Thursday, 19 January 2012

मुलींना द्या आत्मसंरक्षणाचे शिक्षण.. !



  महिलांची व मुलींची छेडछाड करणारे अनेक चिडीमार समाजात वावरताना दिसतात. मुलींना समाजात सुरक्षितपणानं रहायला समाज सुसंस्कृत होणं जितकं गरजेचं आहे तितकीच सिध्दता महिलांनीही करुन आत्मसंरक्षण शिकलं पाहिजे.                                                -प्रशांत दैठणकर
    
     आपण वर्तमानपत्र उघडल्यावर रोज महिलांवर अत्याचार आणि मुलीची छेडछाड झाल्याच्या बातम्या वाचतो अद्यापही समाज पूर्णपणे सुसंस्कृत झालेला नाही गुन्हेगारी वृत्तीने फिरणा-या संकटांमुळे महिला व मुलींना घराबाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागतो. यात बदल व्हावा यासाठी समाज या नात्याने आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच समाज सुधारेल या अपेक्षेवर न राहता महिला व मुलींनी आत्मसंरक्षण तंत्र शिकलेच पाहिजे.
     आपण आपल्या संरक्षणासाठी सज्ज राहणं खूपच चांगलं अनेक प्रकारात भितीपोटी मुली बोलत नाहीत. शाळेतील विद्यर्थी किंवा शाळेतून जाताना-येताना कुणी त्रास देत असेल तर ते मुलींनी पालकांना जरुर सांगावे. समस्या निर्माण झाल्यावर त्वरित उपाय योजना केल्यास पुढे मोठी होणारे संकट आपण टाळू शकतो.
     अनेक ठिकाणी शाळांमधून शिक्षक मुलीची छेड काढतात अशा घटना घडल्या आहेत. आपण आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवला तरच पाल्य अशा गोष्टी आपणास सांगतील याची जाणीव आपण ठेवावी.
     वयात येणा-या अर्थात किशोरवयीन मुलींना अनेक समस्यांना एका वेळी सामोरं जावं लागतं. या काळात ज्युदो, कराटे, किंवा ताइक्वोंदो अशापैकी एक मार्शल आर्ट शिकविल्यास त्यांना स्वत:चे रक्षण करता येईल या प्रकारच्या आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण आपण जबाबदारीने जरुर द्यावे. शाळांनीही अशा प्राकरचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
     महिलांनी सुरक्षेसाठी आपल्या पर्स मध्ये काळया मि-यांची पावडर ठेवण्याची पध्दत पाश्चात देशात आहे. अशा पावडरचे स्प्रे बाजारात उपलब्ध असतात बहुतप्रसंगी संकटात या स्प्रेचा वापर होतो असं अनेकदा सिध्द झालेलं असल्याने तसा सुरक्षेचा उपाय जरुर करावा.
     महिलांवर केवळ छेडखानी अर्थात चिडीमारीसाठी हल्ला होतो असे नाही. झटपट श्रीमंत होण्याच्या नादापायी दागिने पळविणारे गुन्हेगार देखील हल्ला करतात. सार्वजनिक ठिकाणी आपल्या सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करु नका असा कितीही सल्ला दिला तरी महिलावर्गाला दागिन्यांची आवड असते त्यामुळे मोठया प्रमाणावर चेन स्नॅचिंग चे प्रकार हल्ली घडताना दिसतात तो दागिना महत्वाचा की आपण महत्वाचे याचाही विचार महिलांनी जरुर करावा.
     मोठं महानगर असो अथवा छोटं खेडं, प्रत्येक ठिकाणी ही समस्या कायम दिसते. त्यामुळे मुली व महिलांनी आत्मसंरक्षण जरुर जरुर शिकावं
   -प्रशांत दैठणकर

हक्क मतदानाचा अन् कर्तव्य नोंदणीचे.. !

