Tuesday, 15 March 2016

             ग्राहक चळवळ अधिक बळकट करा
                                               -दीपक नलवडे
Ø  जागतिक ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनीचे आयोजन
Ø  विविध ग्राहक संघटनांचा सहभाग
             वर्धा, दिनांक 15 – ग्राहक चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ग्राहक चळवळ लोक चळवळ बनून प्रत्येक ग्राहकांच्याहिताचे रक्षण व्हावे, यासाठी ग्राहकांसोबत प्रशासनाची साथ असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी केले.
अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्यावतीने जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा ग्राहक तक्रार मंचचे सदस्य मिलिंद केदार, ग्राहक कल्याण परिषदेचे सचिव अजय भोयर, भाऊराव काकडे, तहसीलदार राहुल सारंग यांची उपस्थिती होती.
         नलवडे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात ग्राहक नडला जात आहे. सध्या ऑनलाईन खरेदीतही ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. परंतु ग्राहकाला त्याच्या अधिकाराची जाणीव, ग्राहक हक्क संरक्षण कायद्याबाबत जागृती होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच होणा-या गैरप्रकारावर नियंत्रणासाठी शासनस्तरावरून योग्य कार्यवाही सुरू आहे. तरीही ग्राहकांनी जागरूक राहून प्रत्येक खरेदी केलेल्या वस्तूची खरेदी पावती दुकानदारांकडून घ्यावी. आयएसआय, हॉलमार्क असलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
             अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री. तिवारी यांनी अन्न नागरी मानदे कायदा , औषध सौंदर्य प्रसाधने कायदा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच तंबाखू सेवन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी  खरेदी करावी असे सांगून ग्राहक जागरूक होवो, असेही ते म्हणाले.
         माधव चोरे, डॉ. बेहरे, श्री. चिंचपान यांनीही ग्राहकांनी जागरूक राहावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर ग्राहकांनी त्यांच्या अधिकाराची माहिती करून घ्यावी, असे सांगत कृषी, गॅस, वीज, रॉकेल आदी क्षेत्राबाबत विचार मांडून ग्राहकांनी प्रत्येक खरेदीबाबत जागृत राहावे,असेही सांगितले. श्री. केदार, श्री. भोयर यांनीही विचार मांडले. यामध्ये त्यांनी पतसंस्था, शेतकरी अपघात विमा, ऑनलाईन खरेदी तक्रारीबाबत मार्गदर्शन करून ग्राहक संरक्षण हक्क कायद्याबाबत जागृती व्हावी, असे सांगून शेवटच्या घटकापर्यंत ग्राहकांच्या हिताचा विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
             प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते झाले. प्रास्ताविक श्री.सारंग यांनी केले. सूत्रसंचालन श्री.रासपायल्ले यांनी केले. आभार श्री.काळे यांनी मानले.

