Tuesday, 19 March 2013

सुसंस्कृत नेता - यशवंतराव गडाख


विशेष लेख :                                                          
                                                                                                                                                                                                 सुसंस्कृत  नेता
                                                            -  यशवंतराव  गडाख

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .

          स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ भारावलेला होता. धकाधकीचा होता. स्वराज्य मिळाले. त्याचे सुराज्यात रुपांतर करायचे कसे? हा राज्यकर्त्यांपुढे त्या काळात प्रश्न होता. त्यात महाराष्ट्रात द्विभाषिक राज्य.  संयुक्त  महाराष्ट्राची चळवळ जोमात होती. प्रचंड जनक्षोभ होता. केंद्र राज्यातील भाषिक जनता, असाच तो संघर्ष होता. या संघर्षात राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व यशवंतराव चव्हाणांसारख्या धुरिणांकडे होते. यात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. यशवंतरावांनी कुशलतेने ही चळवळ हाताळली. त्यातून  तावूनसुलाखून त्यांचे नेतृत्व  पुढे आले. 1962 च्या चिनी युध्दानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांना केंद्रात बोलावून घेतले. " हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला "असा वाक्यप्रचार तेव्हा रुढ झाला. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला झळाळीच येत गेली. मागे वळून त्यांनी कधी पाहिलेच नाही.  महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचवावी असेच नेतृत्व स्वातंत्र्यानंतर देशाला दिले. लोकमान्य टिळकानंतर नेतृत्वाची पोकळी त्यांनी भरुन काढली.
                माझ्यासारखी नवी पिढी त्या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. राजकारणात, समाजकरणात रस असल्याने या गोष्टी जवळून पाहात होतो. साठ सत्तरच्या दशकात तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यातूनच पुढे राज्यात नवनिर्माण झाल्याचे दिसते. यशवंतरावाच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बरेच काही लिहून आले आहे. अनेक ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.  प्रस्तुत ठिकाणी त्यांच्या चारित्राचे सिंहावलोकन  करण्यापेक्षा त्यांच्या सहवासात आल्यावर  त्यांचे मोठेपण, त्यांची सहिष्णुता, विजिगिषु वृत्ती , सह्दयता  सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न  करीत आहे. त्यांच्या जपलेल्या आठवणीतून या गोष्टी उलगडत जातील.
                अहमदनगरमधील प्रसिध्द कुस्तीगीर पैलवान छबुराव लांडगे यांच्या संबंधातील  एक मजेशीर  आठवण  आहे.  यातून यशवंतरावांचे मोठेपणच सिध्द होते. लहानातल्या  लहान उपकारकर्त्याला विसरायचे नाही.  ही साधी शिकवण त्यांनी दिली. त्याचं काय झाले, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तो काळ होता. नगरच्या गांधी मैदानात कॉ. श्री. . डांगे, बाळासाहेब भारदे, यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांची भाषणे व्हायची. लोक खूप गर्दी करायचे. विचारांची ती मेजवानी वाटायची. भविष्याची स्वप्ने त्यात दिसायची. चव्हाणांसारख्या  राज्यकर्त्याचे विचार ऐकण्यासही लोक उत्सुक असायचे. आंदोलनाच्या काळात त्यांची सभा नगरला होऊ द्यायची नाही, असा आंदोलकांनी पवित्रा घेतला. त्यांना विरोध समजल्यावर साहेबही म्हणाले, " नगरमध्ये  मी येणार, सभा घेणार, त्यात विचारही मांडणार " ते इरेस पडल्यावर कॉग्रेसजनांना हुरुप आला. नगरमध्ये सभा घेण्यास चव्हाणसाहेब आल्यावर जुन्या बसस्थानकापासून मैदानापर्यंत त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या जीपच्या  बोनेटवर प्रसिध्द पैलवान छबुराव लांडगे मांडी घालून बसले. त्या काळात त्यांचा दबदबाच तसा होता. सभा निर्विघ्नपणे पार पडली. त्यानंतर केंद्रात मंत्री असतांना चव्हाणसाहेब एकदा नगरला आले. विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी गप्पा मारत बसले होते. तेथे छबुराव लांडगे आले आणि त्यांनी  साहेबांना 'चहाला घरी चला'  असा आग्रह धरला. कॉग्रेस अंतर्गत विरोधी गट साहेबांनी छबुरावांकडे जाऊ नये, यास्तव विरोध करीत होता.  त्यांनी सगळ्यांचे ऐकून घेतले, काही बोलले नाहीत . जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, "गाडी काढा, आपल्याला छबुरावकडे जायचं आहे". गाडी पैलवानांच्या घराकडे वळाली. गाडीत साहेबांसमवेत  मी आणि आबासाहेब निंबाळकर असे दोघे होतो. ते म्हणाले , " काय हे मनाचे कोतेपण, त्यांच्या घरी जायला विरोध. नगरमध्ये माझी सभा होत नव्हती तेव्हा छबुराव जीपच्या बोनेटवर जाऊन बसले. सभास्थानी त्यांनी नेलं. सभा झाली. हे मी आयुष्यभर विसरणार नाही". कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार, त्याने पक्षासाठी खाल्लेल्या खस्ता त्याच्या त्यागाचा कुणी विचारच करीत नाही. आजच्या राज्यकर्त्यात हे प्रकर्षाने जाणवते. मागची पिढी अपवाद असू शकेल. छबुरावसारख्या सामान्य कार्यकर्त्याने मदतच केली होती. त्यातून उतराई म्हणण्यापेक्षा त्याचा सन्मान कसा वाढेल , हेच साहेबांनी पाहिले. या साध्या घटनेतून त्यांचे मोठेपण, कार्यकर्त्याना जपण्याची कलाच सिध्द होते.  आताचा विचार केलेलाच बरा!
                दुसरे असे की, मुळा सहकारी साखर कारखान्याचा पहिलाच गळीत हंगाम होता. 14 जानेवारी 1979 हा तो मकरसंक्रांतीचा दिवस. गव्हाणीत मोळी टाकण्यासाठी यशवंतराव चव्हाण, शरद पवार अण्णासाहेब शिंदे दी नेते आले होते. या कार्यक्रमानंतर मळ्यात भोजनानंतर जिल्ह्यातील पुढाऱ्यांची बैठक झाली.  विधानसभा निवडणुका जवळ आल्या होत्या. बैठकीस आबासाहेब निंबाळकर , मारुतराव घुले, कि.बा. म्हस्के आदी उपस्थित होते. मतदारसंघाच्या निवडीबाबत चर्चा चालू होती. निंबाळकर यांचा कर्जत विधानसभा मतदारसंघ राखीव झाला होता. आबासाहेब साहेबांचे विश्वासू सहकारी, चर्चा झाल्यावर चव्हाणसाहेब एकच वाक्य बोलले
"
आबासाहेबांशिवाय तुमची टीम राज्यात कशी दिसेल. " जीवाला जीव देणारा हा नेता, संघटना भी करणा-याला  वा-यावर सोडत नसे.