नविन मतदार नोंदणीसाठी जनजागृती व्हावी या करिता निवडणूक आयोगातर्फे 25 जानेवारी रोजी मतदार दिवस निश्चित करण्यात आला आहे त्याबाबतचा हा खास लेख
                                                  -प्रशांत दैठणकर

     भारतीय संविधानाने भारतात जन्मलेल्या आणि वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला मतदानाचा मुलभूत अधिकारी दिला आहे. 120 कोटी लोकसंख्येचा आपला देश जगातली सर्वात मोठी लोकशाही चालविणारा देश आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांच राज्य अशी लोकशाहीची संकल्पना आहे. त्यात सर्वाधिक महत्वाचा ठरतो तो मतदार. या मतदारांनीच आपला देश कोणी चालवायचा याचा निर्णय घ्यायचा असतो आणि लोकप्रतिनिधी निवड ही मतदार म्हणून तुम्ही-आम्ही करायची असते.
     भारतीय संविधानानुसार जो मूळ रचना आहे त्यानुसार थेट लोकांमधून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी संसदेत जातात. संसदेत लोकप्रतिनिधींची दोन सभागृहे आहे. यात लोकांनी मतदानाने निवडून द्यायचे सभागृह हे लोकसभा असून राज्यांमधील लोकांतर्फे निवडलेल्या प्रतिनिधींनी निवडलेले सदस्य राज्यसभेत बसतात ही संसद हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. लोकांच्या समस्या इथं मांडल्या जातात व यात कायदे करणे तसेच कायद्यांमध्ये आवश्यक बदल करणे आदी कामकाज होते.
     यापैकी लोकसभेत 547 प्रतिनिधी असतात या संख्येच्या निम्म्याहून अधिक सदस्य ज्या राजकीय पक्षाचे असतात त्या पक्षाने आपला नेता पंतप्रधान म्हणून निवडायचा असतो. हा पंतप्रधान मग मंत्रीमंडळाची निवड करतो. या व्यवस्थेला आपण सत्ताधारी म्हणतो.
     संसदेतर्फे करण्यात आलेल्या कायद्यांवर आधारित न्याय निवाडा करण्याचे काम न्याय पालिका करते. सर्वात ज्येष्ठ असे सर्वोच्च न्यायालया त्याच्या अधिपत्याखाली उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये अशी व्यवस्था असणारी न्यायपालिका हा लोकशाहीचा दुसरा स्तंभ होय.
     देशाचे शत्रू देशांपासून रक्षण तसेच अंतर्गत सुरक्षा आणि प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अशी जबाबदारी संरक्षण दलांची असते ही संरक्षण दले हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ होय. समुद्री सैन्य अर्थात नौदल, हवाई दल आणि जमीनीवर लष्कर अशी तीन अंगे या संरक्षण दलांमध्ये आहेत.
     या सर्व तीन स्तंभाची जबाबदारी राष्ट्रप्रमुख या नात्याने राष्ट्रपतीवंर असते. लोकप्रतिनिधी निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती भारत निवडणूक आयोगातर्फे होते ही स्वायत्त यंत्रणा असून याच्या कामावर सरकारचे नियंत्रण अथवा हस्तक्षेप होत नाही.
     निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली की भारतातील सर्व भारतीय शासकीय कर्मचारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात. ज्या पध्दतीने राज्यात आमदार निवडले जातात जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यामध्येही निवडणूका होतात. नगरपालिका, महानगरपालिका यांचेही प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात.
     लोकशाहीत सर्वच टप्प्यांवर या सर्वांमुळेच मतदार महत्वाचा आहे हे जाणून वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्वांनी मतदानाच्या हक्कासाठी मतदार म्हणून नोंदणीचे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे.
- प्रशांत दैठणकर       

हत्तीरोग दूर राखणंच चांगलं.. !