00000
शेतकरी उत्‍पादक गटांकडून शेतमाल खरेदीसाठी धान्‍य महोत्‍सव
- आशुतोष सलिल
Ø  दि.18 ते 20 मार्च दरम्यान महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
             वर्धा,दि.15 -  शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्‍पनेवर आधारीत धान्‍य महोत्‍सवाचे आयोजन दिनांक 18 ते 20 मार्च या कालावधीत मगनवाडी वर्धा येथे कृषी तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा ) कृषी विभाग, वर्धा आणि एमगिरी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने करण्‍यात आले आहे. शेतकरी उत्‍पादन गटांनी उत्‍पादीत केलेल्‍या शेती माल व प्रक्रियायुक्‍त पदार्थांना याद्वारे व्‍यासपीठ उपलब्‍ध होणार आहे. थेट विक्रीतून ग्राहक आणि उत्‍पादक यांना फायदा होणार असल्‍याने ग्राहकांनी महोत्‍सवात सहभागी होऊन शेतक-यांचा  उत्‍साह वाढण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
    महोत्‍सवाचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्‍याहस्‍ते होणार आहे. दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता संदीपपाल म‍हाराजांचा प्रबोधनात्‍मक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजता खरेदीदार संमेलन होणार असून दुपारी 1 वाजता आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार यांच्‍या उपस्थितीत होणार आहे.
शेतक-यांना बाजारपेठेचा पर्याय उपलब्‍ध करणे आवश्‍यक आहे. हंगामात शेतमालाला वाजवी भाव मिळत नसल्‍याने शेतक-यांना आर्थिक फायदा होत नाही. ग्राहकांना मात्र चढ्या भावाने खरेदी करावी लागत असल्‍याने आर्थिक गणित कोलमडते. धान्‍य महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून शेतकरी व ग्राहक यामधील संपर्क वाढवून  थेट विक्रीतून दरांमधील तफावत कमी होईल. यातूनच शेतकरी उत्‍पादक गटांना शाश्‍वत बाजारपेठेचा विकास करता येईल. त्‍यामुळे दोन्‍ही आघाडीवर फायदा होऊन शेतीक्षेत्राला शाश्‍वत आणण्‍याचा प्रयत्‍न असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
                   
 या धान्‍य महोत्‍सवात विनापॉलीश डाळी, तांदूळ, गहू, प्रक्रिया पदार्थ, नैसर्गीक पद्धतीने उत्‍पादीत शेतमाल, हळद व इतर मसाला पदार्थ विक्रीसाठी उपलब्‍ध राहतील. शेतकरी गटांना विक्रीचे तंत्र माहिती करुन देण्‍यासोबत गुणवत्‍ता ब्रॅडींग  यासाठीची माहिती देण्‍याचा प्रयत्‍न केला जाणार आहे.
    शेतकरी गटांना बाजारपेठेशी थेट जोडण्‍यासाठी दिनांक 20 मार्च रोजी खरेदीदार व विक्रेता संमेलन आयोजित केले असून त्‍यातून कंपन्‍यासमवेत करार घडवून आणले जातील. जेणेकरुन शेतमालास हक्‍काची बाजारपेठ उपलब्‍ध होईल, या महोत्‍सवाचा सर्वांनी लाभ घ्‍यावा,असे आवाहनही जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
                                                                 0000000              
  

