Tuesday, 30 October 2012

पंचायत युवा क्रीडा स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण खेळाडूंना राष्‍ट्रीय स्‍तरावर संधी


                          * जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धामध्‍ये 450 खेळाडूंचा सहभाग
वर्धा दि.30- पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील खेळाडूसाठी   आयोजित जिल्‍हास्‍तरीय विविध क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये 450 विद्यार्थ्‍यांने सहभाग घेतला असून कुस्‍ती, वेठलिप्‍टींग, टायक्‍योदो,फुटबॉल कबड्डी, आदि स्‍पर्धामधून आपले नैपूण्‍य सिध्‍द केले.
            वर्धा जिल्‍हा स्‍टेडियमवर जिल्‍हा स्‍तरीय पायका स्‍पर्धांचा शुभारंभ झाला.या स्‍पर्धांमध्‍ये आठ तालुक्‍यातून ग्रामीण भागातील विविध शाळातील 450 खेळाडू सहभागी झाले आहेत. क्रीडा स्‍पर्धांचे उदघाटन जिल्‍हा माहिती अधिकारी, अनिल गडेकर यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍य यॅथेलॅटिक्‍स असोशिएशनचे अध्‍यक्ष रमेश कटे, वर्धा जिलहा कुस्‍तीगीर परिषदेचे चंद्रशेखर महाजन, पायकांदो असोशिएशनचे अध्‍यक्ष उल्‍हास वाघ ,जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटेय उपस्थित होते.
            ग्रामीण भागात प्राथमिक स्‍वरुपाच्‍या क्रीडा सुविधा निर्माण करुण ग्रामीण युवकांना विविध खेळांच्‍या माध्‍यमातून राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरापर्यंतच्‍या स्‍पर्धामध्‍ये संधी उपलब्‍ध करुण देण्‍यासाठी पायका मार्फत ग्रामीण,तालुका व जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धांचा लाभ ग्रामीण खेळाडूंना उपलब्‍ध होत असल्‍याचे सांगतांना उदघाटनपर भाषणात जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी अभ्‍यासासोबतच क्रीडास्‍पर्धांमध्‍येही हिरेरीने भाग घेवून आपले नैपुण्‍य सिध्‍द करावे असे सांगितले.
            पायका क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये मुलांपेक्षा मुलींचा सहभाग लक्षणिय असून वर्धा जिल्‍हा विविध क्रीडा प्रकारामध्‍ये राज्‍यस्‍तरावर उल्‍लेखनिय योगदान राहील असा विश्‍वासही अनिल गडेकर यांनी व्‍यक्‍त केला.
            जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी स्‍वागत करुण प्रास्‍ताविक भाषणात पायका जिल्‍हा क्रीडा स्‍पर्धांच्‍या आयोजनाची माहिती दिली. या स्‍पर्धांमध्‍ये पाच क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्‍यात आले असून 16 वर्षाखालील मुले व मुली सहभागी झाली आहे.जिल्‍हा  स्‍तरावर तालुकास्‍तरावरुन निवड झालेल्‍या खेळाडूसाठी स्‍पर्धा घेण्‍यात येत असून सर्व ग्रामपंचायतीने या क्रीडा स्‍पर्धात व उपक्रमात सहभागी व्‍हावे असेही त्‍यांनी सांगितले. दोन गटात आयोजित या स्‍पर्धामध्‍ये पहिल्‍या गटात मैदानी स्‍पर्धा,कुस्‍ती,वेटलिप्‍टींग,तायक्‍योंडो व फुटबॉल या खेळासाठी 16 वर्षाखालील मुला-मुलींचा सहभाग असून दुस-या गटात कबड्डी,खोखो, हॉलीबॉल, धर्नुविद्या,सायकलींग, आदि खेळांचा समावेश आहे.
            कार्यक्रमाचे संचालन चारुदत्‍त नाकट यांनी केले.यावेळी तालुका संयोजक ईश्‍वर वानकर,सुरेश चामचोर, सुधाकर वाघमारे, घनशाम वरारकर, अनिल बोरवार विविध गावांचे सरपंच,ग्रामस्‍थ व खेळाडू आदि उपस्थित होते.
0000
              

