Wednesday, 23 November 2011

मतदानाच्‍या दिवशी भरणारे आठवडी बाजार इतरत्र दिवशी भरणार


   वर्धा, दि. 23- वर्धा जिल्‍ह्यातील हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी , सिंदी (रे) वर्धा या ठिकाणच्‍या नगर परिषद मतदार क्षेत्रातील निवडणूका दिनांक 8 डिसेंबर 2011 रोजी होणार आहेत. मात्र या दिवशी आर्वी  व सिंदी (रेल्‍वे) येथे आठवडी बाजार भरण्‍याचा दिवस आहे. 
    राज्‍य निवडणूक आयोग यांच्‍या  आदेशान्‍वये प्राप्त  अधिकाराचा वापर करुन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2011 रोजी भरणारा आर्वी  नगर पालीका मतदार क्षेत्रातील आठवडी बाजार आता 10 डिसेंबर 2011 रोजी व सिंदी (रे) येथे नगर पालिका मतदार क्षेत्रातील भरणारा आठवडी बाजार आता 7 डिसेंबर 2011 रोजी भरविण्‍यात येईल. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा  यांनी एका आदेशान्‍वये  कळविले आहे.
                     0000

मतदानाच्‍या दिवशी स्‍थानिक सुट्टी जाहीर


     वर्धा,दि. 23- राज्‍य निवडणूक आयोग यांचे आदेशान्‍वये  वर्धा जिल्‍ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगांव, देवळी व सिंदी (रे) येथील संपूर्ण नगर परिषदेच्‍या मतदान क्षेत्रातील निवडणूकीसाठी  मतदान दिनांक 8 डिसेंबर 2011 रोजी होणार आहे. मतदारांनी आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजाविता यावा यासाठी जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांना प्राप्‍त झालेल्‍या अधिकारान्‍वये मतदानाचा दिवस दिनांक 8 डिसेंबर 2011 रोजी सहा नगर परिषदाच्‍या मतदान क्षेत्रामध्‍ये  स्‍थानिक सुटी जाहीर केली असल्‍याचे एका आदेशात नमूद आहे.
                      00000

अंशदायी स्‍वास्‍थ योजना चिकित्‍सालयाचे उदघाटन



   वर्धा,दि.23-माजी सैनिकांसाठी अंशदायी स्‍वास्‍थ योजना चिकित्‍सालयाचे उदघाटन नुकतेच (दिनांक 22 नोव्‍हेंबर 2011 रोजी) वायुसेना नागपूरचे एअर व्‍हाईस मार्शल तथा मुख्‍य चिकितसा अधिकारी आर.सी.कश्‍यप, यांचे हस्‍ते संपन्‍न झाले. याप्रसंगी वायुसेना नागपुर येथील अधिकारी, कर्मचारी  वर्ग , जिल्‍हा  सैनिक कल्‍याण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्‍ह्यातील माजी सैनिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
     एअर व्‍हाइस मार्शल आर.सी.कश्‍यम यांनी चिकित्‍सालयातील सोई सुविधांची पाहणी केली. तसेच अल्‍पावधित चिकित्‍सालयाकरीता इमारत व पायाभूत सोई उपलब्‍ध  करुन दिल्‍याबद्दल जिल्‍हा  परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने व उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांचे आभार मानले.
     सर्व माजी सैनिकांनी  ECHS चिकित्‍सालयाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन माजी फ्ला. ले. धनंजय सदाफळ, जिल्‍हा  सैनिक कल्‍याण अधिकारी वर्धा यांनी केले.            
000000



जिल्‍ह्यात 37(1) आणि (3) कलम लागू

   वर्धा,दि.23- वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी     जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या  अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि (3) कलम लागू केले आहे.
      या कलमाचा अंमल दि.7 डिसेंबर 2011 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.            

