Saturday, 29 September 2012

सिंदी रेल्‍वे नगर परिषद पोट निवडणूक 21 ऑक्‍टोंबर रोजी मतदान - जयश्री भोज




                
वर्धा, दि. 29 – नगर परिषद सिंदी रेल्‍वे  येथील  प्रभाग क्रमांक 3 ब च्‍या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम  जाहीर झाला असून, सोमवार दिनांक  1 ऑक्‍टोंबर पासून नामनिर्देशन पत्र  स्विकारण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी दिली.
       पोटनिवडणूकीसाठी   निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपविभागीय अधिकारी  हरिष धार्मीक यांची नियुक्‍ती  करण्‍यात आली असून,  दिनांक 21 ऑक्‍टोंबर  रोजी  सकाळी  7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज  जारी करण्‍यात आलेल्‍या  निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे देणे व स्विकारणे   सोमवार दिनांक 1 ऑक्‍टोंबर ते दिनांक 6 ऑक्‍टोंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. दिनांक 2 ऑक्‍टोंबर रोजी सार्वजनिक सुटी असल्‍यामुळे या दिवशी  नामनिर्देशन पत्रे स्विकारली जाणार नाहीत.
       नामनिर्देशनपत्रे शनिवार दिनांक 6 ऑक्‍टोंबर  रोजी दुपारी  3 वाजेपर्यंत  सादर करण्‍याची  शेवटची तारीख राहील.  नगर परिषद कार्यालयात  नामनिर्देशनपत्रे स्विकारण्‍यात येणार असून, सोमवार दिनांक 8 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 11 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी  होईल. तसेच वैधरित्‍या  नामनिर्देशीत झालेल्‍या उमेदवारांची  यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल.
      उमेदवारी  अर्ज शनिवार दिनांक  13 ऑक्‍टोंबर रोजी  दुपारी  3 वाजेपर्यंत मागे घेण्‍याची  वेळ आहे. तसेच सोमवार दिनांक 15 ऑक्‍टोंबर  रोजी निवडणूक चिन्‍हाचे वितरण तसेच अंतीमरित्‍या निवडणूक लढविणा-या  उमेदवारांची यादी प्रसिध्‍दी करण्‍यात येईल व  रविवार दिनांक 21 ऑक्‍टोंबर रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्‍यात येईल. त्‍यानंतर   मतमोजणी करण्‍यात येईल. असेही जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज यांनी कळविले आहे.
                                                000000

जिल्‍ह्यात 37 कलम लागू


वर्धा, दि. 29 – शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍ह्यात दि. 13 ऑक्‍टोंबर पर्यंत मुंबई  पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 लागू  करण्‍यात आली असल्‍याची माहिती  जिल्‍हादंडाधिकारी  तथा जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी  आज दिली.
         जिल्‍ह्यात कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी,   यासाठी  आजपासून ते दिनांक  13  ऑक्‍टोंबरच्‍या मध्‍यरात्री पर्यंत  संपूर्ण जिल्‍ह्यात कलम 37  लागू राहणार असून, या कायद्याचा   भंग करणा-या व्‍यक्‍ती  विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असेही आज जारी केलेल्‍या  आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.
                                              0000 

सोमवारचा लोकशाही दिन रद्द


                          
                           वर्धा,29 : राज्‍य निवडणूक आयोगाने  ग्रामपंचायत सार्वत्रिक  निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, या कालावधीत आचारसंहिता  लागू करण्‍यात आली असल्‍यामुळे सोमवार दिनांक 1 ऑक्‍टोंबर रोजी आयोजीत  करण्‍यात आलेला जिल्‍हा लोकशाही दिन रद्द करण्‍यात आला असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
                                              0000

Thursday, 27 September 2012

सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत नोंदणी झालेल्‍या सर्व अपंग विद्यार्थ्‍यांना वैद्यकीय प्रमाणपत्र -संजय भागवत


        

* जिल्‍ह्यात 5 हजार 681 विद्यार्थ्‍यांचा समावेश
* विशेष शिबीर  आयोजीत करुन प्रमाणपत्र देणार