धान्‍य हमी योजना आता राष्‍ट्रीयस्‍तरावर -अनिल देशमुख


           *  10 हजार गावांमध्‍ये योजनेची अंमलबजावणी सुरु
                 *  3 महिन्‍याचे धान्‍य एकाचवेळी
                 *  प्रत्‍येक महिन्‍याची 7 तारीख अन्‍न दिवस
वर्धा दि.30- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमार्फत वितरीत करण्‍यात येणारे धान्‍य कार्ड धारकांना थेट गावात उपलब्‍ध करुण देणारा धान्‍य हमी योजना हा  महत्‍वकांक्षी उपक्रम केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात राबविला जाणार असल्‍याची माहिती राज्‍याचे अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
          कार्डधारकांना सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमार्फत वितरीत करण्‍यात येणारे धान्‍य कमी मिळणे तसेच इतर प्रकारच्‍या तक्रारी नेहमी प्राप्‍त होत असल्‍यामुळे धान्‍य हमी योजना हा अभिनव उपक्रम प्रायोजिक तत्‍वावर 400 गावामध्‍ये राबविण्‍यात आला होता या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्‍यामुळे राज्‍यातील 10 हजार गावामध्‍ये धान्‍य हमी योजना राबविण्‍यात आली. आता ही योजना संपूर्ण राज्‍यामध्‍ये राबविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असल्‍याची माहिती अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिली.
          राज्‍य शासन राबवित असलेल्‍या धान्‍य हमी योजनाचे सादरीकरण केंद्रीयमंत्री व संबंधित विभागांच्‍या वरिष्‍ठ अधिका-यासमोर करण्‍यात आले असून या योजनेची उपयुक्‍तता लक्षात घेवून ही योजना संपूर्ण देशात राबविण्‍याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
          सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमार्फत तालुका व ग्रामीण भागातील गोदामापर्यंत धान्‍याची वाहतूक करण्‍यात येते परंतु तालुक्‍यातील गोदामापासून रास्‍तभाव दुकानापर्यंत ची वाहतूक होत असतांना धान्‍य इतर ठिकाणी वळविणे,संपूर्ण धान्‍यसाठा अपेक्षीत ठिकाणी न पोहचणे आदि तक्रारींवर धान्‍य हमी योजना राबविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.
          या योजनेच्‍या कार्उधारकांना 3 महिन्‍याचे  धान्‍य एकाचवेळी वितरीत करणे,प्रत्‍येक महिन्‍याच्‍या 7 तारखेस अन्‍न दिवस पाळणे 8 ते 15 तारखेपर्यंत अन्‍न सप्‍ताह अंतर्गत अन्‍न महामंडळाचे गोदाम ते गावाच्‍या चावडीपर्यंत धान्‍य वाहतूक करणे व चावडीवरच कार्ड धारकांना धान्‍याचे वाटप करणे धान्‍य वाटपाची पूर्ण सूचना म्‍हणून गावातील कमीत कमी 25 व्‍यक्‍तींना एसएमएस करण्‍यासोबतच धान्‍य वातूक करणा-या ट्रकला हिरवा रंग देण्‍याचा निर्णयही घेण्‍यात आला असल्‍याची माहिती अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
0000

निवृत्‍ती वेतन धारकांनी कोषागारात


        वर्धा दि.-30 वर्धा कोषागार कार्यालया अंतर्गत सर्व निवृत्‍ती वेतन व कुटूंब निवृत्‍ती वेतन धारकांनी सन 2012-13  करीता हयातीचे, पुर्नविवाह व पुनर्नियुक्‍ती बाबत प्रमाणपत्र संबंधित बँक शाखा व्‍यवस्‍थापक यांच्‍या स्‍वाक्षरीने माहे 15 नोव्‍हेंबर, 2012 पर्यन्‍त वर्धा कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्‍यक आहे.पुनर्नियुक्‍ती निवृत्‍ती वेतन धारकांनी प्रमाणपत्र स्‍वतंत्र विहित नमून्‍यात भरुन सादर करावे.
   शासन निर्णय दिनांक 18 ऑगष्‍ट,2008 नुसार ज्‍या निवृत्‍ती वेतन, कुटूंब निवृत्‍ती वेतन धारकांचा हयातीचा, पुर्नविवाह व पुनर्नियुक्‍ती बाबत दाखला विहित मुदतीत प्राप्‍त होणार नाही त्‍यांचे मासिक निवृत्‍ती वेतन, कुटूंब निवृत्‍ती वेतन डिसेंबर देय जानेवारी पासून स्‍थगित ठेवले जाईल. त्‍यामुळे सर्व दाखले किंवा प्रमाणपत्र कोषागारास विनाविलंब प्राप्‍त होतील या बाबतची दक्षता घ्‍यावी असे कोषागार अधिकारी वर्धा कळवितात.
0000

