Sunday, 20 March 2016

जलजागृती सप्ताहानिमित्त आज उमरी मेघेत जलसाहित्य संमेलन
Ø  पाणी पुरवठा विभागामार्फत आयोजन
Ø  जलसाहित्य संमेलनासह विविध जनजागृतीपर कार्यक्रम
Ø  लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यशाळा
             वर्धा, दिनांक 18–   जागतिक जल दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्यावतीने शनिवार, दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता उमरी मेघे  येथे पाणी पुरवठ्याचे उद्भवाजवळ जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या आराखड्यातील निवडक 422 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जलतज्ञ माधव कोटस्थाने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यशाळा जलसाहित्य संमलनाचे उद्घाटन होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी सांगितले.
           दिनांक 16 ते 22 मार्च या कालावधीत पाण्याचे महत्त्व जनतेला पटवून देण्यासाठी तसेच पाण्याबाबत योग्य व्यवस्थापन, जलसाक्षर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 58 ग्रामपंचायतीमध्ये सप्ताहकालावधीत 24 तास पाणीपुरवठा आणि मीटर बसविण्याबाबत ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. पाणी टंचाई आराखड्यातील 60 ग्रामपंचायतींनाही पाणी बचतीवर ग्रामसभेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच 422 ग्रामपंचायतीत जलदिंडी, निवडक ग्रामपंचायतीत पाऊस पाणी संकलन वॉल पेंटिंग, पाणी बचतीचे संदेश रंगविणे आदी उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले आहे
                                                               0000



शेतक-यांच्या शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ
-         रामदास तडस
Ø धान्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन
Ø भंडा-याच्या केशर, चिन्नोर तांदूळ तर वर्धेच्या तूरडाळीला मागणी
Ø शेतकरी गटांचे 42 स्टॉलवर धान्यांची विक्री
Ø शेतकरी उत्पादक गटातर्फे फळ भाजीपाला उपलब्ध
Ø धान्य महोत्सव 20 मार्चपर्यंत
वर्धा, दिनांक 18 – शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा कायम राहावा, तसेच शेतक-यांना उत्पादित धान्य व्यापा-यामार्फत बाजारपेठेत आणता थेट ग्राहकांना शेतातील उत्पादित माल सहज सुलभपणे योग्य भावात मिळावा, यासाठी एमगिरी परिसरात शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.
एमगिरी परिसरात कृषी पणन विभाग तसेच आत्मामार्फत आयोजित धान्य महोत्सवाचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांनी केले, यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एमगिरीचे संचालक प्रफुल्ल्काळे, आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कृषी तज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, प्रदीप धवने यांची उपस्थिती होती.
धान्य महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचता येते ग्राहकांनाही बाजारभावापेक्षा कमी दराने शेतात उत्पादित केलेला शेतमाल उपलब्ध होत असल्यामुळे शेतक-यांना योग्य बाजारपेठ भाव मिळत असल्याचे सांगताना एमगिरी परिसरात राज्यातील पहिली शेतक-यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ बांधण्यासाठी आवश्यक असणारा निधी खासदार निधीतून अथवा जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी शेतक-यांना उत्पादित केलेल्या मालाला योग्या बाजारभाव मिळत नाही, तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळाल्यामुळे धान्य बाजार ही संकल्पना जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्याचा मानस असून शेतकरी ते ग्राहक कायम नाते निर्माण करून ग्राहकांना नियमित धान्य पुरवठा करण्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एमगिरीचे संचालक प्रफुल्ल काळे यांनी बाराही महिने शेतक-यांना विक्रीची कायम व्यवस्था असावी, यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतक-यांना या पुढे कुणालाही कमिशन देता, आपला माल विकता यावा यासाठी बाजारपेठ ही संकल्पना राबविण्याची सूचना यावेळी केली. प्रारंभी आत्म्याचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी धान्य महोत्सव आयोजनाची भूमिका सांगितली. या महोत्सवामध्ये पवनी भंडारा येथील केशर, चिन्नोर आदी तांदूळ तसेच शेतकरी बचत गटाने तयार केलेले तूरडाळ, गहू, चना, हळद, मिरची तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे विविध फळ भाजीपाला खाद्यपदार्थ हे या धान्य महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. कार्यक्रमाचे संचालन विलास दवणे यांनी तर आभार पंकज सावरकर यांनी मानले. यावेळी तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, जनार्दन झाडे तसेच शेतकरी उत्पादक कंपनी संघाचे प्रतिनिधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

00000