Friday, 4 November 2011

न्यायमुर्ती सी.एम.थुल यांचा दौरा

     वर्धा, दि.4- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थुल यांचे गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2011 रोजी नागपूर येथून वर्धा येथे मोटारीने 12-30 वाजता आगमन होईल. निर्धारीत कार्यक्रमाला उपस्थित राहून रात्री सोयीनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.

विशेष लेख         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.4 नोव्हेंबर 2011
                           कुपोषण मुक्त गावांकडे  …. !
     कुपोषण सर्वच स्तरातून संपविण्यासाठी 14 नोव्हेंबर अर्थात बाल दिनापासून राज्यात राजमाता जिजाऊ कुपोषणमुकत ग्राम योजना सुरु होत आहे. प्रत्यक्ष कामात गावक-यांनी सहभाग घेऊन आपला गाव कुपोषणमुक्त करण्याची संकल्पना यात आहे. या मोहिमेची माहिती थोडक्यात.
                            -प्रशांत दैठणकर                                    
      मानवी जीवनक्रमातला महत्वाचा टप्पा असं ज्याला म्हणता येईल तो अर्थातच नवं अपत्य जन्मायला येण्याचा असतो. जन्माला येणारा हा जीव कसा असेल हे त्याच्या मातेच्या आरोग्यावर अवलंबून असतं. स्त्री ला गर्भधारणा झाल्यावर पुरेसं सकस अन्न मिळालं नाही तर त्या बाळाची वाढ व्यवस्थित होत नसते.
      आपल्याकडे अद्यापही घरातील स्त्री ही घरादाराला जेवणं घालून उरलं सुरलं तर कधी शिळं अन्न खाते असं चित्र सर्वच घरातून दिसतं. अशा कमी सकस अन्नामुळे मुळात स्त्री कमजोर होते. आणि कुपोषित मातेच्या त्या स्थितीमुळे मुलही कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते.
      या कुपोषणातून होणा-या मृत्यूंना रोखण्यासाठी येत्या बाल दिनापासून राजमाता जिजाऊ यांच्या नावाने कुपोषणमुक्त ग्राम संकल्पना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यात गावपातळीवर स्पर्धात्मक पध्दतीने या विषयाबाबत जागरुकता व गाव कुपोषण मुक्त करण्यात प्रत्येक गावक-याचा सहभाग घेतला जाणार आहे. यात बालकांचे सर्वांसमोर चावडीवर वजन करुन सगळा गाव कुपोषित मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून कुपोषणापासून मुक्त करणे अपेक्षित आहे.
      कमी वयात होणारे मुलींचे विवाह तसेच अल्पवयातील गर्भधारणा आणि अपत्य संख्येवर नियंत्रण नसणे ही देखील काही कारणे कुपोषणास जबाबदार आहे. त्या दृष्टीकोणातून  जनजागरण करुन या काळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे आव्हान यंत्रणेसमोर राहणार आहे. मुळात कुपोषण ही एक सामाजिक समस्या असून आरोग्याबाबत जागरुक न राहिल्याने ही समस्या कायम आहे हे समाजाने समजून घेतले पाहिजे याकरिता गावागावात किर्तन तसेच पथनाट्य आदी माध्यमातून संदेश पेाहचविला जाणार आहे.
      आजही वृत्तपत्रात छापून आलेल्या गोष्टी समाजात मानल्या जातात त्यामुळे या मोहिमेच्या यशस्वी होण्याच्या दृष्टीकोणातून वृत्तपत्रे आणि घरोघरी पेाहोचलेल्या वृत्त वाहिन्यांना आपला वाटा उचलावा लागेल.
      हाताला काम आणि कामाला धान्य अशी संकल्पना राबवून गरीबी रेषेखाली जगणा-यांना महिन्याला पुरेल इतकं धान्य तसेच सरकारी दवाखान्यांमधेन मोफत उपचार सुविधा आदी उपलब्ध असूनही कुपोषण कमी होत नाही ही अतिशय गंभीर अशी बाब आहे.
      सा-या गावानं शासकीय यंत्रणेच्या मदतीनं ही कुपोषणाची समस्या संपविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपली भावी पिढी सक्षम बनवावी इतकच यावेळी सांगता येईल
                                               - प्रशांत दैठणकर

रुपेरी पडद्यावरील संधी …. !


