्‍पाच्‍या बांधकामात वापरण्‍यात येणारी वाहने प्रदुषण मुक्‍त प्रमाणीत झाल्‍याशिवाय वापरण्‍यात येणार नाही. कोणत्‍याही नैसर्गिक पाण्‍याच्‍या प्रवाहाला बाधा न पोहोचता कामे केल्‍या जाणार आहे. असे पर्यावरण सल्‍लागार नरेद्र टोपे यांनी उपस्थित शेतक-यांना सांगितले.
यावेळी प्रकल्‍पात जाणा-या भूधारकांनी भूसंचयन तसेच भूचयनात शेतीच्‍या मोबदला विषयी तक्रारी मांडल्‍या. रस्‍ते विकास महामंडळाचे अधिकारी,  जनसुनावणीला मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
                                                0000


Thursday, 23 March 2017



              महिलांनी लघुउद्योगासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आधार घ्यावा.
                                   
                                     - सभापती गंगाधर कोल्हे
           हिंगणघाट व समुद्रपूर येथील मेळाव्यात 2 कोटी  रुपयांचे कर्ज वितरण
        वर्धा दि 23 (जिमाका ):- महिलांच्या आर्थिक विकासाशिवाय  देशाचा  संपूर्ण  विकास  होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी नोकरी सोबतच स्वतःमध्ये असलेल्या कौशल्याच्या आधारे लघु उद्योग उभारावा.त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन  हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती गंगाधर कोल्हे यांनी केले.  हिंगणघाट येथे कलोडे सभागृहात आयोजित प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
           या कार्यक्रमाला पंचायत समिती  उपसभापती धनंजय रिठे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड, जिल्हा  माहिती अधिकारी मनीषा सावळे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच बँकांचे  व्यवस्थापक  उपस्थित होते.
               
पाणी हे  जीवन समजून त्याचा चांगला उपयोग करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असेही आवाहन श्री कोल्हे त्यांनी जागतिक जलदिनी केले.
                 
यावेळी मार्गदर्शन करताना श्री कोहाड म्हणालेबँका, बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज देतात.त्याचा उपयोग करून  आज ग्रामीण भागात छोटे मोठे गृह उद्योग सुरु आहेत. महिलांनी शिक्षण - प्रशिक्षणाकडे लक्ष देऊन व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य ज्ञान आत्मसात करावे. उत्तम कौशल्य गुणांच्या आधारे कोणताही व्यवसाय महिला करू शकतात. मुद्रा योजनेचा लाभ पारंपारिक  व्यवसाय करणा-यांसोबतच नवीन व्यवसाय सुरु करणा-याला सुद्धा होऊ शकतो. कोणतेही तारण न ठेवता या योजनेतुन   कर्ज सहज उपलब्ध होत असल्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेतून कर्ज उपलब्ध होणे साठी  अडचण आल्यास कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही  वामन कोहाड यांनी केले.
                यावेळी बोलताना म. ग्रा. जी. अ. चे व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी सर्व महिलांचे वैयक्तिक खाते बँकेत  उघडून द्यावे, अशी विनंती सर्व बँकांना केली.  महिलाबचत गटाच्या माध्यमातून केलेल्या बचतीमुळे देशाच्या विकासात महत्वाचा  सहयोग देत आहेत.  मुद्रा बँक योजनेतून महिलांनी स्वयंरोजगार करून देशाच्या आर्थिक विकासात भर घालावी. आपल्या योजना या मोबाईल अँप चा वापर करून योजनांचा लाभ घ्यावा  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
असाच मेळावा समुद्रपूर येथेही घेण्यात आला.दोन्ही मेळाव्यात 187 बचत गटांना 2 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
                                                            0000

Tuesday, 14 March 2017

शेतक-यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात बचत गटांच्या वस्तूंसाठी पूरक केंद्र




शेतक-यांचा  माल थेट ग्राहकांच्या दारात
बचत गटांच्या वस्तूंसाठी
   पूरक केंद्र
वर्धा,दि 14:- महिला व शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यात येते.मात्र त्या वस्तुंना पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होत नाही. अशा  वस्तूंची मागणी वाढावी, लोकांना बचत गटाच्या वस्तूची माहिती व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील  विविधा केंद्रात पूरक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
                  या केंद्रामध्ये  महिला व शेतकरी बचत गटाकडून उत्पादित संत्री,  तूरडाळ, वायगाव हळद, मिरची पावडर,  फिनाईल, साबण, शॅम्पू,  पापड, कुरडया, शेवळ्या,  गुळ, मसाले,  अगरबत्ती,  कागदी पिशव्या,  अशा अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे या सर्व वस्तू दर्जेदार आणि भेसळमुक्त आहेत.  बचत गटाच्या वस्तूंची विक्री वाढावी म्हणून जिल्हाधिकारी यांनी  प्रत्‍येक  शासकीय कार्यक्रमात अतिथीना पुष्पगुच्छ देण्याऐवजी बचत गटाच्या उत्पादित वस्तूंनी सजवलेली परडी भेट म्हणून दिली जावी अशा सूचना दिल्यात. त्यामुळे  बचत गटांना अशा कार्यक्रमाकरिता मागणी  मिळत असून त्यामाध्यमातूनही विक्री वाढत आहे.  यामध्‍ये महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा, केम, शेतकरी उत्‍पादक गट यांचा समावेश  असून त्‍यांच्‍या सर्व उत्‍पादित मालाची विक्री करण्‍याकरिता विविधा मध्‍ये जागा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
              नुकत्याच सुरु झालेल्या  या पूरक केंद्रातून आतापर्यन्त 25 हजार  रुपयांची विक्री झाली आहे.  दिवसेंदिवस या उत्पादनांना ग्राहकांचा  चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी एकदा तरी या केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे. हे पूरक केंद्र  सुरु करण्यासाठी केम प्रकल्पाचे समन्वयक निलेश वावरे आणि त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले.
000000