Wednesday, 6 January 2016

सामाजिक बांधिलकी स्वीकारत पत्रकारिता करा
-   रामदास तडस
Ø  पत्रकार दिन उत्साहात साजरा
Ø  चौथा स्तंभ पुरस्काराचे वितरण
Ø  पठाणकोट हल्ल्यातील शहिदांना आदरांजली
   वर्धा, दिनांक 6 -   लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभातून जनजीवनातील प्रत्येक बाबींची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहचते, ती केवळ संवेदनशील अशा पत्रकारांमुळे. पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारत पत्रकारिता करावी. तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
दादाजी धुनिवाले मठ  येथील सभागृहात श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मराठी पत्रकार दिन आणि चौथा स्तंभ पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू विनय देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पत्रकार राजेंद्र मुंढे यांची उपस्थिती होती.
खासदार रामदास तडस म्हणाले, पत्रकारांच्या लेखणीचे कौतुक वाटते. अचूक माहितीपूर्ण अशा आशयातून दिवसभरातील घटनांचा अचूक पद्धतीने योग्य शब्दात मांडणी करून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य अथक परिश्रमातून पत्रकार करत असतात. घटनेची सखोल माहिती बहुअंगाने लोकांसमोर ठेऊन जनसामान्यांचा कौल घडविण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून होते. यासाठी जे पत्रकार अहोरात्रपणे समाजासाठी  झटतात त्यांच्या कार्याचा गौरव व्हायलाच हवा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी आपली लेखणी आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे त्यांचा गौरव माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी वर्धा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. हा ठप्पा पुसून काढण्यासाठी पत्रकारांसह सर्वांनी समोर येणे आवश्यक असल्याचे नमूद केले. सेवाग्राम विकास आराखड्याची संकल्पना मांडणा-या श्रीकांत बारहाते यांनी या आराखड्याला पूर्णत्वास नेण्यासाठी साथ देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


जिल्हा माहिती अनिल गडेकर यांनी युवकांनी पत्रकारिता क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत तो पाठविण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे पालन करून पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतिम स्वरूपात लवकरच येईल, असे सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पत्रकारांनी पुढे यायला हवे,असेही सांगितले.
      माजी कुलगरू डॉ. विनायक देशपांडे यांनी समाजकार्यकर्ते आणि पत्रकारांनी अविरतपणे संवेदनशील राहून सातत्याने कार्य करत राहावे. त्यांच्या सारख्या संवेदनशीलतेमुळे जागृत समाज निर्माण होण्यास मदत होते, असे सांगितले. देवस्थान ट्रस्टचे सुनील बुरांडे यांनीही यावेळी दर्पण दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.  
शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह मानपत्र रोख पाच हजार रूपये देऊन समाजकार्यकर्ते श्रीकांत बारहाते, नाट्य कलावंत, दिग्दर्शक हरीष इथापे यांचा मान्यवरांच्याहस्ते चौथा स्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय प्रभावी कामगिरी, लेखन केल्याबद्दल लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देशमुख पुण्यनगरीचे प्रतिनिधी प्रवीण होनाडे यांचाही यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख यांनीही यावेळी विचार मांडले
 कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांनी केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद इंगोले यांनी केले. तर आभारही त्यांनीच मानले. पठाणकोट येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी उपस्थितांसह मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
सत्कारमूर्तींचे मनोगत
समाजकार्यकर्ते श्रीकांत बारहाते यांनी वर्धा शहर हे केवळ शहर नाही. या शहराला, जिल्ह्याला महात्मा गांधीजींच्या रुपातून मोठा इतिहास लाभला आहे. पं. नेहरू, मौलाना आझाद, सरहद्द गांधी, पटेल आदी राष्ट्रीय नेत्यांचा पदस्पर्श या भूमिला झालेला आहे. मध्यभारतातील अत्यंत महत्त्वाचे असे हे शहर आहे. या शहरावर जगाचे लक्ष आहे. त्यामुळे येथील पत्रकारांवर मोठ्याप्रमाणात जबाबदारी आहे, त्यांनी ती संवेदनशीलपणे पार पाडलेली आहेच, परंतु यापुढेही त्यांनी समाजजागृतीसाठी नेहमीच पुढे राहावे, असे सत्काराप्रसंगी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून वर्धा शहरात उत्तम दर्जाचे सांस्कृतिक नाट्य सभागृह उभारण्याची जबाबदारी पार पाडावी. शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब झाली असल्याचे नाट्य कलावंत हरीष इथापे यांनी सांगितले.   
000000