            
  
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फळके यांच्या पहिल्या चित्रपटात स्त्री भूमिका करणारं कुणी मिळालं नाही. समाजाची त्या काळजी रुपेरी पडद्याबाबतची धारणा पूर्णपणे बदलून गेली आहे. आज हाच रुपेरी पडदा करिअरची मोठी संधी बनून स्त्रियांपुढे आलाय. यासंधीबाबत हा खास लेख.
                                                        -प्रशांत दैठणकर  

सौंदर्य ही महिलांची मक्तेदारी आहे असं मानलं जातं आणि याच्याच बळावर महिलांना अनेक क्षेत्रात संधी आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट काढला त्यावेळी त्यांच्या त्या चित्रपटात राज हरिश्चंद्राची पत्नी तारामतीची भूमिका करण्यास स्त्री पात्र उपलब्ध नव्हते मात्र आज हेच चित्र बदललं असल्याचं आपणास दिसेल.


चित्रपट किंवा नाटकात काम करणं काही काळ आधी कमीपणाचं मानलं जायचं पण आता त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत स्त्रियांना करिअर करण्याची संधी आता उपलब्ध आहे. नुसत्या सौंदर्याच्या बळावर यात करिअर घडवयाचं असेल तर मॉडेलिंगचं क्षेत्र हा उत्तम पर्याय आहे.


याच व्यवसायातून आता अभिनय शिकविणा-या संस्था समोर आल्या आहेत.विद्यापीठांमधून अभिनयात पदवी घेणं शक्य आहे. पुण्यातील फिल्म अन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट दिल्लीची ड्रामा अन्ड थिएटर अकादमी. मराठवाड्यात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्शास्त्र विभाग या काही नामांकित संस्थांची नावे यात घेता येतील.


या संस्थांमध्ये अभिनयाच्या जोडीला प्रकाश योजना नेपथ्य तसेच दिग्दर्शन आदींबाबत पदविका ते पदव्यूत्तर पदवी पर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यातून करिअर घडविण्याची संधी मिळू शकते.


याच्याशी संलग्न अशी न्यूज कास्टर होण्याची संधी देखील याच माध्यमातून आपणास मिळते. डेली सोपच्या जमान्यात दुस-या बाजूला वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली आहे. यात वृत्तनिवेदिका म्हणून करिअरचा पर्याय आजकाल उपलब्ध आहे. आता छोट्या शहरांमधून एफ.एम.रेडिओचे जाळे विस्तारताना दिसत आहे. या रेडिओ केंद्रांवर रेडिओ जॉकी होणे ही देखील एक करिअरची उत्तम संधी मुलींना उपलब्ध आहे. शब्दफेक आणि आवाज यांच्या बळावर या क्षेत्रात नाव कमावणं शक्य आहे.


पडद्यावर ज्याप्रकारे संधी आहे त्याच प्रकारची संधी पडद्यामागे देखील आहे. हल्ली इंग्रजी चित्रपट हिंदीत डबिंग करुन दाखवले जातात त्याचप्रमाणे डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक आदी वाहिन्या देखील भारतीय भाषेत प्रक्षेपण करीत आहेत. आवाजाच्या भांडवलावर या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्यात उत्पन्नही चांगले आहे आणि विशेष म्हणजे येणा-या काळात याचा मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्यात उत्पन्नही चांगले आहे आणि विशेष महणजे येणा-या काळात याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे.