                हे झालं आबासाहेबाबद्दल. आजचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याबद्दलही असाच गंमतीशीर प्रकार सांगावासा वाटतो. चव्हाणसाहेब आबासाहेबांचे खूपच सख्य ! आबासाहेब काटेवाडीला पवार  यांच्या घरी गेले असतांना त्यांच्या मातोश्रीना  आमच्या पक्ष  कार्यासाठी आपला पुत्र देण्याबाबतची विनंती केली. त्याचवेळी 1967 च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्याच्या संसदिय मंडळाच्या बैठका मुंबईत  होत होत्या. पुण्याच्या बैठकीत तेथील पक्ष श्रेष्ठीत विधानसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत चर्चा झाली. शरद पवार यांचे नाव यावेळी बारामतीतून सुचविण्यात आले. पुण्यातील पक्षाच्या ज्येष्ठ मंडळीनी त्यास विरोध  केला. ते निवडून येतील का, इथूनच शंका उपस्थित केली. या चर्चेत मध्येच चव्हाणसाहेबांनी भाग घेत सांगितले. " पक्ष राज्यातील सर्व 288  जागा लढविते. त्या सर्वच जागी विजयी होत नाही. त्यातील काही जागा जातात. मग पवार यांना तिकीट दिल्यावर आणखी एखादी जागा गेली तर काय बिघडेल. युवा कार्यकर्त्याला उमेदवारी देवून बघायला काय हरकत आहे.
"
मग मंडळीचा विरोध मावळला पवार यांची उमेदवारी निश्चित झाली. चव्हाणसाहेबांनी आग्रह धरल्याने शक्य झाले. पण युवा  कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, उत्तेजन दिले पाहिजे, हाच त्यांचा दृष्टिकोन ?त्यामागे होता. त्यानंतर पवार यांनी मागे पाहिलेच नाही. निवड सार्थच होती ना ?
                पंचायत राज व्यवस्थेचे जे नेटवर्क आज राज्यात उभे आहे. त्यामागे चव्हाणसाहेबांचीच दूरदृष्टी होती. कार्यकर्त्यांना प्रशासकीय अनुभव  मिळण्याचा ग्रामीण भागातील या राजकीय शाळाच आहेत, असे त्यांना वाटे. या व्यवस्थेतून कार्यकर्ते पुढे सभापती, संस्थेचे अध्यक्ष , मंत्री  झालेले दिसतात. एखादं दुसरं राज्य सोडलं तर महाराष्ट्राला त्यांची ही मोठी देण आहे. जिल्हा  परिषदा स्थापन झाल्यावर ग्रामीण भागातून फार मोठे बळ निर्माण झाले. यात पुढे थोडासा अहंचा प्रश्न निर्माण झाला. तोही साहेबांनी खुबीने सोडविला. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांत श्रेष्ठ कोण कुणी कुणाच्या दालनात जायचे ? प्रश्न साधा होता. मुंबईला अधिकारी पदाधिका-यांची परिषद भरली होती.  चव्हाणसाहेब  या परिषदेला मार्गदर्शन करीत होते. तेथे हा मुद्दा उपस्थित झाला. साहेब म्हणाले, " मला या तक्रारीत अर्थ वाटत नाही. विकासाच्या प्रश्नांवर दोघांनी आपली कार्यक्षमता गुंतवावी. हा प्रयोग राबवितांना अडचणी येतीलच. दोघेही खुर्चीत किती तास बसतात. शेवटी अधिकारी हाही माणूसच असतो. कार्यालयात अपमान वाटत असेल तर अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आजारी पडल्यावर त्यांच्या घरी भेटायला जावे. अध्यक्ष आजारी पडला तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावे. एवढ्या पातळीपर्यंत दोघे येऊ शकतात.  प्रश्न सुटायलाही मदत होईल. " मग हे प्रश्न कमी झाले. राज्यकर्ता असूनही त्यांची पाहण्याची दृष्टी  किती सखोल होती. माणुसकी सुसंस्कृतपणा हा गुण त्यांच्यात मुळातच होता. तो ठायीठायी दिसायचा.                                         
सार्वजनिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांना ते सन्मानाने वागवायचे. नवीन कार्यकर्त्यातील गुण हेरुन ते कसे विकसित करता येतील, याची काळजी घेत. सार्वजनिक कार्यक्रमासाठी राज्यभर ते दौरे करायचे. या दौऱ्या कार्यकर्त्यांप्रती असणारा त्यांचा भाव लक्षात येई. ते त्यांना फार जपत असत. त्यांचा अनुभव मी ऱ्याचदा घेतला आहे. यातूनच आम्ही पुढे आलो. व्यासपीठावर युवक  कॉग्रेसची  मंडळी भाषण करायला लागली की ते एकाग्रचित्ताने भाषण ऐकत. लोकांनी दिलेल्या निवेदनाचे कागद घेत. त्यांचे बारकाईने निरीक्षण करीत. कार्यक्रम चालू असतांना शेजारी बसलेल्या पुढाऱ्यांशी बोलत नसत. हात बांधून कोण काय बोलतो हे काळजीपूर्वक मनन करीत.  आजची स्थिती उलट आहे.  मोठे पुढारी लहान कार्यकर्त्यांकडे पाहात नाहीत. प्रश्न काय मांडले, याकडे लक्ष देत नाहीत. व्यासपीठावर दुसऱ्यांचे भाषण चालू असतांना आपसात गप्पा मारतात, हास्यविनोद करतात. घेतलेली निवेदने कुठे तरी टाकून देतात. या लहान लहान गोष्टी राज्यकर्त्यांनी पाळायच्या असतात.तरुण पिढीचा आत्मविश्वास वाढवायचा असतो. विचारपूर्वक बोलले पाहिजे ही भावना कार्यकर्त्यात तयार व्हायची , ही त्यांची शिकवण आजचे राज्यकर्ते विसरले आहेत.
                चव्हाणसाहेबांनी ऱ्या अर्थाने या राज्यातील लोकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी उच्चारलेल्या शब्दास केवढी किंमत होती. 1967 ची घटना आहे. मी सभापती असतांना नेवाशात महाविद्यालय काढायचे ठरले. यासंदर्भात नेवाशाला ज्ञानेश्वर मंदिरातच बैठक होती. बैठकीला साहेब, अणासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.        " कुणीही कितीही पैसे दिले तरी थं ज्ञानेश्वरांच्या नावाने कॉलेज निघाले पाहिजे. "असे साहेबांनी जाहीर करुन व्यक्तिगत एक हजाराची देणगीही महाविद्यालयासाठी दिली. या घटनेने जिल्ह्यातील पुढारी काय समजायचे ते समजले. चव्हाणसाहेबांचा नंतरचा कार्यक्रम श्रीरामपूरला होता. तेथे अण्णासाहेब शिंदे यांनी डाकले यांना महाविद्यालयास एक लाख रुपयाची देणगी देण्याची गळ घातली. नाव देता येणार नाही, हे ही स्पष्ट केले. नेवाशातील बैठकीचा वृत्तांतही दिला. डाकले यांनी लाखाचा निधी दिला. तेव्हा कुठे आमचे नेवाशाचे कॉलेज निघाले आहे. यामागे साहेबांचीच प्रेरणा होती. हे  निश्चित.
