Monday, 23 July 2012

वर्धा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस



वर्धा, दिनांक 24 : वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस पडत असून, मागील 24 तासात जिल्ह्यात एकूण 81.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस समुद्रपूर तालुक्यात 26.1 मि.मी. पाऊस झाला आहे.
       जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
       वर्धा- 4.1 मि.मी.(246.2), सेलू-2 मि.मी.(219), देवळी-3.6 (205), हिंगणघाट-23 मि.मी.(360), आर्वी-10 मि.मी.(343),
आष्टी 9.2 मि.मी.(155.8), समुद्रपूर-26.1मि.मी.(416.1),
आणि कारंजा-3.4( 238.1)मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 260.5 मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.
                                  0000000

वर्धा जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस


       वर्धा, दिनांक 23 : वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात एकूण 177.07 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हिंगणघाट तालुक्यात 52 मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात 50.3 मि.मी. पाऊस झाला आहे.
       जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
       वर्धा-12 मि.मी.(242), सेलू-6 मि.मी.(117), देवरी-17.08 (201.04), हिंगणघाट-52 मि.मी.(337), समुद्रपूर-50.3मि.मी. (390), आष्टी 12.06 मि.मी.(146.06), आर्वी 15 मि.मी.(333) आणि कारंजा-12 ( 234)
                                  ***

Saturday, 21 July 2012

जे.पी.डांगे यांचा दौरा


      
वर्धा, दि.21- महाराष्‍ट्राचे  वित्‍तीय  समितीचे सभापती जे.पी.डांगे यांचे 25 जुलै 2012 रोजी सायंकाळी 6 वाजता वर्धा विश्राम गृह येथे आगमन.
            दि. 26 जूलै 2012 रोजी सकाळी 10 वाजता जिल्‍हा आणि इतर अधिकारी व मुख्‍याधिकारी,सर्वच जिल्‍ह्यातील न.पा. चे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, सभापती (पुलगांव सोडून ) यांच्‍याशी चर्चा, दुपारी 12 वाजता  जिल्‍हा नियेाजन समितीचे अधिकारी यांच्‍या  सोबत बैठक, 3.30 वाजता जिल्‍हा परिषद वर्धेला भेट व मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी, तसेच जि.प.अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष व इतर समित्‍यांच्‍या सभापती सोबत चर्चा करतील. त्‍यानंतर आष्‍टीकडे प्रयाण. आष्‍टी येथे मुक्‍काम राहील.
            दि. 27 जुलै 2012 रोजी सकाळी  11 वाजता आष्‍टी पंचायत समितीला भेट. संवर्ग विकास अधिकारी व इतर अधिका-यासोबत चर्चा, तसेच इतर समित्‍याचे अध्‍यक्ष आणि सभापती यांच्‍याशी चर्चा. आष्‍टीतील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांच्‍याशी चर्चा  करुन  दुपारी 1.30 वाजता अंतोरा ग्राम पंचायत कार्यालयाला भेट व त्‍यानंतर अकोला कडे प्रयाण व अकोला येथे मुक्‍काम राहील.
                                                            0000000

वनश्री पुरस्‍कारासाठी 31 ऑगस्‍ट पर्यंत प्रस्‍ताव पाठवा सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन


