Thursday, 22 December 2011

26 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन


     वर्धा,दि.22-शासन व ग्राहक चळवळीतील संघटना यांचे संयुक्‍त विद्यमाने दि. 26 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,वर्धा येथे राष्‍ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला आहे.
    कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी जयश्री भोज असून, प्रमुख अतिथी म्‍हणून अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्‍यक्ष आर.बी.सोमानी, जिल्‍हा पुरवठा अधिकारी आर.ए.अनभोरे, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तसेच प्रमुख वक्‍ते म्‍हणून नागपूर विद्यापिठाचे विधी शाखा अधिष्‍ठाता अशोक पावडे, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण  परिषदेचे विदर्भ शाखेचे सचिव अजय भोयर हे मार्गदर्शन करणार आहेत.
     या काकर्यक्रमास बहुसंख्‍येने जनतेने उपस्थित राहण्‍याचे आवाहन तहसिलदार सुशांत बनसोडे, अखिल भारतीय ग्राहक कल्‍याण परिषदेचे अध्‍यक्ष उशा फाले आणि तालुका ग्राहक पंचायतचे अध्‍यक्ष शिवचरण मिश्रा यांनी केले आहे.
                            00000 

डायल 102



      खास दूरध्‍वनी क्रमांक आपणास हमखास पाठ होतात. जसं पोलिसांना दूरध्‍वनी लावायचा तर 100 हा क्रमांक आहे आणि अग्‍नीशामक दलाचा 101 तसा आता पुढील काळात 102 हा क्रमांक गरोदर माता आणि नवजात बालकांचे आरोग्‍य यासाठी कायमस्‍वरुपी व 24 तास सेवेत उपलब्‍ध राहणार आहे.त्‍याबाबत माहिती देणारा हा लेख.                  - प्रशांत दैठणकर                                                         

     शासनाने गर्भवतींचे मृत्‍यू राखण्‍यासाठी तसेच जन्‍मलेल्‍या बालकांना सदृढपणा यावा ते आजारी होवू नयेत. आजारी पडल्‍यास पूर्ण शासनखर्चाने त्‍यांची काळजी घेता यावी याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत खास दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
     या कार्यक्रमात गरोदर स्त्रियांना प्रसूती साठी तसेच 30 दिवसांपर्यंतच्‍या नवजात आजारी बालकांना मोफत आरोग्‍य सेवा पुरवणे असे ध्‍येय्य ठेवलेले आहे.
     गरोदरपणात, बाळंतपणात व प्रसुती पश्‍चात 42 दिवसांपर्यंत सेवा देण्‍यात येईल. सामान्‍य प्रसुतीसाठी 3 दिवस शस्‍त्रक्रियेव्‍दारे बाळंतपण झाल्‍यास सात दिवसापर्यंत मोफत आहार देण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकीय रुग्‍णालयापर्यंत संदर्भ सेवेसाठी जाण्‍यासाठी तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्र शासकिय
रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. मोफत प्रयोगशाळा तपासण्‍या, रक्‍त पुरवठा व औषधोपचार करण्‍यात येईल. कोणत्‍याही सेवेचे शुल्‍क आकारले जाणार नाही अशी यात सोय आहे.
      30 दिवसापर्यंतच्‍या जनवजात आजारी बालकांसाठी मोफत औषधोपचार करण्‍यात येईल. घरापासून प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत, संदर्भ सेवेसाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्र किंवा शासकिय रुग्‍णालयापर्यंत जाण्‍यासाठी तसेच रुग्‍णालयातून घरी परत जाण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, तसेच रक्‍त पुरवठा व प्रयोगशाळा तपासण्‍या, औषधोपचार मोफत करण्‍यात येतील.
     गरोदर माता व नवजात अर्भकांच्‍या तपासण्‍या, उपचार व आहार इतयादी सेवा पूर्णपणे मोफत देण्‍यात येईल. ज्‍यामुळे बाल मृत्‍यू व माता मृत्‍यू कमी होण्‍यास मदत होईल. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथे 24 तास सेवा देण्‍यासाठी कॉल सेंटर सुरु करण्‍यात आले असून त्‍याचा टोल फ्री क्रमांक 102 किंवा (07152)245198 असा आहे. या क्रमांकावर कोणीही कितीही वाजता तात्‍काळ प्रसंगी फक्‍त बाळंतपणाच्‍या माता व अति आजारी बालकांकरीता संपर्क करु शकतात. संपर्क करणा-यांनी पूर्ण नांव, पत्‍ता व जवळची खूण सांगितल्‍यानंतर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाकडून तेथून जवळ असणा-या रुग्‍णालयाची रुग्‍णवाहिका पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. या कार्यक्रमामुळे प्रत्‍येक बालकाची आणि त्‍याच्‍या मातेची अखंड काळजी घेतली जाणार आहे. त्‍यासाठी हा `डायल 102`  लक्षात ठेवायचा इतकच.
-         प्रशांत दैठणकर

