Wednesday, 5 October 2011

पटपडताळणीचे साध्य !


विशेष लेख                   जिल्हा माहिती कार्यालय      
   वर्धा, दि.5/10/2011

       राज्यात 3 त 5 ऑक्टोंबर दरम्यान शालेय पटपडताळणी एकाच वेळी करण्यात आली. यात कागदावरच शिक्षण संस्था चालविण्यापासून पटसंख्या वाढवून शासकीय अनुदान लुटणा-या संस्था आणि संस्थाचालकांचे पितळ उघडे पडले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक अशा या पटपडताळणीत काय साध्य झाले याबाबत केलेला हा उहापोह.                          - प्रशांत दैठणकर
      शासन ही प्रभावी यंत्रणा आहे आणि मोठमोठी किचकट वाटणारी कामे देखील ही यंत्रणा सहजरित्या पार पाडू शकते हेच शालेय पटपडताळणीच्या रुपाने आढळून आलय. शिक्षणाची दुकानदारी करुन त्यात शिक्षणाचा मुळ हेतू बाजूला ठेवून केवळ कमाईसाठी शिक्षण संस्था काढणा-यांना या पडताळणीमुळे चांगलाच चाप बसणार हे स्पष्ट आहे.
     शिक्षण हा जीवनाचा मुलाधार आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण किमान प्राथमिक शिक्षण मिळालेच पाहिजे असा कायदा शासनाने केला आहे. शासन स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शाळा चालवून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नाही म्हणून खाजगी संस्थांना शाळा काढण्याची व अनुदान देण्याची भूमिका शासनाने घेतली मात्र कालांतराने यात अनुदान लाटण्याची शर्यतच लागली.
बदलत्या काळात मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढत आहे त्यामुळे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले. त्याप्रमाणात शिक्षकांच्या  जागा अतिरिक्त ठरायला हव्या होत्या मात्र शाळेतील पटसंख्येच्या आधारे शिक्षक नियुक्त करणे थांबलेले नाही.
      अनुदानीत संस्थांमध्ये आरंभी मानधन तत्वावर नेमणूक द्यायची आणि प्रत्यक्षात शासनाकडे मात्र नियमित नेमणूक दाखवायची या दोन वेतनातील फरक संस्था चालक घेतात असे प्रकार अनेक शाळांमधून दिसून येतात. पटसंख्येच्या आधारे नात्यातील व्यक्तींच्या नेमणूका करण्यापासून पुढे संपूर्ण शाळाच कागदावर उभी करुन चालवणारेही यातून समोर येत आहेत.
      शासनाने विद्यार्थ्यांना शाळेतच एकवेळ सकस आहार मिळावा तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढावे याकरिता माध्यान्ह आहार योजनेत शिधा द्यायला सुरुवात केली. यात धान्य मिळते सोबतच प्रति विद्यार्थी शिजविण्यासाठी पैसे देखील मिळतात. असे मिळणारे दुहेरी लाभ बनावट हजेरीपटाने वाढवता येतात तसेच पैसे घ्यायचे आणि मिळणारे धान्य बाजारात विकायचे असा प्रकार करणा-या संस्था आहेत.
शहरांमधील कित्येक नामांकित संस्था या प्रकारे शासनाची फसवणूक करतात हे स्पष्ट होत आहे. असे धान्य विकणा-यांवर आणि खरेदी करणा-यावरही कारवाई होण्याची गरज आहे.
     शाळेत इतरही अनेक सुविधांसाठी शासन विविध माध्यमातून पैसा पूरवित आहे. दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग होणे व मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा मुलांचा हक्क आहे.
     या शालेय संस्थांना शालेय अनुदान ज्यात वेतन व       भत्‍त्यांवर सर्वाधिक रक्कम खर्च होत असते. सोबतच शालेय पूरक अनुदान त्याचप्रमाणे क्रीडा अनुदान अशा विविध प्रकारचे अनुदान दिले जात असते. ते योग्यरित्या खर्च न होणे ही गंभीर बाब आहे परंतु काही संस्था हा प्रकार सर्रास करतात हे देखील पटपडताळणीत समोर आलेले आहे.
नेमणूक करण्यात आलेले शिक्षक पात्रता प्राप्त असले तरी त्यांना शिकवता येत नाही असाही प्रकार काही शाळांमधून समोर आलेला आहे. ज्या मुलांना आपण देशाचं भविष्य म्हणून बघतो त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले तरच पुढे संधी मिळणार आहे. उगाच शिकलो आहे म्हणण्यासाठी शिक्षण होत असेल तर त्याचा उपयोग काहीच नाही हे आपण मान्य केले पाहिजे.
     शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणा-या  सुविधा महत्वाच्या असतात. अनेक शाळांमधून मुलांना साधे स्वच्छ पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी खेळायला पटांगणच नाही अशी परिस्थिती आहे अशा स्थितीत मुलांचा सर्वांगिण विकास कसा होणार असा सवाल पडतो.
     या सर्व बाबींमुळे शालेय पटपडताळणीचा हा राज्यव्यापी उपक्रम आवश्यकच होता हे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण राज्याची संकलीत आकडेवारी समोर आल्यावर हे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
                        000000      

