Thursday, 21 April 2016

आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या
पाल्यांकरीता श्री सिद्धीविनायक शिष्यवृत्ती
Ø जिल्हाधिका-यांकडे अर्ज करण्याचे आवाहन
            वर्धा, दिनांक 07 – नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होऊन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे, अशा सर्व शेतक-यांचे पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नयेतसेच शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे श्री सिद्धीविनायक शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
              नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशा सर्व शेतक-यांच्या पाल्यांसाठी ही योजना असून शिक्षण घेत असलेल्या शाखेच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम श्री सिद्धी विनायक गणपती मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे पाल्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
             शिष्यवृत्ती योजना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पाल्यांचे नाव, शैक्षणिक तपशील, शैक्षणिक शुल्क, पाल्यांचे बँक खाते क्रमांक आदी माहिती श्री सिद्धीविनायक न्यासाकडे पाठविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या पाल्यांची माहिती संबंधित तहसीलदाराकडे द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.

                                                     *****
2 हजार 875 पिण्याच्या पाण्याचे
स्त्रोतांचे सर्वेक्षण पूर्णसंजय मीणा
·        434 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड  
·        पाण्याच्या स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना
·        लाल कार्ड असणारी एकही ग्रामपंचायत नाही
            वर्धा, दिनांक 07 – नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय सर्वेक्षण वर्षातून दोनदा करण्यात येते. पावसाळ्यानंतरच्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील 514 ग्रामपंचायतींना 2 हजार 875 स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.
           जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरण करून तसेच ब्लिचिंग पावडर असलेलेच पाणी पुरवण्यालाच प्राधान्य देण्यात आल्यामुळे पाणी पिण्या अयोग्य असलेला एकही स्त्रोत नसल्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले नाही
          पिण्याच्या पाण्यामुळे ग्रामीण भागात जलजन्य आजार उद्भवू नये यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करून पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीनंतर ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड, पिवळे कार्ड तसेच ज्या स्त्रोतांचे पाणी पिण्या अयोग्य आहे, अशा ग्रामपंचायतीमधील स्त्रोतांना लाल कार्ड देण्यात येते. जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार 434 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले असून येथील पाणी पिण्यायोग्य असल्याचे वैद्यकीय अधिका-यांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. 80 ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले असून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे
उप अभियंत्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतींना कळविण्यात आले असून पिवळ्या कार्डाचे हिरव्या कार्डात रूपांतरीत करण्यासाठी संबंधित स्वत:च्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असण्यासोबत प्लॅटफॉर्म फुटलेला असेल, अनियमित शुद्धीकरण किंवा ब्लिचिंग याकरीता 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून या सर्व ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणी शुद्धीकरणासाठी जलसुरक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याची मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.

*****
दहा हजार विद्यार्थी आज घेणार
तंबाखू सेवन न करण्याची शपथ
वर्धा, दि.6 – जिल्ह्यातील 10 हजार विद्यार्थी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती, सेवन न करण्याबाबत वर्धा येथील न्यू इंग्लिश विद्यालयाच्या मैदानावर गुरूवार, दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता शपथ घेणार आहेत.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून होणा-या आजारांपासून मृत्यू नियंत्रणासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2006-07 मध्ये सुरू करण्यात आला. राज्यस्तरावर  सन 2014-15 पासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
  जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.डी. मडावी यांनी केले आहे.