          वर्धा, दि. 27- शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या आरोग्‍य तपासणीमध्‍ये  नोंदणी झालेल्‍या जिल्‍ह्यातील 6 ते 18 वयोगटातील  सुमारे  5 हजार 681  विद्यार्थ्‍यांना  वैद्यकीय प्रमाणपत्र देण्‍यासाठी  तालुका तसेच जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयामध्‍ये  विशेष शिबीराचे आयोजन करुन  सर्वांना  प्रमाणपत्र देण्‍याच्‍या सुचना अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत   यांनी  आज दिल्‍यात.
      जिल्‍हाधिकारी  कार्यालयाचे सभागृहात  जिल्‍हास्‍तरीय  अपंग कल्‍याण समितीची बैठक अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांचे अध्‍यक्षतेखाली आयोजीत करण्‍यात आली होती. यावेळी   मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
         विद्यार्थ्‍यांमध्‍ये  असलेल्‍या  अपंगत्‍वाबाबत  वैद्यकीय अधिका-यांकडून तपासणी  करुन   त्‍यानुसार   त्‍यांना प्रमाणपत्र देण्‍यासाठी विशेष शिबीर आयोजीत करावे, अशा सुचना करताना अपंग असलेल्‍या  विद्यार्थ्‍यांना  व सर्वसामान्‍य अपंगांना सायकलीचे वाटप , श्रवण यंत्र, अस्थिव्‍यंग  साहित्‍य तसेच लोव्हिजन साहित्‍यामध्‍ये मोठ्या अक्षरातील पुस्‍तके, दोन मॅग्‍नीफायर , बुकसिफ मॅग्‍नीफायर , वाचन करण्‍यासाठी असलेल्‍या सुविधा  आदी पुरविण्‍यात याव्‍यात  यासाठी  विशेष मोहीम राबवावी अशी सुचनाही संजय भागवत यांनी केली.
          शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या  तपासणी मध्‍ये  144 अस्थिव्‍यंग विद्यार्थ्‍यांपैकी 73 ट्रायसिकलचे  वाटप करण्‍यात आले असून, 77 श्रवणयंत्र साहित्‍य, 245 अस्थिव्‍यंग साहित्‍य तसेच 249 लोव्हिजन साहित्‍य वितरीत करण्‍यात आल्‍याचे यावेळी बैठकीत सांगण्‍यात आले.
           अपंग व्‍यक्‍ती –समान संधी , हक्‍काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 व अपंग कल्‍याण  कृती आराखडा 2001  तसेच  राष्‍ट्रीय विश्‍वस्‍त अधिनियम 1999 ची  प्रभावी  अंमलबजावानी करण्‍यासाठी  जिल्‍हा‍स्‍तरावर अपंग कल्‍याण समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.  त्‍यानुसार अपंगांना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्‍त झालेल्‍या  व होणा-या  आवश्‍यक सुविधा अपंगांना स्‍वयंरोजगारासाठी  बिजभांडवल  योजने अंतर्गत कर्ज प्रकरणांची मंजूरी   व अपंगाचे  सर्व्‍हेक्षण , मुळातच अपंगत्‍व  येवू नये याकरीता  प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आदींबाबत यावेळी  चर्चा करण्‍यात आली.
                           अपंग कल्‍याणासाठी   तीन टक्‍के निधी
          अपंग कल्‍याणाच्‍या  विविध योजना राबविण्‍यासाठी  वर्धा जिल्‍हा  परिषदेने  शेष फंडामधून तीन टक्‍के   निधी   14 लक्ष  90 हजार रुपये   उपलब्‍ध   करुन दिला आहे. या अंतर्गत    अपंग विवाहीत जोडप्‍यांना   प्रोत्‍साहन व आर्थिक सहाय्यासाठी तीन लक्ष रुपये , अपंगांना व्‍यवसायासाठी   पिकोफॉल शिलाई  मशीन , तीन चाकी  सायकल,  श्रवण यंत्रे यासाठी   प्रत्‍येकी    तीन लक्ष रुपये तसेच   रोगनिदान व शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी   3 लक्ष 90 हजार रुपयाचा निधी राखून ठेवण्‍यात आला असल्‍याची माहिती  समाज कल्‍याण अधिकारी श्रीमती  जया राऊत यांनी दिली.
         यावेळी   जिल्‍हास्‍तरीय अपंग कल्‍याण समितीचे सदस्‍य अमोल विजय चव्‍हाण , मधुकर टोनपे, दिनकर अंबुलकर, छाया अंबोरे, डॉ. एस.जी. निमगडे, डॉ. शबाना मोकाशी, जिल्‍हा समन्‍वयक अधिकारी  प्रविन गौतम , कमलेश पिसाळकर, जिल्‍हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे  आदी  विभागाचे  प्रतिनीधी तसेच अपंग पुनर्वसन केन्‍द्र, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार माहिती केन्‍द्र, अशासकीय सदस्‍य , वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, सहाय्यक सल्‍लागार  आदी बैठकीला उपस्थित होते.
                                                0000
       