Monday, 3 October 2011

शालेय पटपडताळणी 2011


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.3 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------



              शालेय पटपडताळणीचे काम
             जिल्ह्यात एकाच दिवसात पूर्ण
वर्धा,दि.3-शाळा शाळांमधून प्रत्यक्ष  भेट देऊन शाळांकडून प्राप्त हजेरीपटांच्या पडताळणीचे काम वर्धा जिल्हयात आज पार पडले. जिल्हा प्रशासनाने मोठया प्रमाणावर यावर जोर दिला होता. स्वत: जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी काही शाळांना भेटी देऊन पडताळणीची पहाणी केली.
शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग वगळून इतर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही पडताळणी केली. राज्यात एकाचवेळी 3 ते ऑक्टोंबर या कालावधीत पडताळणी करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवसात तपासणी पूर्ण करण्याचानिर्णय जिल्हाधिकारी भोज यांनी घेतला व त्यानुसार हे काम झाले.
प्रशिक्षणाच्या दुस-या टप्प्यानंतर कालच सर्व पथकांना साहित्य वाटप करण्यात आले होते. या कामी 392 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. याकामी 150 वाहनांचे अधिग्रहण करण्यात आले होते. उपविभाग स्तरावर नियंत्रण ठेवण्यात आले. तर या तपासणीसाठी 13 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.    2 लाख 44 हजार 47  विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीच्या या कामात 2000 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग होता.या सर्व व्यवस्थेमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी समन्वय राखला.                                                         1451 शाळांमधील या तपासणीसाठी 15 पोलिस पथके निर्माण करण्यात आली होती. पडताळणीचे चित्रिकरण करण्यासाठी 373 कॅमेरे लावण्यात आले.              
जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी काही शाळांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच सुविधांबाबत पहाणी केली. लोकनायक विद्यालय हिंदनगर येथे पत्र्याच्या शेड मध्ये वर्ग भरता व लगतच उघडी विहीर आहे असे आढळून आले. ही विहीर झाकण्याची सूचना जिल्हाधिकारी भोज यांनी केली.
     यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी धार्मिक, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, तहसीलदार सुशांत बनसोड आदींनीही पहाणीत सहभाग घेतला.
     या शालेय पटपडताळणीत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नाव लिहिता न येणे तसेच जूलै व ऑगस्टच्या विद्यार्थी संख्येत तफावत काही ठिकाणी निदर्शनास आली.
     शासनाने नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर अशी पटपडताळणी केली त्यावेळी 20 टक्के विद्यार्थी बोगस आढळले होते. शासनस्तरावर याचा अहवाल प्राप्त झाल्यावर संपूर्ण राज्यात अशी संख्या सापडली तर शासनाचे 5000 कोटी रुपये वाचतील यासाठी हा राज्यभर पटपडताळणीचा निर्णय शासनाने घेतला आहे.