एक दिवसीय रोजगार व स्‍वयंरोजगार मेळावा संपन्‍न


        वर्धा दि.30- स्‍थानिक शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र तथा कनिष्‍ठ महाविद्यालय, वर्धा येथे एच.एस.सी.व्‍होकेशनल 11 वी व 12 वी च्‍या विद्यार्थ्‍यांकरीता 18 ऑक्‍टोंबर,2012 रोजी एक दिवसीय रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्‍न झाले.
          कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्ष्‍ण अधिकारी आर.डी.भोयर उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धाचे गणराज यांनी विद्यार्थ्‍यांना रोजगार व स्‍वयंरोजगार तसेच व्‍यक्‍तीमत्‍व विकास याबाबत मार्गदर्शन केले. शिबीरास एकूण 90 विद्यार्थी उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे प्रास्‍तविक व संचालन एस.एस.जगताप ह्यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन व्‍ही.डी.भगत ह्यांनी मानले. कार्यक्रमाकरीता टी.एस.भोयर, सौ.एम.एस.ठाकरे, पी.एन.चवडे, एस.एस.जगताप, पाटणकर,कामडी ह्यांनी मोलाचे सहकार्य केले.
          कार्यक्रमाकरीता संस्‍थेतील वर्ग 11 वी व 12 वी चे ऑटो इंजिनिअरींग टेक्‍नीशियन, मेकॅनिकल टेक्‍नॉलॉजी, मेंन्‍टेनंन्‍स अॅण्‍ड स्‍पेअर्स ऑफ इलेक्टि्कल डोमेस्टिक अप्‍लॉयन्‍सेस या अभ्‍यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.
0000

यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 4 नोव्‍हेबर रोजी


         वर्धा दि. 30- यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍था, वर्धा या संस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 4 नोव्‍हेंबर,2012 रोजी एकनाथ मंदिर काळा मारोती जवळ शिवाजी चौक येथे रविवारी  सकाळी 10 वाजता घेण्‍याचे ठरविले आहे.
          या सभेला सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन यशवंत नागरी सहकारी पतसंस्‍थाचे  प्रशासक डी.एस.रोहणकर यांनी केले आहे.
0000

Monday, 29 October 2012

110 ग्रामपंचायती व 28 ग्रामपंचायतीच्‍या पोट निवडणूका 26 नोव्‍हेंबर रोजी आचार संहिता आजपासून लागू


         वर्धा दि.29- वर्धा जिल्‍ह्यात माहे डिसेंबर,2012 या कालावधीत मुदती संपणा-या ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूकीसाठी आयुक्‍त, राज्‍य निवडणूक आयोग,मुंबई यांचे पत्र दिनांक 29/10/2012 नुसार जाहिर केलेल्‍या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे वर्धा जिल्‍ह्यात 110 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक व 28 ग्रामपंचायतीच्‍या पोट निवडणूका दिनांक 26 नोव्‍हेंबर,2012 रोजी होऊ घातलेल्‍या आहेत.
          सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या संबंधित ग्रामपंचायतीच्‍या संपूर्ण क्षेत्रात व पोट निवडणूका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या संबंधित प्रभागाच्‍या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्‍यात येत आहे. ही आचार संहिता  निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अस्तित्‍वात राहील. व आचारसंहितेचा भंग होणार नाही.याची दक्षता घेण्‍यात यावी असे जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी कळविले आहे.
                                          00000       

विदर्भातील ग्रामीण खेळाडूंनी राष्‍ट्रीय स्‍पर्धांची तयारी करावी - रणजित कांबळे


            *  39 वा विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेतून विदर्भ संघाची निवड
       *  कुमारगट मुलांचे अमरावती तर मुलींमध्‍ये नागपूर जिल्‍हा अजिंक्‍य

