Wednesday, 28 September 2011

ई-शिष्यवृत्तीच्या प्रक्रीयेचे उद्या मार्गदर्शन


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.28 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------
           
     वर्धा,दि.28-महाविद्यालयात शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीचा पुर्ण लाभ मिळावा याकरीता ऑनलाईन प्रक्रियेव्दारे अर्ज भरण्याची कार्यवाही संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे.
     विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयाचे सभागृहात दि. 29 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 11.30 वाजता मॅस्टेक कंपनीचे प्रतिनिधी आणि विभागीय समाज कल्याण अधिकारी, नागपूर सदर योजनेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
     दि. 29 सप्टेंबर 2011 रोजी होणा-या शिबिरात वर्धा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील संबंधीत प्राचार्य तसेच त्यांचे प्रतिनिधी यांनी ई-स्कॉलरशिप ऑन लाईन अर्ज भरण्यासाठी विहित पध्दतीबद्दल शंका-समाधान करुन घ्यावे.
     भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देय राहणार नाही. त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची व महाविद्यालयांची राहील. अर्ज भरण्याची कार्यवाही दि. 15 ऑक्टोंबर 2011 पावेतो पूर्ण करण्यात यावी, असे आवाहन विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                         00000

Tuesday, 27 September 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती,बुधवार दि.28/9/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
967.76 मि.मी.
0.12 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू आहे
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा - 947.75(निरंक)मि.मी.
2)सेलू - 996(1) मि.मी.
3)देवळी -994.02(निरंक) मि.मी.
4)हिंगणघाट-857.3(निरंक) मि.मी.
5)आर्वी -1085.3(निरंक) मि.मी.
6)आष्टी -783.8(निरंक) मि.मी.
7)समुद्रपूर -1165.6(निरंक) मि.मी
8)कारंजा-920.10 (निरंक) मि.मी.

Monday, 26 September 2011

‘स्‍वागत स्‍त्री जन्‍माचे’




झाशीची राणी लक्ष्‍मीबाई, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, चांदबिबी, रजीया सुल्‍तान, मदर तेरेसा, कल्‍पना चावला ही नावे की डोळ्यासमोर आली की या महात्‍म्‍यांचा आदर्श उभा राहतो. इतिहासात या स्‍त्रियांनी स्‍वकर्तुत्वाने उंचीचे शिखर गाठले. वर्तमानकाळातही ब-याच महिला आजच्‍या पिढीच्‍या आदर्श ठरत आहेत. हे सर्व ठिक असले तरी समाजात दिवसेंदिवस महिलांचे कमी होणारे प्रमाण पाहिले तर भविष्‍यात आदर्शसाठीच नव्‍हे तर आई, बहिण किंवा पत्‍नी म्‍हणून स्‍त्री राहील का, असा प्रश्‍न निर्माण होतो.

दिवसेंदिवस समाज प्रगत होत असला तरी स्‍त्री भ्रूण हत्‍येसारखे प्रकार आजही घडतात, ही शोकांतिका आहे. सुरुवातीच्‍या काळात महिलांचे अधिकार नाकारण्‍यात येत होते. आता मात्र महिलांनाच नाकारण्‍याचा आणि तिला जन्‍मालाच न येऊ देण्‍याच्‍या मानसिकतेमुळे मुलींचे प्रमाण कमी होत आहे. १९९१ मध्‍ये दर हजारी पुरुषांमागे स्‍त्रियांचे प्रमाण ९४६ होते. हाच आकडा २००१ च्‍या जनगणनेत ९१३ वर आला. तर आता २०११ मध्‍ये दरहजारी पुरुषांमागे केवळ ८८३ स्‍त्रिया असल्‍याचे विदारक सत्‍य समोर आले आहे. त्‍यामुळे समाजात महिलांचे प्रमाण वाढविण्‍यासाठी आणि स्‍त्री भ्रूण हत्‍येविरोधात जनजागृती करण्‍यासाठी परभणी जिल्‍ह्यात महारॅलीच्‍या माध्‍यमातून ‘स्‍वागत स्‍त्री जन्‍माचे’ अभियान राबविण्‍यात आले. परभणी जिल्‍ह्यातून या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाचे औचित्‍य साधून हुतात्‍म्‍यांना आदरांजली वाहिल्‍यानंतर या महारॅलीला सुरुवात झाली. परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाच्‍या प्रांगणात पालकमंत्री प्रकाश सोळंके, सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंबकल्‍याण राज्‍यमंत्री प्रा. फौजिया खान यांच्‍या उपस्‍थितीत या महारॅलीला सुरुवात झाली. ही रॅली शिवाजी महाविद्यालय, वसंतराव नाईक पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, शिवाजी चौक, जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय या मार्गाने गेल्‍यानंतर इदगाह मैदानावर स्‍त्री भ्रूण हत्‍येविरोधात उपस्‍थितांनी शपथ घेतली.