                जीवनातील सर्व क्षेत्रात त्यांना रस होता. राज्यकर्ता कसा असावा हे त्यांच्याकडे पाहिल्यावरच कळते. साहित्य, संस्कृती या क्षेत्रातही त्यांना गती होती. केवळ  बहुजन समाजातील पुढाऱ्यांशी त्यांचे हितसंबध होते असे नाही. सर्वच समाजात  त्यांची ऊठबस होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,  वि..पागे, दादासाहेब गायकवाड आदी काही ठळक नांव सांगता येतील. सर्व समाजातील उच्चपदस्थांचा सहभाग घेऊनच  त्यांनी महाराष्ट्र घडविला. पुरोगामी राज्य म्हणून पुढे त्यास नावलौकिक प्राप्त झाला तो त्यांच्या अपार कष्टाने. समाजाचे दीर्घकाळ नेतृत्व करायचे तर त्या राज्यकर्त्याच्या अंगी हे सर्व गुण असले पाहिजेत. राज्य आज प्रगत गणले जाते. विकास झाला म्हटले जाते. उद्योगधंदेही वाढले. पण महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे. चव्हाणसाहेबांनी जी उंची त्या काळात सर्व क्षेत्रात गाठली ती उंची नतंरच्या राज्यकर्त्यांना गाठता आली नाही. उलट हा ग्राफ कमी कमी होत गेला. राज्यकर्ता बहुजन समाज विकास प्रक्रियेत लागला. दुसऱ्या बाजूकडे तो जाऊच शकला नाही. क्षमता नव्हती की,  ती समजली नाही. काही कळत नाही. एका पातळीपर्यत ते राजकारण एके राजकारण करीत बसले. सातत्याने निवडणुका खरेदी विक्री संघ, बाजार समिती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, कुठली ना कुठली निवडणूक चालूच.  या चक्रातून तो डोकं वर काढतच नाही. सारी एनर्जी त्यातच खर्च होते. त्यात घरातली भाऊबंदकी, गावातली भांडणं, गटतट या पलीकडे काही आहे हे त्याला उमगलेच नाही. यात दोन तीन पिढ्या बिघडल्या इतर क्षेत्रात त्या जाऊच शकल्या नाहीत. राजकारणाव्यतिरिक्त अनेक क्षेत्र अशी आहेत. ती पदाक्रांत केलीच नाहीत. ही समाजाच्या दृष्टीने हानीच झाली.  याला आम्ही राज्यकर्तेच जबाबदार आहोत. इतर समाजाला काही क्षेत्र बंद झाली तर त्याने शिक्षण, संरक्षण, व्यापार, उद्योग या क्षेत्रात पदार्पण केले. तसा बहुजन समाज गेला नाही.
                 चव्हाणसाहेबांची आणखी एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. साहित्यिक रणजित देसाई त्यांच्या कोवाड या गावी आम्ही मुक्कामाला होतो. त्याच्या पत्नीच्या पुस्तकाचे प्रकाशन त्या दिवशी होते. वाड्यात साहेब, मी, शिवाजी सावंत, आनंद यादव, अरुण शेवते बसलो होतो. साहेब खुर्चीवर, आम्ही सतरंजीवर बसून गप्पा रंगल्या होत्या. दोन तीन तास साहित्याच्या वेगवेगळ्या प्रवाहावर मनमुराद गप्पा झाल्या. ती एक बौध्दिक मेजवनी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चव्हाणसाहेब रणजित देसाई यांना म्हणाले, ' तुम्ही  "स्वामी" कांदबरी जेथे बसून लिहिली ती जागा दाखवा.' देसाईनी त्याना जीना चढून वरच्या खोलीत नेले. ज्या खुर्चीत बसून त्यांनी लिहिले. त्या खुर्चीत साहेबांनी बसून पाहिले. साहित्याची त्यांना आवड होती. साहित्यिकात ते रमत. स्वत:ही  त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.
                चव्हाणसाहेब उपपंतप्रधानापर्यंत पोहोचले, पण पंतप्रधानपदाची संधी चालून आली असताही  ती त्यांनी नाकारली, याची खंत मराठी माणसाच्या मनात आहे. याबाबत त्यांचे अंतर्मन कुणी जाणून घेत नाही. हल्लीच्या भाषेत त्यांचा आतला आवाज वेगळाच होता. एकतर ते भावनिक होते. सुसंस्कृत होते. त्यांना पदाची , सत्तेची हाव अशी नव्हती. पद मिळण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली नाही. ती त्यांच्या स्वकर्तृत्वाने  आपोआप मिळत गेली, ते इतरांसारखे  श्रूड राजकारणी नव्हते. पंतप्रधानपदाबाबत विचारणा झाल्यावर त्यांनी मला इंदिराजींना भेटावे लागेल, असा निरोप दिला. आणि ते भेटलेही . शेवटी जे व्हायचे तेच झाले.
                त्यांच्या काळात विरोधक मजबूत होते. राजकारण तसं सोप नव्हतं. पण गावपातळीपर्यंत कार्यकर्त्याची फळी त्यांनी निर्माण केली, त्यांना एक वैचारिक बैठक दिली. ते अनेकांना कौटुंबिक आधार वाटायचे, आपली या माणसाकडून फसवणूक होणार नाही, योग्य मार्गदर्शन होईल. आत एक बाहेर एक, असं काही नाही. नेत्याच्या अंगी जी विश्वासार्हता असावी लागते, ती त्यांच्या ठायी होती. त्यामुळे लोक कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे बिनधास्त नेत. येणाऱ्या माणसाची तक्रार, प्रश्न समजून घेऊन  त्यांचे समाधान ते करीत असत. ऐशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण अशा फुकटच्या गप्पा नव्हत्या, समाजमनाची नाडी त्यांनी ओळखली होती.
                सहकार क्षेत्रात कार्यक्रमांना गेल्यावर साहेब त्या क्षेत्रातील चुकांवर भाष्य करायचे. आजच्या इतके अवमूल्यन त्या काळात सहकाराचे झाले नव्हते. प्रवरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या उदघाटनास आले.  ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांची शाळा निघते  म्हटल्यावर मातृभाषेतील शिक्षणच चांगले, असा विचार तेथे  मांडला. चुका दिसल्यातर कुणाचा मुलाहिजा ठेवत नसत. या स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था कशा टिकवता येतील हाच प्रश्न आहे. खासगीकरणाचे पीक आले आहे. सहकाराचे केडर राहिले नाही. परिणामी पुढच्या दहा वीस वर्षात सहकार क्षेत्र आकुंचित होत जाईल. वास्तविक रशियातील साम्यवाद कसा  मोडकळीस आला यूरोपात भांडवलशाहीचे काय चालले आहे. हे पाहिल्यावर सहकार हाच मधला मार्ग तरणोपाय होता, त्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया चव्हाणसाहेबांनी घातला, तोच ठिसूळ झाल्यासारखे वाटत आहे.
            चव्हाणसाहेबासारखा आदर्श सुसंस्कृत राज्यकर्ता होणे नाही. त्यांचे पर्वताएवढे त्तुं काम लक्षात घेऊन  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या सभागृहास "यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह " असे नाव दिले. मुळा एज्युकेशनच्या डेंटल कॉलेजलाही त्यांचे नांव दिले. त्यांनी खूप काही आदर्श या राज्यास घालून दिले. पण या राज्याची शोकांतिका आहे, एकीकडे प्रगती होत असतांना दुसरीकडे राज्यकर्त्यांमधील संवेदनशीलता संपत चालली आहे. सामाजिक प्रगतीचा डोलाराही दिसतो. कायदा सुव्यवस्थेचे काय? ती कुठे आहे? शहरात, गावात गावठी कट्टे मिळू लागले आहेत. शाळेत मुलींचे अपहरण होते. गरीब, मध्यम वर्गीयांना जीवन सुरक्षित वाटत नाही. मग या प्रगतीला अर्थ काय?  संवेदनशीलता जपली असती तर अशी वेळ राज्यावर आली नसती.
                25 नोव्हेंबर 1984 हा दिवस विसरता येणार नाही. त्या दिवशी साहेबांनी इहलोकीची यात्रा  संपविली. शेवटी शेवटी ते आजारीच होते. इस्पितळात त्याच्यावर उपचार  सुश्रषा चालू होती. त्यावेळी आम्ही तेथेच त्याच्या सान्निध्यात होतो. त्यांच्या अखेरच्या सेवेची संधी मलाही मिळाली. त्याचे अंत्यदर्शन  तर झालेच, कदाचित नियतीनेच तेथे पाठविले असावे. ललामभूत अशा या अद्वितीय  व्यक्तिमत्वाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.

