Tuesday, 2 October 2012

अंतरराष्‍ट्रीय अहिंसा दिवस निमित्‍त पदयात्रेचे आयोजन


  वर्धा दि.2- राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या जयंती दिनी जागतिक अहिंसा दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी सामाजिक व शैक्षणिक संघटनांच्‍या सहकार्याने महात्‍मा गांधी पुतळा ते सेवाग्राम येथील आश्रमापर्यंत पदयात्रा काढण्‍यात आली.
          शांती एकता व कृतीशील नागरिकांची चळवळ निर्माण करणे हा मुख्‍य हेतू पदयात्रेच्‍या आयोजनाचा आहे. नेहरु युवा केंद्रातर्फे पदयात्रा काढण्‍यात आली होती.
          महात्‍मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्‍या ह्या पदयात्रेत ज्‍येष्‍ठ नागरिक,स्‍वतंत्रा संग्राम सैनिक,विविध संघटनांचे पदाधिकारी व तरुण-तरुणी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
या पदयात्रोच्‍या आयोजनात गांधी विचार परिषद,नेहरु युवा केंद्र,वर्धा होमगार्डस्, निसर्ग सेवा समिती,लॉयन्‍स क्‍लब, गायत्री परिवार,प्रजापती ब्रम्‍हकुमारी,शिक्षा मंडळ,महिलाश्रम, प्रहार समाज जागृती संस्‍था,राष्‍ट्रीय सेवा योजना गो.से.वाणिज्‍य महाविद्यालय, प्रियदर्शनी महिला विद्यालय, एन.सी.सी. कॅडेट्स मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
सेवाग्राम आश्रमात बापुकूटी परिसरात संमेलन आयोजित करुन ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्‍यात आला. ह्यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय,पवनार आश्रमाचे गौतमभाई बजाज, अरुण लेले,नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा  युवा समन्‍वयक संजय माटे,लॉयन्‍स क्‍लबचे नरेडी, होमगार्डचे मोहन गुजरकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलेखोडे,एन.एस.एस.चे जिल्‍हा समन्‍वयक रफीक शेख आदि प्रामुख्‍याने उपस्थित होते.
00000
          

गांधीजींचे विचार आजही प्रेरणादायी -राजेंद्र मुळक


                 * गांधीजयंती निमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन
           वर्धा दि. 2-  महात्‍मा गांधी यांनी भारताला स्‍वातंत्र्य मिळून देण्‍यासाठी सुरु केलेल्‍या चळवळीचे मुख्‍य केंद्र सेवाग्राम असून गांधीजींचे  विचार आजही जगाला प्रेरणा देणारे असून युवा पिढीने गांधीजींच्‍या आदर्शाचे पालन करण्‍याची आवशकता असल्‍याचे प्रतिपादन राज्‍याचे अर्थ व नियोजन राज्‍यमंत्री तसेच वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी आज सेवाग्राम येथील बापू कुटी परिसरात सर्वधर्म सामुहिक प्रार्थना सभेत केले.