पेन्‍शन अदालत


     वर्धा, दि. 22- भारतीय डाक विभाग, वर्धा व्‍दारा दि. 31 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता अधिक्षक, डाकघर कार्यालयामध्‍ये पेन्‍शन अदालत आयोजित करण्‍यात आली आहे.

     पेन्‍शन संबंधीच्‍या ज्‍या तक्रारीचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्‍तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्‍शन अदालत मध्‍ये दखल घेतल्‍या जाईल. तक्रारीचा  उल्‍लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.

     संबधितांनी पेन्‍शन बाबतची आपली तक्रार अधिक्षक, डाकघर, वर्धा यांचे नांवे दिनांक 28 डिसेंबर 2011 अथवा तत्‍पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्‍या  तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रारकर्त्‍यांना पेन्‍शन अदालतीसाठी स्‍वःखर्चाने उपस्थित राहावे लागेल. असे अधिक्षक, डाकघर, वर्धा यांनी कळविले आहे.

उद्योग मित्र समिती सभा


वर्धा, दि. 22- राज्‍यस्‍तरीय उद्योग मित्र समितीची बैठक दिनांक 7 जानेवारी 2012 रोजी दुपारी 2 वाजता बाबुभाई चिनाय कमिटी रुम, 2 रा मजला, इंडियन मर्चंट चेंबर, आय.एम.सी. मार्ग, चर्चगेट, मुंबई  येथे विकास आयुक्‍त (उद्योग) तथा अध्‍यक्ष, उद्योग मित्र यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली आहे.
या बैठकीस राज्‍यस्‍तरीय  महामंडळाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व शासनाचे वरीष्‍ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 उद्योजकांना आणि संघटनांना बैठकीच्‍या कार्यसुचीवर घ्‍यावयाचे प्रश्‍न व त्‍याची परिपूर्ण माहिती शेखर नाईक, निमंत्रक, उद्योग मित्र यांचे नावे उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, दुसरा मजला, मंत्रालयासमोर मुंबई (दूरध्‍वनी क्र.022-22026755 किंवा फॅक्‍स क्र. 022-22026826 ई-मेल diumitra@maharashtra.gov.in   येथे दिनांक 26 डिसेंबर 2011 पर्यंत कार्यालयास पोहचेल अश्‍यारीतीने पाठविण्‍यात यावी. या तारखेपर्यंत प्राप्‍त होणा-या प्रश्‍नांचा समावेश कार्यसुचीवर होईल याची नोंद घेण्‍यात यावी.
     अधिक माहितीसाठी वा.दौ.देसले, उद्योग उपसंचालक, (उमि) यांचेशी दुरध्‍वनी क्र.022-22044107 वर संपर्क साधावा.असे महाव्‍यवस्‍थापक, जिल्‍हा उद्योग केंद्र,वर्धा यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत प्रशिक्षण