                                                                                                                - शब्दांकन महादेव  कुलकर्णी
                                                                                                                                   अहमदनगर

Tuesday, 5 March 2013

श्रीसंत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्‍साहात साजरा



·       श्री.गजानन विजय ग्रंथावर आधारित प्रश्‍नमंजुषाचे आयोजन
·       प्रश्‍न मंजुषामध्‍ये 1200 विद्यार्थी व 300 भक्‍तांचा  सहभाग
वर्धाः- दि.5- लहानुजी नगर येथील माणकीकर यांचे श्रीसंत गजानन महाराज मंदीर येथे संत श्री. गजानन महाराज यांचा 135 वा प्रगटदिन उत्‍सव मोठ्या उत्‍साहकपूर्ण वातावरणात साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍त  उत्‍सव स‍मिती तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले.
श्री.संत गजानन महाराज मंदिरात 22 फेब्रुवारीपासून प्रगटदिन महोत्‍सवाला प्रारंभ करण्‍यात आला. महाराजांच्‍या प्रगटदिनी रविवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 7.30 ते 9.30 पर्यन्‍त सुधाकर अजंटीवाले यांचे मार्गदर्शनाखाली आवर्तने व सामुहिक अथर्वशिर्ष पठनाने महाराजांच्‍या मुर्तीवर अभिषेक करण्‍यात आला.सकाळी 10 ते 10.30 पर्यन्‍त  महंत अंबिका भारती यांचे हस्‍ते गणेश याग यज्ञ स्‍वाहाकार व यज्ञाची पुर्णाहूती संपन्‍न झाली.11.30 ते दुपारी 1 पर्यंत यवतमाळ ह.भ.प.सौ.उमाताई पुल्‍लीवार ह्यांचे काल्‍याचे किर्तन  होवून  महाआरती करण्‍यात  आली. व महाप्रसादालाला सुरवात झाली. सायंकाळी 7 वाजता अभंग व भक्‍ती गीतांचा सुश्राव्‍य  भरगच्च  कार्यक्रमाने  महोत्‍सव  कार्यक्रमाची सांगता झाली.
 यावेळी समितीतर्फे नवीन उपक्रम म्‍हणजे श्री.गजानन विजय या ग्रंथावर आधारित प्रश्‍नमंजुषा घेण्‍यात आली. यामध्‍ये  विद्यार्थी गटात विविध शाळामधून 1200 विद्यार्थ्‍यां सहभागी झाले. व खुल्‍या गटामध्‍ये  300 भक्‍तांनी भाग घेतला होता. यात विद्यार्थी गटात कु.स्‍नेहा  जोशी, प्रणम्‍य  टोळ व शो झाडे हे अनुक्रमे प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक घेवून विजयी झाले तर खुल्‍या गटात सौ. पल्‍लवी वखरे,सौ. सुलक्षणा देशमुख व शुभांगी  पाच्‍छाव  ह्या  परीक्ष्‍यार्थनी अनुक्रमे प्रथम ,व्दितीय व तृतीय क्रमांक घेवून विजयी झाल्‍या.
1 मार्च रोजी प्रश्‍नमंजुषा उपक्रमातील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बोपापूर येथील श्री.अंबिका भक्‍तीधामाच्‍या  महंत प.पु. अंबिका भारती यांच्‍या  अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आला. कार्यक्रमाला श्री.परमानंदजी तापडीया,प्रा. प्रशांतराव बोकारे, सुधाकर अजंटीवाले प्रा. लतिका नायगावकर,सुभाष राठी प्रमुख पाहुने म्‍हणून  उपस्थित हाते.यावेळी  सरस्‍वती व भरतज्ञान मंदिर विद्यालयाच्‍या  विद्यार्थी व शिक्षकांनी सामुहिक गणपती अथर्वशिर्षाचे सहस्‍त्रवर्तनाचे सामुहिक पठण केले. नंतर प्रश्‍नमंजुषा उपक्रमातील विजयी स्‍पर्धकांना मान्‍यवरांचे हस्‍ते बक्षिसे प्रदान करण्‍यात आली. सोबतच प्रश्‍नमंजुषा  परिक्षा मंडळ व समिती सदस्‍यांचा  स्‍मृतिचिन्‍ह देवून मान्‍यवरांचे हस्‍ते सत्‍कार  करण्‍यात आला. समितीतर्फे प्रश्‍नमंजुषा परीक्षा प्राप्‍त शुल्‍क रु.9335/- श्री.अनिल माणकीकर यांना उत्‍सवासाठी सुपूर्द करण्‍यात आले.
      महोत्‍सवात 22 ते 24 फेब्रुवारी दरम्‍यान दररोज सकाळी  9.3. ते 11.30 यावेळेत श्री.गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायणाचे आयोजन करण्‍यात आले.या पारायणाचा  72 स्‍त्री-पुरुष भक्‍तानी  लाभ घेतला. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्‍यान चिन्‍मय  मिशनच्‍या  आचार्य स्‍वामिनी मंगलानंदा यांच्‍या प्रवचनांनी श्रीमत भागवत ज्ञान सप्‍ताह संपन्‍न झाला. संहिता वाचन ललिता नायगांवकर ह्यांनी  केले.  
     महोत्‍सवाचे आयोजन अनिल माणकीकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली संपन्‍न झाला. आसोलकर,नंदुभाऊ कुळकर्णी,प्रशांत दातार,विठ्ठलराव व्‍यवहारे,मुकूंद क्षिरसागर,सुभाष खंगण,अनिल व शरद देशपांडे,राम वखरे,देशमुख,बेडेकर प्रामुख्‍याने माणकीकर परिवारांनी व सर्व भक्‍तांनी  अथक परिश्रमाने सहभाग घेतला.
00000