Tuesday, 22 November 2011

फलोत्‍पादनाचे उच्‍च तंत्रज्ञान आत्‍मसात करण्‍यासाठी शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना

 वर्धा,दि.22- राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान सन 2011-12 अंतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी,वर्धा यांचे मार्फत तालुका वर्धा, सेलू, देवळी येथील  शेडनेट हाऊस धारक तीस शेतक-यांना पाच दिवशीय राज्‍यांतर्गत प्रशिक्षणासाठी उच्‍च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र तळेगाव (दाभाडे) जि. पुणे येथे दि. 20 नोव्‍हेंबर 2011 रोजी एका वाहनातून पाठविण्‍यात आले.
      सदर प्रशिक्षणामध्‍ये शेडनेट हाऊस पॉली हाऊस मधील  भाजीपाला जसे काकडी, कारली, ढोबळी मिरची, ब्रोकोली व फुले जसे जरबेरा, कार्नेशियम, निशिगंधा, गुलाब इत्‍यादी प्रकारचे घटकांचे अत्‍याधूनिक प्रशिक्षण, लागवड तंत्रज्ञान व किड व रोग व्‍यवस्‍थापन, एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, फळफुलांचे काढणी पश्‍चात तंत्रज्ञान ग्रेडींग व पॅकींग व विक्री व्‍यवस्‍था  इत्‍यादी विषयावर सविस्‍तर मार्गदर्शन शेतक-यांना मिळणार आहे.
हे प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर शेतक-यांना वरील बाबींचा अवलंब करुन आधुनिक तंत्रज्ञानाव्‍दारे कृषि क्षेत्रात कमी पाण्‍यात गट समुहाने फळपिकाचे उत्‍पादन करुन चांगली विक्री व्‍यवस्‍था निर्माण करणे व एकंदरीत उत्‍पादन व उत्‍पन्‍नात भर घालून जिवनमान उंचावणे हे अभिप्रेत आहेत.
     उप विभागीय कृषि अधिकारी वर्धा, संतोष डाबरे व तालुका कृषि अधिकारी येवले यांनी वाहनाला हिरवी झोंडी दाखवून प्रशिक्षणार्थिंना निरोप दिला आहे. असे उपविभागीय कृषि अधिकारी वर्धा कळवितात.

Monday, 21 November 2011

खतांच्‍या बॅगवर नमूद केलेल्‍या किमतीतच शेतक-यांनी खते खरेदी करावी

वर्धा,दि.21- जिल्‍हयामध्‍ये रब्‍बी हंगाम 2011 सुरु झाला असून, काही प्रमाणात पेरणीला सुरुवात झाली आहे. त्‍या करीता शेतक-यांना आवश्‍यक असलेले बियाणे, रासायनिक खते कृषि सेवा केन्‍द्रात उपलब्‍ध आहे. प्रत्‍येक खत कंपन्‍याचे रासायनिक खताचे दर हे वेगवेगळे असल्‍यामुळे शेतक-यांनी रासायनिक खत खरेदी करताना खताच्‍या  बॅगवर नमुद केलेली वसूल पात्र रक्‍कमचे कृषि केन्‍द्र धारकाला अदा करावी. त्‍यापेक्षा जास्‍त रक्‍कम अदा करु नये.
     जर सदर कृषि केन्‍द्र धारकाने बॅगवर नमुद केलेल्‍या  वसूलपात्र रकमेपेक्षा जास्‍त रक्‍कम वसूल केल्‍यास तसेच रासायनिक खतासोबत आपल्‍याला आवश्‍यक नसलेले इतर साहीत्‍य कृषि  केन्‍द्र धारकाने शेतक-यांना लिकिंग करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास त्‍या कृषि केन्‍द्र धारकाची तक्रार तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी, जिलहा स्‍तरावर कृषि विकास अधिकारी, जिल्‍हा परिषद वर्धा व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी या कार्यालयात लेखी स्‍वरुपात तक्रार करावी.
     खरीप हंगामातही पूर्वी स्‍थापन केलेले भरारी पथके कार्यरत असून बियाणे, रासा.खते, औषधे याबाबत तक्रार असल्‍यास टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपक्र साधावा असे आवाहन आर. के. गायकवाड, कृषि विकास अधिकारी, जिल्‍हा परिषद वर्धा यांनी केले आहे.