वर्धा,दि.22- राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा यांचे मार्फत  वर्धा, सेलू, देवळी तालुक्‍यातील शेडनेट हाऊस धारक शेतक-यांना  पूणे येथे आयोजित किसान प्रदर्शनीला भेट देण्‍यासाठी रवाना झाले असून, त्‍यांना  अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित औजारे, विविध पिक पध्‍दती, नाविन्‍यपूर्ण उपक्रम, सिंचनाच्‍या विविध पध्‍दती, नविन संशोधित वाण  याविषयी माहिती मिळणार आहे.
 शेतक-यांना पाच दिवसाचे राज्‍यांतर्गत उच्‍च तंत्रज्ञानाचे  प्रशिक्षण केंद्र तळेगांव (दाभाडे) जि. पूणे येथे प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रशिक्षणामध्‍ये शेडनेट हाऊस व पॉली हाऊस मधील भाजीपाला काकडी, कारली, ढोबळी मिरची, ब्रोकोली व फुले जर्बेरा, कार्नेशियम, निशिगंध, गुलाब याविषयावर अत्‍याधुनिक प्रशिक्षण, लागवड तंत्रज्ञान व किड रोग व्‍यवस्‍थापन , एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, फळाफुलांचे काढणी पश्‍चात तंत्रज्ञान ग्रेडींग व पॅकींग व विक्री व्‍यवस्‍था  इत्‍यादी विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन शेतक-यांना मिळणार आहे. शेतक-यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाव्‍दारे कृषि क्षेत्रात कमी पाण्‍यात गट समुहाने फळपिकाचे उत्‍पादन करुन चांगली विक्री व्‍यवस्‍था निर्माण करणे व एकंदरीत उत्‍पादन व उत्‍पन्‍नात  भर घालुन जीवनमान उंचावेल.
 ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्त्‍या सिंधुताई सपकाळ यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी कृषि मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आवटे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उप विभागीय कृषि अधिकारी संतोष डावरे, तालुका कषि अधिकारी येवले उपस्थित होते.

Wednesday, 21 December 2011

गांधी ; जनसंपर्काच्‍या यशाचे ब्रांडिंग मॉडेल


पब्लिक रिलेशन्‍स सोसायटी ऑफ इंडियाच्‍या वतीने येत्‍या 23-25 डिसेंबर दरम्‍यान नागपूर आणि वर्धा येथे 33 व्‍या अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. वर्धा येथे 24 रोजी महात्‍मा गांधी आणि जनसंपर्क या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्‍यात आले आहे. या आयोजनाविषयी सांगाताहेत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस.मिरगे.                                                        

महात्‍मा गांधी यांना केवळ राजकीय चष्‍म्‍यातून बघणे, त्‍यांच्‍या  व्‍यक्तित्‍व आणि कृतित्‍वाच्‍या इतर आयामांपासून अनभिज्ञ राहणे होय. एवढी वर्ष लोटल्‍यानंतर सुध्‍दा त्‍यांच्‍या व्‍यक्तित्‍वाच्‍या विशाल वटवृक्षाचे बरेच असे पैलू आहेत ज्‍याच्‍याशी अजून स्‍पर्शही झाला नाही. ते शोधणे, जाणून घेणे आणि त्‍यांचे मूल्‍यांकन करणे वर्तमान संदर्भात प्रासंगिक होत चालले आहे. गांधी विचार वाडःमयातून बरेच काही देशाने  आणि जगाने घेतले आहे.
आज जन-समन्‍वयात आलेली घसरण यामुळे गांधींच्‍या विशाल जनसंपर्काला विचारात घेण्‍याची आवश्‍यकता वाटत चालली आहे. जन-भागिदारी, जन-समन्‍वय किंवा जन-संपर्काच्‍या शिवाय बहुआयामी कार्याचे यश असंदिग्‍धच वाटते.
     गांधी आपल्‍या व्‍यक्‍तीमत्‍वात आणि आपल्‍या कर्मात समन्‍वय, सहयोग आणि जन-संपर्क या सूत्राचे उदाहरण बनले होते. असे नसते तर गांधी एवढ्या मोठ्या  जगासाठी यशाचे मानक उदाहरण झाले नसते. त्‍यांचा समन्‍वय, सहयोग आणि संपर्क हा एक ब्रांड झाले होते. आजच्‍या वैश्र्विकरणाच्‍या काळात त्‍यांचा तो समन्‍वयधर्मितेचा जनसंपर्क आवश्‍यक वाटू लागला आहे आणि काही अंशी तो स्‍थापितही झाला आहे.

