Tuesday, 5 April 2016

शेतपिकांचे संपूर्ण संरक्षणासाठी पंतप्रधान पीक विमा
योजनेत सहभागी व्हा- रामदास तडस
·        पीक विमा योजना जनजागृतीचा शुभारंभ
·        खरीपसाठी तर रब्बीसाठी दीड टक्क्यात संपूर्ण संरक्षण
·        खरीप हंगामापासून पीक संरक्षण
·        अवकाळी पावसापासूनच्या नुकसानीचाही समावेश
                 वर्धा,दिनांक 05 – अवेळी पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या शेतपिकांचे नुकसान तसेच कृषीमालाच्या बाजारपेठेतील किमतीत चढ-उतार यापासून शेतक-यांना संरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागी होवून येत्या खरीप हंगामापासून पीक विमा योजनेचे संरक्षण कवच द्यावे, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.
                 सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात पंतप्रधान पीक विमा योजना जनजागृती अभियान तसेच शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्याहस्ते झाले, त्याप्रसंगी शेतक-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डच्या जिल्हा समन्वयक श्रीमती स्नेहल बनसोड, तर प्रमुख वक्ते कृषी व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख दीपक पटेल, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, स्वामीनाथन फाऊंडेशनचे अविनाश पाटणकर, रिलायन्स कृषी समुहाचे विजय बारापात्रे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जानकीदेवी बजाज संस्थेचे विनीश काकडे, कृषी विभागाचे डॉ. नाडे आदी व्यासपीठावर होते.
            निसर्गावर अवलंबून असलेल्या कोरडावाहू शेतीसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे पिकांना संरक्षण मिळणार असल्याचे सांगताना खासदार रामदास तडस म्हणाले की शेतक-यांना पिकांच्या संरक्षणासोबतच सिंचनाच्या सुविधा, विजेची उपलब्धता शेतीसाठी आवश्यक असलेल्या कर्जाची उपलब्धता होणे आवश्यक आहे. केंद्र राज्य शासनाचा निधी शेतक-यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी शेतक-यांपर्यंत या योजना पोहचत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ
घेता येत नाही, प्रत्येक योजना शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत भवनामध्ये योजनांची माहिती ठळकपणे लावल्यास लाभार्थ्यांना लाभ घेणे सुलभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
             पंतप्रधान जीवन विमा योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील 10 हजार शेतक-यांना विम्याचे संरक्षण दिले असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की दरवर्षी दहा शेतक-यांना दत्तक घेऊन त्यांना कर्जमुक्त करण्यात येणार आहे सोबतच शेती पुरक व्यवसायाला मदत देऊन शेतक-यांना सक्षम करण्याचा मनोदय खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. दहा शेतक-यांना दत्त्क घेऊन खासदार म्हणून मिळणा-या मानधनामधून या शेतक-यांना मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे यांनी शेतक-यांना केवळ दीड ते दोन टक्के विम्याचा हफता भरून संपूर्ण पिकांचे संरक्षण होत असल्यामुळे खरीप हंगामासाठी येत्या 1 एप्रिल ते 30 ऑगस्टपर्यंत पिकांचा विम्याचे संरक्षण करून घ्यावे, असे आवाहन करताना रब्बी हंगामासाठी 1 ऑक्टोबरपासून विमा संरक्षण करून घेणे आवश्यक आहे. पीक विम्यावर शासनाने सर्वाधिक अर्थसाहाय्य दिले असून शेतक-यांसाठी विम्याचा दर अत्यंत अल्प ठेवण्यात आला आहे. जिल्हानिहाय पीकनिहाय विम्यासाठी वेगवेगळ्या दराची आवश्यकता नसून यापुढे केवळ दोन टक्के विमा रक्कम भरावी लागेल. विम्याच्या रक्कमेवर कोणतीही सिमा नसल्यामुळे या रकमेत कोणतीही कपात होणार नाही पूरपरिस्थितीत जलसंचय यामुळे पिकांच्या होणा-या नुकसानीलाही विम्याचे कवच राहणार आहे. विम्याचे दावे निकाली काढण्यासाठी मोबाईल आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
             यावेळी आत्म्याचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी परंपरागत कृषी विकास आणि सेंद्रिय शेती यावर मार्गदर्शन केले. जमीन आरोग्य अभियान राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, पिकावरील कीड रोग व्यवस्थापन तसेच पशुसंवर्धनाबाबत विविध तज्ञांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
               प्रारंभी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी पंतप्रधान पीक विमा योजना जनजागृती अभियान तसेच पिकांच्या संरक्षणासाठी उत्पादन वाढीसाठी घ्यावयाच्या उपाययोजनांसंदर्भात प्रास्ताविकात माहिती दिली.
            कमी किमतीत जास्त फायदा पंतप्रधान पीक विमा योजना या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन खासदार रामदास तडस यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन उज्वल सिरसाट यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप दवणे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******


