Wednesday, 1 June 2016

प्रत्येक शेतक-याला पीक कर्ज मिळेल
यादृष्टीने नियोजन करा
Ø जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या बँकांना सूचना
Ø मंडळस्तरावर कर्ज मेळावे घेण्याचे निर्देश
Ø जिल्हास्तरीय सल्लागार, आढावा समितीची बैठक
         वर्धा, दिनांक 18 –  जिल्ह्यातील सर्व पीक कर्जास पात्र असणा-या सर्व शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने  सर्व बँकांनी नियोजन करावे. त्याकरीता मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करून जनजागृती करावी. तसेच शेतक-यांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा असलेला मॉन्सून पूर्व हंगाम लक्षात घेऊन 30 मेपर्यंत पीक कर्जाचे वाटप करावे, अशा सुचना  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बँक अधिका-यांना आज दिल्यात.
         जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अग्रणी बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती आणि जिल्हा स्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, रिझर्व्ह बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. .भारती, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, नाबार्डच्या स्नेहल बन्सोड, सर्व बँकांचे व्यवस्थापक, समन्वयक अधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
          जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, मागील वर्षी सर्व बँकांनी चांगले काम केले. आता आपल्याला त्यापेक्षाही जोमाने काम करून अधिकाधिक शेतक-यांना पीक कर्जाचा लाभ द्यावयाचा आहे. त्याकरीता मंडळस्तरावर लवकरच कर्ज मेळावे घेऊन पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतक-यांनाही मॉन्सून पूर्व हंगामात कर्ज उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यांना येणा-या अडचणी लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून 31 मेपर्यंत हस्तलिखित सातबारा उतारे देण्याची शासनाने मुभा दिली आहे. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी शेतक-यांना कर्ज अन्य शेतीविषयक कामासाठी हस्तलिखित सातबारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
          पुढील बैठकीत गावनिहाय बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असून सर्व बँकांनी  त्या पुरवित असलेल्या सेवा क्षेत्रातील खातेदारांच्या माहितीसह उपस्थित राहावे. तसेच येणा-या अडचणींबाबत अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी समन्वय ठेऊन त्याबाबत अवगत करावे. केवळ उद्दीष्टावर आधारीत कामगिरी पार पाडता उद्दीष्टाबाहेर जाऊन सामाजिक हिताच्या दृष्टीने पीक कर्जास पात्र शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केल्या.

75 कोटींचे पीक कर्ज वाटप
सन 2016-17 अंतर्गत खरीपासाठी जिल्ह्यातील 6 हजार 700 खातेदारांना सर्व बँकांनी मिळून 75 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती प्रारंभी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय जांगडा यांनी दिली. तसेच मे 2016 पर्यंत उर्वरीत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, असे प्रास्ताविकात सांगितले. तसेच यावेळी रिजर्व बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक नीता गेडाम यांनीही पीक कर्जाबाबत माहिती दिली.

****
सकारात्मक वातावरणामुळे विकासकामांना गती
-   आशुतोष सलिल
v मावळते जिल्हाधिकारी यांना निरोप नूतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत
             वर्धा, दिनांक 18 –  वर्धा जिल्ह्याच्या प्रशासन लोकप्रतिनिधी यांचा समन्वय जनतेच्या सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे विविध योजना प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी असेच वातावरण पुढे सुरू ठेवल्यास राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून नावलौकिक मिळेल, असा विश्वास मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी व्यक्त केला. तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रशासनातील सकारात्मक बदलाचा लाभ मला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
            विकास भवन येथे मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना निरोप तर नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा स्वागताचा कार्यक्रम अधिकारी, कर्मचा-यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, परिविक्षाधीन पोलिस उपविभागीय अधिकारी निलोत्पल, प्र. अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, प्र. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. देशपांडे, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरेनिवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांची उपस्थिती होती.     
           जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, नूतन जिल्हाधिकारी शैलेश नवाल उत्तम कार्यकुशल प्रशासक असून ते जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर चांगले काम करतील. जिल्ह्यात जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयात उत्तमप्रकारचे समन्वय आहे.
           जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनीही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या कार्यपद्धतीचा गुणगौरव करत जनतेनेच त्यांच्या कार्याचे मुल्यमापन केले असून त्यांनी जनतेला उत्तम सेवा देण्याचा ध्यास घेतला असल्याचे सांगून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
           प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.. भारती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनीही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मावळते जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचा नूतन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याहस्ते भेटवस्तू, शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांना सहसंचालक पदी अमरावती येथे पदोन्न्ती मिळाल्याबद्दल त्यांनाही अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्याहस्ते भेटवस्तू, शाल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येऊन निरोप देण्यात आला.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी केले. आभार तहसीलदार सारंग यांनी मानले.
विकास भवन परिसरात वृक्षारोपन
नवनियुक्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याहस्ते विकास भवन परिसरात निसर्ग सेवा समितीच्यावतीने वृक्षारोपन करून निरोप समारंभ कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.

****