Sunday, 24 February 2013

मृतक परिवाराच्‍या वारसदारांना एक लाखाचे सानुग्रह अनुदान -पालकमंत्री


वर्धा दि.14- वर्धा जिल्‍ह्यात काल संध्‍याकाळी वादळी वारे व पाऊसाने थैमान घातले होते.यामध्‍ये वर्धा तालुक्‍यातील बोरगांव (मेघे) येथे राहणारा राजेंद्र ठाकरे वय 50 वर्षे या इसमावर झाड कोसळून तर  वायफड येथे राहणारा वेदांत ढोंबरे वय 6 वर्षे यांचा भींत कोसळून दुदैवी  मृत्‍यू झाला. या मृतक परिवारांच्‍या वारसदारांना प्रत्‍येकी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान तातडीने प्रदान करावे असे निर्देश वित्‍त व नियोजन राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिले.
          वायगांव निपाणी व वायफड येथे नैसर्गीक आपत्‍तीमुळे मृत्‍यू झालेल्‍यांच्‍या परिवारांचे मंत्रीमहोदयांनी त्‍यांचे घरी जावून सात्‍वन केले. यावेळी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना,अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,निवासी उपजिलहाधिकारी  सुनिल गाडे,उपजिल्‍हाधिकारी  बी.एस.मेश्राम, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी उमेश काळे,आर्वी उपविभागीय अधिकारी सुनिल कोरर्डे,वर्धा तहसीलदार, माजी नगराध्‍यक्ष शेखर शेंडे,माजी गृहरक्षकदल अधिकारी प्रविण हिवरे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
          जिल्‍ह्यात वादळी पाऊस  व गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार तीन हजार 650 हेक्‍टर क्षेत्रातील गहू, हरभरा व संत्रा  पिकांचे नुकसान  झाले  असून   त्‍यामध्‍ये आर्वी व कारंजा तालुक्‍यातील पिकांचा समावेश नाही असे सांगून पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की, सर्वात जास्‍त गाराचा पाऊस समुद्रपूर तालुक्‍यात झाला आहे.या तालुक्‍यातील शेतक-यांना शासकीय नियमानुसार शेतीच्‍या पिकांचे नुकसान भरपाई शासन देईल.वर्धा तालुक्‍यातील 20 गावातील 41 घरांचे अंशतः 9 घरांचे पूर्णतः अंदाजे 3.25 लाखाचे नुकसान झाले आहे. 94 गावातील 452 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान 50 टक्‍याचे आत झाले आहे.   
          समुद्रपूर तालुक्‍यातील गापपीटीमुळे 17 गावे बाधित झाले असून 270.20 हेक्‍टर आर शेती  क्षेत्राचे नुकसान झाले आहे.यामध्‍ये 498 शेतकरी बाधित झाले आहे. 50 टक्‍याचे आतील 265.20 हेक्‍टर आर क्षेत्र व 50 टक्‍याचे वर 5 हेक्‍टर आरक्षेत्र हिरडी या मौजातील आहे. 22 घराचे अंशतः नुकसान झाले असून नुकसानीचा प्राथमिक अंदाज 15 हजार रुपये एवढा आहे. शासनाच्‍या निकषानुसार आपत्‍तीग्रस्‍तांना सहायता निधी दिली जाणार आहे.
                                                     
          वादळी पावसामुळे ज्‍या गावामध्‍ये विद्युत सेवा खंडीत झाली असेल अशा गावांना आजच विद्युत सेवा प्रदान करावी काही तांत्रीक कारणाने विद्युत सेवा पूर्ववत करण्‍यासाठी अडचणी असल्‍यास त्‍या गावातील विद्युत सेवा इतर गावांच्‍या फिडरवरुन घेवून विद्युतसेवा पूर्ववत करण्‍याच्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या. ज्‍याचा घरचा कर्ता पुरुष गेला असेल अशा कुटूंबांना संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरुन घेण्‍यात यावे. तसेच ते अर्ज तातडीने मंजुर करण्‍यात यावे. नैसर्गीक आपत्‍ती ग्रस्‍तांना शासकीय मदत तातडीने प्रशासनाने पूरविण्‍यात यावी असे निर्देश देवून वादळी पावसामुळे पाच व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाल्‍या असून त्‍यांना  रुग्‍णालयात दाखल केले आहे.त्‍यांच्‍यावर  औषोधोपचार करणे सुरु असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
          यावेळी जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य, संबंधित गावातील सरपंच, पदाधिकारी अधिकारी मोठ्या संखेत उपस्थित होते.
00000

Thursday, 21 February 2013


    दुर्मिळ  पिवळा पळस बहारला.....

