Friday, 23 December 2011

शेतक-यांना मदत वाटपाची सुचना


 वर्धा,दि.23-जिल्‍ह्यात सर्व शेतक-यांना सुचित करण्‍यात येते की, मागील जानेवारी 2011 पासुन जिल्‍ह्यात कृषि विभागा मार्फत जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर 2010 या कालावधीत झालेल्‍या  नैसर्गीक आपत्‍तीमुळे पिकांचे नुकसान झाले अशा 50 टक्‍के चे वर नुकसान झालेल्‍या क्षेत्राला मदत वाटपाची कार्यवाही सुरु आहे. जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर नोव्‍हेंबर 2010 या कालावधीत नैसर्गीक आपत्‍तीमुळे 57074.18 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे 50 टक्‍के चे वर नुकसान झाले त्‍या करीता रुपये 27.26 कोटी रुपयाची वाटपा करीता आवश्‍यकता असताना शासनाकडून आतापर्यंत जिल्‍ह्याला वाटपा करीता रुपये 26.31 कोटी रुपये प्राप्‍त झालेत व प्राप्‍त  रक्‍कमेपैकी दिनांक 15 डिसेंबर 2011 पर्यंत रुपये 23.83 कोटी मदत निधीचे वाटप 144723 शेतक-यांना झाले आहे. प्राप्‍त निधीपैकी अजुनही जवळपास रुपये 2.48 कोटी निधीचे वाटप होणे बाकी आहे. 
      ब-याचशा शेतक-यांची जमीन गावात असते परंतु शेतकरी शहरात राहत असल्‍यामुळे त्‍यांच्‍याशी संपर्क न झाल्‍यामुळे त्‍यांचे बँक खाते क्रमांक संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना न मिळाल्‍यामुळे नुकसान भरपाईची रक्‍कम त्‍यांचे बँक खात्‍यात जमा करता आली नाही किंवा काही शेतक-यांनी त्‍यांचे बँक खाते क्रमांक तालुका कृषि अधिकारी कार्यालयास दिले परंतु मागील बरेच वर्षापासून त्‍या खात्‍यात व्‍यवहार होत नसल्‍यामुळे खाते रद्द झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे मोठी रक्‍कम वाटपा अभावी शिल्‍लक आहे.
     जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांना आवाहन करण्‍यात येते की ज्‍या शेतक-यांच्‍या शेती पिकाचे जुलै 2008 ते ऑक्‍टोंबर नोव्‍हेंबर 2010 या कालावधीत 50 टक्‍के चे वर नुकसान झाले व ज्‍यांची नांवे सर्व्हेक्षण अहवाल आहे अशा शेतक-यांनी तात्‍काळ नजिकच्‍या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा गावच्‍या कृषि सहाय्यकाशी दिनांक 31 डिसेंबर 2011 पर्यंत संपर्क करुन आपले बँक खाते पासबुक दाखवुन खाते नंबर नोंद करावा म्‍हणजे त्‍यांचे खात्‍यात नुकसान भरपाईची रक्‍कम जमा करता येईल.दि. 31 डिसेंबर 2011 पर्यंत राहिलेले वाटप पुर्ण करुन शिल्‍लक राहणारी रक्‍कम शासनास परत करण्‍यात येईल. त्‍यानंतर येणा-या शेतक-यांचा हक्‍क राहणार नाही याची नोंद घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.

Thursday, 22 December 2011

रस्‍ते अपघातांची आपत्‍ती ....!