               वर्धा, दि. 21- सामान्‍य  जनतेमध्‍ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबाबत आस्‍था निर्माण व्‍हावी आणि याबाबत जिल्‍ह्यात ज्‍यांनी उल्‍लेखनीय कामगिरी बजावली आहे त्‍यांच्‍या कार्याचा गौरव व्‍हावा या उद्देशाने वनश्री पुरस्‍कार  शासनाकडून देण्‍यात येतो.
त्‍यानुसार  वनेत्‍तर  क्षेत्रात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन या कामांमध्‍ये उत्‍कृष्‍ट कामगिरी बजाविणा-या व्‍यक्ति व संस्‍था यांना दरवर्षी वनश्री पुरस्‍कार देवुन गौरविण्‍यात  येत असते. दिनांक 27 जुन 2011 च्‍या शासन निर्णयानुसार आता या पुरस्‍काराचे नावात बदल करुन ते छत्रपती शिवाजी  महाराज वनश्री   पुरस्‍कार करण्‍यात आले आहे.
यापूर्वी देण्‍यात  आलेल्‍या   पुरस्‍काराच्‍या धर्तीवरच सन 2011 करीता छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कार  देणेकरीता वनेत्‍तर क्षेत्रावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे कामात कार्यरत असणा-या व्‍यक्ति व संस्‍थाकडून  प्रधान मुख्‍यवनसंरक्षक व महासंचालक, सामाजिक वनीकरण महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांच्‍या कार्यालयामार्फत प्रस्‍ताव मागविण्‍यात आले आहेत.
             या अंतर्गत देण्‍यात येणारे पुरस्‍कार महसुल विभाग स्‍तर आणि राज्‍यस्‍तर अशा दोन वेगवेगळ्या स्‍तरावर देण्‍यात येतात. प्रत्‍येक स्‍तरावर व्‍यक्‍ती , ग्रामपंचायत , शैक्षणिक संस्‍था , सेवाभावी संस्‍था, ग्राम, विभाग किंवा जिल्‍हा अशा पाच वेगवेगळ्या संवर्गात पुरस्‍कार देण्‍यात येतात. महसुल विभाग स्‍तरावर वरील प्रत्‍येक संवर्गात दोन  पुरस्‍कार देण्‍याची तरतुद असुन प्रथम पुरस्‍कार रुपये 25000 तर व्दितीय पुरस्‍कार रुपये 15000 रक्‍कमेचा आहे. राज्‍यस्‍तरावर वरील प्रत्‍येक संवर्गात  तीन पुरस्‍कार देण्‍याची  तरतुद आहे. यापैकी  प्रथम पुरस्‍कार रुपये 50,000, व्दितीय पुरस्‍कार रुपये 40,000 तर तृतीय पुरस्‍कार रुपये 30,000 असे दिल्‍या जाणा-या पुरस्‍कारांचे स्‍वरुप आहे.
            पुरस्‍कार  मिळण्‍यासाठी इच्‍छुक असणा-या व्‍यक्ति, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्‍था व सेवाभावी संस्‍था यांनी रोपवाटिका व रोपनिर्मितीचे काम केलेले असावे. त्‍यांनी शास‍कीय  किंवा सामुहिक अथवा खाजगी जमिनिवर सरपन किंवा वैरण देणा-या झाडांची लागवड केलेली असावी. त्‍यांनी वृक्ष अलागवडीचे कार्यक्रमात  ग्रामीण  दुर्बल घटकांचा तसेच महीलांचा  सहभाग घेतलेला असावा. त्‍यांनी वनीकरणाच्‍या माध्‍यमातुन शाळकरी विद्यार्थी व महिला यांचे कल्‍याणार्थ कार्य केलेले असावे, अपारंपारीक उर्जा सत्रोतांचा वापर करणेसाठी जनतेला प्रोत्‍साहीत किंवा प्रवृत्‍त करणारे त्‍यांचे काम असावे, वनीकरणाच्‍या संबधात जनजागृती किंवा प्रसिध्‍दी व प्रेरणा देणेबाबत सुध्‍दा काम त्‍यांनी केलेले असावे.                       
जिल्‍ह्यात वनेत्‍तर क्षेत्रात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्‍या कार्यात दिनांक   31 डिसेंबर 2011 पर्यंत मागील 3 वर्षापासून कार्यरत असणा-या आणि या पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव सादर करण्‍यास इच्‍छुक असणा-या व्‍यक्ति, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्‍था व सेवाभावी संस्‍था यांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येत प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी नागरिकांना आणि संस्‍थांना उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग वर्धा यांचेकडून करण्‍यात येत आहे. परिपुर्ण प्रस्‍ताव सादर करणेसाठी  प्रस्‍तावाचा नमुना आणित्‍या अनुषंगाने आवश्‍यक माहिती  प्राप्‍त  करुन घेण्‍यासाठी वर्धा  जिल्‍ह्यातील व्‍यक्ति, शैक्षणिक संस्‍था, सेवाभावी संस्‍था, ग्रामपंचायत इत्‍यादी यांनी उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचे बॅचलर रोड स्थित कार्यालय आणि तालुक्‍याचे मुख्‍यालयी असलेल्‍या लागवड अधिकारी यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्‍याची विनंती उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग वर्धा यांचेकडून  करण्‍यात येत आहे.
            या पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव सादर करण्‍यास इच्‍छुक असणा-या व्‍यक्ति किंवा संस्‍था यांनी त्‍यांचा विहीत प्रपत्रातील प्रस्‍ताव योग्‍य पुर्ततेसह दिनांक       31 ऑगस्‍ट  2012 पर्यंत उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचेकडून  करण्‍यात येत आहे.
                                                             000000