डासांमुळे प्रसार होतो अशा रोगांपैकी एक रोग म्हणजे हत्तीरोग होय. या रोगांमुळे प्राण जात नसले तरी मोठया प्रमाणावर विद्रुपता येत असते. जगातील 12 कोटींहून अधिक जणांना हा रोग झालेला आहे. हत्तीरोग दूरीकरण मोहिमे अंतर्गत जानेवारीच्या तिस-या आठवडयात राज्याच्या 17 जिल्ह्यांमध्ये एक दिवसाच्या सामुहिक औषधोपचार दिवस आयोजित करण्यात येतो याबाबत हा खास लेख
 -प्रशांत दैठणकर


डासांमुळे माणसाला अनेक प्रकारचे आजार होतात. डास हे रक्त शोषून घेतात. त्यांच्या दंशाच्यावेळी त्यांच्या पोकळ दंशिकेमुळे रागांचे विषाणू थेट रक्तात शिरत असल्यामुळे डासांना दूर ठेवणे गरजेचे आहे. डास ज्या आजारांचा प्रसार करतात मलेरिया अर्थात हिवतापाचे प्रमाण अधिक आहे. या खेरीज डेंग्यू सारखा घातक आजार देखील डासांमुळे होतो. हे दोन्ही आजार प्राणघातक ठरु शकतात. तुलनेत कमी तीव्रतेचा पण शरीराला बेढव करणारा हत्ती रोगासारखा आजारही डासांमुळे पसरतो.
     अगदी पाचव्या शतकापासून हत्तीरोग झाल्याच्या नोंदी आपणास सापडतील या रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होत असतो. जगात हत्तीरोगाची तब्बल 12 कोटीहून अधिक जणांना लागण झाली आहे. साठलेले, तुंबलेले पाणी तसेच ढुबके यातून या क्युलेक्स डासांची संख्या वाढत असते.
     पाय खूप मोठया प्रमाणात सुजणे, वारंवार ताप येणे, पुरळ, खाज आणि अंडवृध्दी ही या हत्तीरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराने मोठया प्रमाणात विकृती येते त्यामुळे याचा प्रतिबंध करण्यासाठी हत्तीरोग दूरीकरण मोहिमेत आपल्याला देण्यात येणा-या औषधी सर्वच नागरिकांनी घेणे आवश्यक ठरते.
     या अंतर्गत राज्यात 17 जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या तिस-या आठवडयात सामुदायिक औषधी दिन आयोजित करण्यात येत असतो यात रोगाची गांभीर्य लक्षात घेऊन या मोहिमेत लहान मोठया सर्वानीच या औषधीचे सेवन करायचे आहे. यात जंत साफ करणारी एक अल्बेन्डाझोलची गोळी आणि डिईसीच्या गोळया सर्वांना दिल्या जातात या गोळया घेतल्यानंतर हत्तीरोगाप्रती प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होते.
     आपण प्रतिबंधात्मक उपाय केल्यास या रोगातून येणारे शरिरीक व्यंग आपणास टाळता येईल त्याच सोबत पुढे उपचारांवर वेळ आणि खर्च वाचवता येईल. या खेरिज डासांपासून होणारे आजार टाळण्यासाठी आपण सातत्याने परिसर स्वच्छतेकडे देखील लक्ष दिले पाहिजे.
- प्रशांत दैठणकर

Tuesday, 17 January 2012

जाती वैधता प्रमाणपत्र निवडणूक कार्यालयातून प्राप्‍त करावेत


   वर्धा,दि.17-राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या राखीव प्रभागातुन निवडणूक लढवु इच्छिणा-या मागासवर्गीय उमेदवा-यांच्‍या जाती दावा पडताळणी बाबत लिखीत प्रस्‍ताव सादर केलेला वर्धा जिल्‍ह्यातील उमेदवारांपैकी, ज्‍यांचे प्रस्‍ताव जात पडताळणी समितीने मंजूर केलेले आहे. त्‍यांनी जाती वैद्यता प्रमाणपत्र हे सार्वजनिक निवडणूक विभाग, प्रशासकीय इमारत, जिल्‍हाधिकारी परिसर, वर्धा येथुन प्राप्‍त करावेत.
    तसेच ज्‍या उमेदवारांचे अर्जात त्रृटी आहेत त्‍यांना पत्राव्‍दारे तसेच दुरध्‍वनीव्‍दारे कळविण्‍यात आलेले आहेत. अशा उमेदवारांनी त्रृट्यांची पुर्तता तात्‍काळ करणेकामी आवश्‍यक त्‍या प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्राच्‍या साक्षांकीत प्रतीसह सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण, तथा सदस्‍य सचिव, जिल्‍हानिहाय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, वर्धा यांच्‍या कार्यालयात तात्‍काळ सादर करावेत. जेणेकरुन जाती वैधता प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करणे जिल्‍हानिहाय समितीला सोयीचे होईल. असे आवाहन जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे. असे सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण, वर्धा कळवितात.
                                0000000