     जनसंपर्काची भूमिका एक ब्रांड रोल प्रमाणे विविध कार्याच्‍या यशात सहयोगी होत असते. ही संकल्‍पना केंद्रस्‍थानी ठेवून 33 व्‍या अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाच्‍या  नागपुर चॅप्‍टरने आपल्‍या चर्चेचा विषय `रोल ऑफ पब्लिक रिलेशन्‍स इन ब्रांडिंग `असा ठेवला आहे. या संमेलनात जनसंपर्क, पत्रकारिता आणि जाहिरात या त्रयींची तारतम्‍यता कोणत्‍याही ब्रांडला व्‍यावहारिक ठरविते, यावर विशेष चर्चा होणार आहे.
     पब्लिक रिलेशन्‍स सोयटी ऑफ इंडियाच्‍या नागपूर चॅIप्‍टरने 232,24 आणि 25 डिसेंबर असे तीन दिवस हे आयेाजन केले आहे. यापेकी 24 डिसेंबर रोजी वर्धा येथील महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात गांधीजींचा जनसंपर्क या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे.
     हे आयोजन महात्‍मा गांधींच्‍या जनसंपर्काचा व्‍यापक आणि संमेलनाच्‍या महत्‍वाच्‍या उद्देशांची पूर्तता करण्‍याचाच एक भाग होय. इथे हे सांगणे महत्‍वाचे वाटते की वर्धा ही संतांची अशी कर्मभूमी आहे. जेथून गांधीजींनी स्‍वातंत्र्याच्‍या यशासाठी जनसंपर्काच्‍या माध्‍यमातून देशाला एक ब्रांड दिला होता. महानगर मुंबईला जावून त्‍यांनी `डू ऑर डाय`चा नारा दिला होता आणि हाच ब्रांड पुढे जावून यशाचा सूत्रधार ठरला होता.
     संमेलनाच्‍या या महत्‍वाच्‍या श्रृंखलेत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाने ` गांधीजींची पत्रकारिता आणि वर्तमान संदर्भ` या विषयावर दि. 21 डिसेंबर 2011 रोजी एक निबंध स्‍पर्धा आयोजित केली होती.

     हे आयोजन संमेलनाच्‍या  त्रिदिवसीय श्रृंखलेत महत्‍वाचे यासाठी आहे की गांधीजींच्‍या पत्रकारितेची मिशनरी भावना आजच्‍या बांडिंग मीडियातही प्रतिध्‍वनित होत आहे. अशाप्रकारे हे संमेलन ब्रांड आणि व्‍यवहार यांची आधारशीला स्‍थापित करणार असे म्‍हटले तर अतिशयोक्‍ती होणार नाही.

सेवाग्राम येथे स्‍वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम


        वर्धा,दि.21-महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र, वर्धा तर्फे सेवाग्राम येथे दि. 5 ते 16 जानेवारी 2012 या कालावधीत स्‍वयंरोजगार विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
या प्रशिक्षणात शेळी पालन, दुग्‍ध उत्‍पादन, गाई-म्‍हशी पालन, कमीकल उद्योगसंधी (डिटर्जंट, लॅट्रीन अॅसिड, फिनाईल, लिक्विड, ब्‍लू लिक्विड सोप, अगरबत्‍ती, मेणबत्‍ती, मसाले, तिखट, हळद, धने पावडर, वेफर्स, पॉपकॉर्न, पेप्‍सी, जेष्‍ठमध सुपारी ई.) उद्योगांविषयी माहिती तज्ञ व्‍यक्‍तीव्‍दारे व टि.व्‍ही.वर दाखविण्‍यात येईल.
 उद्येाजकीय गुण, उद्योजकीय व्‍यक्तिमत्‍व विकास, उद्योग व्‍यवसाय निवडण्‍याची प्रक्रिया, बाजारपेठ पाहणी, प्रकल्‍प अहवाल, विविध शासकीय योजनांची माहिती , जिल्‍हा उद्योग केन्‍द्राच्‍या येाजना, विशेषकरुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, महात्‍मा फुले महामंडळाच्‍या योजना व त्‍यामध्‍ये कर्ज प्रकरण तयार करण्‍याची, लघुउद्योग नोंदणी इत्‍यादी विषयांवर शासकीय अधिकारी वर्गाव्‍दारे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
 उमेदवार 18 ते 45 वयोगटातील किमान 8 वी उत्‍तीर्ण असावा. इच्‍छुक उमेदवारांनी दि. 2 जानेवारी 2012 रोजी दुपारी 12 वाजता स्‍थळ बी.डी. इंजिनियरींग कॉलेज, सेवाग्राम येथे एक दिवसीय  निःशुल्‍क उद्येाजकता प्रेरणा शिबीर ठरविण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणास प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश या पध्‍दतीने फक्‍त 30 प्रशिक्षणार्थीस प्रवेश देण्‍यात येणार आहे.
कार्यक्रम समन्‍वयक नजमा पठाण , महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र व्‍दारा जिल्‍हा उद्योग केन्‍द्र, वर्धा यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.