मागेल त्‍याला शेततळे योजना
शनिवार व रविवारी विशेष शिबीर
Ø शेततळयासाठी तहसील कार्यालयात नोंदणी
Ø योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन
Ø शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा होणार
      वर्धा, दि.14 – मागेल त्‍याला शेततळे योजनेचा लाभ जिल्‍ह्यातील शेतक-यांना सुलभपणे मिळावा यासाठी शनिवार व रविवारी सर्व तहसील कार्यालयात शेतकरी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. या शिबिरात शेततळ्यांसाठी आपली मागणी नोंदवून मागेल त्‍याला शेततळे योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
        शेती उत्‍पादनामध्‍ये शाश्‍वतता यावी व पिकांना आवश्‍यकता भासेल त्‍यावेळी पाणी उपलब्‍ध व्‍हावे यासाठी शेतामध्‍ये शेततळी बांधण्‍याचा महत्‍वाकांक्षी कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. जिल्‍ह्यातील शेतक-यांसाठी शासनाच्‍या संकेतस्‍थळावर ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. योजनेत सहभागी होण्‍यासाठी शनिवार दिनांक 19 व रविवार दिनांक 20 मार्च रोजी सर्व तहसील कार्यालयामध्‍ये शिबिराच्‍या माध्‍यमातून शेततळ्यांसाठी नोंदणी करण्‍यात येणार आहे.
शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.
        या शिबिरामध्‍ये प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी तहसीलदार, तालुका कृषी विकास अधिकारी, तलाठी हे शेततळ्यासाठी प्रत्‍यक्ष अर्ज भरुन घेणार आहेत. यासाठी  लागणारा सातबारा, आठ अ आदी कागदपत्रे शिबिराच्‍या ठिकाणीच उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. शेतक-यांचे अर्ज ई-सुविधा केंद्राच्‍या साहय्याने ऑनलाईन करण्‍याची संपूर्ण कार्यवाही शिबिरात करण्‍यात येणार आहे. यासाठी आवश्‍यक फी रुपये 23 भरावयाची आहे. शेतकरी बांधवांनी जास्‍ती जास्‍त संख्‍येने उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
        सदरचा कार्यक्रम हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून या योजनेअंतर्गत वर्धा जिल्‍हयास सन 2016-17 करिता 2034 शेततळ्याचे लक्षांक निर्धारित करण्‍यात आलेले आहे.
        या योजनेत सहभागी होणा-या शेतक-यांकडे त्‍यांच्‍या नावावर कमीत कमी 0.60 हे जमीन असणे आवश्‍यक आहे, यास कमाल मर्यादा नाही. योजनेत सहभागी होऊ इच्छिणा-या अर्जदारांनी यापूर्वी शेततळे, सामूहिक शेततळे या घटकाचा शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा. या योजनेत शेततळ्यांची कामे शेतक-यांनी स्‍व्‍तः करावयाची असून आकारमाननिहाय देय रक्‍कम शेतक-यांचे बँक खात्‍यात थेट जमा होणार आहे. जास्‍तीत जास्‍त अनुज्ञेय अनुदान रक्‍कम रु. 50000/- एवढी असल्याचेही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सांगितले आहे.