Tuesday, 5 January 2016

निम्‍न वर्धा प्रकल्‍पांतर्गत जमिनीची
पुलगाव येथे खरेदी-विक्रीची सुविधा
            वर्धा,दि.5- निम्‍न वर्धा प्रकल्‍पांतर्गत येणा-या सर्व जमिनीची खरेदी-विक्री संदर्भात निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे उर्वरित भूसंपादन वाटाघाटी पद्धतीने, सरळ खरेदी पद्धतीने संबंधीत दस्‍तांची नोंदणीची पुलगाव येथे निबंधक (श्रेणी-1) या कार्यालयात करण्‍यात येणार आहे.
            निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे भूसंपादना संदर्भातील दस्‍त नोंदणीची कामे बुधवार दिनांक 6 जानेवारी  रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 व दुस-या सत्रात रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण दिवस करण्‍यात येणार असल्‍याची माहिती सह जिल्‍हा निबंधक अनुप सांगोडे यांनी दिली.
देवळी येथील आठवडयातून मंगळवार, गुरुवार व तिसरा शनिवारी कार्यालयाची वेळ तात्‍पुरती उक्‍त भूसंपादनाची कामे संपेपर्यंत दुस-या सत्रात म्‍हणजे दुपारी 2.00 ते रात्री 9 वाजेपर्यंत राहणार आहे. मंगळवार, गुरुवार व तिसरा शनिवार या दिवशी पुलगाव येथे दुय्यम निबंधक श्रेणी-1, पुलगाव कार्यालयात पहिले सत्रात म्‍हणजे सकाळी 7.00 ते दुपारी 2 पर्यंत कामकाज सुरु ठेवण्‍यात येत आहे. उपरोक्‍तप्रमाणे भूसंपासदाना संबंधात नोंदणीची कामे पूर्ण होताच देवळी येथील भेट कार्यालय, पूर्ववत सुरु राहील,  असे सह जिल्‍हा निबंध अनुप सांगोडे यांनी कळविले आहे.
00000
प्र.प.क्र. 11                                                                                               दिनांक – 5 जानेवारी 2016
राष्‍ट्रीय मतदार दिवसानिमित्‍त जनजागृती कार्यक्रम
            वर्धा, दि.5- मतदारांना, नवीन मतदारांना लोकशाही प्रक्रियेतील त्‍यांच्‍या सहभागाबद्दल जबाबदारीची जाणीव करुन देण्‍याच्‍या उद्देशाने जिल्ह्यात जनजागृती करण्‍यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्‍यावतीने 25 जानेवारी रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले आहे. त्‍यानुषंगाने प्रत्‍येक मतदार केंद्राच्‍या ठिकाणी राष्‍ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे.
            सदर कार्यक्रम मध्‍यवर्ती मतदान केंद्राच्‍या ठिकाणी किंवा परिसरातील शाळा, महाविद्यालय, समाज मंदिर सार्वजनिक सभागृह आदी ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.  नव्‍याने नोंदणी केलेल्‍या मतदारांना निमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्व उपस्थित नवीन मतदारांना प्रतिज्ञा दिली जाणार आहे. नवीन मतदारांना यांचे कार्यक्रमात छायाचित्रे मतदार ओळखपत्र व बिल्‍ले वाटप केले जाणार आहे. मतदार नावनोंदणी  व  मतदान या विषयी उपस्थित मान्‍यवराद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. मतदारांना मतदार यादीचे भाग या ठिकाणी दाखविले जातील. जनजागृतीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्‍ट्रीय सेवा योजना व एनसीसी, स्‍वयंसेवी संस्थाच्यावतीने प्रभातफेरी, दौड, सायकल रॅली अशा कार्यक्रमांचे आयोजन आठवडाभर केले जाणार आहे. पथनाट्य, लोकनृत्‍य इत्‍यादी कार्यक्रमाद्वारे मोहीम प्रशासनामार्फेत राबविण्‍यात येणार आहे.
            स्‍वातंत्र्यानंतर पाचव्‍यांदा प्रत्‍येक मतदान केंद्रांवर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करुन मतदारांना व नवीन मतदारांना लोकशाही प्रक्रियेतील त्‍यांच्‍या सहभागाबद्दल, जबाबदारीची जाणीव करुण देण्‍याचा हा प्रयत्‍न राहणार आहे, असे निवडणूक विभागातर्फे कळविण्यात आले आहे.  
             