व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 3 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.3- व्यसनाचा समाजावर कुटुंबावर, आरोग्यावर वाईट परिणाम होऊन मनुष्याची सर्व दृष्टीने हानी होते. ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने  या कार्यक्रमाची सुरुवात 1951 साला पासून झाली जिल्ह्यात 61 वा व्यसनमुक्ती सप्ताह आयोजित करण्यात आला असून महात्मा फुले यांनी सुरु केलेला दारुबंदीचा वारसा पुढे सुरु ठेवण्याचा निश्चित करण्यात येत आहे. काल पासून महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री यांचे जन्म दिनाचे औचित्य साधून युवा वर्गाला व्यसनापासुन दूर ठेवण्यासाठी व्यसनविरोधी सप्ताह पाळण्याकरीता कार्यक्रम हाती घेण्यात आला आला असून काल पासून या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे.
     व्यसनमुक्ती सप्ताहाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
     दि. 4 ऑक्टोंबर रोजी युवक मेळावा अनिकेत समाज कार्य महाविद्यालय, वर्धा, दि. 5 ऑक्टोंबर रोजी कामगार मेळावा व कार्यशाळ, अंध विद्या मंदिर वर्धमनेरी, दि. 6 ऑक्टोंबर रोजी युवकांची कार्यशाळ अनिकेत समाज कार्य महाविद्यालय, वर्धा , दि. 7 ऑक्टोंबर रोजी चर्चासत्र , डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविदृयालय, वर्धा, आणि दि. 8 ऑक्टोंबर रोजी कार्यक्रमाची सांगता डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, वर्धा येथे होईल.असे समाज कल्याण विभाग, जि.प. वर्धा यांनी कळविले आहे.
                        0000000

Sunday, 2 October 2011

साधेपणाचं जगणं बापूचं


रविवार, २ ऑक्टोबर, २०११
बापूंच्या आश्रमात आज लगबग नव्याने सुरु होती.. अखंडपणे सूत कातण्याचा उपक्रम सुरु झालेला.. एका बाजूला प्रार्थनेचे स्वर कानावर येत आहेत.. नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली... पालकमंत्री राजेंद्र मुळक स्वत: चरख्यावर सूत कातायला जमिनीवर बसले आहेत हे चित्र आजचे गांधी जयंतीच्या निमित्तानं बापूंचा निवास राहिलेल्या सेवाग्राम आश्रमातले आहे.

आश्रमाच्या दारातून आत जातानाच आपण साधेपणा आपोआप जगायला लागतो याचा प्रत्यय या ठिकाणी नेहमीच येतो गांधी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रमाचा हा परिसर गर्दीने फुलला होता तरी त्यात साधेपणाची झलक स्पष्टपणे जाणवत होती.

कुटीत बापूंच्या आसनासमोरील जागेवर बसून उपस्थित सर्वांनी प्रार्थना केली. सोबत जिल्ह्याचे खासदार दत्ता मेघे व इतरांचा समावेश होता. आश्रमाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. असे आश्रम समितीचे अध्यक्ष मा.म.गडकरी यावेळी माहिती देत होते.

आपणही नकळत या वातावरणाने भारावून त्या जुन्या काळात जातो. १९३६ पासून १९४६ पर्यंतचा तो काळ बापूंचा इथं निवास होता आणि सा-या देशाचं केंद्रस्थानच वर्धा व सेवाग्राम बनलं होतं इथच प्रार्थना सभेत बापूंनी प्रथम चले जाव ची घोषणा केलेली.

अनेक चळवळींचा इतिहास इथच घडला आणि याच परिसरात अनेकांनी वास्तव्य केले. बापू नावानं जग आज त्यांना सारं जग ओळखतं... मोहनदास करमचंद गांधी यांचा बापू पर्यंतचा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. महात्मा म्हणून ज्या व्यक्तीची ओळख निर्माण झाली ते महात्मा गांधी केवळ व्यक्ती नसून एक संस्थान, एक विद्यापीठ होते. भारतीय स्वातंत्र्याचं अधिष्ठान होते.

बापूंनी लावलेल्या हिंदीच्या रोपटयाचं रुपांतर आता जगातील अग्रगण्य भाषेचा वटवृक्ष होण्यापर्यंत झालय. खादीची चळवळीने ग्रामीण भागात आर्थिक सुबत्तेचा मार्ग दाखविला तर कुष्ठरोग्यांच्या सेवेने या समाजाबाहेर टाकलेल्या व्यक्तींना समाजात स्थान मिळाले.

