Tuesday, 20 December 2011

विभागीय युवा महोत्सववावर यजमान वर्धेकरांचेच वर्चेस्वी


वर्धा, दि.21- नागपूर विभागीय युवा महोत्‍सवावर वर्धा जिल्‍ह्याचे वर्चस्‍व राहिले असून महोत्‍सवात 9 पैकी 5 स्‍पर्धांचे जेतेपद वर्धेकरांनी मिळविले. हे विजेते आता राज्‍यातील युवा महोत्‍सवासाठी रवाना होत आहे.
येथील सत्‍यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात हा महोत्‍सव पार पडला. याचे यजमानपद यंदा वर्धा जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला देण्‍यात आले होते. या महोत्‍सवात नागपूर विभागातील 6 जिल्‍ह्यातील युवक सहभागी झाले होते.
महोत्‍सवाचे उदघाटन निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी नटराज पूजन व दिपप्रज्‍वलन करण्‍यात आले.
उदघाटनप्रसंगी वसंतराव जळीत, वासुदेवराव गोंधळे, निरज दुबे, गौरीशंकर टिबडीवाल आणि बाळकृष्‍ण टिबडीवाल तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन ज्‍योती भगत यांनी केले.  
या महोत्‍सवासाठी विकास काळे, वसंत जळीत, सुरेश चौधरी, ज्‍योती भगत, माधुरी खाडे, सोनाली मंथनवार, स्मिता हेडावू, वासुदेवराव गोंधळे, जीवन बांगडे, अजय हेडावू, रवी खाडे, सुरेश सालबर्डे, दामोदर राऊत, श्‍याम केदार, सुनील तितरे, नीरज दुबे तसेच श्रीराम मेंढे हे परीक्षक होते.
या महोत्‍सवाच्‍या यशस्वितेसाठी क्रीडाधिकारी घनश्‍याम वरारकर, विनोद ठिकरे, अनिल बोरवार तसेच जिल्‍हा क्रीडा संकुलाचे रवी काकडे आदींनी  परिश्रम घेतले.
स्‍पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
शास्‍त्रीय गायन – अभिषेक मारोडकर, वर्धा. शास्‍त्रीय वाद्य- तबला- दिनेश खांडेकर,वर्धा. हार्मोनियम-किशोर काळे, वर्धा, गीटार – सुरेंद्र टेंभुर्णे, नागपूर. शास्‍त्रीय नृत्‍य- आदीती बोरवटकर, नागपूर, लोकनृत्‍य–श्रृंखला युवा मंच, भंडारा, लोकगीत- लोकधारा कला मंच, वर्धा, एकांकीका- षड्स गांधार गृप, भंडारा आणि वक्‍तृत्‍व–रत्‍नाकर शिरसाट, वर्धा.



नागपूर विभागीय युवक महोत्‍सवाला वर्धा येथे शानदार सुरुवात

वर्धा,दि.20- नागपूर विभागीय युवा महोत्‍सवाला आज येथील बजाज जिल्‍हा ग्रंथालयात सुरुवात झाली. महोत्‍सवाचे उदघाटन निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांच्‍या हस्‍ते  झाले.
उदघाटनप्रसंगी वसंतराव जळीत, वासुदेवराव गोंधळे, निरज दुबे, गौरीशंकर टिबडीवाल आणि बाळकृष्‍ण टिबडीवाल तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 एकांकिका वक्‍तृत्‍व स्‍पर्धा , नृत्‍य, तालवाद्ये आदींसह समुहगीत, समूहनृत्‍य आदी विविध गटात युवक आपले नैपुण्‍य दाखविणार आहेत.
 या महोत्‍सवासाठी विकास काळे, वसंत जळीत, सुरेश चौधरी, ज्‍योती भगत, माधुरी खाडे, सोनाली मंथनवार, वासुदेवराव गोंधळे, जीवन बांगडे, अजय हेडावू, रवी खाडे, सुरेश सालबर्डे, दामोदर राऊत, श्‍याम केदार, सुनील तितरे, नीरज दुबे तसेच श्रीराम मेंढे हे परीक्षक आहेत. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.
 या महोत्‍सवाच्‍या यशस्वितेसाठी क्रीडाधिकारी घनश्‍याम वरारकर, विनोद ठिकरे, अनिल बोरवार तसेच जिल्‍हा क्रीडा संकुलाचे रवी काकडे आदी परिश्रम घेत आहेत.