                                                                          ******                      
द्विलक्षी अभ्यासक्रमांना खातरजमा करूनच प्रवेश घ्या
-        दयानंद मेश्राम
              वर्धा, दिनांक 06- एखाद्या संस्‍थेत +2  स्‍तरावरील द्विलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रमाच्‍या विशिष्‍ट अभ्‍यासक्रमास प्रवेश घेण्‍यापूर्वी अभ्‍यासक्रम, प्रवेश क्षमता, मर्यादा याबाबतची शासनमान्यतेची खातरजमा करुनच प्रवेश घ्यावा. अन्‍यथा होणा-या शैक्षणिक नुकसानास विद्याथी व पालक जबाबदार राहतील. संस्‍थानिहाय मान्‍यताप्राप्‍त अभ्‍यासक्रमांची माहिती जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे उपलब्‍ध आहे, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे प्र. संचालक दयानंद मेश्राम यांनी सांगितले आहे.
            संचालक व्‍यवसाय शिक्षण यांच्‍या अधिपत्‍याखालील + 2 स्‍तरावरील व्दिलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रमास परवानगी देण्‍याबाबत शासनाने विशिष्‍ट कार्यपद्धती विहित केली आहे. व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्‍या स्‍तरावरुन यासाठी दरवर्षी दिनांक 15 फेब्रुवारी ते 15 मार्चमध्‍ये नियमित व दिनांक 16 ते 31 मार्चपर्यंत विलंब शुल्‍कासह प्रस्‍ताव स्वीकारण्‍यात येतात, असे प्रस्‍ताव विहित कार्यपद्धती अवलंबून शासनाकडे मान्‍यतेसाठी सादर करण्‍यात येतात. त्यानंतर विशिष्ट सत्रापासून अभ्यासक्रमाला परवानगी देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात येतो.
          काही संचालक, संस्‍था प्रमुख व्‍यवसाय अभ्‍यासक्रमांना मान्‍यतेबाबतचा शासन निर्णय निर्गमित होण्‍यापूर्वीच व्दिलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रमाच्‍या अकरावीमध्‍ये विद्यार्थ्‍यांनी प्रवेश देतात. तर काही संस्‍था चालक, संस्‍था प्रमुख व्‍यवसाय अभ्‍यासक्रमाच्‍या विशिष्‍ट मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांना प्रवेश देऊन अथवा मान्‍यता नसलेल्‍या अभ्‍यासक्रमास प्रवेश देऊन, असे नियमबाह्य व अनधिकृत कलेले प्रवेश अधिकृत करण्‍यासाठी प्रस्‍ताव सादर करतात. काही वेळा असे प्रवेश किमान दंड आकारून नियमित करण्‍यासाठी दबावतंत्राचा देखील वापर केला जातो.  
           विशिष्‍ट व्‍यवसाय अभ्‍यासक्रम मान्‍यतेसाठी शासन निर्णय निर्गमित झालेला नसताना अशा अभ्‍यासक्रमांना प्रवेश दिल्‍याचे अथवा मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांना प्रवेश दिल्‍याने किंवा ज्‍या अभ्‍यासक्रमांना परवानगी प्राप्‍त झालेली नाही, अशा अभ्‍यासक्रमांना  प्रवेश दिल्‍याचे आढळून आल्‍यास अशाप्रकरणी संस्‍था चालक, संस्‍था प्रमुख अनधिकृत प्रवेश अधिनियमान्वये अन्‍वये फौजदारी व दंडात्‍मक अशा दोन्‍ही स्‍वरुपाच्‍या कार्यवाहीस व्‍यक्तिशः पात्र ठरतील, असेही संस्थाचालक, संस्था प्रमुखांना निदर्शनास आणून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  
                                                        ******    


                  मत्‍स्‍य संवर्धक, शेतक-यांची प्रशिक्षण कार्यशाळा
वर्धा, दि.6 – शेतीला पूरक व्‍यवसाय, मत्‍स्‍य व्‍यवसाय, शेततळी मत्‍स्‍यपालन, जलयुक्‍त शिवारांतर्गत तळीत मत्स्य व्‍यवसाय, मासे विक्री फिरते वाहन, आत्म्यांतर्गत शैक्षणिक सहल, कृषी विभागाकडून मागेल त्‍याला शेततळे, झिंगा पालन, मत्स्य व्‍यवसायाच्‍या विविध योजना आदीवर मत्स्य संवर्धक, शेतक-यांच्या प्रशिक्षण कार्यशाळे मार्गदर्शन करण्‍यात आले.
मत्‍स्‍य व्‍यवसाय  व कृषी  तंत्रज्ञान यंत्रणेच्या विद्यमाने शेतकरी मत्‍स्‍यव्‍यवसाय गटाचे प्रमुख व मत्‍स्‍य संवर्धकाचे मत्‍स्‍य शेती प्रशिक्षण कार्यशाळा शास्त्री चौकातील बच्‍छराज धर्मशाळेत नुकतीच पार पडली.
 कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती,  आत्मा प्रकल्पाचे प्रकल्‍प संचालक दीपक पटेल, मत्‍स्‍य व पशु-विज्ञान विद्यापीठ सहायक प्राध्यापक श्री. बेलसरे, नागपूरचे सहायक मत्‍स्‍य व्‍यवसाय विकास अधिकारी अतुल वरगंटीवार, मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्‍त गणेश डाके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक राजेंद्र बिसने यांनी केले. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी रमेश मांढरे, अभिमान उमाटे, अतूल बिंड, शरद करलुके यांनी पुढाकार घेतला.
                                                                             ******