Monday, 27 August 2012

जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत, अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक ठाकूरदास बंग यांना ‘ नागभूषण पुरस्‍कार ’ प्रदान सेवाग्राम आश्रमात भावपूर्ण सोहळा


      वर्धा, दि. 27- नागभूषण फाऊंडेशनतर्फे देण्‍यात येणारा एक लाख रुपयाचा नागभूषण पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ गांधीवादी विचारवंत, अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक तसेच सर्वोदयी नेते प्रा. ठाकूरदास बंग यांना सेवाग्रामच्‍या पावनभूमीत ज्‍येष्‍ठ गांधीवाद्यांच्‍या प्रदान करण्‍यात आला. याच समारंभात पुरस्‍काराची रक्‍कम बंग यांनी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानकडे सुपूर्द करीत आपल्‍या आजवरच्‍या त्‍यागमयी जीवनाची पुनश्‍च पावती दिली.
      महात्‍मा गांधीच्‍या चले जाव आंदोलनात सत्‍याग्रही, आचार्य विनोबाजींच्‍या भूदान चळवळीतील त्‍यांचे सहकारी तसेच जयप्रकाश नारायण यांच्‍या संपूर्ण क्रांती आंदोलनातील सूत्रधार अशा देशाच्‍या तीन महत्‍वाच्‍या मन्‍वंतरातील सक्रिय वाक्षीदार राहिलेल्‍या ठाकूरदास बंग यांच्‍या योगदानाचा गौरव म्‍हणून नागभूषण पुरस्‍काराने त्‍यांना गौरविण्‍यात आले.
       व्‍यासपीठावर सर्व सेवा संघाच्‍या अध्‍यक्ष राधाबेन भट्ट, सुमनताई बंग, सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे विश्‍वस्‍त  अॅड. मा.म.गडकरी, बापू कथाकार नारायणभाई देसाई, गांधीविचार परिषदेचे भरत महोदय, नागभूषण फाऊंडेशनचे प्रभाकर मुंडले व वनराईचे विश्‍वसत गिरीश गांधी उपस्थित होते.
      महात्‍मा गांधीच्‍या सूचनेवरुन विदेशातील शिष्‍यवृततीप्रापत शिक्षणास नकार देत स्‍वातंत्र्य लढ्यात उतरणारे बंग हे लढयातही कर्तव्‍य कठोर होते. गो.से. वाणिज्‍य महाविद्यालयात काही काळ नोकरी केलयानंतर त्‍यांनी पुढे पूर्णवेळ देशसेवेस दिला. स्‍वातंत्र्य प्राप्‍तीनंतर भूदान चळवळ व त्‍यानंतर जयप्रकाशींच्‍या संपूर्ण क्रांतीचे अग्रणी कर्णधार असे ठाकूरदास बंग यांचे कार्य राहिले. गौरवमूर्तीच्‍या या अशा विशाल त्‍यागमयी जीवनपटाला विविध वक्‍त्‍यांनी उजाळा दिला.
     राधाबेन भट्ट म्‍हणाल्‍या  की, हा पुरस्‍काराचाच गौरव होय. त्‍यांच्‍या कार्यात सुमनताई बंग यांचे मोठे योगदान राहिले. मा.म.गडकरी यांनी विविध गांधीवादी संस्‍था चालविताना ठाकूरदास बंग यांच्‍या मिळालेल्‍या मार्गदर्शनाचा गौरवपूर्ण उल्‍लेख केला. हयात असणा-या गांधीवाद्यांमध्‍ये आज ते सर्वोच्‍च स्‍थानी आहेत असेही गडकरी म्‍हणाले.
      नागभूषण हा विदर्भातील निःस्‍वार्थ सेवेसाठी केलेल्‍या कार्याचा गौरव म्‍हणून नागपूर त्रिशताब्‍दी सोहळ्याची आठवण म्‍हणून आयोजक संस्‍थेने रोख एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र स्‍वरुपातील नागभूषण पुरस्‍कार ठाकूरदास बंग यांना यावेळी प्रदान केला. 97 वर्षीय बंग यांनी कृतज्ञ भावनेने हा पुरस्‍कार स्‍वीकारताना आपले मनोगत व्‍यक्‍त केले. आजही मला जी स्‍वप्‍ने  पडतात, ती सर्वोदयी समाज अस्तित्‍वात आल्‍याची पुरस्‍कारामागची भावना उदात्‍त आहे. त्‍याचा मी आदर करतो. पुरस्‍काराची रक्‍कम मी याचवेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानच्‍या कार्यासाठी देत आहे. असे उदगार काढून त्‍यांनी प्रतिष्‍ठानचे अॅड. गडकरी यांना रकमेचा धनादेश प्रदान केला.
     सेवाग्राम आश्रम परिसरात दिवसभर संततधार सुरु होती, मात्र त्‍याची तमा न बाळगता कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्‍यवर, आश्रमवासी व जेष्‍ठ सर्वोदयी उपस्थित होते. कुष्‍ठधामचे डॉ. रविशंकर शर्मा, गौरवमूर्तीचे सूपुत्र डॉ. अभय बंग, विजय जावंधिया, नारायणदास जाजू, डॉ. सुहास जाजू, अरुण लेले प्रामुख्‍याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक गिरीश गांधी, संचालन डॉ. नारायण निकम व आभार मोहन अग्रवाल यांनी मानले.
                        00000