वाहनांचा अपघात ही मानव निर्मित आपत्‍ती आहे. छोट्या बाबी आपण लक्षात घेतल्‍या आणि त्‍यावर अंमलबजावणी सुरु केली तर अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी करु शकतो.                        
आपल्‍या आसपासच्‍या परिसरात कोणकोणत्‍या प्रकारची आपत्‍ती येवू शकते याप्रती आपण सजग राहणे तसेच आपण त्‍या आपत्‍तीतून सुटका करुन घेण्‍याची पूर्वतयारी करणे त्‍याचा सराव करणे व आलेल्‍या आपत्‍तीत प्रत्‍यक्ष काम करणे म्‍हणजे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन होय.
     काही आपत्‍ती आपण टाळू शकतो याची जाणीव आपणास हवी रस्‍त्‍यांवर होणारे अपघात आणि त्‍यात होणारी प्राण व वित्‍तहानी टाळता येते. यासाठी आपण वाहन सुस्थितीत आहे की नाही याची मुळात तपासणी धरुन निघतानाच करावी. वाहनाला ब्रेक व्‍यवस्थित आहे याची खात्री केल्‍याशिवाय वाहन रस्‍त्‍यावर नेऊ नये.
     रस्‍त्‍यावर चारचाकी वाहनात असाल तर आपण सिटबेल्‍ट जरुर लावला पाहिजे. चुकून अपघात झाल्‍याच्‍या  स्थितीत आपल्‍या सुरक्षिततेसाठी ते आवश्‍यक असते. दुचाकी वाहनातही आपण ब्रेक-इंडीकेटर यांची तपासणी व सुयोग्‍य वापर याकडे लक्ष द्यायला हवे. दुचाकी वाहन धारकांनी हेल्‍मेट जरुन वापरावे. यामुळे अपघाताच्‍या स्थितीत प्राणहानीचा धोका टळतो.
     अपघाताला मुख्‍यत्‍वे मानवी चुकाच कारणीभूत ठरत असतात. यात चुकीच्‍या पध्‍दती ओव्‍हरटेक करणे, इंडीकेटर न दाखवता वाहन अचानक वळविणे या खेरीज अति गतीने वाहन चालविणे ही अपघातांची मुख्‍य कारणे आहेत. वाहनाच्‍या  गतीमुळे झालेल्‍या अपघातांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
     वळणे असलेल्‍या रस्‍त्‍यावर वेगात वाहन वळते त्‍यावेळी ते दुस-या बाजूला ओढले जाते. जितकी गती अधिक तितके ओढले जाण्‍याचे प्रमाण अधिक त्‍यामुळे घाटांमध्‍ये अनेकदा अपघात होतात.
     छोट्या छोट्या बाबींमधून आपण अपघाताची ही आपत्‍ती दूर ठेवू शकतो आणि आपण ती ठेवायलाच पाहिजे.
                                     - प्रशांत दैठणकर

26 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन


     वर्धा,दि.22-शासन व ग्राहक चळवळीतील संघटना यांचे संयुक्‍त विद्यमाने दि. 26 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,वर्धा येथे राष्‍ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला आहे.
    कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी जयश्री भोज असून, प्रमुख अतिथी म्‍हणून अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्‍यक्ष आर.बी.सोमानी, जिल्‍हा पुरवठा अधिकारी आर.ए.अनभोरे, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तसेच प्रमुख वक्‍ते म्‍हणून नागपूर विद्यापिठाचे विधी शाखा अधिष्‍ठाता अशोक पावडे, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण  परिषदेचे विदर्भ शाखेचे सचिव अजय भोयर हे मार्गदर्शन करणार आहेत.
     या काकर्यक्रमास बहुसंख्‍येने जनतेने उपस्थित राहण्‍याचे आवाहन तहसिलदार सुशांत बनसोडे, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण परिषदेचे अध्‍यक्ष उशा फाले आणि तालुका ग्राहक पंचायतचे अध्‍यक्ष शिवचरण मिश्रा यांनी केले आहे.
                            00000 

डायल 102



      खास दूरध्‍वनी क्रमांक आपणास हमखास पाठ होतात. जसं पोलिसांना दूरध्‍वनी लावायचा तर 100 हा क्रमांक आहे आणि अग्‍नीशामक दलाचा 101 तसा आता पुढील काळात 102 हा क्रमांक गरोदर माता आणि नवजात बालकांचे आरोग्‍य यासाठी कायमस्‍वरुपी व 24 तास सेवेत उपलब्‍ध राहणार आहे.त्‍याबाबत माहिती देणारा हा लेख.                  - प्रशांत दैठणकर                                                         