उन्‍हाळी हंगामाकरीता भाडेपट्टीवर देण्‍यासाठी अर्ज आमंत्रित


वर्धा, दि. 21- उर्ध्‍व वर्धा जलाशयाच्‍या बुडीत क्षेत्राच्‍या काठाभोवतीची 342.50 मी. ते 343 मीटर तलांकातील अमरावती जिल्‍ह्यातील 298.22 हेक्‍टर व वर्धा जिल्‍ह्यातील 30.60 हे. गाळपेर जमिन रब्‍बी हंगामात व तलांक 340 मीटर ते 342.50 मीटर मधील अमरावती जिल्‍ह्यातील 806 हेकटर व वर्धा जिल्‍ह्यातील 53 हेक्‍टर जमिन दरवर्षी उन्‍हाळी हंगामा करीता उपलब्‍ध होऊ शकते.
            पुढील अग्रक्रमाने गाळपेर जमिन भाडेपट्टीवर देण्‍याकरीता अर्ज मागविण्‍यात येत आहे.
ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या जमिनीचे नवीन जलाशय, उत्‍प्‍लव बांध, धरण इतयादी बांधण्‍यासाठी संपादीत केलेली आहे किंवा कोणत्‍याही शासकीय प्रकल्‍पामुळे अथवा कोणत्‍याही स्‍थानिक प्राधिकरणाच्‍या प्रकल्‍पामुळे ज्‍यांना बाधा पोहोचलेली आहे अशा व्‍यक्‍ती.  स्‍थानिक भुमिहीन, मागासवर्गीयांच्‍या सहकारी संस्‍था, ज्‍यामध्‍ये बहुसंख्‍य मागासवर्गीय सदस्‍य आहेत अशा मागासवर्गीय आणि मागास वर्गीयेतर स्‍थानिक भूमिहीन व्‍यक्‍तीच्‍या सहकारी संस्‍था. स्‍थानिक भुमिहीन व्‍यक्‍तीच्‍या सहकारी संस्‍था, स्‍थानिक भुमिहीन मागास वर्गीय लोक, इतर वगा्रतील स्‍थानिक भुमिहीन लोक, जेथे गाळपेर जमिनी आहेत त्‍या गावाच्‍या बाहेरील भूमिहीन लोक व उपरनिर्दिष्‍ट लोकांव्‍यतिरिक्‍त इतर स्‍थानिक भूमिधारक परंतु खंड (एक) मध्‍ये विनिर्दिष्‍ट केलेल्‍या  व्‍यक्‍तीपैकी अर्ज करण्‍यासाठी पात्र असतील.
वरील प्रमाणे उपलब्‍ध होणारी गाळपेर जमिनीची मौजे व शेत सर्व्‍हे व मुळ मालक निहाय यादी व रु. 20 च्‍या स्‍टँम्‍पेपरवर करावयाचा करारनामा व अर्जाचे प्रारुप उपविभागीय अभियंता, उर्ध्‍व वर्धा धरण उपविभाग क्र. 2 मोशी येथे उपलब्‍ध आहे. त्‍याप्रमाणे आपला प्रारुप अर्ज व करारनामा  उपविभागीय अधिकारी, उर्ध्‍व वर्धा  धरण उपविभाग क्र. 2 मोर्शी येथे दि. 30 जूलै 2012 पर्यंत द्यावा. वरील अग्रक्रमानुसार पात्र लाभार्थींना प्रत्‍येक कुटुंबाला जास्‍तीत जास्‍त 1.20 हेक्‍टर जमिन भाडेपट्टीवर देण्‍यात येईल. परंतु कुटूंब प्रमुख हा जर सहकारी संस्‍थेचा सदस्‍य असेल तर त्‍यास मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्‍या कलम -6 मध्‍ये ठरवुन दिलेलया निर्वाहक क्षेत्राच्‍या मर्यादेस अधिन राहुन जास्‍तीत जास्‍त 1.6 हेक्‍टर इतकी जमीन देता येईल. भाडेपट्टीचा दर हा महाराष्‍ट्र शासन जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि. 14 जुलै 2006 अन्‍वये एका वर्शा दोन पिके घेतली गेल्‍यास प्रती हेक्‍टरी  रु. 2000 प्रती 11 महिण्‍यासाठी व एका वर्षात एकच पिक घेतले गेल्‍यास  प्रति हेक्‍टरी रु. 1000 प्रति 11 महिण्‍यासाठी भरणे आपणास अनिवार्य राहील. असे कार्यकारी अभियंता, उध्‍व्र वर्धा धरण विभाग, अमरावती कळवितात.
                                                            0000000