             सेवाग्राम येथील बापू कुटी व आश्रम परिसरात गांधी जयंती निमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी सर्वधर्म प्रार्थनाही आयोजित करण्‍यात आली होती. वैष्‍णव जनते....  या महात्‍मा गांधींच्‍या  भजनाने गांधी जयंतीच्‍या कार्यक्रमाचे सुरुवात झाली.  
            पालकमंत्री राजेंद्र मुळक, पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता राज्‍यमंत्री रणजीत कांबळे,महाराष्‍ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्‍यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, आदिंनी बापू कुटीस भेट देवून महात्‍मा गांधी यांच्‍या स्‍मृतीस अभिवादन केले.तसेच त्‍यांच्‍या स्‍मृतीपुढे नतमस्‍तक झाले.
            यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे  अध्‍यक्ष मा.म. गडकरी यांनी  स्‍वागत करुन सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आयोजित प्रार्थनेमध्‍येसुध्‍दा पालकमंत्र्यासह सर्व प्रमुख पाहुने सहभागी झाले होते. वैष्‍णव जनते....  हे भजन सामुहिकपणे गायण्‍यात आले.
            गांधीजींच्‍या विचारानेच देशाचा विकास शक्‍य आहे तसेच बंधुभाव प्रेम व एकता  वृध्‍दीगत व्‍हावी यासाठी गांधीजयंती दिनी सर्वांनी प्रार्थना करावी असे आवाहनही पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले.
            गांधीजींनी खेड्याकडे चला हा संदेश सेवाग्राम येथूनच दिला आहे ग्रामीण जनतेच्‍या सर्वांगिण विकासाठी रचनात्‍मक कार्याची सुरवातही वर्धेपासून सुरु झाली यामध्‍ये खादी उत्‍पादन, ग्रामोद्योग,नईतालीम,कृष्‍टरोग्‍यांची सेवा आदि महत्‍वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.त्‍यामुळे गांधीजींच्‍या विचारांचा प्रसार येथून संपूर्ण जगभर होत असल्‍याची भावनाही यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आली.
            यावेळी विविध संघटना व संस्‍थातर्फे महात्‍मागांधी जयंती निमित्‍त प्रभातफेरी,सर्वधर्म प्रार्थना,सुतकमाई, पदयात्रा आदि कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले होते. नेहरु युवा केंद्रातर्फे महात्‍मा गांधी पुतळयापासून प्रभातफेरी सेवाग्राम आश्रमापर्यन्‍त काढण्‍यात आली होती.युवक बिरादरीतर्फे सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.नईतालीमच्‍या विद्यार्थ्‍यांनीही यावेळी विविध कार्यक्रम सादर करुन सर्वधर्म प्रार्थना केली.                                                 
            यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, किरण उरकांदे, शेखर शेंडे, संजय चौपाणे, राजेंद्र शर्मा, प्रविण हिवरे, इकराम हुसेन, संजय कोल्‍हे, नगरसेवक इकबाल,प्रशांत गुजर आदि यावेळी उपस्थित होते.
       गांधींच्‍या पुतळ्यास पुषहार अर्पण  