कधी काळी वर्ज्य असणारं क्षेत्र स्त्रियांसाठी आता मोठ्या संधीचं क्षेत्र बनलय. यात आपणही करिअर म्हणून निश्चित विचार करायला हरकत नाही


- प्रशांत दैठणकर

Thursday, 3 November 2011

नगर परिषद क्षेत्रामध्ये आचार संहिता लागू


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.3नोव्हेंबर 2011
--------------------------------------------------------------
वर्धा, दि.3- राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या नगर परिषदा, नगर पंचायतांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांचा काय्रक्रम घोषित केला आहे.
 या कार्यक्रमानुसार दिनांक 16 नोव्हेंबर 2011 रोजी जिल्हाधिका-यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करावयाचा आहे. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, पुलगाव, आर्वी, सिंदी, हिंगणघाट या नगर पालिकांच्या निवडणूका घेण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे संबंधीत नगर परिषद क्षेत्रामध्ये दि. 1 नोव्हेंबर 2011 पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचार संहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                      0000

फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा


प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.3/11/2011
-------------------------------------------------------------------------
          फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा
वर्धा,दि.3-जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालयाचे फिरते नांव नोंदणी पथकाचा माहे नोव्हेंबर2011 दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
      दि. 6 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, आष्टी, दि. 7 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कारंजा, दि. 10 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, आर्वी, दि. 12 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, सेलू, दि. 15 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, समुद्रपूर, दि. 16 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती हिंगणघाट, दि. 18 नोव्हेंबर रोजी नगर परिषद पुलगांव, दि.19 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, देवळी येथे नोंदणी करण्यात येणार आहे.
      नोंदणी करणा-या इच्छूक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या मुळ प्रती, जातीचे मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वत: हजर राहून करुन घ्यावी.
                              0000

ई-गव्हर्नन्सचं पाऊल ...!

 शासनाने ई-गव्हर्नन्स धोरण जाहीर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नागरिकांना गतिमान आणि पारदर्शी सेवा देणं या उद्देशाने हे पाऊल टाकलय त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्याची आता वेळ आली आहे. याबाबत माहिती देणारा लेख.
-प्रशांत दैठणकर


जग झपाट्याने बदलत आहे त्याला कारण अर्थातच झपाट्याने बदलत असलेलं तंत्रज्ञान हेच आहे. तंत्रज्ञान बदलण्याचा झपाटा इतका प्रचंड आहे की आपण त्यांच्या वेगासोबत वेग राखणं अवघड बनलं आहे. मात्र आपण हा वेग राखला नाही तर निश्चितपणाने आपण लगेच आऊटडेटेड ठरण्याची शक्यता देखील वाढली आहे.
दळणवळण क्षेत्रात गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. यात सुरुवात अर्थात उपग्रहाच्या आधाराने संपर्क साधणं शक्य झाल्यानंतर टेलिफोनचं रुप बदललं. घरात दिवाणखान्यात असणारा हा डबा खिशात मिरवायला लागला त्यात झपाट्याने संशोधन आणि विकास झाल्यामुळे आता हा मोबाईल फोनने थेट इंटरनेट सर्फींगचा पल्ला गाठत आहे.
सध्या भारतात थ्री जी तंत्राची चर्चा सुरु आहे काही कंपन्यांनी ही सेवा उपलब्ध करुन दिली असली तरी व्हिडिओ कॉलिंगला मर्यादीत ठेवण्यात आलं आहे. याच सुमारास विकसित देशांमध्ये त्याच्याही पुढचं पाऊल असलेल्या 4–जी तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे हे उल्लेखनीय आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आलं आहे या नव्या माध्यमानं प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं नवं दालन खुलं करुन दिलेलं आहे मात्र आजही या तंत्राचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला नाही तीच बाब थ्री – जी तंत्रज्ञानाची आहे. या दोन्ही बाबी अद्याप सामान्यांच्या आर्थिक क्षमतेत बसणा-या नाहीत त्यामुळे याच्या प्रसारावर मर्यादा आहेत.
 हे युग संगणक युग आहे त्यामुळे प्रत्येकाने संगणकाचा वापर आता शिकलाच पाहिजे. येणा-या काळात गतिमानता आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स ची अंमलबजावणी होणार आहे. शासनाने त्याबाबतचं धोरण देखील नक्की केलेलं आहे आणि त्या दृष्टीकोनातून काम सुरु झालेलं आहे.
नागरिकांना गतिमान आणि पारदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न सर्वच स्थरात सुरु झालेला आहे. टाळी एका हातानं वाजत नाही या उक्तीप्रमाणे शासनोन एक पाऊल उचललं आहे. आता नागरिकांनाही आपलं कर्तव्य म्हणून पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे.
शासनाच्या सा-या सेवा येणा-या काळात ऑनलाईन होवू घातल्या आहेत. सध्या नोकरभरती याच पध्दतीने होत आहे. इतकेच नव्हे तर विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश देखील याच पध्दतीने होताना आपणास दिसतील. त्यामुळे येणा-या काळात होणा-या बदलांची दखल सर्वांनी घेतली तर गतिमान पध्दतीने कामे शक्य होणार आहेत.
- प्रशांत दैठणकर    