Friday, 20 July 2012

16 लाख 96 हजार रोपांची वृक्षबँक सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम 2 लक्ष 22 हजार 726 कडूनिंबाची रोपे


                           
        वर्धा, दि.20-  सामाजिक वनीकरण विभागाने  शतकोटी  वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍ह्याचे उद्दिष्‍ट  पूर्ण करण्‍यासाठी  16 लक्ष 96 हजार रोपांची  वृक्षबँक तयार केली  आहे. महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष बँक सज्‍ज झाली असून, जिल्‍ह्यातील  सर्व शासकीय व निमशासकीय संस्‍थांना  त्‍यांच्‍या आवश्‍यकतेनुसार वृक्ष लागवडीसाठी  रोपे  सामाजिक वनीकरण विभागाकडे  उपलब्‍ध आहेत.
            सामाजिक वनीकरण विभागातर्फे जिल्‍ह्यात 8 रोपवाटीका  विविध प्रजातींच्‍या रोपांचे  संगोपन व संरक्षण करण्‍यासाठी  सज्‍ज असून  100 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाला 12 लक्ष रोपे तयार करण्‍याचे उद्दिष्‍ट  देण्‍यात आले होते. परंतु या विभागाने 13 लक्ष 45 हजार रोपे तयार केली आहे. मागील वर्षी लागवड केलेले  यामध्‍ये  4 फुटापेक्षा जास्‍त उंचीचे 64 हजार 228 तर लहान 2 लक्ष 87 हजार 223 अशी एकूण 3 लक्ष 51 हजार 451  रोपांचा यामध्‍ये समावेश आहे. जिल्‍ह्यात वृक्षारोपन  करण्‍यासाठी  उत्‍सुक असलेल्‍या  सर्वांनाच  त्‍यांच्‍या मागणीनुसार वृक्ष उपलब्‍ध असल्‍याची माहिती  सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक  प्रविणकुमार  बडगे यांनी दिली.
            सामाजिक वनीकरण विभागाकडे 62 प्रजातींची  उंच व लहान अशी  16 लक्ष 96 हजार 451 रोपे विक्रीस उपलब्‍ध असून, यामध्‍ये कडूनिंबाच्‍या  प्रजातीची  2 लक्ष 22 हजार 726 रोपांचा समावेश आहे. विभागात  एवढ्या मोठ्या प्रमाणात कडूनिंबाची  वृक्ष असलेली  सामाजिक वनीकरण  विभागाची  ही वृक्ष बँक आहे.
            शतकोटी  वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत  सामाजिक वनीकरण 12 लाख रोपे  तयार करायचे असून  याच कार्यक्रमामध्‍ये 1 कोटी  89 लक्ष रुपये लावण्‍याचे उद्दिष्‍ट देण्‍यात आले आहे.  या विभागाच्‍या  8 रोपवाटीकेमध्‍ये 9 लक्ष 10 हजार लहान रोपे तर 1 लक्ष 90 हजार मोठी रोपे तयार करण्‍यात आली आहे. यामध्‍ये औद्योगिक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीकेतील 9 हेक्‍टर परिसरात सुमारे 3 लक्ष 50 हजार वृक्ष बँक असून  यामध्‍ये सुमारे 15 हजार  कडूनिंबाची  रोपे तयार करण्‍यात आली आहेत. महात्‍मा गांधी  रोजगार हमी योजने अंतर्गत ही वृक्षबँक तयार करण्‍यासाठी  6 लक्ष 95 हजार 952 रुपये खर्च करण्‍यात आले आहे. येथे 26 प्रकारच्‍या  प्रजातींचे वृक्ष आहेत.  