  
जंगलाशेजारील गावांचा सर्वांगीण
विकासासाठी निधी देणार
                                      - एम.एस.रेड्डी
Ø 15 गावांसाठी 4 कोटी 20 लक्ष रुपये
Ø जंगलावरील अवलंबित्‍व कमी करणार
Ø डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा आढावा
Ø पिकांच्‍या संरक्षणासाठी सौर कुंपन
             वर्धा, दि.5 – मध्‍यभारतातील समृद्ध जैवविविधता व वन्‍य प्राण्‍यांचा अधिवास असलेले बोर व्‍याघ्र प्रकल्पाच्‍या संरक्षण व संवर्धनासाठी स्‍थानिक जनतेचा सहभाग महत्‍वाचा आहे. व्‍याघ्र प्रकल्पा शेजारील पंधरा गावांचा सर्वांगिण विकास करण्‍यासाठी आवश्‍यक निधी उपलब्‍ध असल्‍याची माहिती मुख्‍य वन संरक्षक व क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांनी दिली.
            बोर व्‍याघ्र प्रकल्‍पाच्‍या प्रशासकीय परिसरात नव्‍याने बांधलेल्‍या व्‍याघ्र दर्शन सभागृहाचे उद्घाटन व ग्राम परिस्थितीकीय विकास समिती, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत राबविण्‍यात आलेल्‍या पंधरा गावातील कामांचा आढावा योग संचालक एम. एस. रेड्डी यांनी घेतला त्‍याप्रसंगी मागदर्शन करतांना ते बोलत होते.
            यावेळी विभागीय वन अधिकारी एस. बी. भलावी, बीएनएसचे विदर्भ प्रमुख डॉ. संजय करकरे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहा वनसंरक्षक उत्‍तम सावंत, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, प्राध्यापक राजेश लेहकपुरे, कमलनयन बजाज संस्थेचे श्री.पवार, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे विनेश काकडे उपस्थित होते.
            बोर व्‍याघ्र प्रकल्‍पाला लागून असलेल्‍या पंधरा गावातील जंगलावरील असलेले अवलंबित्‍व कमी करुन त्‍यांना गावातच गॅस कनेक्‍शन, सोलर दिवे, सोलर बॅटरीवरील शेतासाठी सौर कुंपन, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरणाचे कामे घेण्‍यात आले असून यासाठी 4 कोटी 19 लक्ष 56 हजार रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे.
            जंगल परिसरात राहणा-या नागरिकांना गावात आवश्‍यक सुविधा देताना त्‍यांना जंगलाच्‍या संरक्षणामध्‍ये सहकार्य वाढावे यासाठी प्रत्‍येक गावात समितीची स्‍थापना करण्‍यात  आली असल्‍याचे सांगताना एम. एस. रेड्डी म्‍हणाले की, गावात राहणा-या शेतक-यांचे जीवनमान उंचावावे व रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होण्‍यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देण्‍यात येत आहे.
            शेतक-यांच्‍या पिकाचे वन्‍यप्राण्‍या पासून संरक्षण व्‍हावे यासाठी 294 लाभार्थ्‍यांना सौर कुंपन दिले आहे. वन्‍यप्राण्‍याचे मोकळया विहीरी पासून संरक्षणासाठी 145 विहीरीना संरक्षण कुंपण बसविण्‍यात आले आहे.
            वन परिसरातील गावाचा विकास करतांना गावातील महिलांचे नेतृत्‍व विकसित व्‍हावे यासाठी प्रशिक्षणासोबत समितीमध्‍ये सर्वानुमते गॅस कनेक्‍शन, गाव परिसरातील नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध दुरुस्‍ती, गुरांसाठी पाण्‍याचे हौद याचासाठी विविध प्रजातीची         दुध उत्‍पादन वाढीसाठी आवश्‍यक उपाययोजना राबवित येत असल्‍याचे श्री. रेड्डी यांनी सांगितले.
            ग्राम समित्‍यांनी गावातील विकास आराखड्यानुसार केलेल्‍या उपाययोजना व त्‍यावरील खर्चाबाबतचे सादरीकरण यावेळी केले.  गावातील महिलांना शिवण कलेचे प्रशिक्षण, मधु मक्षीकापालन, संगणक प्रशिक्षण यासारखे कौशल्‍य विकासाचे प्रशिक्षण देण्‍यात येत आहे.
            प्रारंभी क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी यांनी बोर सोविनिएर शॉपीचे उद्घाटन केले. गाव समितीत तयार केलेल्‍या विविध वस्‍तू पर्यटकांना उपलब्‍ध होणार आहे. गरमसुद, नवरगाव, बोरी  येथील ग्राम समितीच्‍या महिलांनी या शॉपीचे विधिवत उद्घाटनासाठी पुढाकार घेतला.
            यावेळी राजेंद्र गायनेर, श्रीमती आर.टी. भिंगारे-सावंत तसेच वनरक्षक, वनपाल यांनी गावांच्‍या विकास आराखडाचे सादरीकरण केले.          कार्यक्रमाचे संचालन व प्रास्‍ताविक उत्‍तम सावंत यांनी केले. यावेळी ग्राम समितीचे प्रमुख व सरपंच तसेच ग्राम समितीचे सदस्‍य उपस्थित होते.
00000