     शासनाने गर्भवतींचे मृत्‍यू राखण्‍यासाठी तसेच जन्‍मलेल्‍या बालकांना सदृढपणा यावा ते आजारी होवू नयेत. आजारी पडल्‍यास पूर्ण शासनखर्चाने त्‍यांची काळजी घेता यावी याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत खास दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
     या कार्यक्रमात गरोदर स्त्रियांना प्रसूती साठी तसेच 30 दिवसांपर्यंतच्‍या नवजात आजारी बालकांना मोफत आरोग्‍य सेवा पुरवणे असे ध्‍येय्य ठेवलेले आहे.
     गरोदरपणात, बाळंतपणात व प्रसुती पश्‍चात 42 दिवसांपर्यंत सेवा देण्‍यात येईल. सामान्‍य प्रसुतीसाठी 3 दिवस शस्‍त्रक्रियेव्‍दारे बाळंतपण झाल्‍यास सात दिवसापर्यंत मोफत आहार देण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकीय रुग्‍णालयापर्यंत संदर्भ सेवेसाठी जाण्‍यासाठी तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्र शासकिय
रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. मोफत प्रयोगशाळा तपासण्‍या, रक्‍त पुरवठा व औषधोपचार करण्‍यात येईल. कोणत्‍याही सेवेचे शुल्‍क आकारले जाणार नाही अशी यात सोय आहे.
      30 दिवसापर्यंतच्‍या जनवजात आजारी बालकांसाठी मोफत औषधोपचार करण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत, संदर्भ सेवेसाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत जाण्‍यासाठी तसेच रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, तसेच रक्‍त पुरवठा व प्रयोगशाळा तपासण्‍या, औषधोपचार मोफत करण्‍यात येतील.
     गरोदर माता व नवजात अर्भकांच्‍या तपासण्‍या, उपचार व आहार इतयादी सेवा पूर्णपणे मोफत देण्‍यात येईल. ज्‍यामुळे बाल मृत्‍यू व माता मृत्‍यू कमी होण्‍यास मदत होईल. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथे 24 तास सेवा देण्‍यासाठी कॉल सेंटर सुरु करण्‍यात आले असून त्‍याचा टोल फ्री क्रमांक 102 किंवा (07152)245198 असा आहे. या क्रमांकावर कोणीही कितीही वाजता तात्‍काळ प्रसंगी फक्‍त बाळंतपणाच्‍या माता व अति आजारी बालकांकरीता संपर्क करु शकतात. संपर्क करणा-यांनी पूर्ण नांव, पत्‍ता व जवळची खूण सांगितल्‍यानंतर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाकडून तेथून जवळ असणा-या रुग्‍णालयाची रुग्‍णवाहिका पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. या कार्यक्रमामुळे प्रत्‍येक बालकाची आणि त्‍याच्‍या मातेची अखंड काळजी घेतली जाणार आहे. त्‍यासाठी हा `डायल 102`  लक्षात ठेवायचा इतकच.
-         प्रशांत दैठणकर

पेन्‍शन अदालत


     वर्धा, दि. 22- भारतीय डाक विभाग, वर्धा व्‍दारा दि. 31 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता अधिक्षक, डाकघर कार्यालयामध्‍ये पेन्‍शन अदालत आयोजित करण्‍यात आली आहे.

     पेन्‍शन संबंधीच्‍या ज्‍या तक्रारीचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्‍तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्‍शन अदालत मध्‍ये दखल घेतल्‍या जाईल. तक्रारीचा  उल्‍लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.

     संबधितांनी पेन्‍शन बाबतची आपली तक्रार अधिक्षक, डाकघर, वर्धा यांचे नांवे दिनांक 28 डिसेंबर 2011 अथवा तत्‍पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्‍या  तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रारकर्त्‍यांना पेन्‍शन अदालतीसाठी स्‍वःखर्चाने उपस्थित राहावे लागेल. असे अधिक्षक, डाकघर, वर्धा यांनी कळविले आहे.