            केळझर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीकेमध्‍ये  30 प्रजातीची 2 लक्ष 25 हजार 165 रोपे तयार करण्‍यात आली असून, यामध्‍ये  52 हजार 537 कडूनिंबाची रोपे वृक्षारोपनासाठी सज्‍ज आहेत. यासोबतच गुलमोहर, अमलतास, कॅसीया , बीहाडा, साग, बकुळ, सिताफळ, करंजी, आवळा, महारुख , सिरस बांबू, जांभूळ आदी विविध प्रकारच्‍या प्रजातींचा समावेश आहे.  
                                    मातृवृक्षाचे संगोपन
            सामाजिक वनीकरण विभागातर्फे  केळझर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्‍यवर्ती  रोपवाटीकेमध्‍ये मातृवृक्षाचे बँक तंयार करण्‍यात आली असून, यामध्‍ये 26 प्रजातींची सुमारे 150  रोपे  लावण्‍यात आली आहेत. औषधी गुणधर्मासह  दुर्मिळ अशा  डिकेमाली, चित्रक, टेटू, बिबा, गुगुळ, आल, पारड, चारोळी, खिरणी, वायवरण, विकसा, करु, रिठा, बकुळ, मोठा बेल, पळस, मोह आदी प्रजातींचा समावेश आहे.
            पर्यावरणाला पोषक असणा-या  तसेच दुर्मिळ अशा रक्‍तचंदनाच्‍या वृक्षांचे संगोपन करुन  ती झाडे सामाजिक वनीकरण व्‍दारा रोपवाटीकेत लावण्‍यात आली आहेत. रक्‍तचंदनासह   पिवळा धोतरा ,पुतरनजिवा आदी वृक्षांचे संगोपनही येथे करण्‍यात आले आहे. बकुळ वृक्षांची बँक मोठ्या मेहनतीने  फुलविण्‍यात आली असून, नागपूरच्‍या  उच्‍च न्‍यायालयाचे परिसरात असलेल्‍या बकुळांच्‍या झाडांच्‍या बिया गोळा करुन त्‍याचे रोपात रुपांतर करुन सामाजिक वनीकरण विभागाने  बकुळ झाडे रोपवाटीकेत सजविलेली आहेत.  सामाजिक वनीकरण विभागाचे  वृक्षबँक तयार करण्‍यासाठी  उपसंचालक, प्रविणकुमार बडगे यांच्‍या मार्गदर्शनाखाली  लागवड अधिकारी  के.एम.मेंढे, श्री.चाचरकर,केळझरचे किशोर तडवीकर, ए.एन.पाकोजवार, आर्वी व आष्‍टी येथे ए.बी.सरदार , हिंगणघाट व देवळी  येथील ए.एन.देवतळे , वर्धा येथील एम.के. रघुवंशी हे विशेष परिश्रम घेत आहेत.
                                                            0000000