          पळसाच्‍या   लाल,नारंगी  फुलांनी  वसंत ऋतूत फुलल्‍यानंतर  संपूर्ण  जंगल  लाल रंगाने  बहारुन  जाते.  पळस फुलांनी  बहारलेल्‍या  जंगलाला         ` फ्लेम ऑफ  फॉरेस्‍ट `  अशी  उपमा इंग्रजांनी  दिली आहे.  पळसाच्‍या  लाल, नारंगी फुलांच्‍या  प्रदेशात  दुर्मिळ अशा पिवळ्या  रंगाच्‍या बहारलेला   पळसवृक्ष  नागपूर-वर्धा  जिल्‍ह्याच्‍या  सिमेवरील जंगलात  बहारलेला  आहे. पिवळा पळस  क्‍वचितच  पहायला  मिळतो. वसंत ऋतूत   फुललेल्‍या   पळसाचे  झाड सर्वांचेच लक्ष  वेधून घेते.


          पळसाला  जसा  आकार नाही, तसाच त्‍याच्‍या  सुंदर रंगांना गंधही  नाही.  परंतू    फुललेला  पळस सर्वांनाच  आवडतो. कारण  पळस फुलला  की, संपूर्ण  जंगल लाल रंगांनी    न्‍हाऊन  निघते. आणि पळसाच्‍या  फुलातील  मध वेचण्‍याकरीता  पळस  मैनेसह  असंख्‍य  पक्षी  झाडावर येतात. वसंत पंचमीला पळसाच्‍या फुलांच्‍या  रंगालाही  विशेष  महत्‍व  आहे.
          लाल, नारंगी  रंगाचा पळस  सर्वत्र आढळतो परंतू  पिवळा  आणि  पांढरा पळस  हा  दूर्मिळ  असतो. नवेगावबांधच्‍या  जंगलात पांढरा  पळस प्रत्‍यक्ष  पाहिल्‍याचं  सुप्रसिध्‍द  निसर्ग  लेखक  व पक्षीतज्ञ  मारुती  चितमपल्‍ली   यांनी  सांगितले. पिवळा  पळस  सुध्‍दा  विदर्भातील  अगदी  मोजक्‍याच  ठिकाणी  आढळून  येतो . काळ्या  रंगाचा पळस सुध्‍दा   मध्‍य प्रदेशातील   शिवनीच्‍या  जंगलात असल्‍याचं   श्री.जोग  यांनी  बस्‍तरच्‍या   प्रवासात  सांगितले होतं.
          पिवळ्या पळसाबद्दल अद्यापपर्यंत  संशोधन झाले नाही. लाल, नारंगी, फुलांबद्दल  व त्‍याच्‍या  गुणधर्माबद्दल  आर्युवेदामध्‍ये   अभ्‍यास  झालेला आहे. पिवळ्या  व पांढ-या  पळसाच्‍या   झाडांचं संवर्धन   तसेच  संशोधनही  अत्‍यंत  आवश्‍यक   असल्‍याचे   मारुती  चितमपल्‍ली   यांनी सांगितलं. परंतू  40 वर्षे जंगलात राहून, प्रत्‍येक  वृक्षाचं  तसेच  निसर्गाचं  अभ्‍यास   करुन  संशोधन केलं. परंतू  झालेल्‍या  संशोधना नंतर  नवीन  संशोधन  होत नाही. त्‍यामुळे   तरुण  पिढीला  समृध्‍द   निर्सगाची  माहिती  होण्‍यासाठी   मोठ्या  प्रमाणात  संशोधनाची  आवश्‍यकताही  त्‍यांनी  व्‍यक्‍त  केली.
          पिवळा  व पांढरा  पळस  संवर्धन   करताना  त्‍याच्‍या   बियापासून   पिवळा  पळसच  निर्माण  होईल याची  शाश्‍वती  नसल्‍यामुळे  गुटी  कलमाव्‍दारे  या दुर्मिळ   वृक्षवल्‍लीचे  संशोधन व्‍हावे,अशी  मनोमन  इच्‍छाही  त्‍यांनी  व्‍यक्‍त  केली.
          पांढरा व पिवळा  पळस  संपूर्ण  जंगलात  क्‍वचीत  आढळतो. त्‍यामुळे  उत्‍सुकतेपोटी   त्‍या  झाडाची  मुळापासून  तोडणी   होते. संपूर्ण  जगात  केवळ  भारतातच  पळस  आढळतो. हिमालय  अथवा  राजस्‍थानच्‍या  वाळवंटात  पळस  आढळत  नाही. वसंत  ऋतूमध्‍ये  पळस फुलल्‍यानंतर  संपूर्ण  जंगल  लाल  रंगात  न्‍हाऊन   निघते. धुलीवंदनामध्‍ये   पळसाच्‍या  फुलांचाच   रंगाचा  वापर  होत होता.  त्‍यामुळे   शरीरालाही   हा रंग  पोषक  होता. पळसाच्‍या  झाडापासून  लाख  मोठ्या  प्रमाणात   येत  असल्‍यामुळे   शेतकरी   आपल्‍या  बांधावर  पळसाच्‍या  झाडाचे  संवर्धन  करतात.  पळसापासून मिळणा-या  बिया, फुले, पाने, यामध्‍ये  औषधी गुणधर्म  असल्‍यामुळे   त्‍याचा वापरही  औषधी  गुणधर्म  म्‍हणून   मोठ्या  प्रमाणात   करण्‍यात येतो.
          वर्धाच्‍या  जंगलात  आढळलेल्‍या   दुर्मिळ  पिवळ्या पळसाच्‍या  झाडाचे  संवर्धन  करण्‍यासाठी   सामाजिक   वनीकरण   विभागाचे उपसंचालक  प्रविनकुमार बडगे  यांनी  पुढाकार घेतला  आहे. मारुती   चितमपल्‍ली   यांनी   सुचविलेल्‍या   गुटी  कलमाव्‍दारे  पिवळ्या झाडांच्‍या  संवर्धनासाठी  शासकीय  नर्सरीमध्‍ये  विशेष प्रयत्‍न   सुरु आहेत. बिया पासून  पळसाच्‍या  झाडाला  25 ते 30 वर्षापर्यंतही  फुले  आलेले नाहीत.  परंतु   गुटी  कलमाव्‍दारे  अल्‍पावधीत  पळस  बहरु  शकतो.
          पळसाची  लाल,नारंगी  फुलं पोपटाच्‍या  चोचीसारखी  दिसतात.संपूर्ण  विदर्भातील जंगलात पळसाच्‍या   झाडाखाली पळसाच्‍या  फुलांचा सडा  पहायला  मिळतो.  तसेच  पळसाचा  संपूर्ण  झाड  सुध्‍दा  लाल  रंगाने न्‍हाऊन   निघालेल्‍या  असून,  सुध्‍दा  आपण  मुद्दाम   फुलोरा  पहायला  जात नाही.
             अनिल गडेकर
            9890157788
000000