00000000000

Monday, 14 March 2016



                    मागेल त्‍याला शेततळे योजनेत शेतक-यांचा सहभाग वाढवा
                                                विभागीय आयुक्‍त  अनुपकुमार
·        सौर कृषीपंप व मागेल त्‍याला शेततळे योजना चित्ररथाला हिरवी झेंडी
·        जिल्‍हयात चित्ररथाच्‍या माध्‍यमातून योजनांची प्रसिध्‍दी
·        जिल्‍हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
वर्धा दि,11-दुष्‍काळावर मात करण्‍यासाठी तसेच कोरडवाहू शेतीसाठी अत्‍यंत उपयुक्‍त ठरणा-या मागेल त्‍याला शेततळे योजनेमध्‍ये प्रत्‍येक शेतक-यांनी सहभागी होण्‍यासाठी आवाहन करताना सौरकृषीपंपाच्‍या माध्‍यमातून शेती सिंचनाखाली आणणा-या महत्‍वकांशी योजना चित्ररथाच्‍या माध्‍यमातून घरोघरी पोहोचवा असे प्रतिपादन विभागीय आयुक्‍त अनूप कुमार यांनी आज केले.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातील शेतक-यांसाठी सौर कृषीपंप योजनेत तसेच मागेल त्‍याला शेततळे या योजनांच्‍या प्रसिध्‍दी चित्ररथाला विभागीय आयुक्‍त अनूप कुमार यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्‍हयातील आठही तालुक्‍यात दहा दिवस चित्ररथाच्‍या माध्‍यमातून योजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यात येणार आहे. यावेळी जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील, अपर जिल्‍हाधिकारी दीपक नलवडे, कृषी उपसंचालक श्री.कापसे   तसेच महसूल अधिकारी उपस्थित होते.
मागेल त्‍याला शेततळे ही योजना शेतीमध्‍ये शाश्‍वत सिंचनासाठी तसेच दुष्‍काळी परिस्थितीवर मात करताना कोरडवाहू शेतक-यांना पीक वाचविण्‍यासाठी महत्‍वाकांशी असल्‍यामुळे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्‍याने ही योजना राबविण्‍याचे धोरण ठरविले असून जिल्‍हयातील प्रत्‍येक शेतक-याने या योजनेत सहभागी होऊन आपले नाव नोंदवावे असे आवाहन विभागीय आयुक्‍त अनूप कुमार यांनी केले आहे. शेततळे योजना राबविण्‍यासाठी शासनाने 50 हजार रुपयापर्यंतचे अनुदान उपलब्‍ध करुन दिले असल्‍यामुळे शेतक-यांनी स्‍वयंस्‍फूर्तीने शेततळयाची मागणी नोंदवावी असेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
वर्धा जिल्‍हयासाठी सौरकृषीपंप योजना राबविण्‍यात येत असून जिल्‍यातील 920 शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्‍याना केवळ 5 टक्‍के रक्‍कम भरावयाची असल्‍यामुळे ही योजना शेतक-यांच्‍या हिताची आहे. कृषी पंपाच्‍या माध्‍यमातुन आपली शेती सिंचनाखाली आणावी असे आवाहनही विभागीय आयुक्‍तांनी  केले.
            जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांनी शेतक-यांसाठी सौर कृषी पंप योजनेमध्‍ये शेतक-यांचा सहभाग वाढत असून समारे 500 शेतक-यांनी आपले नाव नोंदविले आहे. जिल्‍हयात 920 शेतक-यांना या योजनेचा लाभ दयायचा असल्‍याने विजेचे कनेक्शन नसलेल्‍या प्रत्‍येक शेतक-याने या योजनेत सहभागी व्‍हावे. मागेल त्‍याला शेततळे योजनेमध्‍ये जिल्‍हयात 2 हजार 24 लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यात येणार असून शेतक-यांनी शेततळे बांधण्‍याची योजना यशस्‍वी करण्‍यासाठी जिल्‍हयातील तालुका कृषी अधिकारी तसेच तहसीलदार यांचेकडे आपले नाव नोंदवावे. असे आवाहन यावेळी केले. मागेल त्‍याला शेततळे योजनेसाठी प्रत्‍येक तालुक्‍यात विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्‍यात येणार असून शेतक-यांना या योजनेच्‍या माहितीसाठी विहित नमुन्‍यात  अर्ज भरुन घेण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्‍वागत करुन सौर कृषी पंप योजना तसेच मागेल त्‍याला शेततळे या योजनेसंदर्भात व्‍यापक प्रसिध्‍दीसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या चित्ररथाची माहिती दिली. चित्ररथ 12 मार्च रोजी समुद्रपूर तालुक्‍यात तसेच 13 मार्चरोजी हिंगणघाट तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये जाऊन या योजनांची जनतेला माहिती देणार आहे. विभागात देवळी तालुक्‍यात 14 मार्च, पुलगाव तालुक्‍यात 15 मार्च ,आर्वी तालुक्‍यात 16 ,आष्‍टी तालुक्‍यात 17 मार्च ,कारंजा तालुक्‍यात 18 मार्च ,सिदी रेल्‍वे 19 मार्च सेलू तालुक्‍यात 20 मार्च तसेच वर्धा येथे या चित्ररथाचा समारोप होईल.
                                                            00000