          पालकमंत्री राजेंद्र मुळक, पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे राज्‍यमंत्री रणजीत कांबळे,महाराष्‍ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्‍यक्ष माणिकराव ठाकरे आदिंनी  सेवाग्राम रोडवरील गांधी चौकातील महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुण अभिवादन केले.तसेच सामुहिक प्रार्थनेतही सहभाग घेतला.
            महात्‍मा गांधी जयंती निमित्‍त सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे बापूकुटी परिसरात आयोजित कार्यक्रमास सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय, पवनास आश्रमचे गौतमभाई बजाज, सेवाग्राम आश्रमाचे श्रीमती कुसूमताई, बिहारच्‍या गांधीवादी लेखिका श्रीमती सुजाता बहन सिंन्‍हा, उषा बहण, नेहरुयुवा केंद्राचे समन्‍वयक संजय माटे आदि सहभागी झाले होते.
                                    हुतात्‍मास्‍मारक परिसरात वृक्षारोपण

       गांधी जयंती निमित्‍त कस्‍तुरबा गांधी स्‍मृति हुतात्‍मा स्‍मारकाच्‍या परिसरात पालकमंत्री राजेंद्र मुळक,पाणी पुरवठा राज्‍यमंत्री रणजीत कांबळे तसेच महाराष्‍ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्‍यक्ष माणिकराव ठाकरे यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले.
            निसर्ग सेवा समितीतर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानंतर हुतात्‍मा स्‍मारकाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच हा परिसर अधिक सुंदर करण्‍यासाठी तसेच हुतात्‍मा स्‍मारकाच्‍या सौंदयीकरणासाठी प्रयत्‍नशिल असल्‍याची माहिती पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
            प्रारंभी निसर्ग सेवासमितीचे प्रमुख मुरलीधर बेलखोडे यांनी स्‍वागत केले. तसेच बाळकृष्‍ण हांडे यांनी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुहिक प्रार्थना म्‍हटली.
00000

Monday, 1 October 2012

पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री प्रा. लक्ष्‍मण ढोबळे यांचा दौरा कार्यक्रम