Tuesday, 19 February 2013

ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्‍य सेवा देणार - जि.प.अध्‍यक्ष


वर्धा दि.19- बदलत्‍या वातावरणामुळे ग्रामीण क्षेत्रात अनेक आजार लोकांमध्‍ये आढळून येत असतात गाव निरोगी रहावे यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये स्‍वच्‍छता पाळणे गरजेचे असून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र यापुढे सर्व सुविधेने सुसज्‍ज करण्‍याचा प्रयत्‍न राहणार आहे.वैद्यकीय अधिका-यांचे रिक्‍त पदे तसेच आरोग्‍य संस्‍थेचे इतर पदे भरण्‍यावर भर राहणार असून ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्‍य सेवा देण्‍याचा प्रयत्‍न असेल अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी दिली.
समुद्रपूर तालुक्‍यातील मांडगाव या गावामध्‍ये जिल्‍हा नियोजन समितीच्‍या निधीमधून 3 कोटी 71 लक्ष रुपये खर्च करुण बांधण्‍यात येणा-या  नविन प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या इमारतीच्‍या बांधकामाचे  भुमिपूजन त्‍यांच्‍या हस्‍ते झाले त्‍यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, जि.प. शिक्षण व आरोग्‍य सभापती प्रा. उषाकिरण थुटे,पंचायत समिती समुद्रपूरच्‍या सभापती नंदाताई साबळे,उपसभापती संध्‍याताई डांगरी, वर्धा पंचायत समितीचे उपसभापती संदेश किटे, सरपंच अर्चनाताई घुसे जि.प.सदस्‍य संगिताताई उईके, आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
          बदलत्‍या काळानुसार ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आरोग्‍य यंत्रणा अद्यावत करण्‍याचा प्रयत्‍न असलयाचे सांगून जि.प.अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राची इमारत जिर्ण अवस्‍थेत असल्‍यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम करण्‍याचा प्रस्‍ताव आरोग्‍य विभागाने सादर केला. या इमारतीमध्‍ये आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍यात येतील. येत्‍या 9 महिन्‍याच्‍या आत या इमारतीचे बांधकाम करण्‍यात येईल. असा विश्‍वास व्‍यक्‍त करुण ढगे म्‍हणाले की, जिल्‍हा नियोजन समितीच्‍या निधीमधून यावर्षी 71 लक्ष रुपये उपलब्‍ध करुण देण्‍यात आले आहे. उर्वरित 3 कोटी रुपये येणा-या आर्थीक वर्षात उपलब्‍ध होतील जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्‍य सुदृढ रहावे यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार असून गरोदर महिलांनी त्‍यांचे बाळंतपण प्राथमीक आरोग्‍य केंद्र किंवा शासकीय संस्‍थेत करावे असे आवाहन त्‍यांनी केले.
                                                                                                                                                  
          याप्रसंगी बोलतांना सभापती थुटे म्‍हणाल्‍या की, जनतेच्‍या आरोग्‍याकडे लक्ष ठेवून आरोग्‍य विभागाने वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.सुदृढ गाव,सुदृढ जिल्‍हा व सुदृढ महाराष्‍ट्र  असला पाहिजे अशी भावनाही त्‍यांनी यावेळी बोलून दाखविली.
यावेळी बोलतांना जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी चन्‍ने म्‍हणाले की जिल्‍ह्यातून कुपोषण आजार हद्दपार करण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशिल असून नागरिकांनीसुध्‍दा या कार्यात सहकार्य करावे. शून्‍य ते सहावर्ष वयोगटापर्यंतच्‍या  मुलांच्‍या आरोग्‍याकडे लक्ष देण्‍यात यावे. बाळ पोटात असल्‍यास मातेने योग्‍य प्रमाणात व सुतुलीत आहार घ्‍यावा आपले बाळ कुपोषित होणार नाही याची दक्षता संबंधित कुटूंबांनी घ्‍यावी. राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमात महाराष्‍ट्रामध्‍ये वर्धा जिल्‍हा आघाडीवर असून अनेक कार्यक्रमामध्‍ये आतापर्यंतच्‍या सर्वेक्षणात अव्‍वल आहे. आरोग्‍य सेवा बळकट करण्‍यासाठी वैद्यकीय अधिका-यांचे रिक्‍तपदे भरण्‍याची कार्यवाही सुरु असून गुनात्‍मक व दर्जेदार आरोग्‍य सेवा देण्‍याचा मानस असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          प्रास्‍ताविक  करतांना डॉ. दिलीप  माने  म्‍हणाले की, आरोग्‍य   विभागाच्‍या आराखड्यानुसार जिल्‍ह्यात 5 नवीन प्राथमिक आरोग्‍य केंद्र व 7 उपकेंद्र मंजुर झालेले आहे.वर्धा जिल्‍ह्याने नेत्रदिपक प्रगती साधली असून महाराष्‍ट्रात वर्धा जिल्‍हा शासनाच्‍या कार्यक्रमामध्‍ये आघाडीवर असून ही गुणाक्रमे ठरलेली आघाडी सतत कायम राहील यासाठी आरोग्‍य यंत्रणेचे प्रयत्‍न सुरु आहे.  पुढील वर्षाच्‍या जिल्‍हा नियोजन समितीच्‍या अनुदानातून ई.सी.जी. यंत्र घेण्‍यात येणार असून ग्रामीण भागातील ह्रृदय रुग्‍णांनाया यंत्राचा  मोठा दिलासा मिळू शकेल असेही ते म्‍हणाले.
          यावेळी डॉ.पोहाने यांनी सुध्‍दा आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचलन विजय कुंभलकर व आभार डॉ. शंभरकर यांनी मानले.यावेळी समुद्रपूर पंचायत समितीचे संवर्ग प्रकल्‍प अधिकारी एन.के.भांडारकर यांचेसह पं.स.व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,सदस्‍य,अधिकारी व ग्रामस्‍थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
                                                    0000