Monday, 19 December 2011

क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये प्रवेशासाठी कार्यशाळा


     वर्धा,दि.19-क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत सुरु असलेल्‍या विविध क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याव्‍दारे प्रवेश देण्‍यात येतो. महाराष्‍ट्रात शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्‍यासाठी आणि राज्‍यातून जास्‍तीत जास्‍त आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्‍यासाठी वैज्ञानिक पध्‍दती, अद्यावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर देण्‍याची गरज आहे. या उद्देशाने राज्‍यातील खेळ परंपरा अंतःसामर्थ्‍य व खेळ सुविधा लक्षात घेवुन पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्‍थापना केलेली आहे.

     बॅटरी ऑफ टेस्‍टव्‍दारे निवड क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍या शाळा स्‍तरावरुन तालुकास्‍तर, जिल्‍हास्‍तर आणि राज्‍यस्‍तरीय चाचण्‍याचे आयोजन करण्‍यात येणार आहे. यासाठी दि. 22 डिसेंबर 2011 रोजी दुपारी 2 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

     जिल्‍ह्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक, तालुका क्रीडा संयोजक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.

विद्यार्थ्‍यांचे ओळखपत्र

           वर्धा, दि. 19-सहामाही प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम राबविणा-या तसेच पुरवणी परिक्षेला बसलेल्‍या सर्व संस्‍था प्रमुखांना व संबधीत विद्यार्थ्‍यांनी त्‍यांची सहामाही परिक्षा व पुरवणी परिक्षा दिनांक 10 जानेवारी 2012 पासून सुरु होत आहे.

      संस्‍था प्रमुखांनी विद्यार्थ्‍यांची ओळखपत्र दिनांक एक जानेवारी 2012 पर्यंत जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, वर्धा येथून घेवून जावी. त्‍यानंतर घेऊन जाणा-या संस्‍थाप्रमुखांचे विद्यार्थी परिक्षेस न बसल्‍यास ती त्‍यांची वैयक्‍तीक जबाबदारी राहील, याची संस्‍थाप्रमुखांनी नोंद घ्‍यावी. असे जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.

फळबाग लागवड विकास कार्यक्रम


     वर्धा,दि.19-राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत फळबाग लागवड विकास कार्यक्रम सन 2011-12 या आर्थीक वर्षात जिल्‍ह्यात 90 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड करण्‍याचे लक्षांक प्राप्‍त  झाले आहे. पपई 50 हजार हेक्‍टर व केळी (टिश्‍यू कल्‍चर 40 हेक्‍टर  क्षेत्रावर लागवड करावयाचे आहे. पपई या पिकासाठी हेक्‍टरी एकूण 30 हजार रुपये व केळी फळपिकांसाठी हेक्‍टरी एकूण 41 हजार रुपये अनुदान दोन वर्षात देय राहील.

     योजने अंतर्गत लाभार्थ्‍यांची निवड, लागवड क्षेत्र मर्यादा, तांत्रीक मंजूरी, प्रशासकीय मंजूरी लाभार्थीच्‍या जबाबदा-या व इतर सर्व निकष रोजगार हमी योजना फळबाग लागवडीचे शासन निर्णयाप्रमाणे राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी रासायनिक खते. रोपसंरक्षण औषधे, शेतक-यांनी स्‍वतः खरेदी केल्‍यास खरेदीची पावतीची नोंद घेऊनच अनुज्ञेय अनुदान अदा करण्‍यात येईल. साहित्‍य खरदेी संबधीच्‍या पावत्‍या संबधीत कृषि सहाय्यक यांचेकडे देण्‍यात याव्‍यात. अधिक माहितीसाठी संबधीत तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा व राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान योजनेच्‍या जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