   वर्धा, दि. 1 -  राज्‍याचे  पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री  प्रा. लक्ष्‍मणराव ढोबळे  हे  वर्धा जिल्‍ह्याचे दौ-यावर येत असून, त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
        दिनांक 3 ऑक्‍टोंबर 2012 रोजी   सकाळी  8 वाजता चंद्रपूर येथून  जाम, सेवाग्राम मार्गे  वर्धाकडे प्रयाण करतील. सकाळी  10 वाजता शासकीय विश्रामगृह वर्धा येथे  आगमन व राखीव.  सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्धा येथील  निर्मल भारत यात्रा  कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता वर्धा  येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे  प्रयाण करतील.
                                                000000

नवीन मतदार नोंदनी कार्यक्रम सुरु 31 ऑक्‍टोंबर पर्यंत नांव नोंदवा - जयश्री भोज


      वर्धा, दिनांक 1 -  नवीन मतदार नोंदणी  व छायाचित्र ओळख पत्र काढण्‍यासाठी  जिल्‍ह्यात  विशेष मोहीम राबविण्‍यात येत असून, नवीन मतदार नोंदणी साठी    31 ऑक्‍टोंबर पर्यंत   संबधित मतदार  नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात  विहीत नमुन्‍यात अर्ज सादर करण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री  भोज यांनी केले आहे.
       नवीन  मतदार नोंदणी  व छायाचित्र ओळख पत्रासाठी  उपविभागीय अधिकारी आवी, हिंगणघाट व वर्धा यांचे कार्यालयात विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असून,  मतदारांनी   नाव नोंदणीसाठी व छायाचित्र ओळख पत्रासाठी नमुना 6 व नमुना 8  विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी  यांचे कार्यालयात 31 ऑक्‍टोंबर पर्यंत सादर करावयाचे आहे.
           नवीन मतदार नोंदणी करण्‍यासाठी   नमुना 6  मध्‍ये संपूर्ण माहिती भरुन व दोन रंगीत छायाचित्र जोडून  अर्ज सादर करावे. तसेच छायाचित्र ओळख पत्रासाठी नमुना 8 मध्‍ये संपूर्ण माहिती भरुन  रंगीत छायाचित्र जोडून  अर्ज सादर करावयाचे आहे. या संदर्भात  काही अडचण आल्‍यास  जिल्‍हा निवडणूक अधिकारी दूरध्‍वनी क्रमांक 07152- 249776  यांचेशी संपर्क साधावा.
       मतदार नोंदणी  व  ओळख पत्रासाठी  विधानसभा मतदार संघ निहाय  विशेष कक्ष  44-आर्वी, उपविभागीय अधिकारी  दूरध्‍वनी 07157-223028.       45- देवळी व पुलगाव विधान सभा मतदार संघ , उपविभागीय अधिकारी वर्धा  07152-242561.  हिंगणघाट  विधान सभा मतदार संघ   उपविभागीय अधिकारी  हिंगणघाट दूरध्‍वनी  07153-244080.
                                                00000000

निर्मल भारत अभियान 56 गावांचा समावेश - शेखर चन्‍ने


                              आजपासून  शुभारंभ
       वर्धा, दि. 1 -  निर्मल भारत अभियान  कार्यक्रमांमध्‍ये  वर्धा जिल्‍ह्यातील 56 गावांचा  समावेश झाला असून, अभियानाचा शुभारंभ उद्या मंगळवार दिनांक  2 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी  8 वाजता   देवळी तालुक्‍यातील   डिगडोह ग्रामपंचायतीपासून  होत असल्‍याची  माहिती  मुख्‍य  कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने यांनी दिली.      
         निर्मल भारत अभियानाचा शुभारंभ  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  नानाभाऊ ढगे यांच्‍या हस्‍ते  होणार असून यावेळी   उपाध्‍यक्ष  संजय कामनापुरे, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, उपमुख्‍य कार्यकारी  अधिकारी  आर.एम.भुयार , कार्यकारी अभियंता बी.एल. बोरकर आदी उपस्थित  राहणार आहेत.
        निर्मल भारत  अभियानामध्‍ये  वर्धा जिल्‍ह्यातील 56 गावांचा समावेश असून, यामध्‍ये  आर्वी तालुक्‍यातील  6, हिंगणघाट 16, समुद्रपूर 11, वर्धा 7, कारंजा 3, देवळी 7,  सेलू 5 , आर्वी 6 व आष्‍टी  तालुक्‍यातील  1 ग्रामपंचायतीचा  समावेश आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पर्यावरण संतूलन, हागणदारी मुक्‍त गाव,  सौचालयाचा वापर, शुध्‍द पाणी, स्‍वचछता व पाण्‍याची साठवणूक या ठळक मुद्दयावर  जनजागृतीपर मोहीम राबविण्‍यात येणार आहे.  
       निर्मल भारत अभियान कार्यक्रम जिल्‍हा पाणी  स्‍वचछता मिशन , पाणी पुरवठा विभाग, निर्मल भारत अभियान व गट संसाधन केन्‍द्र यांच्‍यातर्फे  राबविण्‍यात येणार आहे. यावेळी जनजागृतीसाठी  प्रभातफेरी , पथनाट्य , कलापथक या माध्‍यमातून  वातावरण निर्मिती करुन गावक-यांना मार्गदर्शन करण्‍यात येणार असल्‍याची   माहितीही   मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिली.
                                                00000

रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागात गुणवत्‍तापूर्ण,स्‍थायी मालमत्‍ता निर्माण करणार


                           
·        पालकमंत्र्याच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा समन्‍वय समिती
·        आज सर्व गावांमध्‍ये ग्रामसभेचे आयोजन
·        मुख्‍यमंत्र्यांनी घेतला नरेगा कामाचा आढावा  
·        60 हजार 235 मजुरांना 12 कोटी 19 लाख मजुरी वाटप

          वर्धा, दिनांक, 1 – महात्‍मा गांधी राष्ट्रीय ग्रामीन रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्‍ह्यातील गरजू शेतकरी व शेतमजूरांना त्‍यांच्‍या  मागणीनुसार   काम उपलब्‍ध करुन देण्‍यासोबतच योजनेची माहिती  व अधिकाराची जाणीव निर्माण करुन देण्‍यासाठी गांधी जयंती पासून महात्‍मा गांधी  नरेगा जागृती विशेष अभियान प्रत्‍येक गावात  प्रभावीपणे राबविण्‍यात येणार आहे.  
        या विशेष अभियानाच्‍या  अंमलबजावणीसाठी  पालकमंत्री राजेंन्‍द्र मुळक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  जिल्‍हा समन्‍वयक समिती गठित करण्‍यात आली असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी आज दिली.
          ग्रामीण भागात  महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजनेच्‍या माध्‍यमातून  गुणवत्‍तापूर्ण व स्‍थायी मालमत्‍ता  निर्माण करण्‍यासाठी   ग्रामीण जनतेचा सहभाग वाढवून  ग्रामपंचायत स्‍तरावर  मोठ्या प्रमाणात  कामे सुरु करा अशा सुचनाही  आज व्हिडीओ कॉन्‍फरसींगव्‍दारा  मुख्‍यमंत्री  पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी जिल्‍हाधिका-यांना दिल्‍यात.
         विशेष जागृती अभियाना अंतर्गत  2 ऑक्‍टोंबर ते 31 ऑक्‍टोंबर   या कालावधीत  प्रत्‍येक  ग्रामपंचायत स्‍तरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यासाठी  पालकमंत्री  यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठीत करण्‍यात आलेल्‍या  समितीमध्‍ये  खासदार , जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष, सर्व आमदार , जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष , जिल्‍हाधिकारी , मुख्‍य कार्यपालन अधिकारी,  कार्यकारी अभियंते, कृ‍षी, वन , भूजल सर्व्‍हेक्षण  आदींचा समावेश असून,  रोजगार हमी योजनेचे उपजिल्‍हाधिकारी   जगदीश  संगीतराव हे सदस्‍य सचिव म्‍हणून  राहणार आहेत.
         रोजगार हमी योजनेच्‍या माध्‍यमातून  ग्रामपंचायत स्‍तरावर स्‍थायी  मालमत्‍ता व विकासाची कामांचे नियोजन करण्‍यासाठी  2 ऑक्‍टोंबर रोजी विशेष ग्रामसभा घेऊन यामध्‍ये  जागृती  अभियानाची  संकल्‍पना  ग्रामस्‍थांसमोर  मांडण्‍यात येईल. या योजने अंतर्गत   पूर्वी  10 प्रकारची कामे घेण्‍यात येत होती. परंतू आता नव्‍याने  6 कामांचा यामध्‍ये  समावेश  करण्‍यात आला आहे.
          रोजगार हमी योजनेमधून  नवीन 6 कामांमध्‍ये  आता प्रामुख्‍याने   पशुधन विकासाची कामे  यामध्‍ये  कुक्‍कुट पालनासाठी  शेड तयार करणे, बकरी पालनासाठी  गोठ्याचे पक्‍के बांधकाम, जनावरांसाठी   गोठ्यांसह  कोल्‍डर टूफ , जनावरांच्‍या पुरक  चा-यांसाठी अझोलाचे निर्माण करणे , सार्वजनिक जागेवरील जलसाठ्यामध्‍ये  मासेमारी विषयक  मत्‍स्‍य विकासाची कामे , ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी  पुनर्भरणाची  कामे तसेच   ग्रामीण स्‍वचछते संबधी  कुटूंब निहाय संडास , शाळा व अंगणवाडीतील संडास, घन व जलस्‍वरुपातील  घाणीचे व्‍यवस्‍थापन , कंपोष्‍ट खत, वर्मी कंपोष्‍टींग , गांडूळ खत निर्मीती, अमृतपाणी        (अजिवक) आदी कामेही आता नव्‍याने घेण्‍यात येणार आहेत.
                             12 कोटी  29 लाख मजुरीचे वाटप
      महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यात 60 हजार 235 मजूरांच्‍या   खात्‍यांमध्‍ये  सुमारे 12 कोटी 29 लाख रुपयांची  मजुरी जमा करण्‍यात आली आहे. मजुरांना  मजूरीचे पैसे सुलभ व सहजपणे उपलब्‍ध  व्‍हावे यासाठी  पोष्‍टामार्फत   तसेच बँकाव्‍दारे वितरीत करण्‍याची व्‍यवस्‍था सुरु करण्‍यात आली आहे.
        जिल्‍ह्यात  6 लक्ष 98 हजार 419  मनुष्‍यदिन रोजगार निर्माण झाला असून यामध्‍ये  2 लक्ष 51 हजार 899 महिलांचा समावेश आहे. जिल्‍ह्यात  ग्रामीण रोजगार हमी योजनांच्‍या कामावर सुमारे 23 हजार  315 कुटूंबांना  रोजगार उपलब्‍ध   करुन देण्‍यात आला असल्‍याची  माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी दिली.
        महात्‍मा गांधी नरेगा जागृती  अभियान प्रभावीपणे राबविण्‍यासाठी लोकप्रतीनीधी, पदाधिकारी व सर्व  ग्रामपंचायतींनी सहभागी  व्‍हावे , असे आवाहनही यावेळी  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                                               000000