.....बचतगटामुळे सक्षमीकरण

      ग्रामीण भारतात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळेच आता महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने संसाराचा भार उचलत असल्याचे दिसते. या बचतगटांच्या वाटचाली बाबत हा खास लेख.
                                    -प्रशांत दैठणकर

     देशाच्या लोकसंख्येने नुकताच नवा उच्चांक गाठला त्या पाठोपाठ आता जगाची लोकसंख्या देखील नव्या टप्प्यावर पेाहोचली आहे. 700 कोटींचा आकडा आता ओलांडला गेला आहे. भारताचं मोठ्या प्रमाणावर नागरीकरण सध्या सुरु आहे. असं असलं तरी बहुतांश भारत आज ग्रामीण भागातच आहे. ग्रामीण भागात सध्या आर्थिक स्तर उंचावणे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न शासन स्तरावर सुरु आहेत. त्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना एक महत्वाची योजना आहे. त्याच्याच जोडीला महिला बचतगटांची चळवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक स्तर उंचावण्यात मदत करणारी ठरली आहे.
     लहान प्रमाणात बचत करुन त्या बचतीच्या आधारे गृहउद्योग आणि इतर कुटीरोद्योग सुरु करण्यासाठी शासन बँकांच्या मदतीने 4 टक्के व्याजदराने वित्तसहाय्य उपलब्ध करुन देत असल्याने या बचत गटांना व्यवसाय वाढविण्याची संधी मिळत आहे.
   जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाने या कामी पुढाकार घेतला असल्याने मोठ्या प्रमाणावर ही बचतगटाची संकल्पना विस्तारली गेली आहे. केवळ उत्पादनासाठी आर्थिक मदत देण्यापर्यंत मर्यादीत न राहता यात सातत्य राखण्यासाठी संघटिका आणि संयोगिनी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन देणे त्या सोबतच या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने प्रदर्शन व विक्री यासाठी मेळावे आयोजित करणे अशा उपक्रमातून या बचतगटांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळाले आहे.
     बचत गटाच्या चळवळीतून आपणही आर्थिकदृष्ट्या सक्षम होवू शकतो असा आत्मविश्वास ग्रामीण महिलांमध्ये जागा झाला आहे. शहरात शिकलेल्या स्त्रिया नोकरी करतात त्याप्रमाणे आपणही स्वयंरोजगार निर्माण करुन त्यातून इतरांना रोजगार देवू शकतो असा विश्वास आता या महिलांमध्ये आलेला आपणास दिसतो.
     कायम पुरुषांच्या कमाईवर अवलंबून राहणा-या स्त्री ला आता स्वत:च्या उत्पन्नाचे कौतूक नाही तर मोठा आधार झाला आहे. या बचतगटांमुळे अनेक संसार सुरळीत झाले असून, या महिला शक्तीला जीवनाचा मार्ग सापडला असल्याने त्यांच्या चेह-यावर समाधानाचे हसू उमटल्याचे चित्र आता दिसत आहे.
- प्रशांत दैठणकर