सर्वसामान्‍यांना योजनांची माहिती अवगत करावी - ना.गो.गाणार


    वर्धा, दि.27- केंद्र व राज्‍य  पुरस्‍कृत योजना अद्यापही सर्व सामान्‍य जनतेपर्यंत पोहचलेल्‍या नाहीत त्‍यामुळे लाभार्भी संबधित योजनेच्‍या लाभापासून वंचित राहत असतात. यासाठी ग्रामीण क्षेत्रामध्‍ये जनजागरण करुन येाजनांची प्रभावी अंमलबजावणी  करावी तसेच  सर्वसामान्‍य जनतेला योजनाची अद्यावत माहिती अवगत करावी असे आवाहन आमदार ना.गो.गाणार यांनी केले.
      येथील विश्राम भवनामध्‍ये नुकतीच (दि.25ऑगस्‍ट) जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेने आयेाजित जिल्‍हास्‍तरीय दक्षता  व सनियंत्रण समितीची आढावा सभा संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी  ते अध्‍यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जि.प. अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, आमदार अशेाक शिंदे, जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, प्रकल्‍प अधिकारी बि.एम.मोहन, सभापती धर्मशिल जगताप, सभापती छायाताई लांडे, सभापती अर्चनाताई तिमांडे, सभापती दिनेश धांदे, सभापती नंदाताई साबळे, अशासकीय सदस्‍यामध्‍ये  विजय जावंधिया व विलास कांबळे आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
      सामाजिक दायीत्‍वाचे भान ठेवून अधिका-यांनी सर्वसामान्‍यांच्‍या समस्‍याची सोडवणूक करण्‍याचे आवाहन करुन आमदार गाणार म्‍हणाले की, अधिका-यांनी नागरीकांशी सौजण्‍यपूर्व वागणूक ठेवून योग्‍य  मार्गदर्शन केल्‍यास लाभार्थ्‍यांच्‍या अडचणी दूर होण्‍यास मदत होईल.
     याप्रसंगी प्रकल्‍प अधिकारी मोहन यांनी केंद्रशासित पुरस्‍कृत योजनांवर 24 मार्च 2012 पर्यंतच्‍या खर्चाचा आढावा सादर करताना सांगितले की महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेवर 99.47 टक्‍के, इंदिरा आवास योजनेवर 88.34 टक्‍के , सुवर्णजयंती स्‍वरोजगार योजनेवर 75.33 टक्‍के, इंदिरा आवास योजनेवर 88.34 टक्‍के, पंतप्रधान ग्रामीण सुवर्णजयंती योजनेवर 88.82 टक्‍के खर्च करण्‍यात  आला असल्‍याचे सांगितले. गेल्‍या आर्थिक वर्षामध्‍ये स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजने अंतर्गत बँकेकडे कर्ज मंजूरीसाठी  271 प्रकरणे पाठविण्‍यात आली त्‍यापैकी 237 प्रकरणांना कज्र वितरण करण्‍यात आले. इंदिरा अवास योजने अंतर्गत जिल्‍ह्यामध्‍ये 2 हजार 371 घरकुले मंजूर करण्‍यता आली त्‍यापैकी 1 हजार 763 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 608 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमा अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाकउून आष्‍टी येथील 8 कामावर 1 कोटी 80 लक्ष 58 हजार रुपये खर्च झालेला असून हरयाली कार्यक्रम अंतर्गत कारंजा, आर्वी व आष्‍टीचे पाणलोटाचे कामे प्रगतीपथावर असून त्‍यावर 6 कोटी 64 लक्ष 24 हजार रुपयापैकी 6 कोटी 17 लक्ष 50 हजार रुपये खर्च झालेले आहेत.
      ग्रामीण पाणी पुरवठा येाजने अंतर्गत जिल्‍ह्यात 44 प्रस्‍तावांना मंजूरी दिली असून 43 कामे पूर्ण झालेली आहे. ग्रामीण स्‍वचछता कार्यक्रमा अंतर्गत फेब्रुवारी 2012 अखेर पर्यंत जिल्‍ह्यात दारिद्र रेषेवरील 56 हजार 557 लाभार्थ्‍यांना व दारिद्र रेषेखालील 55 हजार 280 लाभार्थ्‍यांना सौचालये बांधून देण्‍यात आली असून शाळेतील 1298 व आंगणवाउीचे 855 सोचालये बांधकाम करुन देण्‍यात आले आहे. त्‍यावर 14 कोटी 46 लक्ष 50 हजार रुपये खर्च झाला आहे.
     यावेळी राष्‍ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, पंतप्रधान शेतकरी पॅकेज, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य योजना, सर्व शिक्षा अभियान, शेतकरी कुटूंबातील मुलींच्‍या सामुहिक विविाह शुभमंगलम येाजना, राजीव गांधी ग्रामीण विद्यूतीकरण योजना आदी योजनांची माहिती प्रकल्‍प अधिकारी यांनी दिली.
     या बैठकीचे आभार सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी डॉ. पी.व्‍ही. भालेराव यांनी मानले.
                              0000000