Friday, 11 March 2016

फॉडर कॅफेटेरियाचा प्रयोग राज्‍याला लागू
Ø  नांदपूरच्‍या वैरण संग्राहणीत 27 प्रकारच्‍या चा-याचे उत्‍पादन
Ø  जिल्‍हा माहिती कार्यालयाची व्‍यापक प्रसिध्‍दी मोहिम
      वर्धा,दि 11 – पशुखाद्य चा-याच्‍या टंचाईमुळे पशुपालन आणि दुग्धव्‍यवसाय प्रभावित होत असल्‍याचा प्रश्‍न सोडविण्‍याकरिता जिल्‍हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत आर्वी तालुक्‍यातील नांदपूर (ता.आर्वी) येथील पशुवैद्यकीय रुग्‍णालयातील कर्मचा-यांनी केलेला यशस्‍वी प्रयोग शासनाने राज्‍यासाठी लागू केला आहे. नांदपूर येथील पशु रुग्‍णालयाच्‍या पाऊण एकर जागेत वैरण संग्राहणी चारा बाग (फॉडर कॅफेटेरिया ) तयार करुन 27 प्रकारच्‍या चा-यांचे उत्‍पादन घेण्‍याच्‍या या कार्यावर राज्‍य शासनाची मोहोर उमटली आहे.
            या प्रयोगाचे जिल्‍हयातील यश पाहता राज्‍य शासनाने शासन निर्णय काढून प्रत्‍येक जिल्‍हयात प्रत्‍येकी दोन चारा बाग तयार करण्‍याचा तसेच पशुपालकांना वैरण उत्‍पादनाबाबत प्रशिक्षण देण्‍याचा शासन निर्णय काढला. जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू म्‍हणाले ,जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍या माध्‍यमातून गवळाऊ गायीकरिता आपल्‍याकडे चराईक्षेत्र कमी आहे. परिणामी, व्‍यापक प्रसिध्‍दी मोहिम याबाबत राबविण्‍यात आले.  पशुपालन आणि दुग्‍धोत्‍पादन व्‍यवसायात अपेक्षित प्रगती साधली जात नाही. यावर पर्याय काढण्‍याकरिता विभागाच्‍या कार्यक्षेत्राबाहेर विचार करुन तत्‍कालीन मुख्‍यकार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्‍या कार्यकाळात दोन कर्मचा-यांना हैदराबाद येथील आयजीएफआरएस संस्‍थेत प्रशिक्षणाकरिता पाठविले. नांदपूर येथील पशुवैद्यकीय रुग्‍णालयातील पर्यवेक्षक भालचंद्र जाने , मेहबुब शेख या कर्मचा-यांनी प्रशिक्षण घेतले. त्‍यांना डॉ. अनिरुध्‍द पाठक यांची साथ मिळाली आणि नांदपूरमध्‍ये चारा बाग तयार करण्‍यात आली.  या बागेत 27 प्रकारचा चारा उपलब्‍ध आहे. या बागेत विदर्भातीलच नव्‍हे तर बारामती ,बीड, जळगाव आदी ठिकाणच्‍या शेतक-यांनी भेटी दिल्‍या. संकल्‍पना समजावून घेतली. तसेच  वरिष्‍ठ अधिकारी, सचिवस्‍तरावरील अधिका-यांनीही या कॅफेटेरियला भेट दिली आणि प्रकल्‍पाची स्‍तुती केली.
            या बहुपर्यायी चारा बागेतील 27 प्रकारच्‍या चा-यांमुळे शेतक-यांना आपल्‍या शेतजमीनी पोत पाहून चा-याची निवड करणे सोपे झाले सध्‍या जिथे बाग आहे. तिथे शेजा-यांच्‍या शेतातील विहिरीतून पाणी दिले जात आहे. पाणीपुरवठयाच्‍या लिकेजेसचाही खुबीने वापर करुन या बागेला हिरवेकंच ठेवले जात असल्‍याचे यावेळी डॉ.राजू यांनी सांगितले.
            प्रमोद पवार म्‍हणाले, या चारा बागेतील प्रजातींमध्‍ये अन्‍नघटक पोषण मुल्‍य अधिक असल्‍याचा निष्‍कर्ष निघाला आहे. ज्‍या शेतक-यांनी या चा-यांचे बेणे नले, त्‍यांनी या चा-यामुळे जनावरांची प्रकृती सुधारल्‍याची माहिती दिली आहे. वर्ध्‍याने पशु चा-यांची उपलब्‍धता करण्‍याकरिता काढलेला मार्ग राज्‍याने स्‍वीकारल्‍याचा मनस्‍वी आनंद आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांचे आम्‍ही अभिनंदन करतो असे गौरवोद्गार विलास कांबळे ,राणा रननवरे यांनी यावेळी काढले आहेत.  
            राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयात राबविण्‍यात येणारी ही योजना 2016-17 पासून तर 2019-20 पर्यंत जिल्‍हा वार्षिक योजयनेतर्गंत नावीन्‍यपूर्ण योजना राबविण्‍याकरिता प्रत्‍येक जिल्‍हा नियोजन समितीस उपलब्‍ध असलेल्‍या पाच टक्‍के निधीतून राबविण्‍यात यावी, असे शासन निर्णयात नमूद आहे.
अल्‍लीपूर ,पुलगाव आणि सिंदी (रेल्‍वे) चाराबाग येथील पशुवैद्यकीय रुग्‍णालयाच्‍या जागेवर चारा बाग तयार केली जाणार आहे. याकरिता शासनाकडून सहा लाख 40 हजार रुपयांची तरतुद करण्‍यात आली आहे. अल्‍लीपूर येथील चारा बाग पावणेतीन एकरांत राहील. या बागेतून दरवर्षी जिल्‍हा परिषदेला तीन लाखांचे उत्‍पन्‍न होईल. जिल्‍हयातील शेतक-यांना या चा-यांचे बेणे निशुल्‍क, बाहेर जिल्‍हयातील शेतक-यांना कमी किमतीत उपलब्‍ध करुन दिल्‍या जाईल. चा-यांच्‍या या 27 प्रजातीचे पहिले हे पिक 60 दिवसात येईल. त्‍यानंतरचे पीक 40 दिवसांत कापणीयोग्‍य होईल. असेही राजू यांनी सांगितले


