Friday, 24 August 2012

सोयाबीनला सांभाळा जैवीक व रासायनीक औषधी उपलब्‍ध


      
        वर्धा,दि.24- सोयाबीन, कापूस तसेच तुरीच्‍या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असल्‍यामुळे  शेतक-यांनी  पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी  तात्‍काळ उपाययोजना करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कृषी  विभागातर्फे गळीत धान्‍य विकास कार्यक्रमाअंतर्गत  जैवीक व रासायनीक औषधांचा पुरवठा तालुका स्‍तरावर उपलब्‍ध  करुन दिला असून,  शेतक-यांना  आवश्‍यकतेनुसार 50 टक्‍के अनुदानावर पुरवठा  करण्‍यात येत आहे.
           जिल्‍ह्यात  केन्‍द्र पुरस्‍कृत   गळीत धान्‍य विकास कार्यक्रमा अंतर्गत सोयाबीन पिकांची  56 प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहेत. या प्रकल्‍पा अंतर्गत सोयाबीनवर येणा-या  किड रोगाच्‍या नियंत्रणासाठी रासायनीक व जैविक औषधे  उपलब्‍ध   करुन देण्‍यात आली आहेत. यामध्‍ये  अॅझाडीरेक्‍टीन  1500 पीपीएम चा  1 हजार 120 लिटरचा पुरवठा, बिव्‍हेरीया बॅसियाना चा 4 हजार 480 किलोचा पुरवठा, सुडोमोनास  2 हजार 240 किलो व वहर्टीसिलीयम  4 हजार 480 किलोचा पुरवठा करण्‍यात आला आहे.
         सोयाबीन या पिकासाठी जैविक किड नियंत्रणा अंतर्गत बिव्‍हेरीया 2 हजार 464 किलो व  व्‍हर्टीसिलीयमचा 1 हजार 232 किेलोचा पुरवठा ही उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. शेतक-यांच्‍या मागणीनुसार  पीक संरक्षण औषधी  चा पुरवठा सुध्‍दा उपलब्‍ध  झाला आहे. केन्‍द्र पुरस्‍कृत गळित धान्‍य  विकास कार्यक्रमा अंतर्गत बिव्‍होरीया बासीयानाचाही  पुरवठा करण्‍यात येत आहे.
         पिकावरील किड रोग संरक्षण व सल्‍ला प्रकल्‍पाबद्दल  कापूस व सोयाबीन पिकाकरीता  1 हजार 344 थेरोमन सापळे (कामगंध सापळे) व 7 हजार 296 स्‍पोडो त्‍पेराही उपविभागीय स्‍तरावर उपलबध करुन देण्‍यात आला आहे. तसेच विभागीय स्‍तरावरुनही किटकनाशकांचा पुरवठा करण्‍यात येणार आहे.
          सोयाबीन पिकांवर  उंट अळी , तंबाखूवरील पाने खाणारी अळी व चक्रभुंगा किडीच्‍या नियंत्रणासाठी जैवीक व रासायनीक औषधांचा निश्चितच लाभ होणार आहे. शेतक-यांनीही किड नियंत्रणासाठी तात्‍काळ उपाययोजना करावेत तसेच तालुका कृषि अधिकारी यांचेकडून बिव्‍हेरीया, बॅसीयाना या जैविक किटक नाशकाची मागणी  तात्‍काळ नोंदवावी त्‍यामुळे सोयाबीन पिकाचे संरक्षण करणे निश्चितच सुलभ होणार आहे.
                                                             0000