उद्योग मित्र समिती सभा


वर्धा, दि. 22- राज्‍यस्‍तरीय उद्योग मित्र समितीची बैठक दिनांक 7 जानेवारी 2012 रोजी दुपारी 2 वाजता बाबुभाई चिनाय कमिटी रुम, 2 रा मजला, इंडियन मर्चंट चेंबर, आय.एम.सी. मार्ग, चर्चगेट, मुंबई  येथे विकास आयुक्‍त (उद्योग) तथा अध्‍यक्ष, उद्योग मित्र यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली आहे.
या बैठकीस राज्‍यस्‍तरीय  महामंडळाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व शासनाचे वरीष्‍ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 उद्योजकांना आणि संघटनांना बैठकीच्‍या कार्यसुचीवर घ्‍यावयाचे प्रश्‍न व त्‍याची परिपूर्ण माहिती शेखर नाईक, निमंत्रक, उद्योग मित्र यांचे नावे उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, दुसरा मजला, मंत्रालयासमोर मुंबई (दूरध्‍वनी क्र.022-22026755 किंवा फॅक्‍स क्र. 022-22026826 ई-मेल diumitra@maharashtra.gov.in   येथे दिनांक 26 डिसेंबर 2011 पर्यंत कार्यालयास पोहचेल अश्‍यारीतीने पाठविण्‍यात यावी. या तारखेपर्यंत प्राप्‍त होणा-या प्रश्‍नांचा समावेश कार्यसुचीवर होईल याची नोंद घेण्‍यात यावी.
     अधिक माहितीसाठी वा.दौ.देसले, उद्योग उपसंचालक, (उमि) यांचेशी दुरध्‍वनी क्र.022-22044107 वर संपर्क साधावा.असे महाव्‍यवस्‍थापक, जिल्‍हा उद्योग केंद्र,वर्धा यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत प्रशिक्षण

वर्धा,दि.22- राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा यांचे मार्फत  वर्धा, सेलू, देवळी तालुक्‍यातील शेडनेट हाऊस धारक शेतक-यांना  पूणे येथे आयोजित किसान प्रदर्शनीला भेट देण्‍यासाठी रवाना झाले असून, त्‍यांना  अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित औजारे, विविध पिक पध्‍दती, नाविन्‍यपूर्ण उपक्रम, सिंचनाच्‍या विविध पध्‍दती, नविन संशोधित वाण  याविषयी माहिती मिळणार आहे.
 शेतक-यांना पाच दिवसाचे राज्‍यांतर्गत उच्‍च तंत्रज्ञानाचे  प्रशिक्षण केंद्र तळेगांव (दाभाडे) जि. पूणे येथे प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रशिक्षणामध्‍ये शेडनेट हाऊस व पॉली हाऊस मधील भाजीपाला काकडी, कारली, ढोबळी मिरची, ब्रोकोली व फुले जर्बेरा, कार्नेशियम, निशिगंध, गुलाब याविषयावर अत्‍याधुनिक प्रशिक्षण, लागवड तंत्रज्ञान व किड रोग व्‍यवस्‍थापन , एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, फळाफुलांचे काढणी पश्‍चात तंत्रज्ञान ग्रेडींग व पॅकींग व विक्री व्‍यवस्‍था  इत्‍यादी विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन शेतक-यांना मिळणार आहे. शेतक-यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाव्‍दारे कृषि क्षेत्रात कमी पाण्‍यात गट समुहाने फळपिकाचे उत्‍पादन करुन चांगली विक्री व्‍यवस्‍था निर्माण करणे व एकंदरीत उत्‍पादन व उत्‍पन्‍नात  भर घालुन जीवनमान उंचावेल.
 ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्त्‍या सिंधुताई सपकाळ यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी कृषि मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आवटे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डावरे, तालुका कषि अधिकारी येवले उपस्थित होते.