पोथरा,लालनाला,नांद, निम्‍न वर्धा ओव्‍हर फ्लो सुरु


   वर्धा, दि. 27 – जिल्‍ह्यात सतत सुरु असलेल्‍या पावसामुळे सिंचन प्रकल्‍पातील जलसाठ्यात वाढ होत असून,  पोथरा सिंचन प्रकल्‍प  पूर्णपणे भरल्‍यामुळे  14 सेंटीमीटरचा विसर्ग सुरु आहे.  लालनाला सिंचन प्रकल्‍पात   87.81  टक्‍के उपयुक्‍त जलसाठी असून या प्रकल्‍पाच्‍या दोन दरवाजामध्‍ये 25 सेंटीमीटरचा तसेच नांद जलाशयातून 15 सेंटीमीटरचा विसर्ग सुरु आहे.
      जिल्‍ह्यातील निम्‍न वर्धा प्रकल्‍पामध्‍ये 57.24 टक्‍के जलसाठा असून या प्रकल्‍पातील तीन दरवाजे 10 सेंटीमीटरनी उघडण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातील इतर सिंचन प्रकल्‍पामध्‍ये उपलब्‍ध असलेला जलसाठा पुढील प्रमाणे आहे.
     धामप्रकल्‍प महाकाळी 14.94 द.घ्‍.मि. (23.90) टक्‍के, पोथरा प्रकल्‍प  34.72 द.घ.मि. (100 टक्‍के), बोर प्रकल्‍प 41.75 द.घ.मि. (32.79) टक्‍के , डोंगरगांव प्रकल्‍प 0.45 द.ल.घ.मि. (10.30) टक्‍के , पंचधारा प्रकल्‍प 1.95 द.घ.मि. (22.29 ) टक्‍के, मदन प्रकल्‍प 2.39 द.घ.मि. (22.67) टक्‍के , मदन उन्‍नई धरण 0.85 द.ल.घ.मि. (31.52) टक्‍के, लालनाला प्रकल्‍प 24.24 द.ल.घ.मिटर (87.81) टक्‍के , नांद प्रकल्‍प 17.10 द.ल.घ.मि. (83.87) टक्‍के , वडगाव प्रकल्‍प 112.92 द.ल.घ.मि. (83.3) टक्‍के , उर्ध्‍व वर्धा प्रकल्‍प 457.49 द.ल.घ.मि. (81.11) टक्‍के, वर्धा कार नदी प्रकल्‍प 12.23 द.ल.घ.मिटर (58.9) टक्‍के,
निम्‍न वर्धा प्रकल्‍प 59.12 द.ल.घ.मिटर (57.24) टक्‍के , बेंबळा प्रकल्‍प 112.9 द.ल.घ.मि. (37.1) टक्‍के, सुकळी लघु प्रकल्‍प 7.57 द.ल.घ.मिटर (7.78) टक्‍के .
                              0000000