या रॅलीत नगर परिषद, माधव ए.एन.एम. स्‍कूल, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्‍वीन्‍स हायस्‍कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, महिला आणि पुरुष होमगार्ड, जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय परिचारीका प्रशिक्षण केंद्र, भारत भारती माध्‍यमिक विद्यालय, मुंजाजी विठ्ठल शिंदे विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, राष्‍ट्रीय सेना, नूतन विद्या मंदिर, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय, मराठवाडा हायस्‍कूल, प्रभावती विद्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, परिवहन महामंडळ, तिरुपती नर्सिंग स्‍कूल, जिल्‍हा कोषागार कार्यालय, भदंत रुपाली हायस्‍कूल, जीवन प्राधिकरण, शारदा महाविद्यालय, सामाजिक न्‍याय विभाग, सुहेब ऊर्दू हायस्‍कूल, संबोधी माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक हायस्‍कूल, महात्‍मा फुले माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय सहभागी झाले होते. विद्यार्थ्‍यांच्‍या हातात महिलांचे महत्‍त्‍व विशद करणारे विविध फलक होते. सर्वांचा कळवळा एकच की उमलत्‍या कळीला मारू नका. तिलाही जग पाहू द्या.

विशेष म्‍हणजे रॅलीच्‍या सुरुवातीला स्‍वागत अश्‍व, पोलीस बॅन्‍ड, अश्‍वरुढ झाशीची राणी, होमगार्डच्‍या तुकड्या, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील मुलांचे शिस्‍तबध्‍द पथसंचलन नागरिकांचे लक्ष वेधत होते. तसेच स्‍त्री भ्रूण हत्‍येविरोधात विविध शाळा, महाविद्यालये तथा शासकीय कार्यालय व संस्‍थांच्‍यावतीने विविध प्रकारचे सजिव देखावे आणि चित्ररथ साकारण्‍यात आले होते. तसेच विविध कला पथक पोवाडे, लोकगितांच्‍या माध्‍यमातून प्रबोधन करीत होते. याशिवाय पालखी आरुढ असलेल्‍या जिजाऊंच्‍या वेशातील, झाशीच्‍या राणीच्‍या वेशातील व रजिया सुलतानाच्‍या वेशातील मुलींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या महारॅलीच्‍या माध्‍यमातून सर्वांनीच ‘स्‍त्री जन्‍माचे स्‍वागत करा’ असा संदेश दिला.

 राजेश येसनकर

आधार क्रमांक: वर्धा जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर एकुण लोकसंख्याच्या 53 टक्के नोंदणी पूर्ण


महाराष्ट्र शासन
वृत्त विशेष.क्र.1 *      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.26 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------

वर्धा,दि.26- राज्यात एकूण लोकसंख्येपैकी 2 कोटी 32 लाख 693 जणांची नोंदणी 18 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाली. एकूण लोकसंख्येच्या 21 टक्के नोंदणीचे काम यामुळे पूर्ण झाले. या तुलनेत वर्धा जिल्ह्यात अतिशय वेगाने काम सुरु आहे.
     वर्धा जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी 6 लाख 46 हजार 118 जणांची नोंदणी पूर्ण झाली. याची टक्केवारी 52 टक्के इतकी येते. वर्धेखालोखाल गडचिरोली आणि जालना जिल्ह्याचा क्रमांक येतो. या जिल्ह्यांमध्ये 32 टक्क्यापर्यंत नोंदणी पूर्ण झाली आहे. तिस-या क्रमांकावर गोंदिया जिल्हा असून येथे 30 टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे.
     लगतच्या नागपूर जिल्ह्यात 16 टक्के नोंदणी पूर्ण झाली तर नागपूर मानपा क्षेत्रात 49 टक्के नोदणीचे काम पूर्ण झालेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात नोंदणीचे हेच प्रमाण 16 टक्के इतके आहे.
     वर्धा जिल्ह्यात नोंदणीचे काम करणा-या टेरासॉफ्ट या कंपनीचे अमित बाजिये यांनी सांगितले की जिल्ह्यात नोंदणीसाठी नगारिकांनी स्वत:पुढाकार घेतल्याने इतक्या वेगवान पध्दतीने नोंदणी करणे शक्य होत आहे. याही पुढील काळात नागरिकांचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात महत्वाकांक्षी शालेय पटपडताळणी


 महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.    *             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.26 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.26- शाळांमधील बनावट विद्यार्थी संख्या शोधण्याच्या हेतूने 3 ते 5 ऑक्टोंबर दरम्यान वर्धा जिल्ह्यात शालेय पटपडताळणीचा महत्वाकांक्षी उपक्रमा होत आहे. या उपक्रमासाठी प्रशासनातर्फे जोरदार तयारी करण्यात येत आहे.
     जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी याबाबत आढावा घेऊन  होणा-या पडताळणीबाबत संबंधित अधिका-यांना मार्गदर्शन केले. नांदेड जिल्ह्यात या स्वरुपाचा प्रायोगिक उपक्रम झाला होता त्यात 20 टक्के पटनोंदणी बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकाच कालावधीत ही तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
     वर्धा जिल्ह्यात पहिली ते बारावी अशा प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या दोन हजाराहून अधिक आहे तर यातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे अडीच लाख आहे. या पटपडताळणीचे वैशिष्ट म्हणजे यात शिक्षण विभाग सोडून शासनाचे इतर सर्व विभाग काम करणार आहे. ज्याचे नेतृत्व महसूल विभाग करेल
     जिल्ह्यात शाळांमधून 1 ऑगष्ट 2011 रोजी शाळेतील हजेरी पटाच्या झेरॉक्स प्रती प्रशासनाने प्राप्त करायच्या व त्यानुसार प्रत्येक शाळेत 5 जणांच्या पथकाने प्रत्यक्ष तपासणी करायची असे या तपासणीचे स्वरुप आहे. एकाच विद्यार्थ्यांची दुस-यांदा गणना होवू नये याकरिता निवडणुकीत करतात त्या पध्दतीने मुलांच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर अर्थात तर्जनीवर शाईदेखील लावली जाणार आहे.
     या उपक्रमात येणारे अडथळे लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात 144 कलम लावण्यात येत आहे तसेच संवेदनशील शाळांची यादी करुन या शाळांची विशेष तपासणी होणार आहे. बाजूच्या गावांमधून विद्यार्थ्यांना घेऊन येण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेशही जारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी सांगितले.

Sunday, 25 September 2011

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पंचायत समिती महत्वाची संस्था केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख


  महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. *             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.25 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आर्वी येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन झाले.यावेळच्या छायाचित्रात पालकमंत्री  राजेंद्र मुळक आणि आर्वीच्या नगराध्यक्षा लता तळेकर दिसत आहेत.
 वर्धा,दि.25- ग्रामीण भागात जनतेसाठी पंचायत समिती ही खूप मोठी संस्था असते या भूमिकेतून सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी केले.
     आर्वी येथे बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजेंद्र मुळक तसेच खासदार दत्ता मेघे, आमदार जैनुदीन जव्हेरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील राऊत आर्वीतील काँग्रेस नेते अमर काळे, नगराध्यक्ष लता तळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     मी. माझ्या राजकीय जीवनाची सुरवात ग्रामीण भागातूनच केली त्यामुळे ग्रामीण जनतेच्या समस्यांची मला पूर्ण जाण आहे असे देशमुख यावेळी म्हणाले.
     1 कोटी 30 लाख 12 हजार रुपये खर्चून ही नवी इमारत बांधण्यात आली आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने तसेच सभापती महिला व बाल कल्याण जि.प. सौ.रजनीताई देशमुख, सभापती बांधकाम समिती जि.प. महानामा रामटेके, सभापती पं.स.आर्वी शिवलाल जाधव, गटविकास अधिकारी पं.सं आर्वी संजय दा.वानखेडे, उपसभापती पं.स.अर्वी सौ.मिना देशमुख, जि.प.सदस्य सौ.तृप्ती पावडे, व चंद्रकांत कांडलकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
     यापूर्वी विलासराव देशमुख यांच्या हस्ते आदीवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या इमारतीचे उद्घाटन झाले ही इमारत 1 कोटी 11 लाख आणि 1 कोटी 19 लाख अशा दोन टप्प्यात बांधण्यात आलेली आहे.
     सोबतच शहरातील मटण मार्केटचे भूमीपूजन, पाणीपुरवठा वितरण योजना, रस्ते बांधकाम प्रारंभ आदी विकासकामांचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
                

केंद्रीय मंत्री श्री विलासराव देशमुख यांचा आर्वी दौरा

पंचायत समितीची नूतन इमारत

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह उदघाटन

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह उदघाटन

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह उदघाटन

पंचायत समितीची नूतन इमारत
पंचायत समिती इमारत उदघाटन
पाणी पुरवठा योजना भूमीपूजन
पंचायत समिती इमारत उदघाटन

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह उदघाटन

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह उदघाटन

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह उदघाटन


आदीवासी विद्यार्थी वसतीगृह उदघाटन

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह उदघाटन

आदीवासी विद्यार्थी वसतीगृह इमारतीचे छायाचित्र