Sunday, 20 November 2011

करिअर रूपेरी..

            
  
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फळके यांच्या पहिल्या चित्रपटात स्त्री भूमिका करणारं कुणी मिळालं नाही. समाजाची त्या काळजी रुपेरी पडद्याबाबतची धारणा पूर्णपणे बदलून गेली आहे. आज हाच रुपेरी पडदा करिअरची मोठी संधी बनून स्त्रियांपुढे आलाय. यासंधीबाबत हा खास लेख.
                                                        -प्रशांत दैठणकर  
सौंदर्य ही महिलांची मक्तेदारी आहे असं मानलं जातं आणि याच्याच बळावर महिलांना अनेक क्षेत्रात संधी आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट काढला त्यावेळी त्यांच्या त्या चित्रपटात राज हरिश्चंद्राची पत्नी तारामतीची भूमिका करण्यास स्त्री पात्र उपलब्ध नव्हते मात्र आज हेच चित्र बदललं असल्याचं आपणास दिसेल.
चित्रपट किंवा नाटकात काम करणं काही काळ आधी कमीपणाचं मानलं जायचं पण आता त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत स्त्रियांना करिअर करण्याची संधी आता उपलब्ध आहे. नुसत्या सौंदर्याच्या बळावर यात करिअर घडवयाचं असेल तर मॉडेलिंगचं क्षेत्र हा उत्तम पर्याय आहे.
याच व्यवसायातून आता अभिनय शिकविणा-या संस्था समोर आल्या आहेत.विद्यापीठांमधून अभिनयात पदवी घेणं शक्य आहे. पुण्यातील फिल्म अन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट दिल्लीची ड्रामा अन्ड थिएटर अकादमी. मराठवाड्यात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्शास्त्र विभाग या काही नामांकित संस्थांची नावे यात घेता येतील.
या संस्थांमध्ये अभिनयाच्या जोडीला प्रकाश योजना नेपथ्य तसेच दिग्दर्शन आदींबाबत पदविका ते पदव्यूत्तर पदवी पर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यातून करिअर घडविण्याची संधी मिळू शकते.
याच्याशी संलग्न अशी न्यूज कास्टर होण्याची संधी देखील याच माध्यमातून आपणास मिळते. डेली सोपच्या जमान्यात दुस-या बाजूला वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली आहे. यात वृत्तनिवेदिका म्हणून करिअरचा पर्याय आजकाल उपलब्ध आहे. आता छोट्या शहरांमधून एफ.एम.रेडिओचे जाळे विस्तारताना दिसत आहे. या रेडिओ केंद्रांवर रेडिओ जॉकी होणे ही देखील एक करिअरची उत्तम संधी मुलींना उपलब्ध आहे. शब्दफेक आणि आवाज यांच्या बळावर या क्षेत्रात नाव कमावणं शक्य आहे.
पडद्यावर ज्याप्रकारे संधी आहे त्याच प्रकारची संधी पडद्यामागे देखील आहे. हल्ली इंग्रजी चित्रपट हिंदीत डबिंग करुन दाखवले जातात त्याचप्रमाणे डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक आदी वाहिन्या देखील भारतीय भाषेत प्रक्षेपण करीत आहेत. आवाजाच्या भांडवलावर या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्यात उत्पन्नही चांगले आहे आणि विशेष म्हणजे येणा-या काळात याचा मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्यात उत्पन्नही चांगले आहे आणि विशेष महणजे येणा-या काळात याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे.
कधी काळी वर्ज्य असणारं क्षेत्र स्त्रियांसाठी आता मोठ्या संधीचं क्षेत्र बनलय. यात आपणही करिअर म्हणून निश्चित विचार करायला हरकत नाही
- प्रशांत दैठणकर