एक ना अनेक बापूंचं कार्य याच ठिकाणी असलेल्या वास्तवात वाढतच होतं... या ठिकाणच्या प्रत्येक वास्तूला बापूंचा स्पर्श लाभलाय.

आजही आश्रमात ते साधंपण आणि तो दिनक्रम जसाच्या तसा जपला जातो. इथं नित्यनेमानं प्रार्थना होते आणि सूतकताई देखील होते. आश्रम परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम या ठिकाणी राहणारे स्वयंसेवक करतात.

एकदा बापूंच्या वाढदिवसाला त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांनी तुपाचा दिवा लावला त्यावेळी देशात अनेक घरात चूल पेटत नाही अशा स्थितीत आपण तुपाचा दिवा लावणं योग्य नाही असं बापूंनी सांगितलं होतं तेव्हा पासून साधेपणानं वाढदिवस होते आजही तो साधेपणा ठळकपणे जाणवत होत.

बापूंच्या आश्रमातून पुढील कार्यक्रमास निघताना देखील मनाचा हा भूतकाळातील प्रवास सुरुच होता.....

प्रशांत दैठणकर
महान्यूज वरून साभार
'महान्यूज 'मधील मजकूर आपण 'महान्यूज' च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या दौ-यातील क्षणचित्रे


सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

सेवाग्राम आश्रम

यात्री निवास

विकास भवन

विकास भवन

विकास भवन

विकास भवन

विकास भवन
------------------------------------------------------
सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण
वर्धा गटाच्या कामाचा शुभारंभ
महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.२ ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------         
     वर्धा, दि.2- वर्धा जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण कामाच्या वर्धा गटातील कामाचा शुभारंभ पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते झाला.
     वर्धा पंचायत समिती येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी जयश्री भोज, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. मोहन यांची प्रमुख उपस्थिती होती.
     जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात होणार असलेल्या या सर्वेक्षणात शहरी भागाचा समावेश आहे. यासाठी खास असे संगणक भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यां कंपनीने पुरविले आहेत.
     एक प्रगणक त्यासोबत संगणक चालक असे संयुक्तपणे हे काम करणार आहे. यात थेट संगणकात माहिती साठवून ती दैनंदिनरित्या एकत्र करण्याचे निश्चित करण्यात आले आले. यासाठी तालुकास्तरावर यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे.
                     00000
    


सामाजिक बांधिलकीचे उपक्रम यशस्वी करा - राजेंद्र मुळक


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.२ ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------ 
वर्धा, दि. 2 - सामाजिक बांधिलकी असणा-या तीन महत्वपूर्ण योजनांची गांधी जयंती दिनी होत आहे. यामध्ये वर्धा जिल्हा अग्रेसर राहील या दृष्टीने अधिका-यांनी काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. राजेंद्र मुळक यांनी आज येथे केले.

     गांधी जयंतीचे औचित्य साधून आज जिल्हाभरात स्वच्छता उत्सव तसेच सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण मोहिम आणि व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. राजेंद्र मुळक यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
     या कार्यक्रमास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडहाचे उपाध्यक्ष आमदार सुरेश देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच  जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जयस्वाल, उपाध्यक्ष सुनील राऊत, सभापती (अर्थ) महानामा रामटेके, सभापती (महिला व बालकल्याण) रजनी देशमुख, सभापती (समाज कल्याण) महानंदा कंगाले, जिल्हाधिकारी जयश्री भोज तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
     या प्रसंगी स्वच्छता उत्सवादरम्यान विविध स्तरावर आयोजित करण्यात कार्यक्रमांची माहिती शेखर चन्ने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये दिली.
सामाजिक, आर्थिक व जातसर्वेक्षण मोहिमे दरम्यान येणारी कार्यवाही तसेच वर्धा जिल्ह्यात होणार असलेल्या शालेय पटपडताळणीच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारी संगणीकृत सादरीकरण जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी यावेळी केले.
     पालकमंत्री मुळक यांच्या हस्ते याप्रसंगी व्यसनमुकती व स्वच्छता सप्ताहानिमित्त खास मशाल प्रज्वलीत करण्यात आली.
     कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. मोहन यांनी केले.
                     00000