Saturday, 29 September 2012

राष्‍ट्रीय सॉफ्टबॉल स्‍पर्धेकरीता महाराष्‍ट्राचा संघ जाहीर


राज्‍यस्‍तरीय  स्‍पर्धामध्‍ये कोल्‍हापूर विभाग विजयी
     वर्धा, दिनांक 29 – राष्‍ट्रीय सॉफ्टबॉल स्‍पर्धेकरीता  घेण्‍यात आलेल्‍या  राज्‍यस्‍तरीय  स्‍पर्धांमधून  मुलींच्‍या   तीन संघाची  निवड   क्रीडा व युवा संचालनालयाचे  विभागीय उपसंचाक  डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी आज जाहीर केली आहे.
       मध्‍यप्रदेशातील इंदोर येथे  17 वर्षे  मुलींच्‍या  राष्‍ट्रीय स्‍पर्धा होणार असून तसेच 14 वर्षे मुलींसाठी जळगाव व 19 वर्षे मुलींसाठी छत्‍तीसगड राज्‍यातील कोरबा येथे  राष्‍ट्रीय स्‍पर्धाचे  आयोजन करण्‍यात आले असून,  या स्‍पर्धांसाठी  महाराष्‍ट़ाच्‍या  सॉफ्ट  बॉल  संघाची निवड करण्‍यात आली आहे.  
      वर्धा येथे  राज्‍यातील   आठ विभागातून 840 विद्यार्थ्‍यांची   राष्‍ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये सहभाग घेतला होता.  या स्‍पर्धेमध्‍ये   14 वर्षाखालील मुलींमध्‍ये  कोल्‍हापूर विभाग विजयी ठरला असून, नाशिक विभागाची  चमू  उपविजयी ठरली आहे. 17 वर्षाआतील  मुलींमध्‍ये कोल्‍हापूर विभागाची चमू विजयी  तर अमरावती विभागाची चमू उपविजयी ठरली आहे. 19 वर्षे आतील  कोल्‍हापूर विभाग विजयी तर अमरावती  विभाग उपविजयी  ठरली आहे.   विजयी स्‍पर्धकांना जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्‍या हस्‍ते  पारितोषीकाचे वितरण करण्‍यात आले.  
                  महाराष्‍ट्राचा संघ जाहीर
      राष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी  विभागीय स्‍पर्धांमध्‍ये   उत्‍कृष्‍ट  कामगिरी करणा-या  खेळाडूमधून  तीन संघ निवडण्‍यात आले असून, महाराष्‍ट्राचे संघ जाहीर करण्‍यात आले.
          14 वर्षे मुली -   प्रणिता कुंभार, सुप्रिया पाखरे, सोनाली सदामते, भक्‍ती पाटील (कोल्‍हापूर विभाग), कु. मानसी दोडगेकर, पुजा पाटील, शिवाणी देशमुख, अर्पिता देशपांडे, भावेशा महाजन   (नाशिक विभाग), कु. वैष्‍णवी वढणे, रंजना लवाटे  ( पुणे विभाग), कु. आंचल शहा, समिक्षा माहूलकर  (नागपूर विभाग), समृध्‍दी सरतापे (अमरावती विभाग).
           17 वर्षे मुली -   सरीता कांबळे, प्रियंका पाटील , मनिषा सोनुले , शिवाणी शिंदे ( कोल्‍हापूर विभाग), तेजस उवसकर , प्रिया काळमेघ, अंकीता मोगल (अमरावती विभाग), रविना गायकी, काजल शेट्टी, काजल मोनल, श्रृती गावंडे ( नाशिक विभाग),  रविना चोपडे (नागपूर विभाग), मृदुल देसाई ( मुंबई) , रेश्‍मा पुणेकर (पुणे विभाग).
         19 वर्षे मुली  - सुष्मिता पाटील, रसिका शिरगावे , कोजोल वाडेकर, माधुरी दांगट ( कोल्‍हापूर विभाग), ईश्‍वरी गोतमारे, जुही मलेश्‍वर , प्रतिक्षा तायलकर, रेणूका टिपले, आरती देशमुख   ( अमरावती विभाग), ऐश्‍वर्या बढे, स्‍वाती पाटील ( नाशिक विभाग), दिक्षा शिवगोर ( औरंगाबाद विभाग), मयुरी टेंभूर्णे ,मोनीका नानेकर ( नागपूर विभाग) , ऋषाली कुभार (पुणे विभाग), प्रियंका पवार (मुंबई विभाग).
          राष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी  निवड समिती सदस्‍य म्‍हणून  प्राध्‍यापक एस.व्‍ही.ठावरी, ए.एस.बिराज, दर्शना पंडीत, किशोर चौधरी, मृदुला महाजन, अभिजीत इंगोले, विश्‍वास गायकर,  स्‍वप्‍नील चांदेकर आणि प्रवीण राऊत यांनी काम पाहीले.
          सॉफ्ट बॉलच्‍या राष्‍ट्रीय  स्‍पर्धा  वर्धा जिल्‍हा क्रिडा परीषद , महाराष्‍ट्र राज्‍य  सॉफ्ट बॉल संघटना व वर्धा जिल्‍हा सॉफ्ट बॉल संघटनेच्‍या सहकार्याने आयेाजीत करण्‍यात आल्‍या असल्‍याची माहिती  जिल्‍हा क्रिडा अधिकारी  प्रदिप शेटीये यांनी दिली.
                                                000000