Monday, 16 January 2012

रस्‍ता सुरक्षा पंधरवाड्याचा समारोप थाटात संपन्‍न


   वर्धा, दि.16-1 जानेवारी पासून ते 15 जानेवारी 2012 या कालावधीत रस्‍ता सुरक्षा मोहीम पंधरवडा समापनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात येथील पोलीस स्‍टेशन  प्रांगणात संपन्‍न झाला.
     याप्रसंगी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण, एस.टी.चे वाहतूक नियंत्रक पंचभाई व उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पाटील उपस्थित होते.

    याप्रसंगी बोलताना पंचभाई म्‍हणाले की, रस्‍ता  सुरक्षा मोहीम ही समाजाच्‍या कल्‍याणकारी कार्यासाठी मोलाची ठरते. आपल्‍या देशामध्‍ये लोकसंख्‍या बरोबर वाहनाची संख्‍या वाढत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. अपघात होऊ नये यासाठी शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांना व समाजातील प्रत्‍येक घटकांना वाहतूकीचे नियम सांगितले. वाहतुकीच्‍या नियमांचे प्रत्‍येकांनी अंगिकार केल्‍यास अपघाताचे प्रमाण कमी होऊन कौटुंबिक वातावरण सुध्‍दा सुदृढ राहण्‍यास मदत होते. खाजगी प्रवासी वाहने हे सुरक्षिततेची हमी देत नाही तर एस.टी.महामंडळ प्रवाशांना संपूर्ण सुरक्षा देत असल्‍यामुळे प्रवाशांचा ओघ आता एस.टी. महामंडळाकडे वळला आहे असेही ते म्‍हणाले.
      प्रास्‍ताविक करताना चवहान म्‍हणाले की रस्‍ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अनेक लोकाभिमुख अनेक उपक्रम घेण्‍यात आले. त्‍यामध्‍ये विद्यार्थ्‍यांची वत्‍कृत्‍व स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, वाहन धारकांना हेल्‍मेट बंधनकारक करणे, पोष्‍टर काढणे आदींचा समावेश करण्‍यात आला. मानवीय चुकामुळे 70 टक्‍के अपघात होत असतात यासाठी पादचा-यांनी रहदारीचे नियमा सोबत रस्‍ता सुरक्षा विषयीचे नियम आत्‍मसात केले पाहीजे असे आवाहन याप्रसंगी त्‍यांनी केले.
     याप्रसंगी चित्रकला स्‍पर्धकांना पोलीस अधिक्षक अविनाशकुमार यांचे हस्‍ते स्‍मृती चिन्‍हांचे वितरण करण्‍यात आले.
     या कार्यक्रमाचे आभार शशिकांत भंडारे यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या संख्‍येने प्रतिष्‍ठीत नागरीक, विद्यार्थी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                               00000000

ग्रंथोत्‍सवाचा समारोपीय कार्यक्रम थाटात संपन्‍न


     वर्धा, दि.16- ग्रंथोत्‍सवाचा समारोपीय कार्यक्रम मोठ्या थाटात येथील न्‍यु इंग्‍लीश हायस्‍कुलच्‍या  प्रांगणात  (दि.14 रोजी) नुकताच संपन्‍न झाला. याप्रसंगी अध्‍यक्षस्‍थानी  विदर्भ साहित्‍य संघ वर्धा जिल्‍ह्याचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रा. हाशम शेख, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर व ग्रंथपाल सुरज मडावी मंचावर उपस्थित होते.
     