जमिनीचे भोगवाटपदार परावर्तीत करण्‍यासाठी विशेष मोहीम - जयश्री भोज


 जिल्‍ह्यात 1 लक्ष 56 हजार 150 भोगवाटपदार
वर्धा, दिनांक 27- जिल्‍ह्यातील भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या जमिनीचे विक्री हस्‍तांतरण करतेवेळी   शेतक-यांना  मानसिक त्रास किंवा अडचण निर्माण होऊ नये म्‍हणून  भोगवाटपदार वर्ग दोन मधून एक मध्‍ये  परावर्तीत करण्‍यासाठी  विशेष मोहीम राबविण्‍यात येत असल्‍याची  माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री  भोज यांनी दिली.
शेतक-यांना  भुस्‍वामी भोगवाटपदार वर्ग एक मध्‍ये  परावर्तीत करण्‍यासाठी जिल्‍ह्यात विशेष मोहीम राबविण्‍यात येत असून, 1 लक्ष  56 हजार 150 भोगवाटपदार वर्ग दोन च्‍या शेतकरी खातेदारांपैकी  53 हजार 742  खातेदारांनीच विशेष मोहीमे अंतर्गत अर्ज  सादर केले आहेत. भूस्‍वामी  शेतक-यांनी या विशेष मोहीमेत सहभागी होवून, संबंधीत   उपविभागीय अधिकारी  यांचेकडे  भोगवाटपदार परावर्तीत करण्‍यासाठी अर्ज करावे, असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी  श्रीमती  जयश्री भोज यांनी केले आहे.
          जिल्‍ह्यातील भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट  असलेल्‍या जमिनींची विक्री, हस्‍तांतरण , दस्‍तनोंदणी  करण्‍यापूर्वी  जमिनी  शासकीय वाटपातील आहे किंवा कसे याबाबत तपासणी होणे आवश्‍यक आहे. भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या जमिनीची विक्री, हस्‍तांतरण करतेवेळेस उपविभागीय महसूल अधिकारी हे सक्षम अधिकारी असल्‍याने त्‍यांचे ना हरकत प्रमाणपत्र, परवानगी असल्‍याशिवाय  दुय्यम  निबंधक यांचेकडे दसताऐवजाची नोंद होणार नसल्‍याने जिल्‍ह्यातील  खातेदार शेतक-यांना मानसीक त्रास किंवा अडचण निर्माण होऊ नये म्‍हणून   जिल्‍ह्यात विशेष मोहीम राबविण्‍यात येत आहे.  या मोहीमेचा लाभ  सर्व शेतकरी खातेदारांनी घ्‍यावा, असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
                                                00000000

गणेश विसर्जन काळात शांतता व सुव्‍यवस्‍था राखा- अविनाश कुमार


                                          134 कलम लागू
       वर्धा, दि. 27 – जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवसथा कायम राखण्‍यासाठी  सर्व जनतेनी  सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार  यांनी  केले आहे.
          घरघुती तसेच सार्वजनिक गणतीचे विर्सजन, त्‍यानंतर शहरी व ग्रामीण भागात 3 ऑक्‍टोंबर पासून हडपक्‍या  गणपतीचा उत्‍सव व माध्‍यमिक शालांत परीक्षेच्‍या काळात कायदा व सुव्‍यवस्‍था कायम राहावी म्‍हणून  दिनांक 29 सप्‍टेंबर ते 13 ऑक्‍टोंबर पर्यंतच्‍या कालावधीत मुबई पोलीस अधिनियम 1951 चे  36 अन्‍वये अ आदेश जारी  करण्‍यात आला आहे.
          या आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 134 अन्‍वये कार्यवाहीस पात्र राहतील.जिल्‍ह्यात या कालावधीत जाहीर सभा, निदर्शने, मोर्चे, शोभायात्रा आदिंसाठी पोलीस स्‍टेशन अधिकारी यांचेकडून परवानगी घेतलयाशिवाय  आयोजन करण्‍यात येवू नये तसेच शांततेला व सुव्‍यवस्‍थेला बाधा आणणा-या घोषणा देऊ नये असेही जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी  जाहीर केलेल्‍या आदेशात म्‍हटले आहे.
                                              0000 

अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख रविवारी हिंगणघाटमध्‍ये




वर्धा, दि. 27- राज्‍याचे अन्‍न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख रविवार दिनांक 30 सप्‍टेंबर रोजी  हिंगणघाट तालुक्‍यात असून सकाळी 11 वाजता रिंगडोह (हिंगणघाट) येथे आगमन होईल.
       दुपारी 12 वाजता रिंगडोह येथून हिंगणघाट कडे प्रयाण करतील. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे अभ्‍यागतासाठी  राखीव राहील. दुपारी 1 वाजता कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती येथे शालेय विद्यार्थ्‍यांना लॅपटॉप वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून, दुपारी 3 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                0000