नागभुषण पुरस्‍काराचे रविवारी वितरण


                           
       वर्धा, दि. 24- ज्‍येष्‍ठ गांधीवादी विचारवंत व अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक प्रा. ठाकुरदास बंग यांना यावर्षीचा नागभूषण पुरस्‍कार रविवार दिनांक  26 ऑगस्‍ट रोजी दुपारी 4 वाजता सेवाग्राम आश्रम येथे आयोजीत विशेष समारंभात देण्‍यात येणार आहे.
          नागभूषण अवार्ड फाऊंडेशनच्‍या वतीने दिल्‍या जाणा-या नागभुषण पुरस्‍कारामध्‍ये  1 लाख रुपये , सन्‍मान चिन्‍ह, शाल व श्रीफळ  यांचा समावेश आहे. ज्‍येष्‍ठ  गांधीवादी नेते नारायणभाई देसाई यांच्‍या हस्‍ते ठाकुरदासजी बंग यांना नागभूषण पुरस्‍कार दिल्‍या जाणार असून या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी  सर्वोदय संघाच्‍या अध्‍यक्षा राधाबहन भट्ट राहणार  आहेत.  यावेळी  सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी  प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित   राहणार असल्‍याची माहिती नागभुषण  अवार्ड फांऊडेशनचे प्रमुख गिरीश गांधी  यांनी दिली.
      विदर्भाच्‍या विकासात मोलाचे योगदान देणा-या किंवा विदर्भाचा नावलौकीक राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर वाढवणा-या  सन्‍माननीय व्‍यक्‍तींना  दरवर्षी   हा नागभुषण पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात येतो.  नागभूषन अवार्ड फाऊंडेशनचे अध्‍यक्ष प्रभाकरराव मुंडे, उपाध्‍यक्ष सत्‍यनारायण नुवाल, सचिव गिरीश गांधी, कोषाध्‍यक्ष  ब्रिजकिशोर अग्रवाल तसेच सदस्‍य म्‍हणून  सुरेश शर्मा, अजयकुमार संचेती, डी.आर.माली, राजेंद्र पुरोहीत, सागर मेघे, मोहन अग्रवाल व विलास काळे हे सुध्‍दा या कार्यक्रमास उपस्थित   राहणार आहेत. नागभूषन वितरण समारंभास  उपस्थित राहण्‍याचे आवाहन नागभूषण अवार्ड फाऊंडेशनचे महासचिव गिरीश गांधी यांनी केले आहे.
       ज्‍येष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक , भुदान चळवळीचे कार्यकर्ते व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्‍या संपूर्ण क्रांतीचे प्रमुख कर्णधार असलेले गांधीवादी विचारवंत ठाकुरदास बंग हे 1942 मध्‍ये  महात्‍मा गांधी यांनी  गोवालीया टँक मैदानावर केलेल्‍या करा वा मरो च्‍या आवाहनानंतर आपल्‍या नोकरीचा राजीनामा देऊन  स्‍वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्‍यांना  दोन वर्षे सक्‍त मजूरीची शिक्षाही झाली होती. प्रो.बंग हे जहाल अहिंसक  सत्‍याग्रही म्‍हणूनही ओळखले जात होते.  
           आचार्य विनोबा भावेंच्‍या आवाहनानंतर ठाकूरदासजी बंग यांनी 1957 मध्‍ये भूदान पदयात्रा काढली. महात्‍मा गांधी  सोबत स्‍वातंत्रय आंदोलन, विनोबा भावे यांचेसोबत सर्वोदय आंदोलन व जयप्रकाश नारायण यांचे सोबत संपूर्ण क्रांती आंदोलन या तीनही राष्‍ट्रीय आंदोलनामध्‍ये त्‍यांचा सहभाग राहीलेला आहे.
                                                     000000

वर्धा व हिंगणघाट शहरात दूधाच्‍या पॉलीथीन मधे बदल


    
           वर्धा, दि.24 -  शासकीय दूध योजना वर्धा मार्फत वर्धा व हिंगणघाट येथे 500 मि.ली. पिशवीतून दूध विक्री करण्‍यात येते . सध्‍या 500 मि.ली. पॉलीफिल्‍मचा साठा संपुष्‍ठात आल्‍याने हिंगणघाट व वर्धा येथे दूध ग्राहकांना 1000 मि.लि.  पॉलीपिफल्‍म मधून 500 मि.ली. दूधाचा पुरवठा करण्‍यात येईल.  याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्‍यावी असे दुग्‍धशाळा व्‍यवसथापक, शासकीय दिुध योजना, वर्धा यांनी कळविले आहे.
                                                  00000

निवृत्‍ती वेतन धारकांचा मेळावा



           वर्धा,दि.24-  निवृत्‍तीवेतन तसेच कुटूंब निवृत्‍ती वेतन घेणा-या राज्‍य शासकीय निवृत्‍ती वेतन धारकांच्‍या अडचणी  व त्‍यांचे  निराकरण करण्‍यासाठी कोषागार कार्यालयात दिनांक 7 सप्‍टेंबर 2012 रेाजी सकाळी 8  वाजता मेळावा  आयोजित  करण्‍यात आला आहे.
       निवृत्‍तीवेतन व कुटूंब वेतन धारकांनी निवृत्‍ती वेतन संदर्भातील अडचणी सोडविण्‍यासाठी वर्धा येथील कोषागार कार्यालयात उपस्थित राहून आपल्‍या अडचणीचे निराकरण करावे असे आवाहन कोषागार अधिकारी  श्री.पराते यांनी केले आहे.
                                                  0000000