Thursday, 19 July 2012

सरी वरंभा पध्‍दतीने पिकांना मिळाले जीवनदान कृषी आयुक्‍तांकडून कपाशीच्‍या पिकांची पाहणी


         वर्धा, दि. 19 – सरी वरंभा पध्‍दतीमुळे कपाशी व इतर पिकांना आवश्‍यकतेनुसार पाणी तसेच शेणखत, रासायनिक खते व पाण्‍याची बचत होत  असून  पीक चांगल्‍या पध्‍दतीने  घेणे  सुलभ होत असल्‍यामुळे  शेतक-याने  सरी वरंभा पध्‍दतीनेच  शेतीचे उत्‍पादन घ्‍यावे असे आवाहन  राज्‍याचे  कृषी आयुक्‍त  उमाकांत  दांगट यांनी केले आहे.
            देवळी तालुक्‍यातील  कापसासह विविध पिकांची पाहणी  कृषि आयुक्‍त श्री. दांगट यांनी केली. त्‍यावेळी शेतक-यांशी संवाद साधतांना  ते बोलत होते. यावेळी  कृषि सहसंचालक डॉ. जे.सी.भुतडा, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, कृषि अधिकारी निगोट, श्री. उघाडे, श्री. कऊटकर आदी यावेळी उपस्थित होते.
       प्रगतीशील शेतकरी श्री. राऊत यांच्‍या शेताला विदर्भ सिंचन प्रभावी कार्यक्रमाअंतर्गत रुंद वरंभा व सरी या पध्‍दतीने कपाशीची लागवड करण्‍यात आली आहे.  अपुरा पाऊस पडत असला तरी  या पध्‍दतीने  कपाशीच्‍या  झाडांना  आवश्‍यकतेनुसार  पाणी उपलब्‍ध होत असल्‍यामुळे कपाशीच्‍या झाडांची वाढ  अपेक्षेनुरुप  आहे. सरी वरंभा पध्‍दतीमुळे शेणखत, रासायणीक खत, पाणी याची बचत होत असून  भूगर्भात  पाणीसुध्‍दा  साठविण्‍यास मदत होत आहे.
            कपाशीच्‍या  पांढ-या मुळांची  संख्‍या मोठ्या प्रमाणात वाढून उत्‍पादनामध्‍ये निश्चितच  वाढ होणार असल्‍याची  माहिती  शेतक-यांनी  यावेळी आयुक्‍तांना दिली. खताची कार्यक्षमता, पाणीयोग्‍य वापर, तणांचे नियंत्रण शक्‍य झाले असल्‍याने शेतक-यानेही  रुंद सरी  वरंभा पध्‍दतीनेच आपली शेती करावी  असे सांगून  पुढील वर्षी सुध्‍दा जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी  या पध्‍दतीने  कपाशीची लागवड  करावी यासाठी अनुदानांवर बेडमेकर पुरविण्‍याबाबतही  श्री. दानगट यांनी शेतक-यांशी संवाद साधतांना सांगितले.
            सोनेगाव आबाजी येथील ज्ञानेश्‍वर  वासुदेव चोरे या शेतक-यांनी सरी वरंभा पध्‍दतीवर  ठिंबक संचाचा वापर करुन कपाशीची लागवड केली आहे. त्‍यामुळे पिकांना उपयुक्‍त अशा खतांचा व औषधांचा वापर सुलभ झाले असून, जास्‍त पावसामुळे पाण्‍याचा योग्‍य निचरा होऊन कपाशीचे नुकसान टाळता येणे शक्‍य झाल्‍याची माहिती  ज्ञानेश्‍वर चोरे यांनी कृ‍षी आयुक्‍तांना दिली.
      आत्‍मा अंतर्गत 50 टक्‍के अनुदानावर  मानवचलीत बियाणे  टोकन यंत्राचे वाटप करण्‍यात आले असून, प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये  12 अवजारे वाटप करण्‍यात आले आहे. या अभिनव उपक्रमाची  माहितीही कृषी आयुक्‍तांनी  घेतली. प्रारंभी  अधिक्षक कृषि अधिकारी  भाऊसाहेब ब-हाटे यांनी स्‍वागत करुन  जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली.
                   ब्राझील पॅटर्नने  कपाशीची लागवड
    देवळी तालुक्‍यातील  नागझरी  येथील  मोहन राऊत यांच्‍या शेतात ब्राझील पॅटर्न नुसार लावण्‍यात आलेल्‍या  कपाशीच्‍या  प्रात्‍यक्षिक  शेतीला  कृषि आयुक्‍त उमाकांत दांगट यांनी  भेट देऊन पाहणी केली.
          कृषि विभागातर्फे कपाशी पिकाची  उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी कपाशी  धन लागवड व देशी वानांची लागवड तंत्रज्ञान (ब्राझील पॅटर्न) चा  उपक्रम राबविण्‍यात येत आहे. देशी वानांचा वापराला प्रोत्‍साहन  देण्‍यासाठी सात शेतक-यांना  प्रात्‍यक्षिक अनुदानावर  प्रोत्‍साहन  देण्‍यात आले आहे.  या उपक्रमा अंतर्गत पिकांचे  किड व रोग व्‍यवस्‍थापन  या संदर्भात मार्गदर्शन करुन  बी.टी. कपाशीचा वाढता उत्‍पादन खर्च कमी करुन  देशी वानाला  प्रोत्‍साहन देण्‍याचा प्रयत्‍न  या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत आहे. प्रात्‍यक्षिकाच्‍या  सर्व निविष्‍ठा शेतक-यांना देण्‍यात आल्‍या आहेत.
              देशी वानाच्‍या  लागवड तंत्रा अंतर्गत नागझरी येथील मोहन राऊत यांच्‍या 1.80 हेक्‍टर  क्षेत्रात हा उपक्रम राबविण्‍यात आला आहे. या उपक्रमाची  पाहणी करण्‍यासाठी  कृषि आयुक्‍त श्री. दांगट यांचेसह विभागीय कृषि  सहसंचालक जे.सी. भुतडा, भाऊसाहेब ब-हाटे, कृषि अधिकारी संतोष डाबरे आदी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

                                                            00000