                                          रक्षा पेंशन अदालतीसाठीचा
जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज उपलब्ध
वर्धा,दि.04– सातारा येथे पीसीडीए (पेंशन) इलाहाबाद यांच्यामार्फत रक्षा पेंशन अदालत एप्रिल 2016 मध्ये आयोजित करण्‍यात आली आहे. त्याकरीता आवश्यक असलेला विहित नमुन्यातील अर्ज जिल्‍हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा येथे उपलब्‍ध आहेत. ज्‍यांना पेंशन संबंधित काही अडचणी असल्‍यास त्‍यांनी कार्यालयीन वेळेत जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी फ्ला.ले.धनंजय सदाफळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी सैनिक, विधवा, अवलंबिताना करण्यात आले आहे.
माजी सैनिक, विधवा, अवलंबितांना निवृत्‍ती वेतनाबाबत काही समस्‍या असल्यास त्‍यांनी विहित नमुन्यातील अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांसह आशिष सेन, पेंशन अदालत अधिकारी, कार्यालय रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेंशन) द्रौपदी घाट, इलाहाबाद यांचेकडे द्वी प्रतीत पाठविणे आवश्‍यक आहे, असेही कळविण्यात आले आहे.  
                                                                         000000

                                  
विधवा महिलांना ऑटोरिक्षा परवाने
वर्धा,दि.04 - आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाकडून तातडीची मदत म्‍हणून 1 लक्ष ऐवढे सानुग्रह अनुदान देण्यात येते. अशा कुटुंबातील कर्ता पुरुष मयत झाल्‍याने परिवारास चरितार्थाचे कायमस्‍वरुपी साधन उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्‍या विधवा महिलांना विशेष बाब म्‍हणून ऑटोरिक्षा परवाने वितरीत  करण्‍याबाबत शासनाने हिंदू-हदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्‍वावलंबन योजना अंतर्गत परवाने देण्‍यात येणार आहेत. योजनेसाठी पात्र विधवा अर्जदारास ऑटोरिक्षा लायसन्‍स व बॅज असण्‍याच्‍या अटीतून सूट  असल्याचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी सांगितले आहे.
    इच्‍छुक अर्जदारानी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशासकीय इमारत जिल्‍ह‍ाधिकारी कार्यालय परिसर वर्धा येथे ओळखपत्रासह व आवश्‍यक कागदपत्रासह संपर्क करावा, असेही त्यांनी सांगितले आहे.