वर्धा मुख्‍यालय व सर्व तहसिलमधे लोकअदालत


        वर्धा, दि. 24- जिल्‍हा वि‍धी सेवा प्राधिकरणातर्फे वर्धा  मुख्‍यालयी  व जिल्‍ह्यातील सर्व तहसिलमधे दिनांक 16 सप्‍टेंबर 2012 रोजी  महालोक अदालतीचे   आयोजन करण्‍यात आले आहे.
        महालोक अदालतीमध्‍ये  प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा होणार असल्‍यामुळे  जनतेनी  महालोक अदालतीच्‍या माध्‍यमातून  न्‍यायालयात प्रलंबित असलेली व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने झटपट निकाली काढण्‍यासाठी सहभागी होण्‍याचे आवाहन महाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष व मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमुर्ती  डी.डी. सिन्‍हा  यांनी केले आहे.
        महालोकअदालतीमध्‍ये  ज्‍या न्‍यायालयात वाद सुरु आहे  तिथे एक साधा अर्ज करुन आपले प्रकरण महालोकअदालत मध्‍ये ठेवून आपला वाद कायमचा संपुष्‍टात आणता येईल. असे प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश तसेच अध्‍यक्ष जिल्‍हा  विधी सेवाप्राधिकरण, वर्धा यांनी  आवाहन केल आहे.
                                                              00000

सोशालिस्‍ट चौकात वाहतुकीस अडथडा अधिसुचना जारी


  
वर्धा, दि. 24 – सोशालीस्‍ट चौक हा बजाज चौक ते नागपूरकडे जाणारा मुख्‍य रस्‍ता असल्‍याने त्‍या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये  व रहदारीस कुठल्‍याही प्रकारचा अडथडा होऊ नये म्‍हणून  वाहतुकीचे  सुनियोजीत रीतीने  नियमन करण्‍याकरीता  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) अन्‍वये  जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार यांनी आज अधिसुचना जारी केली आहे. या अधिसुचनेची अंमलबजावनी दिनांक 1 सप्‍टेंबर 2012 पासून अंमलात येणार आहे.  
 सोशालिस्‍ट चौक येथे कामगारांच्‍या उभे राहणा-या वाहतुकीस अडथडा निर्माण होत असल्‍याने  ते यापुढे भाजी मार्केट (बजाज चौक) च्‍या पाठीमागे रोडवर, वर्धा अर्बन बँकेच्‍या समोरील रोडवर , शास्‍त्री चौक ते पँथर चैाक ते जयभीम चौक कडे जाणा-या राष्‍ट्रभाषा रोडवर उभे राहू शकतात.
          जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार यांनी  आज जारी केलेल्‍या  अधिसूचनेची अंमलबजावनी  दिनांक 1 सप्‍टेंबर 2012  पासून करण्‍यात येत असून, या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असेही या अधिसुचनेत स्‍पष्‍ट केले आहे.
                                                0000000       