           वर्धा दि. 29 - विदर्भातील ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्‍ट्रीय स्‍पर्धासाठी तयार करण्‍यासाठी प्रत्‍येक तालुका स्‍तरावर आवश्‍यक सुविधा निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने संपूर्ण सहकार्य करण्‍यात येईल अशी ग्‍वाही राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम,पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिली.
          पुलगाव येथे आयोजित 39 व्‍या विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धाच्‍या उदघाटन  समारंभाप्रसंगी राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्‍छा देवून राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर आपल्‍या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करुन प्रतिनिधीत्‍व करा असेही त्‍यांनी सांगितले.
 स्‍वर्गिय प्रभाताई राव स्‍मृती प्रित्‍यर्थ नगर स्‍पोटींग क्‍लब,पुलगांव-नाचणगाव यांच्‍या वतीने 39 व्‍या विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेचे आयोजन  येथील आर.के. हायस्‍कुलच्‍या प्रांगणात  आयोजित करण्‍यात आले होते.
या स्‍पर्धेत विदर्भातील कुमार गटातील 22 संघांनी सहभाग घेतला. यामध्‍ये मुलांचे 11 तर मुलींच्‍या 11 संघांचा सहभाग होता.उदघाटन समारंभात इंडियन मिलटरी स्‍कूलच्‍या जवानांनी व खेळाडूंनी मानवंदना दिली. स्‍पर्धेचे उदघाटन राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍याहस्‍ते दिप प्रज्‍वलनाने झाले.  कुमारगटातील  यवतमाळ- अमरावती या जिल्‍ह्यातील झालेल्‍या मुलांच्‍या अंतिम सामन्‍यात    अमरावतीच्‍या चमूने अजिंक्‍यपद पटकाविले.तर यवतमाळ व नागपूर जिल्‍ह्यातील झालेल्‍या मुलींच्‍या अंतिम सामण्‍यात नागपूर विभाग अजिंक्‍य ठरला.
विदर्भस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धेमधून  विदर्भाचा संघ निवडला जाणार असल्‍याचे विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष विलासराव इंगोले यांनी यावेळी सांगितले.
          विदर्भातील ग्रामीण भागातून खेळाडू तयार होऊन तो  राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर भरारी मारुन त्‍या खेळाडूने ऑलंपिकमध्‍ये देशाचे प्रतिनिधीत्‍व करावे,असा संदेश राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्‍यमंत्री रणजीत कांबळे यांनी दिला.
कबड्डी खेळामुळे प्रत्‍येक जण मातीशी जुळतो.कबड्डी हा खेळ कमी खर्चात कमी जागेत उत्‍कृष्‍टरित्‍या   खेळता येतो.प्रत्‍येक खेळ हा खेळाडूंच्‍या भावनेशी निगडीत असून,कबड्डी खेळाकरीता खेळाडूंना प्रोत्‍साहित करण्‍याची गरज राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी व्‍यक्‍त केली.                                       
          सुरवातीला माता सरस्‍वती,हिमाचल प्रदेशच्‍या माजी राज्‍यपाल स्‍व. प्रभा राव यांच्‍या प्रतीमेचे पूजन व माल्‍यार्पण करण्‍यात आले. त्‍यानंतर तीन दिवसीय कबड्डी स्‍पर्धेचे उद्घाटन  करण्‍यात आले. शनिवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत मुलींच्‍या गटाचे तर मुलांच्‍या गटाचे प्रत्‍येकी तीन असे  6 सामने खेळविण्‍यात आले.
         जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा  श्रीमती चारुताई राव टोकस यांनी अध्‍यक्षीय भाषणात विदर्भस्‍तरीय स्‍पर्धेच्‍या आयोजनासाठी संपूर्ण मदत करण्‍यात येईल व स्‍पर्धकांना प्रोत्‍साहनासाठी सदैव तत्‍पर असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.     जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे, श्रीमती चारुताई राव टोकस,वर्धा जिल्‍हा कॉग्रेस कमेटीचे अध्‍यक्ष किरणभाऊ उरकांदे यांच्‍या हस्‍ते विजयी संघांना बक्षिस देण्‍यात आले.
यावेळी विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष विलासराव इंगोले, सचिव, सुभाष पिसे,पुलगांव नगर परिषदेचे अध्‍यक्ष भगवानसिंग ठाकूर,उपाध्‍यक्ष,सुनिल ब्राम्‍हणकर, राजूभाऊ कोचर, रमेश सावरकर,आर.के. महाविद्यालयाचे बालकिसन टिबडीवाल,नाचणगावचे सरपंच शेकर राऊत विदर्भ कबड्डी असोसिएशन चेआयोजक आर.एस.साहू तसेच विदर्भातील क्रीडाप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होती.  
000