                                                      00000
लोकशाही दिनातील तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करा
-   दीपक नलवडे
Ø नवीन 5 तक्रारी दाखल, जुन्या तक्रारींचाही घेतला आढावा
      वर्धा,दिनांक 04 – लोकशाही दिनात दाखल होणा-या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींसंदर्भात विभागप्रमुखांनी तत्काळ चौकशी करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितांना त्वरीत माहिती उपलब्ध करून तक्रारीचा निपटारा करावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी आज अधिका-यांना दिल्यात.
         निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित लोकशाही दिनात जिल्ह्यातून आलेल्या तक्रारी अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सर्व विभागांचे प्रमुख, महसूल अधिकारी आदींची उपस्थिती होती.
         जमीन मोजणी, नोंदणी, नकाशा दुरूस्ती, अतिक्रमण आदी विषयांवर लोकशाही दिनामध्ये नवीन पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या. नवीन तक्रारीसह जुन्या तक्रारींबाबत तत्काळ कार्यवाही करून संबंधित तक्रारदाराला त्या प्रकरणाबाबत कळवावे, असेही त्यांनी सांगितले.  
*******


  
   ग्रामपंचायत निवडणूक : नामनिर्देशनपत्रासोबत
जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथील
        वर्धा, दि.1 –वर्धा जिल्‍ह्यात नवनिर्मित 7 ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुका व 35 ग्रामपंचायतींच्‍या पोट निवडणुका दिनांक 17 एप्रिल रोजी होऊ घातलेल्‍या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक व पोट निवडणूकांसाठी दिनांक 2 एप्रिल 2016 रोजी नामनिर्देशन स्‍वीकारण्‍याचा शेवटचा दिवस असून वेळ दुपारी 3 वाजेऐवजी शेवटची वेळ सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे स्‍वीकारण्‍यात येतील. ग्रामपंचायत निवडणुकांमध्‍ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडावयाची जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करुन नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने पडताळणी समितीकडे प्रस्‍ताव सादर  केल्‍याची पावती किंवा अन्‍य कोणताही पुरावा सादर करावा.
       तसेच उमेदवार निवडून आल्‍याचे घोषित झाल्‍याच्‍या दिनांकापासून सहा महिन्‍यांचे मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करेल, याबाबतचे हमीपत्र नामनिर्देशक पत्रासोबत सादर करावे लागेल. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्‍यास त्‍यांचे सदस्‍य पद रद्द  ठरेल, असे निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी वैभव नावडकर यांनी कळविले आहे.
                                                                             0000000      





डॉक्टरांनी गरीब रुग्णाच्या सेवेकरीता सदैव तत्पर रहावे
-         जे.पी.नड़्डा  
      वर्धा, दिनांक 1 - आपल्या देशातील सार्वजनिक वैद्यकीय सेवा बहुतांशी शहरी क्षेत्रात केंद्रीत झाल्या असून वैद्यकीय तज्ज्ञांचा विस्तार ग्रामीण क्षेत्रापर्यंत व्हावा. डॉक्टरांनी आपल्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ गरीब जनतेला मिळावा या उद्देशाने रुग्ण-सेवेसाठी तत्पर व कटिबद्ध राहावे, असे आवाहन वर्धा येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या 7 व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित केंद्रीय आरोग्य व कुटुंब-कल्याण मंत्री जे.पी.नड़्डा यांनी केले. 
              समारंभाच्या अ‍ध्यक्षस्थानी दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे कुलपती श्री. दत्ता मेघे उपस्थित होते.  कराड येथील कृष्णा आयुर्विज्ञान संस्थेचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे कुलगुरु डॉ. गोडे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
दीक्षांत समारोहप्रसंगी भावी डॉक्टरांना संबोधित करताना श्री. नड्डा यांनी डॉक्टरांना रुग्णांच्या वैद्यकीय समस्या सोडवण्यासोबतच त्यांच्याशी आपुलकीच्या नात्याने वागण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय क्षेत्रात  डॉक्टरांची  तसेच गुणवत्तापूर्ण मानव संसाधनाची उणीव भरुन काढण्यासाठी देशभरात 11 अखिल भारतीय वैद्यकशास्त्र संस्था (एम्स) स्थापन करण्यात येणार आहे. त्यापैकी 6 संस्था कार्यरत झाल्या असून नागपुरातील एम्स येत्या 2 वर्षात पूर्णत्वास नेण्याचा आपल्या मंत्रालयाचा प्रयत्न असेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या समारंभात विद्यार्थ्यांना आचार्य पदवी तसेच स्नातक व स्नातकोत्तर पदवीदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. श्रुती, मेडीसीन या विद्याशाखेच्या तब्बल 11 सुवर्ण-पदकांच्या मानकरी ठरल्या.
डॉ.  वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मोठे कार्य करण्याची जिद्द  मनाशी बांधून ते पूर्ण करण्याचा निर्धार आपल्या भाषणातून व्यक्त केला. समारंभास विविध विद्याशाखेचे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000