   तीन दिवशीय ग्रंथोत्‍सवाला मोठ्या प्रमाणावर वर्धेकरांनी प्रतिसाद दिला असल्‍याचे सांगून संजय इंगळे तिगावकर म्‍हणाले की, बाल मनावर वाचन साहित्‍य रुजविणे ही काळाची गरजेचे आहे. साहित्‍य  ते कोणत्‍याही स्‍वरुपाचे असो त्‍यापासून समाजाने दूर राहू नये. साहित्‍यामुळे प्रत्‍येकाच्‍या ज्ञानामोलाची भर पडते, साहित्‍यातूनच चांगला माणूस घडत असतो असेही त्‍यांनी सांगितले.
    प्रास्‍ताविक करताना जिल्‍हा माहिती अधिकारी दैठणकर म्‍हणाले की ग्रंथोत्‍सवामुळे प्रत्‍येकांना ग्रंथ प्रदर्शनीला भेट देता आले. तसेच नवनविन साहित्‍यीकांचे ग्रंथ तसेच दूर्मिळ पुस्‍तकांची  खरेदी करता आली. वाचन संस्‍कृती टिकावी हा गंथोत्‍सवामागील हेतू होता. या निमित्‍ताने झालेले कवि संमेलन, कथाकथन, बाल साहित्‍य संमेलन निश्चित ज्ञानात भर पाडणारी होती असेही ते म्‍हणाले.
     या कार्यक्रमाचे संचलन पंकज वंजारे यांनी तर आभार प्रदर्शन मनिष जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने श्रोते उपस्थित होते. 
                        000000 

ग्रंथोत्‍सवातून बाल साहित्‍याचा कला अविष्‍कार


    वर्धा,दि.16- न्‍यु इंग्‍लीश शाळेच्‍या प्रांगणात (दि. 14 रोजी) नुकताच ग्रंथोत्‍सव अंतर्गत बाल साहित्‍याच्‍या कला अविष्‍कारांनी चालणा मिळाली. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्‍यांनी बाल साहित्‍य कार्यक्रमात सहभागी होऊन एक आगळा वेगळा ठसा उमटविला. राजकारण, समाजकारण, अर्थ व सांस्‍कृतिक कलेला जोड देवून अनेक विद्यार्थ्‍यांनी आपण उद्याचे उदयन्‍मुख साहित्‍यीक आहोत याचा परिचय मोठ्या  धैर्याने करुन त्‍यांनी कविता, नाटीका, कथा व गझलचे श्रोत्‍यांपुढे सादरीकरण केले.

     यावेळी सुशिलचंद्र आलेख, प्रभाकर पाटील, संजय इंगळे तिगांवकर व शेख हाशम, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ग्रंथपाल सुरज मडावी मंचावर उपस्थित  होते.    
      याप्रसंगी सुशील हिंम्‍मतसिंगका माध्‍यमिक विद्यालयातील विद्यार्थी शोभवी उदय, इंद्रायणी गावंडे, अपूर्वा औझोकर, आदिती फाये, संघमित्रा पवार, प्रेरणा ढाले, वृषाली अवचट, मोनिका खिल्‍लारे, चैताली ठाकरे ,आकांक्षा राखुंउे, चेतन महंतारे, किशोर तमगिरे, व्‍यंकटेश टेकाडे, शंतनू घुमडे व मुकूल नगराळे . राष्‍ट्र संत तुकडोजी महाराज विद्यालयातील विद्यार्थी सुयोग अवचित, हर्षल कावळे, हर्षल बुरंगी, नेहाल चामटकर, सम्‍यक लोहकरे, मयुर सोनटक्‍के व आकाश उजवणे. साने गुरुजी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पूर्वा गव्‍हाने व अबोली निर्मल, वनश्री कात्रोजवार व जानवी साबळे . स्‍व. जिजामाता सबाने पूर्व माध्‍यमिक विद्यालयाचे अश्‍वीती नाखले, प्रणाली हलगे व प्रतिक कुरवटकर यांचा समावेश होता.
     युवा साहित्‍य संमेलनामध्‍ये मंगेश शेंडे, रेखा जुगनाके, संदिप चिचाटे, चेतन परळीकर, संजय भगत यांनी सामाजिक आशयावर कथा व कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्‍ध केले.
     या कार्यक्रमाचे संचलन पंकज वंजारे व आभार प्रदर्शन मनाष जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
                               00000