Thursday, 3 March 2016

माहिती विभागाच्‍या वर्षपूर्ती चित्ररथास हिरवी झेंडी
Ø  पाच दिवस वर्धा जिल्‍हयात
Ø  लोकोपयोगी योजनांची चित्ररथाद्वारे माहिती
            वर्धा, दिनांक 3शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांची माहिती चित्ररथाद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्‍साठी विशेष तयार करण्‍यात आलेल्‍या चित्ररथाला आज अपर जिल्‍हाधिकारी दिपक नलावडे यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून करण्‍यात आले.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातून वर्षपूर्ती चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली.  यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नवाडकर, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कृ‍षी उपसंचालक जी. आर. कापसे आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या एक वर्षपूर्ती  निमित्त  राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती असलेला चित्ररथ हा  वर्धा जिल्‍ह्यात पाच दिवस वर्धा, देवळी, सेलू, आष्‍टी, आर्वी, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये जावून जनतेस विविध योजनांची माहिती देणार आहे.  राज्य शासनाच्या अटल सौर कृषी पंप योजना, सिंचनाला कृषी पंपाची जोड, शेतकऱ्यांना सावकारी कर्ज माफीचा दिलासा, लोकसेवा हमी कायदा, जलयुक्त शिवार योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत येणारी पारदर्शकता संकल्प जलसत्ताक होण्याचा लोकाभिमुख गतिमान पारदर्शक महाराजस्व अभियान, लोककल्याणासाठी, दुष्काळग्रस्तांसाठी 10 हजार 512 कोटींचे विशेष पॅकेज अशा अनेक योजनांची माहिती या चित्ररथद्वारे देण्यात येणार आहे.
मागेल त्‍याला शेततळे योजने अंतर्गत जिल्‍ह्यात शेतक-याचा महत्‍वाकांक्षी कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. शेतक-यांनी आपल्‍या शेतात शेततळे बांधण्‍यासाठी ऑन लाईन अर्ज करावा अथवा तालुका कृषी अधिका-यांशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्‍यावा.
प्रारंभी जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्‍वागत करुन चित्ररथामार्फत वर्षपूर्ती निमित्‍त योजनांच्‍या प्रसिध्‍दी मोहिमेची माहिती दिली.
वर्षपूर्ती चित्ररथ माहिती व जनसंपर्क विभागाच्‍या संचालक कार्यालयातर्फे तयार करण्‍यात आला आहे. हा चित्ररथ विभागातील सर्व जिल्‍ह्यात माहिती देणार आहे. जनतेनी चित्ररथाच्‍या माध्‍यमातून योजनांचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.

00000