जिल्‍हा कोषागार अधिकारी पदी शरद पराते रुजू


      वर्धा,दि.27- जिल्‍हा कोषागार अधिकारी या पदावर शरद पराते यांची नियुक्‍ती झाली असून, त्‍यांनी पदाची सुत्रे स्विकारली आहेत. यापुर्वी ते नांदेड जिल्‍हा परिषदेमध्‍ये वरिष्‍ठ लेखाधिकारी म्‍हणून कार्यरत होते.
      जिल्‍हा कोषागार अधिकारी शरद पराते यांची 1989 मध्‍ये लेखा व कोषागारे या विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्‍हणून नियुक्‍ती झाली. त्‍यांनी विभागीय समाज कल्‍याण कार्यालय, नागपूर तसेच गडचिरोली कोषागार अधिकारी, चंद्रपूर येथे जिल्‍हा परिषदेमध्‍ये वरिष्‍ठ लेखाधिकारी, हातमाग महामंडळ नागपूर, व सिंधुदूर्ग येथेही  काम केले आहे.
                              00000

नवीन शाळेच्‍या मान्‍यतेसाठी प्रस्‍ताव संकेत स्‍थळावर उपलब्‍ध


      वर्धा,दि.27- जिल्‍ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांनी शाळा मान्‍यतेसाठी सादर केलेल्‍या अर्ज व स्‍वप्रतीज्ञापत्र जिल्‍ह्याच्‍या  www.nic.wardha.in  या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आले असल्‍याची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक   यांनी दिली आहे.
                         00000 

बुधवारी सामाजिक ऐक्‍यासाठी सदभावना दौड


       वर्धा,दि.27- सामाजिक ऐक्‍य पंधरवडा साजरा करण्‍याचे निमित्‍ताने  दिनांक 29 ऑगस्‍ट 2012 रेाजी सदभावना शर्यत जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथुन सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. या स्‍पर्धेचे घोषवाक्‍य भारत-निरोगी आणि समर्थ हे आहे. तसेच राष्‍ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे जादुगार (मेजर ध्‍यानचंद) यांचा जन्‍मदिवस सकाळी 9 वाजता साजरा करण्‍यात येणार आहे.
     सर्व शाळा, महाविद्यालये, तसेच खेळाडू, क्रिडा प्रेमी, सर्व क्रिडा पुरस्‍कार विजेते, नेहरु युवा केन्‍द्र, भारत स्‍काऊट आणि गाईड्स, युथ होस्‍टेल असो. ऑफ इंडिया, राष्‍ट्रीय सेवा योजना व युवक बिरादरी यांनी सहभागी होण्‍यासाठी जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा क्रिडा अधिकारी वर्धा यांनी केले आहे.
                      00000

सार्वजनिक उत्‍सवासाठी वर्गणी गोळा करताना परवानगी आवश्‍यक


       वर्धा, दि. 27- सार्वजनिक गणेश उत्‍सव, दुर्गा उत्‍सव, शारदा उत्‍सव साजरा करण्‍याकरीता वर्गणी गोळा करण्‍यासाठी मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियमा अंतर्गत  परवानगी आवश्‍यक असल्‍याची माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त पी.पी.शर्मा यांनी दिली.
     सार्वजनिक उत्‍सव आयोजनासाठी वर्गणी गोळा करण्‍यासाठी आवश्‍यक परवानगी साठीचा अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त यांच्‍या कार्यालयात उपलब्‍ध असून, अर्जाची किंमत तीन रुपये आहे. सार्वजनिक मंडळानी  मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार परवानगी घ्‍यावी, असे आवाहनही सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त पी.पी.शर्मा यांनी केले आहे.
       अर्जासोबत मंडळाचा ठराव ज्‍यामध्‍ये मंडळाचे नाव ठरविणे, मंडळाचे कार्यकारी मंडळ ठरविणे, ज्‍या ठिकाणी मुर्तीची स्‍थापना करावयाची आहे ती जागा ठरविणे या बाबतचा उल्‍लेख असावा. मागील वर्षाचा हिशोब, ज्‍या जागेवर मुर्तीची स्‍थापना करावयाची आहे त्‍या जागेच्‍या मालकाचे मुर्ती स्‍थापनेसाठी व उत्‍सव साजरा करण्‍याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक जागेत उत्‍सव साजरा करणा-या मंडळांकरीता ग्राम पंचायत किंवा नगर परिषद यांचे ना हरकत प्रमाणपत्र,प्रतिज्ञापत्र , हद्दीतील सक्षम पोलीस स्‍टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे. कार्यालयाने कुठल्‍याही त्रयस्‍त इसमास या कामासाठी नेमलेले नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. 
                           00000