Wednesday, 22 August 2012

पीक संरक्षणासाठी ऑनलाईन किड नियंत्रण


          
              चक्रीभुंगा व उंट अळी पासून सोयाबीन सांभाळा

          वर्धा, दि. 22 -  सोयाबीन व कापूस या दोन महत्‍वाच्‍या  पिकांवर येणा-या किड रोगाचे  नियंत्रण करण्‍यासाठी  जिल्‍ह्यात  विशेष प्रकल्‍प राबविण्‍यात येत असून पिकांवरील किडीबाबत निरीक्षण  ऑनलाईन पध्‍दतीने  संकलीत करण्‍यात येवून त्‍यावर नियंत्रणासाठी  विशेष उपाययोजना  करण्‍यात  येत असल्‍याची माहिती  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी आज दिली.
         वर्धा जिल्‍ह्यात सुमारे 1 लाख 70  हजार 104 हेक्‍टर   क्षेत्रावर सोयाबीन, तर 1 लाख 85 हेक्‍टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी  पूर्ण झाली आहे. पिकांना  आवश्‍यक असणारा समाधानकारक पाऊस झाल्‍यामुळे पिकांची  वाढही समाधानकारक असून, जिल्‍ह्यातील देवळी, कारंजा, सेलू , वर्धा , आदी तालुक्‍यात त उंट अळी व चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव वाढत असून त्‍यावर  तातडीने नियंत्रण करणे आवश्‍यक  आहे.
       पिकांवरील किड नियंत्रणासाठी जिल्‍ह्यात  27 स्‍काऊट  आणि तीन  किड नियंत्रकाची नेमणूक करण्‍यात आली असून, प्रत्‍येक आठवड्यामध्‍ये  32 ठिकाणी  पिकांच्‍या  किडीबाबत प्रत्‍येक स्‍काऊट निरीक्षण घेऊन त्‍याचा अहवाल  ऑनलाईन  पध्‍दतीने बुधवार व शनीवारी कृषि विद्यापिठाला पाठविल्‍या जातो. प्रत्‍येक आठवडयात  जिल्‍ह्यातून 864  निरीक्षणे घेतल्‍या जातात. त्‍यानुसार विद्यापिठाकडून  सुचविण्‍यात आलेल्‍या  किड नियंत्रणची माहिती  8 हजार    शेतक-यांना  एसएमएस व्‍दारे पाठविली जाते.
          किड नियंत्रणाबाबत या आठवड्यात मिळालेल्‍या निरीक्षणानुसार  उंट अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकांवर  दिसुन आला असून शेतक-यांनी  सतर्क राहून  त्‍याचे नियंत्रण करणे आवश्‍यक आहे. उंट अटीमुळे आर्वी तालुक्‍यातील कारंजा, पाचोड, सोरटा, विरुळ, देवळी तालुक्‍यातील अडेगाव, अंदोरी, आंजी , बोपाकूर, खर्डा, दापोरी, गणेशपूर, गौळ, गिरोली , काजळसरा, मोमीनपुरा, पाथरी , पिंपळगाव (लुटे), सोनेगाव. कारंजा तालुक्‍यातील धर्ती, संसधर, ठाणेगाव, सेलू तालुक्‍यातील आमगाव, हमदापूर, हिवरा, जंगलपूर, जोगापूर, मोर्चापूर, सेलडोह.
वर्धा तालुक्‍यातील  बोरगाव, सावरी, दिग्रस, गणेशपूर, गोंदापूर, कारला, करंजी, कांजी, मदनी, महाका, नारायणपूर, साखरा, तरोडा, उमरी मेघे, वाठोडा, येनकापूर, झाडगाव या गावामध्‍ये उंट अळीचे नियंत्रण तातडीने करणे आवश्‍यक आहे.
                                                                            
 असे करा नियंत्रण
          सोयाबीन व कापूस पिकावरील किड नियंत्रणासाठी शेतात पक्षांना बसण्‍यासाठी पक्षी  थांबे  तयार करावेत. यावर बसणारे पक्षी शेतावर बसणा-या अळ्या टिपून खातात. तसेच  प्रकाश सापळ्यांचा नियंत्रीत उपयोग करुन किडीचे पतंग नष्‍ट करावे. शेतामध्‍ये  कामगंद सापळे हेक्‍टरी  दहा सापळे लावावे.
        किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्‍यास  किटकनाशकांचा वापर करावा. यामध्‍ये  क्विनालफॉस , क्‍लोरोपायरीफॉस, इमामेक्‍टीन  बेन्‍झाएट, स्‍पीनोसॅड, थायोडीकार्ब, प्रोफेनोफॉस, बिव्‍हेरीया बॅसियाना चा वापर करावा.
      चक्रीभुंगा या किडीसाठी  डायमथोएट किंवा थेनव्‍हॅलरेट , प्रायजोफास्‍ट यापैकी   एका किटकनाशनाचा प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळवून फवारणी करावी. पावरस्‍प्रे फवारणी करावयाची असल्‍यास किटकनाशकांची मात्रा तिप्‍पट करावी.
            सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा ही महत्‍वाची किड आहे. या किडीचा मादीभुंगा पाणाच्‍या फांदीवर किंवा मुख्‍य खोडावर एकमेकापासून 1 ते दीड सें.मी. अंतरावर दोन गोल काप करुन त्‍यात अंडी टाकतो. त्‍यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुटतो. अंड्यातून निघालेली अळी पाणाचे देठ व फांदीतून आत जाते. या किडीचा प्रादुर्भाव मुंग, उडीद, बरबटी या पिकावर सुध्‍दा होऊ शकतो. या किडीमुळे उत्‍पादनही मोठ्या प्रमाणात घटते.
           पिकावरील  उंटअळी  आणि चक्रीभुंगा किडीचे नियंत्रण करण्‍यासाठी तांत्रिक माहिती  शेतक-यांनी  तालुका कृषि अधिकारी अथवा मंडळ अधिकारी यांचेकडून घ्‍यावी. व शेताततील पिकांचे संरक्षण करण्‍यासाठी  प्राधान्‍याने उपाययोजना करावीत, असे आवाहनही जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहे ब-हाटे यांनी केले आहे.
                                                  00000