महात्मा गांधीजीचे विचार युवा पिढीसाठी प्रेरणादायी आठ एकर क्षेत्रावर भव्य संकुल उभारणार - पालकमंत्री


                   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.२ ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------
सेवाग्राम आश्रमात पालकमंत्री राजेद्र मुळक व खासदार दत्ता मेघे प्रार्थना करताना
वर्धा,दि.2-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटीश विरुध्द लढा पुकारुन त्यांनी अहिंसक चळवळीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य प्राप्त करुन दिले. त्यांची साधी राहणी व उच्च विचार सर्वांसाठी स्फुर्तीदायक असून, त्यांचे आचार व विचार युवा पिढीसाठी आजही प्रेरणादायी आहेत. असे प्रतिपादन वित्त व नियोजन  व जलसंपदा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले.
2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजीची जयंत सेवाग्राम आश्रमात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्याप्रसंगी आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार दत्ताजी मेघे, आमदार सुरेश देशमुख, आमदार राऊत,जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज,उपाध्यक्ष सुनिल राऊत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.म. गडकरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
महात्मा गांधीजीच्या परीसराचा विकास करण्यासाठी शासनाने गांधीजींच्या विचारावर आधारीत भव्य संकूल उभारण्याचा निर्धार केला असल्याचे नमुद करुन पालकमंत्री मुळक म्हणाले की या संकुलामध्ये एक मोठे वाचनालय, ग्रंथ व प्रबंधावर संशोधन कक्ष, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विषयावरील अनेक मान्यवरांचे पुस्तके त्यामध्ये असतील. ज्यामुळे परदेशातील व देशातील विद्यार्थ्यांना अभ्‍यासासाठी हे संकूल महत्वाची भूमिका प्रदान करेल. आज ज्ञान विज्ञानाच्या कक्षाची व्याप्ती वाढत असून, महात्मा गांधीजींच्या विचाराचा ठेवा चिरंतर टिकवून राहावा
यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करण्यात येत आहे. सेवाग्राम परिसरात आठ एकर जागा आश्रम प्रतिष्ठानाने दिलेली असून, दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या आधारावर एक भव्य संकूल बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. 
   येत्या डिसेंबर 2011 मध्ये नागपूर अधिवेशनात निधीची पुरवणी मागणी मंजूर केल्यानंतर या संकूलनाच्या विकास कामाला गती येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गांधीजीचे कार्य समाजाच्या प्रगतीसाठी होते. त्यांचे त्यागमय  व संघर्षमय जीवन  सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून प्रत्येकांनी सत्य व अहिंसेचा मार्ग आत्मसात केला पाहीजे असे आवाहन करुन बोटीबोरी ते सेवाग्रामच्या चौपदरी मार्गाचे काम पूर्ण झाल्या नंतर अहिंसा महामार्ग असे नामकरण करण्याचा विचार असून तांत्रीक बाबी तपासल्या नंतरच या मार्गाचे नामकरण केल्या जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार दत्ता मेघे म्हणाले की,सेवाग्रामच्या विकासासाठी कटिबध्द असून, गांधीजीच्या विचारांची बांधीलकी समाजाला स्फुर्ती देणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मंत्रीमहोदय व अन्य मान्यवरांनी आद्य आदी निवास, आदी निवास व बापू कुटीला भेट देवून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. तसेच पालकमंत्री मुळक व खासदार दत्ताजी मेघे यांनी चरख्यावर सुत कताई केली. यावेळी नशाबंदी मंडळाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी विदर्भ युवक बिरादरीच्या युवकांनी महात्मा गांधीजीचे लोकप्रिय भजन म्हटले. याप्रसंगी महात्मा गांधीजीच्या जीवनावर श्रीकांत भाई यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, उद्योजक प्रविण हिवरे, उपसरपंच सुनिल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मालती देशमुख यांनी तर आभार विनोद भाई यांनी मानले.
                  000000