0000
प्र.प.क्र. 12                                                                                               दिनांक – 5 जानेवारी 2016
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव सादर करा
-         बाबासाहेब देशमुख
             वर्धा,दि.5 - दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे. या पुरस्‍कासाठीप्रस्‍ताव दिनांक 25 जानेवारीपर्यंत सादर करावेत,असे आवाहन समाज कल्‍याण विभागाचे सहायक‍ आयुक्‍त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.   
               सामाजिक न्‍याय विभागामार्फत अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, शारीरिकदृष्ट्या  मनोदुर्बल, अपंग, कृष्‍ठरोगी आदींच्या कल्‍याणासाठी कार्य करणा-या व्‍यक्‍ती  व सामाजिक शिक्षण, आरोग्‍य, शेती, वने, पर्यावरण सहकार, उद्योग, संस्‍कृती, साहित्‍य, अंधश्रद्धा निर्मुलन आदी श्रेत्रात कार्य करणा-या सामाजिक संस्‍थांना यांना प्रत्‍येकवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्‍कार देण्‍यात येतो. व्‍यक्‍तीसाठी 15 हजार रुपये व सन्‍मानपत्र आणि संस्‍थेकरीता 25 हजार रूपये रोख व सन्‍मानपत्र असे पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. या सन 2015-16 पुरस्‍कारासाठी 25 जानेवारीपर्यंत इच्‍छुक व्‍यक्‍ती व संस्‍थांकडून प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहेत. अर्जदार व्‍यक्‍तीचे वय पुरुषासाठी किमान 50 वर्ष व स्त्रियांसाठी किमान 40 वर्ष इत‍के असावे. अर्जदार व्‍यक्‍तीचे सामाजिक क्षेत्रात किमान 15 वर्ष व सामाजिक संस्‍थेचे किमान 10 वर्ष कार्य असणे आवश्‍यक आहे. अर्जदार व्‍यक्‍ती खासदार, आमदार, जिल्‍हा परिषद सदस्‍य अथवा कोणतीही पदाधिकारी नसावी. तसेच अर्जदार संस्‍था राजकाणापासून अलिप्‍त असावी.
            पुरस्‍कारासाठी अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी विशेष जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी नवीन प्रशासकीय इमारत, वर्धा या कार्यालयास कामकाजाच्‍या दिवशी कार्यालयीन वेळेत (दूरध्‍वनी क्रमांक 07152-243331) संपर्क साधावा. प्रस्‍ताव तीन प्रतीत सादर करावा. प्रस्‍ताव स्वीकारण्‍याची अंतिम मुदत 25 जानेवारी आहे.  या तारखेनंतर  आलेले प्रस्‍ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे समाज कल्‍याण विभागाचे सहायक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.

                                                                         00000       
सावंगी (मेघे) पोलीस स्‍टेशनच्‍या कार्यक्षेत्रात 40 गावांचा समावेश
Ø   हद्दनिश्चितीची अधिसूचना जारी
Ø  रामनगर पोलीस स्‍टेशन अंतर्गत 34 भाग
          
वर्धा,दि.5- रामनगर व सावंगी (मेघे) या दोन नविन पोलीस स्‍टेशनच्‍या निर्मितीनंतर या दोन्‍ही पोलीस स्‍टेशनचे कार्यक्षेत्र निश्चित करण्‍यात आले आहे. पोलीस स्‍टेशनच्‍या कामांच्‍यादृष्‍टीने हद्द निश्चितीची अधिसूचना जारी करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली.
            वर्धा शहर पोलीस स्‍टेशनचे विभाजन करुन नवनिर्मित रामनगर ठाण्‍यात पूर्वेकडील 55 भागाचा   
           एरीया असून रामनगर ठाण्‍याच्‍या अंतर्गत 34 एरीया भूभाग आहे.
                        सेवाग्रामचे विभाजन काम नवनिर्मित सावंगी (मेघे) मध्‍ये पुलगाव येथील दोन गावे, देवळी  
           येथील चार गावे, खरांगणा येथील पाच गावे व सेवाग्रामची 29 गावे असे 40 गावे जोडण्‍यात  
           आली आहेत.
            पोलीस स्‍टेशन कार्यक्षेत्र निश्चित केल्‍यानंतर खरांगणा पोलीस स्‍टेशन अंतर्गत 73 गावे, देवळी 52
            गावे, पुलगाव 72 गावे तर सेवाग्राम पोलीस स्‍टेशन अंतर्गत 30 गावांची हद्द निश्चित करण्‍यात
           आली आहे.
000000