नोंदणीकृत संस्‍थाकडून अर्ज आमंत्रित


     वर्धा, दि. 19 – शैक्षणिक वर्ष 2012-13 करीता महाराष्‍ट्र राज्‍य व्‍यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत संगणक, पॅरा-मेडीकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रीकल, मेकॅनिकल, सिव्हिल, अॅग्रकल्‍चर, ऑटोमोबाईल, केमिकल, इन्‍स्‍ट्युमेंटेशन, आहार, टेक्‍सटाईल, भाषा, खेळ, सौंदर्यशास्‍त्र, मुद्रण, चर्मकला (लेदर), वाणिज्‍य, हस्‍तकला, अॅपारेल, कला, मासमेडीया, टुरिझम, हॉस्‍पीटॅलिटी, जेम अॅण्‍ड ज्‍वेलरी, एव्‍हीएशन, म्‍युझीक, परफॉर्मींग आर्ट तसेच इतर गटातील 6 महिने, 1 व 2 वर्ष कालावधीचे एकूण 1090 अभ्‍यासक्रमामधील प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम सुरु करणेसाठी अर्ज मागविण्‍यात येत आहे.
     नियमित शुल्‍कासह अर्ज विक्री व स्विकृती दि. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2011 पर्यंत असून विलंब शुल्‍कासह अर्ज विक्री व स्विकृती दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2012 पर्यंत राहील.

     अर्जासहीत माहितीपुस्तिका, अभ्‍यासक्रमाची यादी जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे मिळेल. माहितीपुस्‍तिकेची किंमत रुपये 500 असून रक्‍कम दिलेल्‍या लेखाशिर्षामध्‍ये कोषागारात भरल्‍याची चलन प्रत अर्जासोबत जोडावी. अर्ज व माहितीपुस्तिका संकेत स्‍थळावरुन डाऊनलोड करु शकता.अधिक माहितीसाठी जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण प्रशिक्ष्‍ण अधिकारी,वर्धा यांचेशी संपर्क करावे.

कृषि मित्र नेमणुका


        वर्धा,दि.19- कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा अंतर्गत  अत्‍यावश्‍यक गरजुनुरुप गावपातळीपासूनचे नियेाजन व विस्‍तार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्‍ह्यात कृषि मित्रांची नेमणूक करावयाची आहे. कृषि मित्र हा शेतीतील कौशल्‍य सिध्‍द केले असून, कृषि विस्‍तार  येाजना व गाव, खेडे यातील महत्‍वाचा दुवा असेल. कृषि मित्राचे किमान शिक्षण माध्‍यमीक अथवा उच्‍च माध्‍यमीक स्‍तरावरील असावे. कृषि मित्राला शेतकरी संघटन, शेतकरी समुह तयार करणे, गांव पातळीवरील माहितीबाबत विषय विशेषज्ञ यांचेशी संपर्कात राहणे ग्रामसभेस हजर राहणे, प्रसार माध्‍यमाच्‍या मदतीने माहिती देणे, आधुनिक शेतीचा प्रसार करणे, तसेच कृषि विभागामार्फत सांगितलेली कामे इ. कामे करावयाची आहे.
    निवड झालेल्‍या कृषि मित्रांना वार्षीक रु. 4000 चे मानधन देण्‍यात येणार असुन दैनिक अॅग्रोवणचा पुरवठा तसेच कृषि विषयक माहिती देण्‍यात येणार आहे.
     कृषि मित्राच्‍या नेमणुकीसाठीचा अर्ज संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाकडे आठ दिवसाच्‍या आत करावयाचा असुन उपविभागीय स्‍तरावरील समिती मार्फत दोन गावाकरीता एक याप्रमाणे ग्रामपंचायतीच्‍या  ठरावानुसार कृषि मित्राची निवड करण्‍यात येणार आहे.