Sunday, 10 February 2013

सेवाग्राम आश्रमाला संपूर्ण मदत -आर.आर.पाटील


                                       सेवाग्राम येथील विविध प्रकल्‍पांची पाहणी
                           महात्‍मा गांधींचे विचार जगाला मार्गदर्शक 
वर्धा दि.10- सेवाग्राम येथील महात्‍मा गांधी आश्रम परिसराच्‍या संवर्धनासाठी तसेच त्‍यांच्‍या कार्याचा व गांधी विचारांचा प्रसार करण्‍यासाठी आवश्‍यक संपूर्ण मदत देण्‍याची ग्‍वाही गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज सेवाग्राम आश्रमाला भेटी प्रसंगी दिली.
          सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष अॅड. मा.म. गडकरी यांनी गृहमंत्र्यांचे सुतकताईच्‍या हाराने स्‍वागत केले तसेच सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे सुरु असलेल्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी आमदार सुरेश देशमुख त्‍यांच्‍या समवेत उपस्थित होते.
          गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी महात्‍मा गांधी सर्वप्रथम सेवाग्राम येथे आले त्‍यावेळी ज्‍या विहीरीजवळ पहिल्‍यांदा मुक्‍काम केला त्‍याची पाहणी केली. तसेच सेवाग्राम येथील ऐतिहासीक भाषण अस्‍पृश्‍यता संपूर्णपणे दूर व्‍हावी याविचारांचा संदेश आदर्श गावके एकादश सिधांत ग्राम स्‍वाराज्‍य आदर्श गावाची संकल्‍पना आश्रम परिसरात सुरु असलेले गोपालन बेलापासून तयार करण्‍यात येणारे उत्‍पादन आदि बाबतही संपूर्ण माहिती घेतली.
          महात्‍मा गांधी यांची दिनचर्या काय होती  याबाबत अॅड. मा.म. गडकरी,सुमनताई पांडे, यांचेकडून संपूर्ण माहिती घेतली व आश्रम परिसरात दररोज होणा-या प्रार्थनेबाबतही चौकशी केली.तसेच  सर्वधर्म प्राथनेतही सहभागी झाले.
          यावेळी आदिनिवास,बा कुटी, आखिरी निवास,बापू कुटी, गांधीजी का दप्‍तर  या वास्‍तुंची पाहणी केली. बापूकुटी मधील मिराबेन यांनी काढलेले भिंतीवरील चित्रांचीही माहिती घेतली. सेवाग्राम आश्रमासाठी केंद्र व राज्‍य शासनाकडून आवश्‍यक मदत देण्‍यासंदर्भातही गृहमंत्र्यांनी आश्रम प्रतिष्‍ठानच्‍या पदाधिका-यासोबत चर्चा केली. यावेळी त्‍यांनी गांधीजींच्‍या जीवनावरील विविध पुस्‍तकांचीही खरेदी केली.
         
यावेळी सुनिल राऊत,माजी आमदार राजू तिमांडे, समीर देशमुखृ, शशांक घोडमारे, दादाराव खैरकर यांच्‍या सह  सेवाग्राम येथील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
0000

जेष्‍ठ गांधीवादी प्रा. ठाकूरदास बंग आयुष्‍यभर निरामय जीवण जगले - आर.आर.पाटील


                                             बंग कुटूंबियांचे गृहमंत्र्याकडून सांत्‍वन
             वर्धा दि.10- जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत प्रा.ठाकूरदास बंग यांनी आयुष्‍यभर गांधी विचाराला वाहून घेतानांच समाजसेवेच्‍या माध्‍यमातून निरामय जीवन जगले अशा भावना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज चेतना विकास संस्‍थेच्‍या परिसरातील निवास्‍थानी श्रीमती सुमन बंग यांची भेट घेवून त्‍यांचे सांत्‍वन केले.  त्‍याप्रसंगी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.
          जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत प्रा. ठाकुरदास बंग यांचे नुकतेच अलोडी येथील अशोक बंग यांच्‍या निवास्‍थानी निधन झाले. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सकाळी बंग कुटूंबियांचे सांत्‍वन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या निवास्‍थानी भेट दिली.स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या फोटोस गुलाबपुष्‍प अर्पण करुन आपली भावपूर्ण आदरांजली वाहिली.
 महात्‍मा गांधी यांचे विचार पुढे नेण्‍यामध्‍ये स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांचे महत्‍वाचे योगदान असून संपूर्ण आयुष्‍य समाजसेवेसाठी त्‍यांनी वाहिले असल्‍याची भावनाही यावेळी व्‍यक्‍त केली.
         स्‍वातंत्र्य चळवळी मध्‍ये सक्रीय सहभाग घेतांना आचार्य विनोबा भावे यांच्‍या भुदान चळवळीसोबत सर्वोदय कार्यासाठी  आपले जीवन वाहिले होते. संपूर्ण क्रांती आंदोलन,स्‍वातंत्र्य आंदोलन यामध्‍ये त्‍यांचा सक्रीय सहभाग होता.
        स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या पत्‍नी सुमनताई बंग यांचे आशिर्वाद घेतल्‍यानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मृत्‍यूपूर्वी त्‍यांच्‍या प्रकृती स्‍वास्‍थाची माहिती घेतली. तब्‍बल पंचवीसवर्षे मधुमेहासारखा आजार असूनही समाजसेवेत कधीही खंडपडू दिला नाही. महिन्‍यापूर्वी पडल्‍यामुळे पायाला फ्याक्‍चर झाले होते त्‍यामुळे त्‍यांची हालचाल बंद झाली होती. शेवटी आठ दिवस बोलने बंद होते आणि झोपेतच त्‍यांचे निधन झाले. आयुष्‍यात कुठलिही इच्‍छा किंवा अपेक्षा त्‍यांची नव्‍हती असे यावेळी अशोक बंग यांनी सांगितले.
        यावेळी डॉ. आकाश बंग श्रीमती निरंजना बंग व संपूर्ण बंग कुटूंबीय उपस्थित होते. आमदार सुरेश देशमुख, सुनिल राऊत आदिनीही स्‍वर्गीय ठाकुरदास बंग यांच्‍या प्रतिमेस गुलापुष्‍प अर्पण करुण आदरांजली वाहिली.
0000